ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१४ (बालकहक्क विशेषांक)

Magazine Cover

संवादकीय - दिवाळी २०१४

प्रिय वाचक,

हे संवादकीय आहे आपल्याला एक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी! डिसेंबर २०१३ मध्ये ‘आता नव्या पिढीच्या पालकांसाठी नव्या पिढीच्या संपादकगटाने पुढे यावे’ असं आवाहन पालकनीतीनं केलेलं होतं. त्यानुसार २०१५ जानेवारीपासून पालकनीतीच्या संपादनाची धुरा ‘प्रगत शिक्षण संस्था, फलटण’ आणि ‘उगम पालक-शिक्षक संघ, सावंतवाडी’ यांनी घेतलेली आहे.

गेल्या वर्षभरात, पालकनीती हे मासिक बंद केलं जाऊ नये, अशी इच्छा अक्षरश: अनेको सुहृदांनी पत्रानं, फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून व्यक्त केली होती; मदतीची, आर्थिक साहाय्याची तयारी दाखवली होती. तरीही बदलत्या काळातल्या बदलत्या आव्हानांना पेलणार्‍या नव्या दमाच्या संपादकगटाची उभारणी होईपर्यंत तुम्हाला सांगण्याजोगं काही हाती आहे, असं म्हणता येत नव्हतं.

‘उगम’च्या नीला आपटे आणि ‘प्रगत’च्या डॉ. मंजिरी निमकर या दोघी पालकनीतीच्या अनेक वर्षांच्या वाचक, एका प्रकारे विस्तारित संपादक मंडळातल्या म्हणाव्यात अशा आहेत. ह्या दोघीही ‘पालकनीती मासिक सुरू राहावं’ हा मुद्दा मधल्या काळात आस्थेनं अनेक प्रकारे अधोरेखित करत होत्या.

प्रगत आणि उगम यांनी पालकनीतीचं संपादन करावं का, असा विषय आल्यावरही ते दोन्ही गट आणि पालकनीतीच्या आत्तापर्यंतच्या संपादकगटामध्येही अनेकदा चर्चा झाल्या, एकत्रित विचार झाला. सरकारी नियम, आर्थिक ताळमेळ इथपासून अनेक विषय बोलले गेले. आजवर एकाही अंकाचा अपवाद न करता सलग २८ वर्षं सुरू असलेल्या मासिकाची जबाबदारी घेणं ही सहज बाब म्हणून नव्या गटानं मानली नाही, तरी त्यांचा आत्मविश्वास कुठेही उणा नव्हता. अनेकवार उलटसुलट चर्चा झाल्यानंतरच आम्ही सर्वजण मिळून २०१५ यावर्षी या दोन्ही गटांनी मिळून अंकाची योजना आणि रचना करायची, ह्या निर्णयाला आलो.

हा नवा संपादकगट उत्साही आहे, सक्षम आहे, नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा असल्यानं पालकत्वातील नव्या प्रश्नांचे नवे आयामही त्यांना माहीत आहेत. आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी हे निर्णय घेत असताना आमच्या सर्वांच्या मनात होत्या. एक तर आम्हा सर्वांची तात्त्विक भूमिका आणि दृष्टिकोन एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. दुसरं, ‘पालकनीती मुख्यत: शहरी सुशिक्षितांसाठी असते’, ही मर्यादा, दूर करण्याचा प्रयत्न करत असूनही, आजवर काही प्रमाणात होतीच. वर्गणीदार आणि लेखकही बहुतांशी शहरी असत. आताचा नवा गट ही मर्यादा उडवून लावणार आहे. फलटण गावातलं प्रगत शिक्षण संस्थेचं काम समाजातल्या वंचितगटांतील बालकांसाठी चालणारं असल्यानं, विविध वयांतील बालक-पालक आणि शिक्षणाबद्दलचे मुद्दे त्यांच्या अनुभवातून पुढं येणार आहेत. त्यामुळं पालकनीतीतून व्यक्त होणार्‍या विचारविषयांचं क्षेत्र आता अधिक व्यापक आणि सखोल होईल अशी आम्हाला खात्री वाटते.

डॉ. मॅक्सिन बर्नसन यांनी स्थापन केलेल्या प्रगत शिक्षण संस्थेच्या अनेक कामांपैकी, एक अत्यंत महत्त्वाची कमला निंबकर बालभवन ही प्रयोगशील मराठी माध्यमाची शाळा पालकनीतीच्या वाचकांना परिचित आहेच. ही संस्था म्हणजे शिक्षणातील सर्वोत्कृष्ट आचार-विचार प्रत्यक्षात आणण्याचा आणि तज्ज्ञ, संशोधक, शासकीय अधिकारी व सर्वसामान्य जनता यांच्यात संवाद घडवण्याचा प्रयत्न करणारी एक शैक्षणिक चळवळचआहे.

उगम पालक-शिक्षक संघ, सावंतवाडी या गटाचं काम अनौपचारिक पद्धतीनं चालतं. उ - उद्यमशीलता, ग -गतिशीलता आणि म - मति, मन व मनगट यांचा विकास अशा तीन उद्दिष्टांसाठी स्थापन झालेल्या उगम या संस्थेनं पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समन्वयातून विधायक काम सुरू केलं आहे. यात प्रामुख्यानं शिक्षणविचार आणि पालकत्वाच्या संदर्भानं चर्चा, शिबिरं आणि वाचन-लेखनाचं काम केलं जातं. त्याचप्रमाणे अर्थपूर्ण शिक्षणासाठी शाळेव्यतिरिक्त व शाळांशी जोडूनही काही उपक्रम ही संस्था मुलांसोबत करत आहे.

या वर्षात ज्यांची वार्षिक वर्गणी संपत होती त्यांना, आम्ही एरवी करत असू तशी, ती भरण्याची आठवण केलेली नव्हती. मासिक सुरू राहील किंवा नाही हे स्पष्ट होईपर्यंत तसं करणं योग्य नव्हतंच, पण आता मासिक चालू राहणार असल्यानं ज्यांनी वार्षिक वर्गणी भरलेली नसेल त्यांनी ती जरूर भरावी अशी विनंती आहे.

वर्गणीमध्येही यावर्षी वाढ केलेली नाही. ती आधीप्रमाणे वर्षासाठी रु. २००/- इतकीच असेल. तसेच पालकनीतीची छपाई, वर्गणी व्यवस्था आणि वितरण व्यवस्था पूर्वीप्रमाणेच राहील.

आपण आजवर आम्हाला प्रेमानं सहकार्य करत आलात, तसंच या नव्या तरुण संपादक मंडळालाही करावंत आणि वर्गणीदार वाढवण्यासाठीही हातभार लावावात. अंतर्बाह्य नव्या साजात आपल्यापर्यंत येणार्‍या पालकनीतीचं आपण स्वागत कराल असा आम्हाला विश्वास आहे.

कळावे,
संजीवनी कुलकर्णी आणि संपादक मंडळ

बालहक्कांचं वचन

अनेकदा असं होतं - आपण मुलाला एखादी गोष्ट आणून द्यायचं कबूल केलेलं असतं. पण प्रत्यक्षात आपल्याला ते जमत नाही. मूल त्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत असतं. फार तर मधूनच आठवण करून देत राहतं ‘‘तुम्ही म्हणाला होतात....’’ आपण जीभ चावतो आणि पुढच्या वेळी ती गोष्ट नक्की आणायची ठरवतो.
इथे तर सर्व मोठ्या माणसांनी मिळून बालकांना बालहक्कांचं वचन दिलेलं आहे आणि ते देऊन बराच काळ उलटलेलाही आहे. आपल्या लक्षात आहे ना, की ते वचन पूर्ण करायचंय!

नोबेलचं आपल्याकडे भारी अप्रूप. आपल्या शास्त्रज्ञांना परदेशांमध्ये नोबेल पुरस्कारानं गौरवलेलं आहे, पण आपल्या देशात केलेल्या संशोधनांना नोबेलनं गौरवलं जात नाही, याची खंत आपल्याकडे नेहमी बोलून दाखवली जाते. यावर्षी नोबेलचा शांतता पुरस्कार आपल्या देशाकडे आलाय. खरं म्हणजे, कुठलंही सामाजिक विकाससन्मुख काम पुरस्कारासाठी केलं जात नाही, पुरस्कार म्हणजे समाजानं केलेलं त्या कामाचं कौतुक. किती केलं तरी नोबेल हा महत्त्वाचाच पुरस्कार आहे, पण हा पुरस्कार कौतुक म्हणून किती आणि राजकारणी खेळी म्हणून किती वापरला जातो, असाही विचार करण्याजोगा आहे. त्यातही एकाच वेळी भारत-पाकिस्तानाला विभागून पुरस्कार मिळणं, या सगळ्यामागे काय असतं, हे बहुधा आपण सगळेच जाणतो. एरवी हा सगळा उपहास बाजूला ठेवून, ‘का होईना, मिळालाय ना’ असं बरं वाटून घेतलं असतं, पण हा पुरस्कार मिळताना तो केवळ ‘बचपन बचाओ’ आंदोलनाचं, कैलाश सत्यार्थींचं कौतुक करत नाहीय, तर ‘आपल्या देशातली बालकांची परिस्थिती बरी म्हणावी अशी नाही, बालकांना आपलं बाल्य अनुभवायला मिळत नाही, त्यांना उपाशी राहावं लागतं, निकृष्ट दर्जाच्या वातावरणात राहावं लागतं, सुमार दर्जाचं का होईना शिक्षण मिळेलच याची खात्री नसते, शिवाय घर चालवण्यासाठी कामाला जुंपलं जातं, चिमुकल्या हातांना मजुरी करावी लागते’, ही आपल्याला तशी माहीत असलेलीच बाब आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता आपलं लक्ष वेधत आहे. भारत-पाकिस्तान यांनी एकमेकांशी भांडत बसू नाही, आपल्या पायाखाली काय जळतंय ते पाहावं, असं या पुरस्कारातून आपल्याला सुचवलं जात आहे. त्या लहानशा मलालालाही मुलींच्या शिक्षणासाठी काम करावं लागलं, कारण तिच्या देशात तर स्त्रियांना इतकं कमी लेखलं जातं की सामान्य स्त्रीला शिक्षणाचा हक्क सहजी मिळत नाही.

