मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक ३- लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे

मूल ज्या वेगवेगळ्या आठ उद्देशांनी भाषेचा वापर करीत असते, ते आपण मागील लेखांकात पाहिले. त्यांचा उद्देश ओळखण्यासाठी इथे एक स्वाध्याय दिला आहे. मुले जे बोलतात, त्याची उदाहरणे इथे आहेत. आठ निरनिराळ्या उद्देशांनुसार त्यांचे वर्गीकरण करा.

(1) ‘ढग गेले आणि पाऊस थांबला.’

(2) ‘आपडी थापडी गुळाची पापडी.’

(3) ‘असं नको करू. हे बघ इथे गट्टू आहे.’

(4) ‘रोज सकाळी पाणी इतक्या सगळ्या घरांपर्यंत कसं काय पोहोचतं?’

(5) ‘आता मी कप इथे ठेवणार आणि रामूला हाक मारणार.’

(6) ‘जितूकाका आले होते तेव्हा आणला होता ना, तसाच हा खाऊ आहे.’

(7) ‘दिवाळी आली की मला नवीन शर्ट मिळणार!’

(8) ‘तिथे बाजारासारखं होतं – इतकी बदकं होती! नुसता कलकलाट!’

आपल्याच बोलण्याचा आपल्यावरील प्रभाव

मुले ज्या वेगवेगळ्या उद्देशांनी भाषा वापरतात त्याविषयीच्या या विवेचनातून भाषेबद्दलची एक गोष्ट लक्षात येते. भाषा एक विलक्षण लवचिक असे माध्यम आहे. जीवनातल्या जवळजवळ प्रत्येक परिस्थितीत ते माध्यम लागू करता येते.

परिस्थितीनुसार भाषा वळवून – वाकवून आपण परिस्थितीशी अधिक चांगल्या रीतीने जुळवून घेत असतो. दैनंदिन जीवनातच या प्रक्रियेचे कितीतरी दाखले मिळतात. कुणीतरी आपल्यावर रागावले आहे हे जेव्हा आपल्याला कळते, तेव्हा आपण बोलण्यासाठी नकळत असे शब्द आणि सूर निवडतो, की त्यांच्यामुळे आपल्या मनातली दिशा परिस्थितीला मिळते. उदाहरणार्थ – लढायचेच असेल तर आपण कडक शब्द निवडतो; परिस्थिती थंडावण्यासाठी आपण मवाळ शब्द आणि सूर निवडतो.

अतिशय लवचिकपणे भाषेचा वापर करण्याच्या आपल्या क्षमतेनुसार हेही ठरते, की जीवनातल्या विविध प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जाऊन आपण त्यातून तगतो की नाही. एका पातळीवर, एखाद्या परिस्थितीला आपला असणारा प्रतिसाद भाषेतून आपण व्यक्त करतो, तर दुसर्‍या पातळीवर, आपली भाषाच परिस्थितीला आकार देत असते. सतत आपल्या अवतीभवती घडणार्‍या गोष्टींशी जुळवून घेण्यासाठी भाषा आपल्याला मदत करत असते. आपण प्रत्यक्ष त्या प्रसंगात असलो किंवा त्यांच्याबद्दल केवळ विचार करत असलो तरी भाषेची आपल्याला मदतच होते.

एखाद्या प्रसंगाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार असलो किंवा नसलो, तरी त्या प्रसंगाचे वर्णन ज्या भाषेत असते, तिचा आपल्या प्रतिसादावर परिणाम होत असतो. आपल्यापासून दूरदूरच्या ठिकाणी रोज हजारो गोष्टी घडत असतात. वृत्तपत्रातल्या वर्णनांच्या रूपाने त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. घडलेल्या घटनेचे चित्र रंगवण्याची मुभाच एका अर्थाने, वृत्तपत्रे आपल्याला देत असतात. रस्त्यात बघितलेली एखादी गोष्ट जेव्हा मूल आपल्या आईला सांगते, तेव्हा नेमके हेच घडते. वर्णनासाठी वापरलेली भाषा जितकी चपखल, तितके मुलाने किंवा वृत्तपत्राने निर्माण केलेले चित्र नेमके. वर्णन करणार्‍याचा हेतू काय, यावरून वर्णनाची भाषा निवडली जाते आणि त्यामुळे अचूकतेची पातळी कमी अधिक होऊ शकते. मुलाने जर अपघात बघितला असेल, आणि त्यामुळे मूल हबकून गेले असेल तर अपघाताचे वर्णन अतिशयोक्तीकडे झुकणारे असेल. अतिरंजित वर्णन करण्यातून त्याची भीती ‘साधार’ ठरते आणि पाहिलेल्या दृश्याशी जुळवून घेणे, ते दृश्य पचणे मुलाकरता सुकर होते.

