News not found!

सुंदर जगण्यासाठी . . .

Magazine Cover

सुंदर जगण्यासाठी चित्रंच काढता आली पाहिजेत किंवा भरतकाम-विणकामच आलं पाहिजे असा काही नियम नाहीय. पण सौंदर्य बघणारी, सुंदर काय आणि असुंदर काय हे समजू शकणारी नजर मात्र हवी. गाणं ऐकणारा कान हवा. सुंदर शब्दामागचा भाव समजून घेणारं मन हवं-सौंदर्याचा आदर करणार्या माणसांचं जगणं सुंदरच असतं. आणि अशा जगण्याचे संस्कार हे आपल्या रोजच्या जगण्यातूनच, रोजच्या व्यवहारांमधूनच व्हायला हवेत. ते आठवड्यातून एकदा ‘पाच ते पाच पंचेचाळीस’ अशा एखाद्या तासात होऊ शकत नाहीत. आपल्या आईबाबांवर, बहीण भावंडांवर प्रेम करायला शिकवणारा तास अभ्यासक्रमात असला तर कसं वाटेल? तसंच आहे हे.

आपण राहातो ते घर, भोवतालचा परिसर, आपलं गाव सुंदरच असलं पाहिजे असा आपल्यापैकी कितीजणांचा हट्ट असतो? स्वच्छ तर असलंच पाहिजे, पण सुंदरही असायला हवं. ‘सुंदर’ म्हणजे नेमकं काय? शाळेत गणित, इंग्रजी शिकवतात, इतिहास, भूगोल शिकवतात, पण आपलं जगणं सुंदर करायला कुठे शिकवतात? आम्ही शाळेत होतो तेव्हा चित्रकला, गायन, हस्तकला वगैरेचे तास म्हणजे आम्हाला शिक्षा वाटत असे. बहुतेक वेळा दुसर्‍या एखाद्या विषयाचा राहिलेला अभ्यास पूर्ण करायलाच हे तास वापरले जात. कधी चुकून चित्र काढायची किंवा गाणं म्हणायची वेळ आलीच तर ते चुकवण्याकडे किंवा थातुर मातुर काहीतरी करण्याकडे सगळ्यांचा कल असे. आता विचार केला की वाटतं शेकडो हजारो मुलांचं केवढं नुकसान झालं. चित्रकलेच्या तासाला बसून एखाद्या वर्गातली साठच्या साठ मुलं चित्रकार होणार होती किंवा गाण्याचा अभ्यास करून मैफली गाजवणार होती असं मुळीच नव्हे. पण चांगलं चित्र बघायला तरी शिकली असती. चांगल्या चित्राचं आणि चांगल्या गाण्याचं एकमेकांशी काही नातं असतं, त्या दोन्हीची चांगली जाण असलेला माणूस उत्तम कविता करू शकतो, कथा रचू शकतो, अगदी थोर शास्त्रज्ञ, आकडेवारीत रमणारा एखादा गणिती हा मुळात कल्पनेच्या राज्यात भरार्‍या मारणारा, स्वप्नं पाहणारा, संवेदनाशील मनाचा कलावंतच असतो. पण हे आम्हाला कुणी सांगितलंच नाही.

घरी तर आनंदी आनंदच! डोळ्यापुढे पुस्तक धरून बसलं किंवा पानंच्या पानं काहीतरी खरडलं की मग मोठ्या माणसांचे आत्मे शांत होत. त्यांच्या मते ते ‘अभ्यास करणं’ असे आणि अशा ‘अभ्यासू’ मुलामुलीचं येणार्या जाणार्यासमोर धाप लागेपर्यंत कौतुक होत असे. पण ते सोडून चित्र काढणं, किंवा कविता वगैरे लिहिणं हे अजिबात नॉट अलाऊड प्रकरण होतं. या गोष्टी आपलं रोजचं जगणं सुंदर, हवंहवंसं करत असतात. त्या टाळून किंवा कमी महत्त्वाच्या समजून कसं चालेल? खरं तर माझ्या मते शाळाबिळा नंतर. आपल्या सुंदर जगण्याच्या शिक्षणाची सुरूवात घरातच व्हायला पाहिजे. मला माहितीय की असं तुम्ही मोठ्या माणसांना सांगायला गेलात की ती नाक फुगवून म्हणणार ‘हॉ! तेवढाच उद्योग आहे आम्हाला? सगळं आम्हीच करायचं तर एवढाले पैसे खर्च करून शाळेत कशाला घातलंय तुम्हाला?’ सध्याच्या परिस्थितीत म्हणाल तर त्यांच्यामागे खरोखरच इतक्या कटकटी असतात की त्यांना असा वैताग येणं साहजिकच आहे. आपण त्यांना रागावण्याची संधीच न देता थोडं समजावून सांगायचा प्रयत्न करूयात.