आपल्यापुरती एक गोष्ट खरीच आहे की, बालकांचे हक्क त्यांना मिळू न देण्यात आपला देश चांगलाच अग्रेसर आहे, आणि आंतरराष्ट्रीय फटका बसल्याशिवाय त्याकडे आपलं लक्ष जाणार नाही. अर्थात आपण असल्या आंतरराष्ट्रीय धमक्यांना घाबरलो, तरी भीक घालत नाही म्हणा. आपण सरळ आकडेवारी सोईस्करपणे बदलून त्यांच्या पुढ्यात टाकू शकतो. बाळंतपणातले मृत्यू, अर्भकमृत्यू, बालमृत्यू अशा अनेक बाबतीत नाही का आपण तसं करत?

आरोग्य, पोषण, शिक्षण, सुरक्षा, इतकंच नाही तर वात्सल्यपूर्ण वातावरणातलं खेळकर, स्वस्थ बालपण आणि विकास हा जन्माला येणार्‍या, प्रत्येक लेकराचा अधिकारच आहे.. श्वासाइतका सहज! पण वास्तव पाहू गेल्यास तो कित्येक मुलांच्या बाबतीत कोसो दूर आहे. हक्क कशाला म्हणायचं? हक्क ही काही कुणी कुणाला बहाल करायची बाब नसते. ती जन्माबरोबर स्वाभाविकपणे मिळते, म्हणजे मिळायला हवी. बालकांसंदर्भात तर ‘हे तुमचे हक्क आहेत’ याची जाणीवही बालकांना करून देणं, हेही त्या हक्कातच येतं.

१९८९ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत बालहक्कसंहिता तयार झाली. या संहितेनुसार जगातल्या सर्वच बालकांना मन, बुद्धी आणि शरीर यांचं पोषण करणारा आहार, निवारा, आरोग्यपूर्ण हवापाणी, शिक्षण, मनोरंजन व समृद्ध पर्यावरण मिळालं पाहिजे आणि त्यांची काळजी घेत त्यांना सर्व अर्थानं सबल होण्यासाठी अवकाश मिळाला पाहिजे यासाठी अनेक देशांनी शपथही घेतली. १९९२ साली भारतानंही ती औपचारिकपणे मान्य करून त्यानुसार अनेक कृतिकार्यक्रमही आखले. या कार्यक्रमांमध्ये बालकांचं आरोग्य, पोषण, शिक्षण, वेगवेगळ्या टप्प्यांवरचा बालविकास, स्वच्छ पाणीपुरवठा, मुलींचं पोषण, शिक्षण यांचा प्रामुख्यानं विचार केला गेला.

यानंतर १५ वर्षांनी मुलांच्या सुरक्षिततेचा हक्क जपण्यासाठी भारत सरकारनं २००७ साली राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाची (एनसीपीसीआर) स्थापना केली. भारतीय संविधानात सांगितल्याप्रमाणे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालहक्क परिषदेत ठरवल्याप्रमाणे; सर्व कायदे, धोरणं, कार्यक्रम, आणि प्रशासकीय यंत्रणा बालहक्कांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत याकडे लक्ष ठेवणं हे या आयोगाचं उद्दिष्ट आहे. बालमजुरी, शिक्षणहक्क कायदा, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा आणि बालतस्करीच्या (विशेषत: ईशान्य भारतातील) प्रश्नांवर राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाचे कृतिकार्यक्रम हे सुसंगत व्हावेत, अशाप्रकारे आखलेले दिसतात. राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाच्या जोडीला, अनेक राज्यांनीदेखील आपापले राज्य बालहक्कसुरक्षा आयोगही स्थापले. मात्र स्थापनेच्या बाबतीत पुढाकार घेतलेलं आपलं महाराष्ट्र राज्य सरकार अपेक्षेप्रमाणे आरंभशूर ठरलं आहे. २००८ मध्ये नेमलेल्या बालहक्क आयोगाच्या सदस्यांची मुदत २०११ मध्ये संपली. त्यानंतर ‘पुरोगामी’ महाराष्ट्रातल्या आयोगाची सदस्यपदं रिकामीच राहिली होती असं दिसतं! कार्यक्रम ठरवण्यामध्ये, योजना आखण्यामध्ये आपण कधीच मागे नसतो. आपल्याला अडचण असते ती त्या योजना व कार्यक्रमांमागचा अर्थ ढळू न देता त्या चालू ठेवण्यात.

अडचणी अनेक आहेत- राजकीय अस्थिरता, कशाला अग्रक्रम द्यायचा याबद्दलची अनिश्चितता, भ्रष्टाचार, सरकारी अक्षमता इत्यादी. याशिवाय आपल्या दृष्टिकोनाचाही ह्यात मोठा सहभाग आहे. ‘कल्याणकारी’ आणि ‘हक्क’ हे एखाद्या विकाससन्मुख कामाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. आपल्या मानसिकतेत कल्याणकारी कामांना जागा असते, तीही स्वत:चं पोट पूर्ण भरल्यावरच. पण माणसाला माणूस म्हणून हक्क असायला हवेत आणि ते स्वाभाविकपणे, त्यानं-तिनं काही न करताही, मिळायला हवेत- हे आपल्या मानसिकतेत बसत नाही.

बाईला देवी मानायचं, पण तिचा जीवनाचा हक्क गुंडाळून ठेवून तिला जन्माआधी किंवा जन्मानंतर मारायचं, हे एक उदाहरण पाहिलं तरी वरच्या वाक्याची सत्यता पटेल. एकंदर समाजातही आपल्या मुलानं मोठं व्हावं, त्याचं समाजात चांगलं नाव व्हावं, अशी पालकांची इच्छा असते. मात्र त्यासाठी मोकळेपणानं विचार करण्याचा अवकाश त्यांना असावा असं मात्र पालकांना वाटत नाही. आपण सांगू तेच मुलामुलींनी करावं अशी अपेक्षा असते. विचार करायला न शिकलेली मुलं मग तेच करतात. याचाच परिणाम विविध क्षेत्रातली घराणेशाही निर्माण होण्यात होतो. कुणी सामान्य सामाजिक प्रघात गुंडाळून ठेवले तर त्याला पालकांचा जोरदार विरोध असतो. असो.

बालकांच्या स्थितीबाबत दिसणारी आकडेवारी नुसती पाहिली तरी अंगावर येते. जगभरात दरवर्षी सुमारे बारा लाख मुलांना विविध कारणांसाठी पळवून नेलं जातं, एखादा माल विकावा तसं विकलंही जातं. त्यातही वेश्याव्यवसायासाठी - विशेषत: १४ ते १८ वयोगटातल्या मुली वापरल्या जातात. ह्या मुलामुलींचा वापर किती भीषण प्रकारच्या व्यवसायांसाठी होतो याची यादी आपल्याला माणूस म्हणून लाज आणणारी आहे! यात बालविवाह, अंमली पदार्थांची विक्री, भीक मागणं, अवयवांची चोरी, पोर्नोग्राफी, मसाज पार्लरमध्ये काम, अशांत टापूमध्ये / देशांच्या सीमांलगतच्या भागांमधील बेकायदेशीर शस्त्रवापर-अतिरेकी कारवाया अशा असंख्य धोकादायक गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय शहरांमध्ये घर-कामगार म्हणून अनेक मालक मध्यस्थी संस्थांतर्फे गरीब राज्यांमधील/ घरांमधील मुला-मुलींना विकत घेतात. तिथे मालक/ मालकिणीकडून त्यांचं गुलामासारखंच सर्व प्रकारचं शोषण होत राहतं. ‘गरिबांचं भलं करण्याचा’ वरकरणी उदात्त वाटणारा हा प्रकार मुलांच्या बालपणाची होळी तर करतोच, शिवाय त्यांच्या वाढीची शक्यताच नाकारतो.

युनिसेफच्या २०१३ च्या अहवालानुसार :
- देशात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या मृत्यूचं प्रमाण हजारात ४६ इतकं आहे,
- तर ४८% मुलं कुपोषित (आणि उपाशी) आहेत.
- ६ ते ११ वयोगटातली भारतातली जवळजवळ १७ लाख मुलं शाळाबाह्य गटात मोडतात तर शाळेत आलेल्या मुलांपैकी २०% मुलं कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर शाळा सोडून देतात.
- प्रत्येक हजार मुलांमागे ९१४ मुली आहेत आणि त्यातल्याही शाळेत जाणार्‍या मुली जेमतेम ६०% आहेत.
बालमजुरीवर बंदी असूनही अठरा लाख मुलं बालकामगार म्हणून काम करतात आणि पॉक्सोसारखा कायदा येऊनही बालकांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांना आळा बसण्याचं काम त्याच्यानं किती होईल हे अद्यापही प्रश्नांकितच आहे. असं का होतं, याचं कारण सरळ आहे. योजना आहेत, काही प्रमाणात कायदेही आहेत पण समाजाचा पारंपरिक सांस्कृतिक दृष्टिकोन ‘बदलासाठी’ उत्सुक नाही. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या धोरणांचा भाग म्हणून काही कार्यक्रम ठरवणं सरकारला भाग पडतं, पण कागदावरच्या गोष्टी जमिनीवर उतराव्यात म्हणून असाव्या लागणार्‍या इच्छाशक्तीचा मात्र अभाव दिसतो.