आणि शेवटचा मुद्दा म्हणजे भाषा आपल्या अपेक्षांना आकार देते. शांतपणे, व्यवस्थिशीर रीतीने एखादी गोष्ट जो समजावून सांगू शकतो, तो इतरांकडूनही तशीच अपेक्षा करतो. तसेच, ज्याला खोलात जाऊन चौकशी करायला आवडते, त्याला नकळत असे वाटते की इतरांनाही अशी चौकशी करण्यात रस असणार. अशा लोकांनी विवेचनासाठी, किंवा चौकशीसाठी भाषेचा वापर केल्यामुळे, चौकसपणाचे महत्त्व जाणले जाईल असे वातावरण तयार होते. याचीच दुसरी बाजू म्हणजे, समाजात किंवा संस्थेत अशा कारणांसाठी भाषेचा वापरच होत नाही, अशा ठिकाणी वाढणारी मुले, निगुतीने केलेले विवेचन, शांतपणे केलेला वादविवाद यांच्याशी परिचित असण्याची शक्यता फारच कमी. मुख्यत: मुलांना काबूत ठेवण्यासाठीच जर पालक आणि शिक्षक भाषेचा वापर करत असतील, तर भाषा हे इतरांना नियंत्रित करण्याचे साधन आहे असेच मुलांना वाटू लागेल. कुणीतरी सांगितल्याशिवाय काहीही न करणारी मोठी माणसे अशा मुलांमधून तयार होतील.

दृष्टी, क्षमता, वृत्ती, आवडी आणि मूल्ये यांच्यासह मुलाचे व्यक्तिमत्व भाषेतून कसे घडते या मुद्यापासून आपण हे प्रकरण सुरू केले. आता आपण या प्रश्नाचे उत्तर असे देऊ शकू : भाषेने निर्माण केलेल्या वातावरणात मूल जगत असते, लहानाचे मोठे होत असते त्यामुळे मुलाचे व्यक्तिमत्त्वच भाषेतून घडते. हे वातावरण निर्माण करण्यामध्ये शिक्षक मोठाच वाटा उचलू शकतात. मुलाच्या जीवनात भाषा कोणकोणती कामे करते याची जाणीव जर शिक्षकाला असेल, तर मुलाच्या भावनिक आणि बौद्धिक गरजांना शिक्षक प्रतिसाद देऊ शकेल. मुलाने वेगवेगळ्या प्रसंगी वापरलेल्या भाषेला शिक्षक काय प्रतिसाद देतो हे फार फार महत्त्वाचे ठरते. विशिष्ट प्रकारे भाषा वापरण्यामागचे मुलाचे उद्दिष्ट काय हे समजल्याचे शिक्षकाच्या प्रतिसादांमधून दिसले, तर मूल त्या विशिष्ट प्रकारे अधिक चांगल्या रीतीने भाषेचा वापर करू शकेल. मात्र, याउलट, योग्य काय, अचूक काय याविषयीच्या ठाम पूर्वग्रहावर आधारित असे शिक्षकाचे प्रतिसाद असतील, तर मुलाच्या स्वतंत्र अभिव्यक्तीत, संवादात ते अडसरच  ठरतील.

प्रकरण 2 

बोलणे

बोलणे ही चांगली गोष्ट नाही, अशा नकारात्मक दृष्टीने आपल्याकडच्या शाळांमध्ये बोलण्याकडे बघितले जाते. कुणी बोलत असेल तर शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या बाबींकडे तो दुर्लक्ष करीत आहे असे गृहीतच धरले जाते. त्यामुळे, मुले बोलत आहेत असे दिसताच शिक्षकाला त्यांना गप्प करावेसे वाटते. मधल्या सुट्टीत किंवा शिक्षक महत्त्वाचे काहीतरी सांगत नसेल तेव्हा मुलांना बोलण्याची मुभा असते.

बोलण्याकडे बघण्याची दृष्टी अशी असल्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत बोलण्याचे जे असंख्य उपयोग आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. शिकण्याच्या कोणत्याही टप्प्याला हे लागू होते, बाल्यावस्थेतल्या शिक्षणाच्या बाबतीत तर हे फार फार खरे आहे. पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शाळातील मुलांच्या वयात ‘बोलणे’ हे शिक्षणाचे प्रमुख साधन असते. शिकलेल्या गोष्टी बोलण्यातून स्थिर, पक्यया होत असतात. जिथे लहान मुलांना मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, अशी शाळा काय कामाची! खरोखरच, जे शिक्षक मुलांना बोलू देत नाहीत, त्यांनी पुस्तके वा अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी पैसा नाही ही तक्रारच करू नये. कारण ज्याकरता एकही पैसा खर्च करावा लागत नाही, असे ‘बोलण्या’सारखे मोलाचे साधन ते वाया घालवत असतात!