म्हणजे असं पहा की कटकटी माणसाच्या मागे काही आजच लागलेल्या नाहीयेत. त्या नेहमीच होत्या. प्रकार वेगळे, पण त्रास तोच. माणूस केवळ त्याचाच विचार करत राहिला तर त्याला जगणं अशक्य होऊन जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंद शोधणं आणि आनंद निर्माण करणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि अन्न वस्त्राइतकीच महत्त्वाची गरजही आहे. तुम्हाला शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळाबद्दल थोडी माहिती असेल. माणसाचं आयुष्य तेव्हाही अतिशय कठीण, कष्टाचं होतं. आज आपल्याला सहज मिळणार्‍या सोयी म्हणजे वीज, गॅस, नळाचं पाणी, वेगवान वाहनं वगैरे काहीसुद्धा नव्हतं. माणसाचं आयुष्य कमी होतं कारण लढाया आणि रोगराईमधे खूप माणसं मरत. शिवाय दुष्काळ, महापूर अशी संकटंही होती. पण म्हणून माणसं त्या चिंतेनं सारखी कपाळाला हात लावून बसून राहात होती का? उलट ह्या सर्व काळज्यांमधून जे स्वस्थपणाचे, सुखाचे चार क्षण मिळत ते जास्तीत जास्त आनंदानं कसे घालवता येतील याचाच विचार करत.

तुम्ही कधी पुण्यातलं ‘राजा केळकर वस्तू संग्रहालय’ पाहिलं आहे? म्हणजे पाहिलं असेलच. तिथे अनेक सुंदर वस्तू ठेवलेल्या आहेत. दिवे, समया, आरसे, फण्या, अडकित्ते, विळ्या, रांजण, पानदानं, मसाल्याची पाळी, चुली अशा कितीतरी गोष्टी, त्या बघताना आपण म्हणतो ‘किती सुंदर आहेत ह्या वस्तू!, त्या काळात यंत्रं नव्हती, सर्व गोष्टी हातानं कराव्या लागत. मग इतका सुबक आकार कसा देता आला असेल? इतकं बारीक, शोधून खोट सापडणार नाही असं नक्षीकाम कसं केलं असेल? इतके सुंदर रंग द्यायला कसं सुचलं असेल? खूप प्रश्न आपल्याला पडतात.

आपण हे लक्षात घ्यायला हवं की यातली कुठलीच वस्तू शोभेची म्हणून काचेच्या कपाटात ठेवण्यासाठी केलेली नसे. त्या सर्व रोज वापरण्याच्या वस्तू सुंदर आणि तरीही टिकाऊ असल्या पाहिजेत असा आग्रह होता. यंत्र नसल्यामुळे ती घडवायला किती वेळ लागत असेल? पण घाईनं किंवा कंटाळ्यानं कसंतरी काम करून टाकलंय असं कुठे दिसतं का? शिवाय प्रत्येक वस्तू वेगळी. अशा सुंदर, नखरेल वस्तू वापरणार्या माणसांचं जगणं सुंदर नसेल असं कसं म्हणता येईल.