प्रत्येक देशातील बालकांच्या स्थितीचा अभ्यास ज्या घटकांवर आधारित केला जातो, ते सर्व घटक (बालमृत्यू, मुलांचं आरोग्य, पोषण, शिक्षण, विकास, सुरक्षा इत्यादी) एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. यातल्या एका घटकाचा दुसर्‍यावर परिणाम होतो. तामिळनाडूतल्या एका नेत्यानं म्हटलं होतं- शाळेत खायला द्या, म्हणजे मुलं शिकायला येतील. एका बाजूनं ह्या मुद्द्याला विचारवंतांनी विरोध केलेला होता की, मुलांनी शाळेत खाण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी यायला हवं, हा हेतूच यातून बारगळेल. पण आता आपल्याला जाणवतं की शाळेत (खाण्याजोगं) पोटभर अन्न मिळणं ही आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या वाटेवरची केवढी महत्त्वाची आवश्यकता आहे. पोटात खड्डा पडलेला असताना शिकण्यात लक्ष लागू शकत नाही, म्हणजे खायला मिळालं नाही तर माणसाचा कुठलाच विकास शक्य नाही. कुपोषणाचा म्हणजे मुख्यत: भुकेचा प्रश्न आपल्या देशात एकंदरीनंच इतका मोठा आहे की त्यामुळं देशातल्या ६०-७०% स्त्रियांमध्ये रक्तपांढरी (ऍनिमिया) आहे. स्त्रियांमधल्या प्रश्नातच बालकांमधल्या प्रश्नांची बीजं आहेत.

आपल्या देशात मूलभूत संशोधन फारसं होत नाही, संशोधनाची क्षमता असलेले ‘इथे आमच्या क्षमतांना पुरेसा वाव मिळण्याजोगा नाही’ असं म्हणून पळ काढतात, यामागे ‘चांगल्या संशोधन व्यवस्था नाहीत’ असं कारण सांगितलं जातं. त्यात तथ्य आहेच, पण मागे बघत गेलो तर दर्जेदार शिक्षणाचा हक्क इथल्या बालकांना मिळत नाही, नवा विचार करण्याला प्रोत्साहन नसतं, त्यामुळे एकंदर विचारसरणीतच एक आळशी, जागच्याजागी राहण्याची, फारतर कमी श्रमात जास्तीतजास्त पैसा कसा मिळवता येईल याकडे धावण्याची वृत्ती वाढीला लागते. बालशिक्षणाच्या मुद्द्याकडे युद्धपातळीवर बदल घडवण्याची गरज आपल्या देशात आहे. त्यासाठी २००९ साली शिक्षणहक्क कायदाही आलेला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही रुटूखुटूच सुरू आहे. आमच्या महाराष्ट्रातलं सरकार इतकं तैलबुद्धी आहे की त्यांनी शिक्षणहक्क कायद्यातल्याच विधानांचा सोईस्कर अर्थ लावून अनेक बालकांचं शिक्षण थेट धाब्यावर बसवलं आहे. ज्या वर्गात ३० वा ३५ पेक्षा कमी विद्यार्थी आहेत, ते वर्ग बंद करून संबंधित शाळांतल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळांमध्ये पाठवावं, असा शासनाचा आदेश आहे. आणि या आदेशानुसार ग्रामीण भागातले अनेक वर्ग बंद झाले आहेत, होत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे तब्बल बावीस हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. प्रत्यक्षात या शिक्षकांना पगार देणं बंधनकारक असतानाही अनेकांना तो मिळालेला नाही. आता, या घटनेविरुद्ध शिक्षक त्यांच्या संघटनांतर्फे आवाज उठवतील, मोर्चे काढतील आणि आपल्या हक्कांसाठी लढा देतीलही. पण बंद झालेल्या वर्गातल्या मुलांचं काय? आता नवी शाळा त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहे, तिथे जायची सोय आहे का, मुलांना किती चालत जावं लागेल,याचा विचारही हा निर्णय घेताना केलेला नाही का?

शाळा घराजवळ असल्यामुळे निदान त्या काही ना काही दर्जाच्या शाळेत तरी त्यांना जायला मिळत होतं. आता त्या मुलांना, विशेषत: त्यातल्या बर्‍याच मुलींना शाळेत जायला मिळणार नाही. दूरवरच्या शाळेत जायचं म्हणजे खूप प्रश्न असतात. एकतर जाण्यायेण्याचा वेळ, त्या वेळात झाली असती अशी घरातली कामं बुडतात, शिवाय असुरक्षिततेचं भय. शाळेत न पाठवण्यामागंही पालकांचा हेतू भल्याचाच असणार, पण शिकायला मिळणं हा बालकांचा हक्क आहे, त्याचं काय?

शिक्षणहक्क मिळण्याचं उत्तरदायित्त्व शासनावर आहे, पण तिथे राजकीय इच्छाशक्तीच नाही. आपल्या राज्यकर्त्यांची, राजकारण्यांची एकंदर वृत्ती, दृष्टी पाहता या आणि अशा कृतींमागे आणखीन एक शक्यता डोकावते. भले कायदा म्हणतो ६ ते १४ वयोगटासाठी मोफत शिक्षण! पण त्यासाठी सरकारी शाळा कशाला हव्यात? त्यापेक्षा शाळांचं सार्वत्रिक खाजगीकरण करत गेलं तर कायद्याचा प्रश्न निकाली निघेल. तिथल्या फिया गरीबांना परवडणार नाहीत म्हणून काही टक्के जागा राखीव ठेवायच्या, काही योजनांमधून ते पैसे फिरवून घ्यायचे. (यामध्ये मुली अधिक भरडल्या जाणार, पण ते ठीकच आहे!!) पैसे फिरत फिरत गेले की त्यांच्यावर हात मारणं थोडं सोपं होतं. खाजगी उद्योगांना जनसेवेचं श्रेय मिळतं, त्या श्रेयाचा उपयोग त्यांना इतरत्र करून घेता येतो. शिवाय खाजगी शाळांकडे इंग्रजी माध्यमाचं चिंचेचं बुटूक असल्यानं जागतिकीकरणाची दुरून का होईना ओळख झालेल्या पालकांना त्याचा मोह पडणारच आहे. त्यामुळे ह्या कल्पनेला व्हावा तेवढा विरोधही होणार नाही. तिथे न जाणार्‍या अगदी गरीब गटाच्या शिक्षणाचा प्रश्न निकालात तर निघेलच पण त्याच्या पापाची जबाबदारी पालकांच्या शिरावर टाकून देता येईल; आपल्या समवयस्कांपेक्षा आपले कपडे साधेसे, आपल्या वह्या जुन्या -अशा कमीपणाच्या भावनेशी लढत, शिक्षकांकडूनही कमी लेखलं जात जी मुलं शिकतील ती शिकतील, बरीचशी बाहेरच पडतील. त्याची जबाबदारी तर पालकांचीच किंवा मुलांची स्वत:चीच.

आपला देश हा आता तरुणांचा देश मानला जातो. ही तरुणाई देशाला केवळ मंगळावर नेणारी म्हणूनच नाही तर खर्‍या अर्थानं मंगलमय करणारी व्हायला हवी असेल तर आपल्याला आता आपल्या दृष्टिकोणात बदल घडवण्याची वेळ आल्याची जाणीव करून घ्यायला हवी. ‘मूल’ ह्या गोष्टीला आपण अग्रक्रम द्यायला हवा. मुलांच्या गरजांना प्राधान्य द्यायला हवं. या देशात आनंदानं जगता येईल, ही शाश्वती बालकांना मिळायलाच हवी. वाढीच्या वयातल्या बालमनांना नीतीनिष्ठ सचोटीनं जगता येतं हा विश्वास इथे मिळायला हवा, त्यासाठीच देशातल्या प्रत्येक बालकाच्या मनात शांत सुरक्षितता असायला हवी; पोटभर अन्न, स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, मनभर आनंद आणि दर्जेदार शिक्षणाचा हक्क तर हवाच.. देशात आज अनेक नव्या योजना घाटत आहेत. राजकारणी, समाजकारणी, धोरणकर्ते आणि आपण सगळ्यांनीच, प्रत्येक कृती, प्रत्येक योजना ही गोष्ट लहान मुलांनाही फायदेशीर, सोईस्कर आहे ना, या एकाच निकषावर जरी घासून तयार केली तरी ती समाजातल्या प्रत्येक घटकासाठी उपयोगी ठरेल. अगदी साधं म्हणावं असं उदाहरण मोठ्या शहरातल्या रस्त्यांच्या सुरक्षिततेचं. मुलांना रस्ता सहजपणे पार करता आला पाहिजे, त्यांच्यासाठी सोयीचा चढ-उतार हवा, दुचाकींचे/ सायकलींचे /चालणार्‍यांचे वेगवेगळे मार्ग हवेत. क्रीडांगणं हवीत, बागाही हव्यात. गावागावात, शाळेशाळेत वाचनालयं हवीत.

हे सगळं झाल्यावरच बालहक्कसंहितेला २५ वर्ष पूर्ण झाल्याचा आणि मुख्य म्हणजे बालकामगारांना मुक्त करण्याबद्दलचा नोबेल पुरस्कार मिळण्याचा आनंद साजरा करायची वेळ आपल्यासाठी येईल.

भारतीय राज्यघटनेचं मुलांना वचन
• अधिनियम १४ - कायद्यासमोर सर्व समान, कायद्याचे सर्वांना समान संरक्षण
• अधिनियम १५ - कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही
• अधिनियम २१ - जीवनाधिकार
• अधिनियम २१अ - ६-१४ वयोगटातल्या मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार
• अधिनियम २४ - १४ वर्षांखालील कोणत्याही बालकाला असुरक्षित ठिकाणी काम करण्यास बंदी
• अधिनियम ३९ - वाढीसाठी संधी, सोयी-सुविधा आणि कोणत्याही प्रकारच्या शोषणापासून संरक्षण
• अधिनियम ४५ - ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी काळजी आणि शिक्षण
• अधिनियम २४३ - मुलांच्या काळजीसाठी संस्थात्मक रचना

बालकांचे हक्क - कायदे व धोरणांचा प्रवास

१९१९ - ‘अंग्लांटाईन जेब’ या ब्रिटिश स्त्रीनं ‘सेव्ह दी चिल्ड्रेन’ ही मुलांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था स्थापन केली.
१९२४ - ‘लीग ऑव्ह नेशन्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या व्यासपीठावरून ‘अंग्लांटाईन जेब’नं बालकांच्या हक्कासंदर्भातला पाच कलमी कार्यक्रम जिनिव्हा येथे मांडला:
• मुलाच्या उत्तम शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासासाठी आवश्यक ते वातावरण !
• प्रत्येक भुकेल्या मुलाला अन्न, आजारी मुलाला सेवा-शुश्रुषा, मागे पडणार्‍याला मदत, बालआरोपीला/चुकलेल्या मुलाला घर आणि निराधाराला आधार !
• संकटप्रसंगी पहिली मदत मुलांनाच !
• सर्व प्रकारच्या शोषणापासून मुलाचा बचाव आणि त्याला स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी बळ!
• आपल्या क्षमतांचा समाजोपयोगी कामासाठी वापर/ योगदान करण्याची शिकवण!
१९५९ - ‘चार्टर ऑव्ह चिल्ड्रेन्स राईटस’ ही मुलांच्या हक्कांची सनद संयुक्त राष्ट्र परिषदेपुढे
मांडण्यात आली. त्यावर अनेक देशांसह भारताचीही सही आहे.
१९६८ - कोठारी कमिशन - राष्ट्रीय शिक्षण आराखडा
१९७८ - नॅशनल प्लान ऑव्ह ऍक्शन फॉर चिल्ड्रेन
१९९४ - प्रसूतीपूर्व गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा
१९८९ - २० नोव्हेंबरला संयुक्त राष्ट्र परिषदेने ‘बालकांच्या हक्कांसंदर्भातली संहिता’ मंजूर केली. या परिषदेतल्या चर्चांनंतर अनेक राष्ट्रांची संमती असणारा जाहीरनामा तयार झाला. त्यातील ५४ अधिनियम मूलभूत मानवी हक्कांवर आधारित आहेत:
• जीवनाधिकार
• सर्वांगीण विकासाची संधी मिळण्याचा अधिकार
• वाईट प्रभाव, अत्याचार आणि शोषणापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार
• कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागाचा अधिकार
१९८६ - बालकामगार प्रतिबंध कायदा
१९९२ - बालहक्कसंहितेवर भारताचे शिक्कामोर्तब.
१९९२ - बालविवाह प्रतिबंध कायदा
२००० - बालगुन्हेगारीला प्रतिबंध आणि बालगुन्हेगारांची काळजी
२००५ - युएनच्या १९८९च्या करारामध्ये मान्य केलेल्या आणि भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क आराखडा २००५ (National Plan of -Action for Children, २००५)
•ICDS (Integrated Child Development Services ) पौष्टिक आहारासाठी तरतुदी
ITP- (Immoral Traffic (Prevention) -Act ) - मुलींना पळवणे, व्यापार व विक्री आणि त्यांचा याविरुद्धचा कायदा.
•ग्रामीण आरोग्य मिशन - १००% गावांमधून पिण्याच्या पाण्याची आणि मलमूत्रविसर्जनाची योग्य सोय करण्यासाठी

•प्रसूतीपूर्व गर्भलिंग चाचणी प्रतिबंध ©
२००७ - मार्चमध्ये बालहक्क आयोगाची स्थापना. संस्थेचा दृष्टिकोन ‘मुलांवर मेहेरबानी’ नसून ‘मुलांच्या हक्काचे संरक्षण’ असा आहे.
• मुलाच्या संदर्भातील निर्णयांच्या केंद्रस्थानी ‘मूलच’ असले पाहिजे.
• मुलाची अस्मिता जपून त्याला/तिला आदरपूर्वक वागवले पाहिजे.
२०१० - ६ ते १४ वयोगटातील बालकांना गुणवत्तापूर्ण मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क देणारा कायदा
२०१२ - लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा (प्रोटेक्शन ऑव्ह चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस)

बालकहक्कांचा जाहीरनामा
बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रांनी १९५९ साली प्रसृत केला. जगातील सर्व बालकांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे, असा या जाहीरनाम्याचा हेतू आहे. उद्देशिका, प्रत्यक्ष ठराव आणि बालकहक्कांच्या कार्यवाहीसाठी सुचविलेली दहा तत्त्वे असे त्याचे तीन भाग पडतात.
उद्देशिका : संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांच्या वैश्विक घोषणेमध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक मनुष्य हा सर्व हक्क व स्वातंत्र्ये मिळविण्यास पात्र आहे. मग त्या बाबतीत जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय वा अन्य मतप्रणाली, राष्ट्रीय वा सामाजिक उत्पत्ती, मालमत्ता, जन्म वा अन्य दर्जा ह्यांचा विचार केला जाणार नाही. शारीरिक वा मानसिक अपरिपक्वतेमुळे बालकाची अधिक काळजी व संगोपन करावे लागते; त्याचप्रमाणे त्याला कायद्यान्वये संरक्षणही द्यावे लागते. बालकाच्या प्रसवपूर्व व प्रसवोत्तर स्थितींचा विचार करण्यात येतो. अशा प्रकारे बालकाची योग्य ती काळजी व निगा घेण्याची तरतूद १९२४ च्या बालकहक्कासंबंधीच्या जिनिव्हा घोषणेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती.
प्रत्यक्ष ठराव : बालकाला समृद्ध बाल्य लाभावे, स्वतःसाठी तसेच समाजाच्या भल्याकरिताही त्याला सर्व अधिकार व स्वातंत्र्ये उपलब्ध करण्यात यावीत; त्याचप्रमाणे पालक, ऐच्छिक संघटना, स्थानिक संघटना, राष्ट्रीय सरकारे यांनी बालकांच्या हक्कांची जाणीव लक्षात घेऊन त्यांचे विधिवत पालन करावे.

तत्त्वेे :

(१) बालकहक्कांच्या जाहीरनाम्यात समाविष्ट केलेले सर्व हक्क प्रत्येक बालकाला, जात, वर्ण, लिंग, भाषा, धर्म, राजकीय वा अन्य मतप्रणाली, राष्ट्रीय वा सामाजिक उत्पत्ती (उगम), मालमत्ता इत्यादींचा विचार न करता मिळावयास हवेत.

(२) बालकाला विशेष संरक्षण मिळावे, बालकाचा शारीरिक, मानसिक, नैतिक, आध्यात्मिक व सामाजिक दृष्टीने विकास होऊ शकेल, अशा संधी-सुविधा त्याला कायद्याने वा अन्य मार्गांनी उपलब्ध करावयास हव्यात.

(३) जन्मापासून बालकाला नाव व राष्ट्रीयत्व मिळण्याचा हक्क आहे.

(४) बालकाला सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ मिळावयास हवेत.

(५) शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक दृष्ट्या अपंग असलेल्या बालकाला विशेष प्रकारची वागणूक, शिक्षण देण्यात येऊन त्याची विशेष प्रकारची काळजी घेण्यात यावी.

(६)बालकाच्या पूर्ण व सुसंवादी व्यक्तिमत्वाच्या विकासार्थ त्याला प्रेम व सलोखा यांची गरज असते. कोवळ्या वयातील बालकाला, अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता, त्याच्या मातेपासून दूर करू नये. अनाथ व निराधार बालकांची विशेष काळजी वाहणे आणि त्यांना आधार देणे, हे समाजाचे व शासनाचे कर्तव्य ठरते.

(७) बालकाला मोफत व सक्तीचे किमान प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे. बालकाचे सामर्थ्य वाढेल, त्याच्या निर्णायक बुद्धीचा विकास होऊन त्याच्या ठायी नैतिक व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होईल आणि समाजाला त्याचा उपयोग होईल, अशा प्रकारचे शिक्षण बालकाला उपलब्ध करावयास हवे.

(८) बालकाला सर्वप्रथम संरक्षण व साहाय्य मिळणे आवश्यक आहे.

