शब्दबिंब – एप्रिल २०१४

केशवसुत म्हणाले होते, ‘ह्या विश्‍वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’

किती काय काय घडतं या विश्‍वात! पण आपण कोणी त्याकडे किती पाहतो, कसं पाहतो, ते आपल्या प्रत्येकाच्या आवाक्यावर अवलंबून आहे. आता ही काही आंतरराष्ट्रीय राजकारणावर मत व्यक्त करण्याची जागा नाही, आम्ही त्यासाठी योग्य व्यक्तीही नाही. पण जगभर सहा-सात देशात केवढी बंडाळी माजली, युक्रेन, बोस्निया, थायलंड, व्हेनेझुएला इथे अक्षरश: एकावेळी उठाव होताना दिसले, राजकर्त्यांच्या भ्रष्ट वागणुकींना मध्यमवर्गानं खपवून घेतलं नाही; म्हणून
सर्वांनी त्यातून काही बोध घेतलाय असं काही घडलं नाही. भारतातली निवडणुकीची लगीनघाई बघितली तर राजकारण्यांना त्याची जाणीव असल्याचं निदान जाणवत तरी नाहीय. भारताला आता अधिक जबाबदार, लवचीक असलेल्या आणि शांततापूर्ण वाटेवर नेणार्‍या सरकारची गरज आहे. आणि ती पूर्ण झाली नाही तर मात्र भारतातला समाजही संतापेल आणि मग कदाचित दिल्लीत जो फुफाटा उठेल त्याला जगात तोड नसेल.

तर मुद्दा असाय की आपण सगळे जे काही जगतो, त्यात माणूस म्हणून जन्माला आल्यानं- काही इलाजच नाही म्हणून- काही ना काही विचारही करतो, हा सगळा विचार आपापल्या डोक्याएवढाच असतो. तिथे जेवढी जागा असेल त्यावर आपल्या विचारांचा आटोका ठरायचा. मग तो वाढवायला आपण कितीही आटोकाट प्रयत्न केले, तरी त्यांनाही आपली स्वत:ची अशी कक्षा किंवा इयत्ता असायचीच.

किती केलं तरी प्रत्येकाची काही एक मर्यादा असते, आणि ती ओलांडून काही जाता येत नाही. आमच्या घरी मुलं नववी-दहावीच्या वयाची असताना कुणाच्या अशा मर्यादांची आपल्याला जाणीव झाली की, त्यांचा पगार कळला-असा वाक्प्रयोग यायचा. त्यात मला वाटतं थोडी तक्रार असायची. ‘ताई, तू प्रत्येक गोष्ट काय आईला सांगतेस, पगार कळला आता मला तुझा!!’ किंवा लहान बाळालाही ‘अरे, माझ्या वहीवर ओली धार धरलीस, कळला मला पगार तुझा!’

तर असा प्रत्येकाचा आवाका वेगळा. भाताची लावणी करायला गेलं की एका हातात मावतील एवढीच रोपं आवणातून घ्यावी लागतात. त्यांना आवा म्हणतात. त्यावरून आवाका हा शब्द आलाय. खरं म्हणजे अनेक गोष्टी आपल्या आवाक्यातल्या असतात पण आपण त्या करत नाही. आपल्या मनातून त्यांना प्राधान्य द्यायचं नसतं किंवा वाटतं तितकं ते सहज काम नसतं. आमची एक मैत्रीण याला, ‘‘अजून काही ते माझ्या बेचक्यात बसत नाहीय’’, असं म्हणते.

आ असा उपसर्ग वापरून अनेक शब्द आहेतच. संस्कृतोद्भव गटातले आसेतू हिमाचल, आमूलाग्र वगैरे सोडा, पण आटोकाही त्यातलाच म्हणावा काय? आमचे एक मित्र ‘आकंटाळा’ कुठल्याही कार्यक्रमांना यायला तयार असतात. म्हणजे, कितीही कंटाळा आला तरी सामाजिक कार्यक्रम ही आपण जाऊन भूषवण्याची जागा असल्याचं त्यांच्या मनानं घेतलेलं असल्यानं, ते सापडेल त्या सगळ्या कार्यक्रमांना जातात. आणि गंमत म्हणजे, सगळे कार्यक्रम त्यांना आवडतात. ह्याचा एक मोठा फायदा आहे. अनेक वर्षं हा उद्योग केल्यानं असेल, पण त्यांची मान नेहमी थोडी हलत असते. त्यामुळे त्यांच्याकडे बघत बोलल्यास एक प्रकारचं सातत्यपूर्ण प्रोत्साहन मिळत राहतं. विशेषत: नव्या वक्त्यांना त्यांची फार मदत होऊ शकेल. असो.

आपल्या अधिकाराचं, आपल्या क्षमतांचं, आपल्या जीवनाचं म्हणू नेमकं क्षेत्र कोणतं आणि त्यातल्या कशावर आपली अधिसत्ता आहे, काय केलं ते तर तो अधिक्षेप ठरेल, या सगळ्याचा आपल्याला काय अधिगम आहे, म्हणजे आपल्याला काय कळलंय उमजलंय, सारं आपलं आपल्याजवळ राहातं. त्यातही आपली पोच कुठपर्यंत आणि त्यातलं काय आपल्या बेचक्यात, पकडीत किंवा चिमटीत उचलता येतं ते अग्रक्रमानं शोधावं, इतरांच्या मर्यादा संकोचू न देता आपल्या विस्ताराव्यात. त्यासाठी फार अचाट प्रयत्न करावेत असं जरी नाही, तरी कचाटं तरी करत राहू नये. निदान सगळा प्रयत्न दुसर्‍याला कचाटीत पकडायला करत बसू नये, इतकंच काय ते म्हणता येईल.

लेख संपताना एक देखणा शब्द सांगते.

शब्दांच्या जगातलं एक देखणं आणि डोळस नाव ग. दि. माडगूळकर! त्यांनी एका नव्या आणि चांगल्या कवीबद्दल आनंद अंतरकर या संपादकाशी बोलताना म्हटलं होतं, ‘‘आजच्या काळात विश्रंभ वाटावा असे कवी क्वचितच आढळतात. हा तसा आहे.’’
विश्रंभ म्हणजे विश्‍वास, काही भलं करेल असा विश्‍वास!

आपल्याला सर्वांनाच आपल्या स्वत:तल्या आणि परिस्थितीतल्या विश्रंभाची ओढ आणि आवश्यकता आहे.
संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे