देतो तो देव

माझ्या आईले कोणतीही वस्तू वाटून खाण्याची सवय आहे.

घरी काही वेगळं बनवलं तर आधी मावशीकडे, आत्याकडे आणि काकूकडे नेऊन देते, मग आम्हाले देते.

गरमगरम भाजी असो नाहीतर भजे; आई म्हणते, ‘‘जा आत्या, मावशी अन् काकूले देऊन ये.’’

इथं माज्या तोंडाले पाणी सुटून रायते; पण मले चव घ्यालेबी देईना ती.

एक डाव आमच्याकडे बासुंदी केली, झाली असंल गंजभर तरी;

पण सगळ्याले वाटून आलो तर अर्धा गंज खाली झालता.

आई, बाबा, भाऊ, आजी अन् मी; आमाले किती वाटयाला येणार एक-एक वाटी!

मले तर रागच आला.

मावशी, काकू, आत्या आमाले तर कवाभी देईना काही.

मी धडा वाचला होता ‘देतो तो देव, राखतो तो राक्षस.’

माझी आई देव आहे, सगळे शेजारी राक्षस आहेत.

मलेपण कुणाले काही देऊशा वाटत नाही,

मीपण राक्षस आहे.

 

सोनाली वाघमारे  | इयत्ता सहावी

जि.प.उ.प्रा.शाळा, गोवरी