(९) क्रूरता, पिळवणूक व दुर्लक्ष या सर्व प्रकारांपासून बालकाला संरक्षण मिळावयास हवे. त्याचा कोणत्याही प्रकाराने अपव्यापार करण्यात येऊ नये. किमान वयोमर्यादेपर्यंत बालकाला नोकरीवर वा कामास ठेवू नये, त्याचप्रमाणे त्याच्या जीविताला हानी वा धोका संभवेल अशा कोणत्याही अनारोग्यकारक व्यवसायात त्याला गुंतवू नये.

(१०) जातीय, धार्मिक वा अन्य प्रकारचा भेदभाव उत्पन्न करणार्‍या प्रवृत्तींपासून बालकाचे रक्षण केले पाहिजे. सलोखा, सहिष्णुता, सख्य, तसेच शांतता, वैश्विक बंधुभाव इत्यादींचे संवर्धन केल्या जाणार्‍या परिस्थितीत त्या बालकाचे संगोपन केले पाहिजे.

प्रत्येक बालकास जन्मसिद्ध अधिकार व हक्क प्राप्त करून देणारे कायदे प्रगत राष्ट्रांनी वेळोवेळी केल्याचे दिसून येते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९३० साली बालकांच्या शिक्षणासंबंधी एक सनद तयार करण्यात आली. १९४२ मध्ये लंडन येथे १९ राष्ट्रप्रतिनिधींच्या विचारविनिमयांतून बालक सनद जाहीर करण्यात आली. १९४६ मध्ये स्थापन करण्यात आलेली ‘संयुक्त राष्ट्रे बालक निधी’ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड-युनिसेफ) ही संस्था प्रथमतः दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात उद्ध्वस्त युरोपच्या पुनर्रचना कार्यात गुंतली; सांप्रत या संस्थेने विकसनशील देशांमधील बालक कल्याण कार्यक्रमावर प्रामुख्याने भर दिलेला आहे.

गद्रे, वि. रा.; मिसार, म. व्यं.,
मराठी विश्वकोश
िंhttp://www.marathivishwakosh.in/khandas/khand11/

जगी ज्यास कोणी नाही...

संधींच्या आणि संसाधनांच्या वाटेवरच्या सर्वात शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा आग्रह महात्मा गांधींनी धरला होता. गांधीजींच्या मनातला अर्थ आतापर्यंत त्या शब्दांना सोडून गेलेला आहे. कारण सर्वात शेवटचा माणूस म्हणजे नक्की कोण, यावर बर्‍याच विचारवंतांचं अद्याप एकमत व्हायचंय! समांतर रेषा जशा अनंतात एकमेकांना भेटतात तसं हे एकमतही अनंतातच कधीतरी होईल.
मोठ्यांच्या जगात लहान मुलं नेहमीच शेवटच्या स्थानी असतात. मोठ्यांवर प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून असल्यानं स्वाभाविकपणे आधीच बिचारी असतात. त्यांचे कुठलेही निर्णय घेण्याची त्यांची क्षमता नसते, आणि क्षमता आली तरी पद्धत नसल्यानं त्यांना तसा अधिकार नसतो. आईबाप किंवा त्यासारखे प्रेम करणारे पालक असले तर अन्न- वस्त्र- निवारा- शिक्षण तरी त्यांना मिळतं. पण तेही नशिब वाट्याला आलेलं नसलं तर, नातेवाईक किंवा आधार-संस्था एवढाच पर्याय त्यांच्यासाठी उरतो. मुलांच्या नावावर पैसे असले, जमीनजुमला, घरदार असं काही असलं तर ते मिळवण्याच्या इच्छेनंही काही नातेवाईक त्यांना सांभाळतात. संस्थेतलं मूल तर जीवनातल्या अनेक हक्कांना विशेषत: प्रेमाला, जिव्हाळ्याला आधीच वंचित असतं, अनेक संस्थांमध्ये पोटभर अन्नाला आणि सुरक्षिततेलाही महाग होतं. तशात त्याला/तिला जर काही शारीरिक प्रश्‍न असला, उदाहरणार्थ एचआयव्हीसारखा विषाणू जन्मापासून शरीरात असेल तर बघायलाच नको.
दोन महिन्यांपूर्वी आमची १८-२० वर्षांची एक मैत्रीण जग सोडून गेली. ती अनाथ होती. तिला एचआयव्ही होता. निराधारांना आधार देणार्‍या एका संस्थेत ती वाढली. तिच्याबद्दल आतड्यानं ओढ असणारं या जगात कुणीकुणी नव्हतं. संस्थेत असल्यामुळे स्वत:ची कुठलीही इच्छा बोलूनही न दाखवता, सांगतील ते अत्यंत आज्ञाधारकपणे खाली मान घालून ऐकायचं एवढंच तिला शिकवलेलं होतं. कुणाशी काही बोलण्याचाही आत्मविश्वास नसलेली अशी ही मुलगी, एचआयव्हीसह जगणार्‍या तरुण-तरुणींच्या कार्यशाळेत आम्हाला भेटली. कार्यशाळेला आलेली बाकीची मुलंमुली बघून तिला आश्‍चर्यच वाटलं. एचआयव्ही असूनही ही मुलं इतकी सशक्त, हसरी, उत्साही कशी- असा प्रश्‍न तिला पडे. ती इतकी अशक्त आजारी कशी- असा प्रश्‍न बाकीच्यांना पडे. संस्थेनं तिला अन्न-वस्त्र-निवारा दिलेला होता. एचआयव्ही असल्यानं सरकारी यंत्रणेतून एआरटी औषधंही मिळत होती. ही एआरटी औषधं फार नियमितपणे घ्यावी लागतात. संस्थेत ते पाळलं जात नसे, जमायचं तेव्हा सोईसवडीनुसार तिला एआरटी सेंटरला नेलं जाई. या अनियमित औषधांनी तिची प्रकृती नीट राहीना. एरवीही ही पोर जगली काय आणि नसली काय, कुणाला फारसं सोयरसुतक नव्हतंच. कार्यशाळेत येऊनही पहिले दोन दिवस ती झोपूनच होती, पण तिचं लक्ष असे. नव्यानं ओळख झालेल्या तिथल्या सगळ्या मुलामुलींनी तिची मनापासून शुश्रूषा केली. सगळ्या मुलामुलींनी दिलेल्या प्रोत्साहनानं तिनं तिसर्‍या दिवशी अगदी हळू आवाजात एक गाणंही म्हटलं. ह्या मुलीनं आणखी थोडी उमेद धरली, तिला योग्य औषधं सातत्यानं मिळाली, तर आयुष्यातल्या कुठल्याही आव्हानाला पुरी पडेल अशी बुद्धिमत्ता तिच्याजवळ होती. तिला योग्य औषधं मिळावीत, यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले. काही आवश्यक तपासण्या करून घेतल्या. संस्थेचं पुरेसं सहकार्य मिळत नव्हतं, पण शक्य तितके सगळे प्रयत्न करून तिच्या औषधांची व्यवस्था झाली. आता फक्त तिनं ती औषधं आणायला जावं आणि पुढं नियमित घ्यावीत एवढं राहिलं होतं. ती आजारी पडली तर तिला हॉस्पिटलमध्ये आणावं. तिथं पुढची व्यवस्था तयार असणार होती. पण हे काहीच झालं नाही. ती आजारी पडली आणि गेली. चांगली गोष्ट इतकीच, की निदान कार्यशाळेत तिला मित्रमैत्रिणी मिळाल्या. त्यांच्या मनात तिनं आपल्या अत्यंत गोड वागण्यानं जागा निर्माण केली. त्यांना ती नेहमीच आठवत राहील.
एचआयव्हीला आटोक्यात आणणारी एआरटी औषधं आता सरकारी व्यवस्थेत सहजपणे उपलब्ध होतात. एचआयव्ही असल्यानं आयुष्याला फारसा फरक पडू नये, इतकी या आजारावरच्या उपचारांची परिस्थिती सुधारलेली आहे. असं असलं तरी एक सामाजिक प्रश्न म्हणून त्यातले काही कोपरे अजूनही दुर्लक्षितच आहेत.
आईवडलांचं किंवा तत्सम कुणाचंही आधारछत्र हरपलेल्या एचआयव्हीबाधित मुलामुलींचं आपल्या जगात काय होतं, अशी किती मुलं (उदाहरणार्थ) महाराष्ट्रात असतील, त्यांना सांभाळणार्‍या किती संस्था उपलब्ध आहेत, ह्या संस्था कशा असतात, तिथं मुलांचं काय होतं- ह्याबद्दल सामान्यपणे समाजात कुणाला काहीच माहिती नसतं. एचआयव्हीबाधित, संस्थास्थित मुलं आमच्या मुलांसमवेत शाळेत नकोत, असं आजही अनेक पालकांना वाटतं. जणू बालहक्क मिळण्याच्या यादीतून या मुलांची नावं पुसून टाकलेली असतात. एचआयव्हीच्या साथीला आता पंचवीस वर्ष पालटली, पण ‘एचआयव्हीबाधित असणं’ हा आजही एक कलंकच समजला जातो.