मुले अनेक कारणांनी बोलतात. त्यापैकी प्रत्येक प्रकारचे बोलणे हे शिक्षकासाठी उपयोगी ठरणारे असते असे नव्हे. उदाहरणार्थ, कंटाळा आला म्हणून तो घालवण्यासाठी बोलणे आणि काहीतरी विशेष दिसले म्हणून त्याकडे दुसर्‍याचे लक्ष वेधण्यासाठी केलेले बोलणे या दोन्हीत फरक आहे. दुसर्‍या प्रकारचे बोलणे हे शिकलेल्या गोष्टीचे स्थिरीकरण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. नोंदवही भरणार्‍या शिक्षकाच्या टेबलाशी थांबलेल्या दोन मुलांच्या कुजबुजीतून ही भूमिका स्पष्ट होते.

पहिले मूल : बाईंनी अंगठी घातलीए.

दुसरे मूल : तू आधी बघितली नव्हतीस?

पहिले मूल : नाही… अं… हो हो… पाहिली होती, पाहिली होती.

दुसरे मूल : अरे! पण ही अंगठी दुसरी आहे.

पहिले मूल : त्यांनी नवीन घेतली आहे अंगठी. ही लहान आहे अगं!

दुसरे मूल : नाही रे, ही बारीक आहे.

मुलांच्या या लहानशा संभाषणाचे विश्लेषण केले, तर बोलण्यातून त्यांना शिकण्यासाठी संधी मिळाल्याचे आपल्या ध्यानात येईल. पहिले मूल शिक्षिकेच्या बोटात दिसलेल्या अंगठीबद्दल काही बोललेच नसते, तर शिक्षिका नेहमीच अंगठी घालतात हे त्याला आठवलेही नसते. आणि दुसरे म्हणजे, हा संवाद जर घडला नसता, तर जुन्या आणि नव्या अंगठीतला फरक निरखणे तसेच ‘लहान’ आणि ‘बारीक’ यातला सूक्ष्म फरक समजणे या संधीला दुसरे मूल मुकले असते.

बोलण्याची ही विविध कार्ये लक्षात येण्यासाठी मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याची आपल्याला सवयच लागायला हवी. साधी वाटली तरी ही फार अवघड गोष्ट आहे. कारण मुलांनी काय करायचे, काय नाही हे सांगण्याचे काम आपण मोठे म्हणून आपले आणि ऐकण्याचे काम मुलांचे असे आपल्याला वाटते. मुले बोलतात तेव्हा चांगले श्रोते होण्यामध्ये या पूर्वग्रहामुळे अडसर येतो. कोणत्या कारणासाठी बोलले जात आहे हे शांतपणे समजावून घेणारा आणि त्या बोलण्यामुळे शिकण्याच्या कोणकोणत्या शक्यता निर्माण होत आहेत हे हेरणारा श्रोता चांगला.

कुठल्याही अगदी साध्याशा परिस्थितीत एकमेकांशी बोलणारी दोन मुले यापैकी काहीतरी करीत असतात.

1. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या कशाकडे तरी लक्ष देणे,

2. त्याचे सहज किंवा नीट निरीक्षण करणे,

3. निरीक्षणांची देवाण-घेवाण करणे,

4. केलेल्या निरीक्षणांची काही एक नीट व्यवस्था लावणे,

5. एकमेकांच्या निरीक्षणांना आव्हान देणे,

6. निरीक्षणावर आधारित चर्चा करणे, वाद घालणे,

7. अंदाज बांधणे,

8. आधीचा अनुभव आठवणे,

9. दुसर्‍याच्या भावनांची, अनुभवांची कल्पना करणे,

10. कल्पित प्रसंगातल्या स्वत:च्या भावनांची कल्पना करणे.

मुलांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्याची सवय जडली की बोलण्याच्या या आणि इतर कार्यांमधला फरक लक्षात येऊ लागेल. आणि हेही लक्षात येईल की या कार्यांमध्ये विश्लेषण, कारणमीमांसा यांसारख्या बौद्धिक कौशल्यांचा वापर आणि विकास अंतर्भूत असतो. अशा कौशल्यांचा बोलण्यातून विकास व्हावा असे प्रसंग कसे निर्माण करता येतील याची कल्पना या प्रकरणात पुढे दिलेल्या कृतींवरून येईल.

मुलांच्या बोलण्याचा वर्गातील साधन म्हणून उपयोग करून घ्यायचा असेल तर बोलण्यासाठी पोषक असे वातावरण शिक्षकाने तयार करायला हवे. आपल्या वागण्यामधून आणि मुलांच्या बोलण्याला प्रतिसाद देण्यामधून, मुलांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे हे शिक्षकाने मुलांपर्यंत पोचवले पाहिजे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की वर्ग म्हणजे मासळीबाजार वाटावा. परिस्थिती बरोब्बर याच्या उलट असायला हवी. आपले ऐकून घेतले जाते, आपले बोलणे शिक्षकाला हवेसे आहे असे प्रत्येकाला वाटायला हवे.