आदरांजली – नंदा खरे


आजच्या जगात नंदा खरेंसारखा खराखुरा विवेकवादी लेखक असणे हा अपवादच
म्हटला पाहिजे. ते गेले. ते गेल्याने त्यांची पत्नी आणि निकटतम नातेवाईक,
मित्रमंडळी ह्यांचे खूप काही हरवले. समाजाचे काय हरवले हे बहुतांश समाजाला
अजून कळायचेच आहे. त्यांची बरीच पुस्तके अद्याप अनेकांनी वाचायचीच आहेत;
तेव्हा ते सगळे वाचेपर्यंत बराच काळ जावा लागेल. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ हे त्यांचे
बहुधा पहिले पुस्तक असावे; तेव्हापासून 2050, अंताजीची बखर, संप्रति, जीवोत्पत्ती
आणि त्यानंतर, दगडावर दगड विटेवर वीट, नांगरल्याविण भुई, कहाणी
मानवप्राण्याची, बखर अंतकाळाची, दगड-धोंडे, ऐवजी, वाचताना पाहताना जगताना,
उद्या; आणि भाषांतरे : वारूळ पुराण, इंडिका, ऑन द बीच इत्यादी. इत्यादी
म्हणण्याचे कारण यात काही सहलेखकांसह लिहिलेल्या पुस्तकांचा उल्लेख
माझ्याकडून राहून गेला आहे आणि दुसरे; यात ‘आजचा सुधारक’ या विवेकवादी
मासिकातील लेख, शिवाय इतर, अगदी पालकनीतीतले लेख, समाविष्ट नाहीत.
सहसा एवढी ग्रंथसंपदा असणार्‍या लेखकाने फक्त तेवढेच केलेले असते किंवा तोंडी
लावायला एखादी नोकरी. नंदांचे तसे नाही. ते आयआयटीतून सिव्हिल इंजिनियर
झाल्यावर त्यांनी दोन धरणे आणि अनेको पूल बांधले. बंग दांपत्याच्या ‘निर्माण’
कार्यक्रमात सहभागी झाले. आजचा सुधारकचे अनेक वर्षे संपादन केले, त्याशिवाय
इतर नव्याजुन्या लेखकांना मदत करण्याचे उद्योग चाललेले असतच. यात मुलांच्या
आता बहरलेल्या संसारात लुडबूड न करता आधाराला असण्याचाही भाग असे.
हे सगळे विद्याताई साथीला होत्या म्हणूनच… हे खरेच. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात
विद्याताईंच्या मदतीची जाणीव व्यक्त केलेली असे, तीही ‘मला वेळ दिला’ अशा
प्रकारची नाही, तर केलेल्या लिखाणाचे वाचन आणि सूचना केल्याचे सन्मानाने
म्हटलेले असे.
या पलीकडे अनंत यशवंत उर्फ नंदा खरे हे माणूस म्हणूनही अतिशय उत्तम होते. ते
स्पष्टपणे बोलत; पण त्यात विखार कधीही नसे. इतकी नितळ माणसे आता
बघायलाही मिळत नाहीत. नंदा खरे यांच्या स्मृतीला पालकनीतीचे अभिवादन.