एचआयव्ही : उपचार करता येण्याजोगा आजार
आजच्या काळात औषधं असल्यानं, एचआयव्ही हा मधुमेह किंवा रक्तदाबासारखा सहज उपचार करता येण्याजोगा आजार मानावा- अशी वेळ आलेली आहे. असं असूनही एचआयव्ही असलेलं, वर उल्लेखलेल्या मुलीसारखं, एखादं निराधार मूल असलं तर त्याचं पुनर्वसन सहज होत नाही. ह्या मुलामुलींना सांभाळणारी संस्था सहजी मिळत नाही. त्यामध्ये अनंत अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा बेकायदा चालू असणार्‍या संस्थांमध्येही मुलं वाढत राहतात. एचआयव्ही असलेल्या मुलांना ठेवून घेणार्‍या संस्था अगदीच थोड्या आहेत. आवश्यकतेचा आणि उपलब्धतेचा कोणताही ताळमेळ नाही. आख्ख्या महाराष्ट्रात एचआयव्हीबाधित मुलांसाठी केवळ दहा अधिकृत संस्था आहेत, त्यामध्ये एकूण मिळून केवळ ५७५ मुलं राहू शकतात. खरं पाहता, या मुलांसाठी खास संस्था लागण्याचंच आता काही कारण उरलेलं नाही. या मुलामुलींना सामान्य संस्थांत ठेवू नये असा नियमही नाही; पण सरकारी व्यवस्थेत खास संस्था असल्यामुळे असेल, इतर संस्था एचआयव्ही असलेल्या मुलांना ठेवून घेत नाहीत. त्यांना मग सहा-सहा महिने प्रतीक्षा यादीवर तिष्ठत ठेवलं जातं. या काळात त्यांच्या शाळा, अभ्यास आणि मुख्य म्हणजे एआरटी औषधं (हो, औषधं सर्वात महत्त्वाची. कारण एकवेळ एखाद्या वर्षी शाळा बुडली तर पुन्हा भरून काढता येते. औषधात खंड पडला तर परिस्थिती पुन्हा ताळ्यावर न येण्याजोगी गंभीर बनू शकते.) या गोष्टींची व्यवस्थाही होत नाही.

बालआधारगृहांची स्थिती
एका पुणे शहरातली परिस्थिती बघितली तर ‘मानव्य’ नावाची एक भली संस्था सोडून इतर कुठल्याही संस्थेजवळ अधिकृत मान्यताच नाही. काही संस्था पूर्वी मान्यताप्राप्त होत्या, पण २०१२ सालात मिनिस्ट्रीने नियम बदलले. त्यामध्ये अनेक संस्थांची मान्यता गेली. काही संस्था सरळ बंद केल्या गेल्या. नियम बदलले ही खरं पाहता चांगली गोष्ट होतीे, कारण काही वर्षांपूर्वी एचआयव्हीच्या क्षेत्रात भरपूर पैसा आहे अशा चाहुलीनं अनेकांनी संस्था सुरू केल्या होत्या. त्यांचा हेतू वेगळा होता. अशा संस्था बंद कराव्यात अशी गरज सरकारी व्यवस्थेला वाटली हे चांगलंच. पण संस्था बंद करताना तिथं राहत असलेल्या बालकांचं काय, हा प्रश्‍न उरतोच आणि त्याला कुणाजवळ उत्तरच नाही. कोणतंही नवीन बालगृह (अगदी एचआयव्हीबाधित मुलांसाठीसुद्धा) सुरू करायला २०१२पासून परवानगी मिळत नाहीय. आधी आलेले सर्वच अर्ज थोपवलेले आहेत. नवे अर्ज दाखलच करून घेत नाहीत.
अनेक संस्था अगदी अचानक धाडी घातल्या जाऊन बंद करण्यात
आल्या आहेत. त्यावेळी तिथं राहणार्‍या मुलामुलींना, त्यांच्या नातेवाईकांकडे धाडून देण्यात आलं. आता त्या नातेवाईकांनी सांभाळलं तर बरं, नाहीतर मुलांनी काय करायचं बरं?
कुठलंही बालक, कशा का होईना घरात, पालकांजवळ वाढलं तर ते संस्थेत वाढण्याहून बरं असा एक समज आहे; सरकारचाही त्यावर विश्‍वास आहे. आणि बहुतेक संस्थांमधलं वातावरण पाहता, हा समज त्यांनी खरा करून दाखवलेला आहे, यात शंका नाही. त्यामुळे अडचण आली तर हा असा नातेवाईकांकडे पाठवून द्यायचा पर्याय घेतला जातो. विचार करा, नातेवाईक जर सांभाळायला तयार असते, मुलाला तिथे बरं वाटत असतं तर ते मूल मुळात संस्थेत का आलं असतं?
संस्था बंद करताना ‘काही काळासाठी त्या मुलाची व्यवस्था हवी’ म्हणून पाठवताना; निदान त्या पालकांशी बोलून त्यांची परवानगी घेऊन, तयारी आहे ना हे पाहून मग पाठवायला हवं, त्यानंतरही सतत संपर्क ठेवायला हवा. एक संस्था अशीच बंद झाल्यावर अचानक येऊन दाराशी उभ्या राहिलेल्या बालकांना काही नातेवाईकांनी हाकलून दिलं. एकाला नातेवाईकानं फसवून रस्त्यावर आणून सोडून दिलं. तो मुलगा दोनतीन दिवसांनी लपतछपत पुन्हा संस्थेत आला. पण संस्थेत राहायला परवानगी नाही, हे पाहून निघून गेला. तो कुठे-कसा राहत असेल, काय करत असेल, कुणालाच माहीत नाही. त्याच्या औषधांची, त्याच्या जेवणाखाण्याची काळजी घेणारं आता कुणीही नाही. मनाबिनाचा विचार तर लांबच राहिला, हे मूल जिवंत आहे की नाही याचीही कुणाला क्षिती नाही.
काही मुलांना नातेवाईकही नसले तर त्यांचं काय करणार? एखाद्या संस्थेत जागा असेल तिथं त्यांना पाठवून दिलं जातं. असं पाठवताना बालकाच्या काही विशेष गरजा आहेत का ह्याचाही विचार करायला नको का? विशेषत: एचआयव्हीसह जगणारं बालक असेल तर त्याची नोंद कुठल्या एआरटी केंद्रात झालेली आहे, हे बघावं लागेल. गाव बदललं तर त्या नव्या गावातल्या केंद्रात हे नाव नोंदवावं लागेल. त्या सगळ्या कार्यवाहीत औषधं बुडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. काही संवेदनशील लोक सर्वत्र असतात तसे या व्यवस्थांमध्येही आहेत, आणि ते अशा कामांना आवश्यक न्यायही देतात. बहुतांश ठिकाणी मात्र ही आवश्यक हिताची बाब असल्याचं अद्याप सर्वांना पटलेलं नाही, असं दिसून येतं.
बालकल्याण समिती कधीकधी चांगलं काम करणार्‍या पण अधिकृत मान्यता नसलेल्या संस्थांकडेही मुलं पाठवते. अशा काही संस्था निकषांमध्ये अद्याप बसत नसल्या तरी त्या चांगल्या आहेत, यावर समितीचा विश्‍वास आहे. ह्यामध्ये तथ्य असलं तरी त्या संस्थांना खास वागणूक दिली जाते, असं वाटून बालकल्याण समितीच्या कार्यपद्धतीबद्दल
अनेक संस्थांच्या मनात हरकत दिसते.
एचआयव्हीसह जगणार्‍या बालकांना इतर बालकांच्या सोबत इतर संस्थांमध्ये राहण्यात वैद्यकीय दृष्टीनं काहीही हरकत नाही. उपचारांसाठी जवळच्या एआरटी केंद्राशी जोडून घेतलेलं असावं आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे महिना दोन महिन्यांच्या अंतरानं औषधं घ्यायला आणि सहा महिन्यांनी प्रतिकारशक्तीची तपासणी करायला जाता यावं एवढीच वेगळी गोष्ट त्यांच्यासाठी आवश्यक असते. एचआयव्ही असलेल्या मुलामुलींना नेहमीचाच आहार द्यायचा असतो आणि वेळेवर औषधं द्यायची असतात, वेगळ्या अशा कुठल्याही सोयीसुविधा लागत नाहीत. अंगात जुनाट आजार असल्यानं वाढीला सहकार्य करणारी प्रथिनं त्यांच्या जेवणात आवर्जून असावीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण ही गोष्टही इतर मुलांपेक्षा अजिबात वेगळी नाही. वाढीच्या वयातल्या सर्वच मुलांना प्रथिनांची गरज असते. तरीही इतर संस्था ‘त्यांंना सांभाळण्यासाठी आमच्याकडे व्यवस्था नाही’ असं म्हणून प्रवेश नाकारतात. संस्थांशी बोलून पाहावं तर ‘अशी मुलं आमच्या संस्थेत आम्ही ठेवली तर आम्हाला काम करायला माणसंच मिळणार नाहीत’ हे मिळणार्‍या प्रतिसादाचं एक सामान्य उदाहरण! अशा प्रतिसादांमुळे या मुलांना किती नाकारलेपण येत असेल, अगतिक वाटत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.
एचआयव्हीसह जगणार्‍या एखाद्या मुलासाठी तुम्हाला संस्था शोधायची असेल, तर सामान्यपणे जागा उपलब्ध नसतेच. मग लांब कुठेतरी असलेल्या संस्थेत गरजवंत मुलाला पाठवलं जातं. मुलाच्या गरजांचा- वयाशिक्षणाचा विचार करावा, त्याला ओळखीच्या (भाषांच्या) परिवेशात राहायला मिळावं ही अपेक्षा अवास्तवच मानली जाते. त्याचा साहजिक परिणाम मुलांच्या विकासावर होतो.
साकेतची ( नाव बदललं आहे) गोष्ट तर आणखीच विचित्र म्हणावी अशी आहे. साकेत अनेक वर्षं एचआयव्हीत काम करणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेत राहिला. पण इथे मुलांच्या निवासासाठीची सोय नाही. ही संस्था एचआयव्ही असलेल्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात सहकार्य करते. रोज उत्तम जेवायचं, मोठ्यांकडून लाड करून घेत संस्थेत फिरायचं, शिवाय टीव्ही बघायचा. असा साकेतचा त्या वर्षांचा उद्योग होता. शाळेत जायचा विषय साकेत काढत नसे, कुणी त्याला काही म्हणतही नसे. अशी तीनचार वर्षं गेल्यावर संस्थेनं साकेतची सोय लावायचे प्रयत्न सुरू केले. कुठंही जागा न मिळाल्यानं अखेर साकेतची रवानगी महाराष्ट्राबाहेरच्या एका संस्थेत करण्यात आली. आजवर शाळेचा गंध नाही, तिथली भाषा तर अजिबात माहीत नाही. अशा मुलाला शिक्षणाशी जोडून घ्यायचे विशेष प्रयत्न व्हायला हवेत, संस्थेत ते कोण करणार?
अशीच काहीशी परिस्थिती एचआयव्ही असलेल्याच नाही तर नसलेल्याही अनेक मुलांना भोगावी लागलेली आहे. अकरा-बारा वर्षांचा होईपर्यंत शहरी वातावरणात वाढलेल्या मुलांना गावातल्या संस्थांमध्येे ‘जमत’ नाही! काही अनाथालयांमध्ये फार लहान मुलं असल्यानं नव्यानं तिथं गेलेल्या किशोरवयीन मुलांना जमवून घेता येत नाही. शारीरिक, मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांना इतर स्वीकारत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना साहाय्य करायला हवं, समजून घ्यायला हवं ही बाब संस्थाचालकांना निभत नाही.
मुलांसाठी काम करणार्‍या संस्थांमध्ये आजघडीला समन्वय नाही, किंवा त्यांची सक्रिय संघटना नाही. त्यांना एकमेकांच्या कामाची, इतर बालगृहांची माहिती नसते. किंवा असलीच तर बहुधा दुसर्‍या संस्थेविषयी काहीशी हेव्याची, मत्सराची भावना असते.

