मूल – सार्‍या गावाचं (It takes a village)

लेखन आणि चित्रे – जेन कोवेन फ्लेचर
मराठी अनुवाद – शोभा भागवत
प्रकाशन – स्कोलॅस्टिक (इंग्रजी), कजा कजा मरू (मराठी)
‘इट टेक्स अ व्हिलेज टु रेझ अ चाईल्ड’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. मुलाच्या
संगोपनात फक्त त्याच्या पालकांचा नाही, तर संपूर्ण गावाचा सहभाग असतो असा
ह्या आफ्रिकन म्हणीचा अर्थ. ‘मूल सार्‍या गावाचं’ हे पुस्तक आफ्रिकेतल्या एका
खेड्यातील बाजारात घडलेल्या एका प्रसंगातून, तिथले वातावरण आणि परिसर
दाखवणार्‍या सुंदर चित्रांतून या म्हणीचा प्रत्यय देते.
खेड्यात घडणार्‍या अगदी नेहमीच्या – बाजाराच्या – प्रसंगाभोवती गुंफलेली साधी
सोपी गोष्ट. बाजाराचा दिवस आहे. आई बाजारात आंबे विकायला जाणार आहे.
त्यामुळे लहानग्या कोकूला सांभाळायची जबाबदारी तिने आज छोट्या येमीला दिली
आहे. कोकूला घेऊन येमी बाजारात फिरायला जाते आणि फिरता फिरता कोकू
दिसेनासा होतो. कोकूवर काय प्रसंग ओढवला असेल, तो भुकेला असेल का, त्याला
तहान लागली असेल का, तो घाबरला असेल का, एकटा उन्हातान्हात रडत भटकत
असेल का, या विचारांनी ती सैरभैर होते.
इकडे कोकूच्या मदतीला मात्र अख्खा गाव उभा असतो! एकट्याने फिरणारे हे पोर
बघून कोणी त्याला खाऊ देते, कोणी सरबत पाजते, कोणी त्याचे मन रमवते तर
कोणी त्याला सावलीत झोपवते. कोकू सापडल्यावर त्याला ज्यांनी ज्यांनी सांभाळले
त्या सर्वांना भेटत, त्यांचे आभार मानत येमी त्याला घेऊन एकदाची आईकडे परत
येते. गंमत म्हणजे आईला दोघांची अजिबात काळजी वाटत नसते कारण ‘आपण
एकटेच आपल्या मुलांना सांभाळत नाही. एका मुलाला सांभाळायचे तर सगळे गाव
पाठीशी उभे राहते’ हे तिला पक्के ठाऊक असते!
पुस्तकातल्या चित्रांमधून आफ्रिकेतले छोटे खेडे दिसते. मातकट, हिरव्या आणि
पिवळ्या रंगाच्या वापरातून खेड्याचा निसर्गाशी असलेला संवाद जाणवतो. गावातली

माणसे गप्पा मारताहेत, डोक्यावरून पाट्या वाहून नेताहेत, खरेदी करताहेत.
सर्वांच्या चेहेर्‍यावर समाधानाचे भाव आहेत. लोकांचे वैशिष्ट्यपूर्ण पेहराव, घरे,
वस्तू असे छोटे छोटे तपशील चित्रांची लज्जत वाढवतात. कोंबड्या-मेंढ्यांबरोबर एका
चित्रात घराच्या भिंतीवरची पालसुद्धा दिसते. गावकर्‍यांच्या कपड्यांवरचे आफ्रिकन
पद्धतीचे डिझाईनचे नमुने केवळ लाजवाब!
पुस्तक वाचताना पालक म्हणून काही वेगळे पदरही दिसले. आईने लहान भावंडाची
जबाबदारी विश्वासाने, काहीही सूचना न देता अगदी सहज मोठ्या भावंडावर (वयाने
लहानच!) टाकली आहे. मुलांना इकडेतिकडे आपापले फिरायचे स्वातंत्र्य आहे.
जगाकडे बघताना ‘जग वाईटच आहे’ असा नाही, तर ‘हे आपलं विस्तारित कुटुंब
आहे’ असा दृष्टिकोन आहे. असे निर्मळ, सहज वातावरण आपल्याला शहरांत
आढळत नाही. मुलांना एकटे, त्यांच्या जबाबदारीवर आपण फार सोडू शकत नाही.
शहरी जगण्यात, असुरक्षिततेच्या वातावरणात समाजावरचा विश्वास कुठे तरी
हरवला आहे ही बोच आपल्या मनाला लागते. वस्ती, गाव, शहर, देश, अगदी जग
म्हणा – कोणताही समुदाय हे एक मोठे कुटुंब असते. त्यातली मुले फक्त त्यांच्या
पालकांचीच नाहीत, तर सर्व समाजाची आहेत हा विचार पुस्तकातून अतिशय
सहजपणे मांडलेला आहे. समाजातील सर्व मुलांपर्यंत पोचणे वास्तवात कोणालाच
शक्य नाही. मात्र आपापल्या शक्तीच्या मर्यादित परिघात शेजारपाजारच्या, घरातील
मदतनिसांच्या मुलांसाठी प्रत्येक जण काही न काही करूच शकतो. हे सामाजिक
पालकत्व आपापल्या परीने कसे निभावता येईल याचा विचार हे पुस्तक वाचून
आपल्या मनात सुरू होतो.
पुस्तक वाचण्यासाठी लिंक – https://archive.org/ details/EkGaonKaBachcha-
Marathi-JaneFletcher
मानसी महाजन
manaseepm@gmail.com

लेखक पालकनीती खेळघरमध्ये भाषा विषयावर काम करतात आणि शिक्षक-
प्रशिक्षणे घेतात. बालसाहित्यात त्यांना विशेष रस आहे. मुलांपर्यंत उत्तम पुस्तके
पोचावीत यासाठी ‘पुस्तक खिडकी’ नावाचे ऑनलाइन पाक्षिक चालवतात.
पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.