हे जगणं सुंदर करण्याचं शिक्षण त्यांना कुठल्या शाळेत मिळालं? आजही कोकणातल्या एखाद्या खेड्यात गेलं की झाडीत लपलेली, सारवलेल्या अंगणाची, मातीनं भिंती लिंपलेली कौलारू घरं दिसली की आपण खूष होऊन जातो. ती घरं, ती बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य, त्याचे रंग हे सगळं भोवतालच्या निसर्गाशी सुसंगत असतं, नातं सांगणारं असतं. म्हणून अशा कौलारू घरांच्या गावात एखादीच सिमेंट कॉंक्रीटची चार-पाच मजली इमारत असली किंवा ऑईलपेन्टनं रंगवलेला आडवातिडवा लांब जाहिरातीचा बोर्ड असला तर तो आपल्या नजरेला खुपतो. कारण त्याचा आणि भोवतीच्या दगड- मातीच्या रंगाचा, हिरव्यागार झाडीचा काही संबंध नसतो. पूर्वी माणसांचंही निसर्गाशी जवळचं नातं होतं. आपली घरं, देवळं, आतल्या वस्तू तयार करण्याकरता ती भोवतीच्या निसर्गातूनच साहित्य मिळवत, त्याच्याच रंगांचा उपयोग करीत. हे शिक्षण त्यांना त्यांच्या निसर्गाबरोबर गुण्यागोविंदानं जगण्यातूनच मिळालं होतं. प्लास्टिक, ऑइलपेन्ट, फायबर अशासारख्या कृत्रिम आणि नैसर्गिक साहित्य आणि रंगापासून फटकून असणार्‍या गोष्टी त्याला सापडलेल्या नव्हत्या.

ह्या आधुनिक संशोधनामुळे माणसाची सोय झाली हे खरं आहे, हेही खरं की प्रचंड प्रमाणात होणार्‍या उत्पादनांमुळे गरीब माणसालाही काही गोष्टी विकत घेणं शक्य झालं आहे. पण पूर्वीच्या माणसांनी सोय आणि सौंदर्य यांची जशी सांगड घातली होती, तशी सांगड घालायला मात्र आपल्याला जमलेलं नाहीय. ह्या कृत्रिम साहित्यानं आणि कृत्रिम रंगांनी आपलं जग इतकं व्यापून टाकलं आहे की अस्सल वस्तूंचं सौंदर्य आणि महत्त्व आपल्याला कळेनासंच झालंय. ह्या कृत्रिमतेच्या चकचकाटाला आपण भुलून गेलो आहोत. म्हणून अत्यंत सुंदर काळ्याभोर दगडानं बांधलेली देवळं आपण भडक आणि चकचकीत ऑईलपेन्टनं रंगवतो. खर्या, जिवंत रोपांऐवजी घरात प्लास्टिकची फुलं आणून ठेवतो. देवळांच्या भिंतीवर सुंदर चित्रं काढण्याऐवजी न्हाणीघरातल्यासारख्या चकचकीत फरश्या बसवतो. कुणी म्हणेल भिंती खराब होतात म्हणून आम्ही हे करतो. भिंती खराब कोण करतं? बदाबदा तेल ओतून, हळदकुंकू-बुक्क्याचे हात पुसून आपणच त्या चिकट तेलकट करतो. ह्या सवयी बदलायच्या की फरश्या लावून देव सारखा आंघोळीला बसलाय असं वातावरण निर्माण करायचं?

सुंदर जगण्यासाठी चित्रंच काढता आली पाहिजेत किंवा भरतकाम-विणकामच आलं पाहिजे असा काही नियम नाहीय. पण सौंदर्य बघणारी, सुंदर काय आणि असुंदर काय हे समजू शकणारी नजर मात्र हवी. गाणं ऐकणारा कान हवा. सुंदर शब्दामागचा भाव समजून घेणारं मन हवं-सौंदर्याचा आदर करणार्या माणसांचं जगणं सुंदरच असतं. आणि अशा जगण्याचे संस्कार हे आपल्या रोजच्या जगण्यातूनच, रोजच्या व्यवहारांमधूनच व्हायला हवेत. ते आठवड्यातून एकदा ‘पाच ते पाच पंचेचाळीस’ अशा एखाद्या तासात होऊ शकत नाहीत. आपल्या आईबाबांवर, बहीण भावंडांवर प्रेम करायला शिकवणारा तास अभ्यासक्रमात असला तर कसं वाटेल? तसंच आहे हे.

Comments

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...