अठरा वर्षांनंतर...
अठरा वर्षांपुढच्या मुलांचं पुनर्वसन हे सर्वच संस्थांपुढचं मोठं आव्हान आहे. अठराव्या वर्षी संस्थेतून बाहेर पडून ह्या मुलांनी कुठे राहायचं? स्वत:चं आयुष्य पेलता येईल, इतकी ताकद त्यांच्या पंखांमध्ये आलेली नसते. बाहेरच्या जगाचा अनुभवही नसतो. एकंदर आर्थिक गणित बसवून सचोटीनं जगता येईल असा पगार या वयाच्या, क्षमतांच्या बळावर मिळवणं खरंच अवघड आहे. त्यात शहरांमधल्या राहत्या जागेच्या वाढत्या किंमती, फसवणूक आणि अडवणूक करायला टपलेली व्यवस्था ह्या सार्वत्रिक प्रश्‍नांना तर सामोरं जावंच लागतं. ही परिस्थिती बालगृहातल्या सगळ्याच मुलांची आहे. अशा प्रश्‍नांवर एकत्र मिळून तोडगा काढता येण्याजोगा आहे पण अजूनही तो निघत नाही.
एचआयव्ही असलेल्या मुलांच्या संदर्भात अठरा वर्षांनंतर प्रश्न आणखीच गंभीर आहे. नोकरी मागायला गेल्यावर त्याचा एचआयव्ही न सांगण्याचा हक्कही त्याला नाही. अमूक संस्थेतून तो/ती आलेली आहे ,असं कळलं की त्याचाच अर्थ तसा होतो. ह्या मुलामुलींना सहजी नोकरीवर ठेवून घेतलं जात नाही. नोकरीच्या ठिकाणी भेदभावाला सामोरं जावं लागतं.
अनेक संस्थांमध्येही ‘एचआयव्ही असलेल्यांना फारशी बुद्धिमत्ता नसतेच, त्यांची प्रकृती अशक्तच असते’ अशी एक समजूत आहे. त्यामुळे कुठल्याही चांगल्या शिक्षणक्रमांचा विचार त्यांच्यासाठी केलाच जात नाही. शिकवायचंच म्हटलं तरी ‘कुठलंतरी व्यावसायिक शिक्षण द्यावं म्हणजे लवकर पायावर उभं राहता येईल’, असंच म्हटलं जातं. या मुलांना उच्चशिक्षणही घ्यावंसं वाटेल, आणि तसं असेल तर ती संधी
देण्याची जबाबदारी आपली आहे, ही कल्पना अजूनतरी पटलेली नाही.
अठरा वर्षांहून मोठ्या मुलींबाबत काय करावं हा प्रश्‍न सोपा नाही. ह्या मुलींना एकतर नातेवाईकांकडे परत पाठवलं जातं किंवा ते शक्य नसलं तर त्यांचं लग्न करून टाकलं जातं. या विषयाबाबत बोलणं सोपं आहे, करणं अवघड. पण आपल्याला किती कमी लेखलं जातंय ते या मुलांना जाणवत असेल, त्याचं काय?
नुसत्या एचआयव्ही असल्यानं आनंदानं जगण्याला कमीपणा येण्याचं काही कारण नाही, पण संस्थांमध्ये राहणार्‍या ह्या बालकांमध्ये मात्र आनंदाची कमतरताच दिसते. लहान असताना, लहान असतात म्हणूनच केवळ कुठल्याही परिस्थितीत हसायखिदळायची हिंमत त्यांच्यात दिसते. पण मोठी झालेली मुलं, आत्मविश्वास नसलेलं जीवन, आपल्या नशिबाला आणि नसलेल्या आईवडलांना बोल लावत दु:खीकष्टीपणे जगत राहतात. गेल्या काही वर्षांमध्ये एचआयव्हीबाधित मुलांच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं, असं राष्ट्रीय स्तरावर ठरलेलं आहे. त्याचा धोरणात्मक आराखडाही तयार होत आहे. भारत सरकारनं एड्स थोपवण्यासाठी आणि त्याचे दुष्परिणाम नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम २००७-२०१२ (छअउझ खखख) आखला आहे.
या विषयाबद्दलच्या मार्गदर्शक तत्त्वांमधील सर्वात कळीचं तत्त्व म्हणजे, त्यांच्याशी भेदभाव न करणं ! तसं झालं तरच मुलांना त्यांचे सर्व हक्क आणि सुविधा उपभोगता येतील. ह्या मुलांना समाजात वावरताना, (खासगी किंवा सरकारी क्षेत्रात), सोयी-सुविधा मिळताना कोणत्याही प्रकारे नाकारलं किंवा वगळलं जाऊ नये, किंवा वेगळी वागणूक मिळू नये; इतर मुलांना उपलब्ध असणारं सुरक्षित बालपण मिळावं आणि त्यांच्या विशेष गरजांनुसार विशेष प्रकारच्या सोयी-सुविधा मिळाव्यात, ही आपली सर्वांचीच आणि मुख्य म्हणजे सरकारची जबाबदारी आहे.

बालकल्याण समिती (CWC)
पुण्यामध्ये शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या बालकल्याण समितीचे कार्यालय Observation/ Children Home for Boys Campus, हर्डीकर हॉस्पिटल शेजारी, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे आहे. त्यांचे कामकाज आठवड्यातून ३ दिवस चालते.

एकात्मिक बाल सुरक्षा योजना

भारतातील जवळजवळ ४०% बालके ही दुर्बल - बळी पडण्याची जास्त शक्यता असणार्‍या गटामधली आहेत. त्यात लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या, ड्रगच्या आहारी गेलेल्या, रस्त्यावरच्या, भीक मागणार्‍या, अत्यंत गरीब किंवा भटक्या-विमुक्त-वंचित घरातल्या बालकांचा, एचआयव्ही बाधित, पळवून नेलेल्या, बालगुन्हेगार आणि अनाथ बालकांचा समावेश होतो.
खरं म्हणजे देशातल्या प्रत्येकच बालकाला सुरक्षित वातावरण मिळण्याचा हक्क आहे, पण दुर्बल घटकांमधील या बालकांच्या सुरक्षेची विशेष जबाबदारी २००९-२०१०च्या ‘एकात्मिक बाल सुरक्षा’ (Integrated Child Protection Scheme) या योजनेंतर्गत भारत सरकारनं नागरी संस्थांच्या बरोबरीनं (civil society partnership) घेतलेली आहे. त्यानुसार या बालकांंसाठी वसतीगृहं-अनाथालयं उभारणं, २४ तास हेल्पलाईन सेवा देणं (१०९८ क्रमांक), हरवलेल्या बालकांंची माहिती मध्यवर्ती डेटाबेसमध्ये गोळा करणं, अनाथ बालकांचं पुनर्वसन आणि संरक्षण करणं इत्यादींचा समावेश आहे.
याचबरोबर बालकांंच्या हक्काविषयी जागृती निर्माण करण्याचे, वंचित परिस्थितीला बळी पडू शकणार्‍या कुटुंबांसाठी आणि त्यातल्या बालकांंसाठी विशेष आर्थिक साहाय्य देण्याचे कृतिकार्यक्रम या योजनेतर्फे घेतले जातात आणि बालकांंसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, बालकल्याण समित्या, पोलीस, न्यायालयं यांना आवश्यक ते प्रशिक्षण, आर्थिक-व्यवस्थापकीय सहकार्यही दिलं जातं.
http://wcd.nic.in/icpsmis/home.aspx

यह बच्चा किसका बच्चा है

यह नज़्म एक सूख़ाग्रस्त, भूख़े मरियल बच्चे ने कवि से लिखवाई है

१.

