शाळा – हिंदी कवी – बंशी माहेडरी, मराठी अनुवाद – चंद्रकांत पाटील

शाळेत पहिल्या वर्गाची मुलं 

पाढे आणि उजळणी घोकतायत जोरजोरात

गुरुजी टेबलावर पाय पसरून जांभई देतायत.

मुलं दुसरीत जातात.

शाळेच्या गणवेशात आवळलेली मुलं

डोययावरची दप्तरं खाली ठेवून

गुरुजींचा चट्ट्यापट्ट्यांचा बुशशर्ट पाहून

थकून गेलीयत्.

कपाळावर आठ्या चढवून 

गुरुजी वेत मारतायत सपासप

मुलाची चूक एवढीच की त्याचा मळका सदरा

फाटलाय् अनेक ठिकाणी.

मुलं एकत्रित गोळा झालीयत्

पुण्यतिथीनिमित्त 

मुलांना माहीत नाहीय् याचा अर्थ

त्यांना एवढंच कळतंय 

की यानंतर सुटी मिळणारय् पूर्णवेळ.

सुटी मिळाल्याचा आनंद 

शाळेचं फाटक तोडून टाकतो.

मुलं आभाळाला चेंडूसारखं फेकतात 

दप्तरं वाजवतात.

त्यांना काहीच सोयर सुतक नाहीय्

की तिरंगी झेंडा का म्हणून अर्ध्यावर उतरवलाय्.

मुलं वाचता वाचता नजर चुकवून 

खिशातले पाच दहा पैसे शोधून ठेवतात.

मुलं लघवीच्या-पाणी प्यायच्या सुटीत

लघवी करायची विसरून जातात.

लिहून लिहून थकून गेलीयत् मुलं

गुरुजी लिहून देतायत् मुलं लिहितायत्-निर्भय

गालावर आदळलेली बापाची थप्पड आठवतेय्!

मुलं लिहितायत्-भय!

मुलं अनवाणी जातायत्

मुलं फाटयया वहाणा घालून जातायत्

मुलं नक्षीदार, भारीचे बूट घालून जातायत्

शाळा म्हंजे समाजच!

पायाची खाज दाबून उभी मुलं

राष्टगीत म्हणताना मुळीच हलत नाहीत

गुरुजी शिट्टी वाजवून हलतात पण, डुलतात पण.

एकच गुरुजी पहिल्या वर्गापास्नं 

पाचव्या वर्गापर्यंत शिकवतात.

मुलं शिकतात सगळं अगम्य 

समजत असल्यासारखं.

गुरुजी शाळेत झाडून काढतात 

ताडपत्री अंथरतात 

सद्भावनेचे धडे देत असतात

लोकांच्या मनात गुरुजी आदरणीय असतात.

शाळेत गुरुजी आणि मुलं आहेत.

घंटी आणि चपराशी आहे

महात्मा गांधी आणि सरस्वतीची चित्रं आहेत

सांगण्यासाठी बरंच काही आहे 

फक्त छप्पर नाही!

शाळा चिखल व गटारीशी जोडलेलीय्

ह्या गावाहून त्या गावाला जाणारी-येणारी मुलं

गुरुजींची वाट बघता-बघता झोपी जातायत्.

गुरुजी कित्येक मैल 

सायकल मारीत मारीत शाळेत पोचतात

मॉनिटर शुद्धलेखन लिहून घेतो

गुरुजी खुर्चीची खाट करतात.

वर्गात कंटाळा घालवण्यासाठी

मुलं सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचे

फटाके वाजवतायत्.

वर्गात गुरुजी मुलांना राष्टीय चारित्र्याचा 

धडा देतायत्.

गुरुजींचे डोळे पुस्तकाच्या पानांनी बांधले गेलेयत्

मुलं हसतायत् आपापसांत.

मुलं थरथर कापून घोकलेला धडा विसरून जातात

गुरुजींची छडी टेबलावर…. सपसप वाजत राहते.

गुरुजी मुलांचं लक्ष चुकवून गायडातनं शिकवतात.

सगळ्या गणितांची उत्तरं

पुस्तकाच्या शेवटी आहेतच.

मुलं डोययावर दप्तर घेऊन रस्त्यावर डकवलेली

सिनेमांची पोस्टरं पाहात वाढतायत्.

मुलं भिंतीला चिकटवलेलं पोस्टर काढून

कात्रीनं चित्रं कापून घेतायत्

मुलं गृहपाठ पूर्ण करतायत्.

मुलं पुस्तकात 

सरस्वतीचा-हेमा मालिनीचा फोटो ठेवतात.

शाळा सुटल्यावर 

मुलांच्या आपसातल्या मारामारीत 

आई-बहिणींपासून सिनेमाच्या फ्रीस्टाईलपर्यंत

सगळं काही चालू असतं.

जन-गण-मन अधिनायक जय हे

भारत भाग्यविधाता!

(मराठवाडा रविवार, 16 जून, 1979 मधून साभार)

शाळांमधलं वातावरण, त्यातले ताण, शालेय व्यवस्थेतला करकरीत तांत्रिकपणा, यंत्रणा राबवायला सोपं जावं म्हणून आखण्यात आलेल्या चौकटी – चाकोर्‍या यात खरं ‘शिकणं’ हरवतंय का? अशा अर्थाचं पालकनीतीतून अनेकदा मांडलं जातं. आपण म्हणाल, यांना काही चांगलं दिसतच नाही का? निदान शिक्षक दिनाच्या निमित्तानं तरी?

अनेकदा पालकनीतीनं शिक्षणातल्या छोट्या छोट्या सृजन प्रयत्नांबद्दलही मांडलं… जाणीवपूर्वक मांडलं. 

परंतु खरोखर या प्रयत्न-प्रयोगांचं प्रमाण  प्रत्यक्ष परिस्थितीच्या महाकाय लोंढ्यासमोर अत्यंत छोटं, अपुरं आहे. आशा टिकवून ठेवायलाही आज प्रयत्न करावे लागताहेत. पालकनीतीच्या वाचकांनी त्यांच्या कामातून-अनुभवांतून त्यांना गवसलेले असे आशेचे किरण जरूर जरूर आमच्याकडे पाठवावेत.

संपादक