यह बच्चा कैसा बच्चा है
यह बच्चा काला-काला-सा
यह काला-सा, मटियाला-सा
यह बच्चा भूख़ा-भूख़ा-सा
यह बच्चा सूख़ा-सूख़ा-सा
यह बच्चा किसका बच्चा है

यह बच्चा कैसा बच्चा है
जो रेत पर तन्हां बैठा है
ना इसके पेट में रोटी है
ना इसके तन पर कपड़ा है
ना इसके सर पर टोपी है
ना इसके पैर में जूता है
ना इसके पास ख़िलौना है
कोई भालू है कोई घोड़ा है
ना इसका जी बहलाने को
कोई लोरी है कोई झूला है
ना इसकी जेब में धेला है
ना इसके हाथ में पैसा है
ना इसके अम्मी-अब्बू हैं
ना इसकी आपा-खाला है
यह सारे जग में तन्हां है
यह बच्चा कैसा बच्चा है
२.

यह सहरा कैसा सहरा है
ना इस सहरा में बादल है
ना इस सहरा में बरखा है
ना इस सहरा में बाली है
ना इस सहरा में खोशा१ है
ना इस सहरा में सब्ज़ा है
ना इस सहरा में साया है

यह सहरा भूख़ का सहरा है
यह सहरा मौत का सहरा है
३.

यह बच्चा कैसे बैठा है
यह बच्चा कब से बैठा है
यह बच्चा क्या कुछ पूछता है
यह बच्चा क्या कुछ कहता है
यह दुनिया कैसी दुनिया है
यह दुनिया किसकी दुनिया है
४.

इस दुनिया के कुछ टुकड़ों में
कहीं फूल खिले कहीं सब्ज़ा है
कहीं बादल घिर-घिर आते हैं
कहीं चश्मा है कहीं दरिया है
कहीं ऊँचे महल अटरिया हैं
कहीं महफ़िल है, कहीं मेला है
कहीं कपड़ों के बाज़ार सजे
यह रेशम है, यह दीबा२ है
कहीं गल्ले के अम्बार लगे
सब गेहूँ धान मुहय्या है
कहीं दौलत के सन्दूक़ भरे
हॉं ताम्बा, सोना, रूपा है
तुम जो मॉंगो सो हाज़िर है
तुम जो चाहो सो मिलता है
इस भूख के दुख की दुनिया में
यह कैसा सुख का सपना है ?
वो किस धरती के टुकड़े हैं ?
यह किस दुनिया का हिस्सा है ?
५.

हम जिस आदम के बेटे हैं
यह उस आदम का बेटा है
यह आदम एक ही आदम है
वह गोरा है या काला है
यह धरती एक ही धरती है
यह दुनिया एक ही दुनिया है
सब इक दाता के बन्दे हैं
सब बन्दों का इक दाता है
कुछ पूरब-पच्छिम फ़र्क़ नहीं
इस धरती पर हक़ सबका है

६.

यह तन्हा बच्चा बेचारा
यह बच्चा जो यहॉं बैठा है
इस बच्चे की कहीं भूख़ मिटे
(क्या मुश्किल है, हो सकता है)
इस बच्चे को कहीं दूध मिले
(हॉं दूध यहॉं बहुतेरा है)
इस बच्चे का कोई तन ढॉंके
(क्या कपड़ों का यहॉं तोड़ा३ है ?)
इस बच्चे को कोई गोद में ले
(इन्सान जो अब तक ज़िन्दा है)
फिर देखिए कैसा बच्चा है
यह कितना प्यारा बच्चा है
७.

इस जग में सब कुछ रब का है
जो रब का है, वह सबका है
सब अपने हैं कोई ग़ैर नहीं
हर चीज़ में सबका साझा है
जो बढ़ता है, जो उगता है
वह दाना है, या मेवा है
जो कपड़ा है, जो कम्बल है
जो चॉंदी है, जो सोना है
वह सारा है इस बच्चे का
जो तेरा है, जो मेरा है

यह बच्चा किसका बच्चा है ?
यह बच्चा सबका बच्चा है

शब्दार्थ:
१. धान्याचं कणीस किंवा दाणा
२. तलम रेशमी कापड
३. अभाव

रक्ताचं पाणी झालं ग बाई !

मला आठवतंय तेव्हापासून आई सगळ्यांचं झाल्यावर जेवायला बसायची. तिच्या पानात बर्‍याचदा भाजीऐवजी मिरची-खरडा-लोणची असायची. विचारलं की म्हणायची, ‘‘अरे, तुमच्या सगळ्यांच्या पोटात गेली म्हणजे मला मिळाल्यासारखीच आहे की...’’ मावशी, मामी वगैरे बायकांनाही मी असंच उरलेल्या रश्श्याबरोबर जेवताना पाहिलेलं होतं. घरात कितीही भाज्या येत असल्या तरी या बायकांच्या वाट्याला कधीच येत नसत. यातल्या अनेकजणींना अशक्तपणा, चक्कर येणं, कंबरदुखी, अंधारी येणं असे त्रास अनेक वर्षं होत असत. त्याला डॉक्टर ‘ऍनिमिया’ म्हणत. या शब्दाची ओळख मला अशी झाली होती. पुढे मी स्वत: डॉक्टर झाल्यावर त्याचा संपूर्ण अर्थ मला कळला.
‘ऍनिमिया’ हा इंग्रजी शब्द आहे. ऍनिमिया म्हणजे रक्तातला लालपणा, म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होणं. याला मराठीत ‘रक्तपांढरी/रक्तक्षय/पंडुरोग’ म्हणतात. हा आजार आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात आहे. खास करून बायांमध्ये ऍनिमियाचं प्रमाण खूप आहे. शंभरातल्या ६० ते ७० महिलांना/मुलींना हा आजार आहे. म्हणजे आपल्या देशातली जवळजवळ निम्मी लोकसंख्या ‘ऍनिमिक’ आहे.
या आजाराची वाईट गोष्ट अशी आहे की बर्‍याच स्त्रियांना त्याची ‘सवय’ होते. या आजाराची सुरुवात हळूहळू होते. अनेक वर्षे ऍनिमिया हळूहळू वाढत गेला तरी तो बाईच्या ‘अंगवळणी’ पडतो. खूप ऍनिमिया झालेली बाईसुद्धा काबाडकष्टाची कामं करत राहते. सुरुवातीला अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो. जिच्याशी बोलावं तिलाही तशीच लक्षणं जाणवत असतात. मग दोघींनाही असं वाटतं की हे तर ‘बाईच्या जन्माचे भोग’ आहेत. हे असं व्हायचंच. सगळ्याजणी दुखणं अंगावर काढतात, तसं आपणही काढायचं. संसाराकडं बघायचं की आपल्या दुखण्याचं कौतुक करायचं, असं तिला वाटू लागतं.
दर १०० मि.लि. रक्तामध्ये साधारणपणे हिमोग्लोबिनचं प्रमाण सुमारे १२ ते १५ ग्रॅम असावं लागतं. हिमोग्लोबिन हे लाल द्रव्य प्राणवायू वाहून नेण्याचं खूप महत्त्वाचं काम करतं. शरीराच्या प्रत्येक अवयवाला प्राणवायूची गरज असते. आपण श्‍वासावाटे हवा आत घेतो. फुफ्फुसांमध्ये हवेतला प्राणवायू रक्तात शोषून घेतला जातो. म्हणजे हिमोग्लोबिनमध्ये मिसळतो. तो सगळीकडे पोहोचवण्याचं काम आपलं रक्त करत असतं. हिमोग्लोबिन कमी झालं असेल तर रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची ताकद कमी होईल. ‘ऍनिमिया’मुळे नेमकं असंच होतं. मग हवेमध्ये प्राणवायू भरपूर आहे, पण रक्तामध्ये तो घेण्याची ताकद नाही अशी परिस्थिती होते. म्हणजेच ‘देणार्‍याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी’ असं होतं. यालाच काही लोक ‘रक्ताचं पाणी झालं’ असंही म्हणतात.
मग याची लक्षणं दिसायला लागतात. अशक्तपणा येतो. दम लागतो. छातीत धडधड करते. अंधारी येते, चक्करही येते, उत्साह वाटत नाही, चिडचिड वाढते, उदास वाटतं, भूकही लागत नाही. सुरुवातीला नुसता थकवा जाणवतो. पण हिमोग्लोबिन ८ ग्रॅमच्या खाली येऊ लागलं की खूप जास्त त्रास होऊ लागतो. नंतर पायावर सूजही येते.
हिमोग्लोबिनमधलं हिम म्हणजे लोह, ते २५% असतं आणि ग्लोबिन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं प्रथिन, ते ७५% असतं. हे प्रथिन शरीर स्वत:च बनवतं. ‘हिम’ साठी लागणारा कच्चा माल म्हणजे हिरव्या पालेभाज्या, हिरव्या फळ भाज्या, कोंड्यासहित धान्य, हळीव, नारळ, गूळ, खजूर. स्वयंपाकात लोखंडाची भांडी (म्हणजे तवा, कढई, उलथणं, झारा) वापरल्यानं त्यातून थोडं लोह मिळतं. (आजकाल आपण ही भांडी माळ्यावर टाकून हिंडालियम किंवा स्टेनलेसची भांडी वापरतो. ती माळ्यावरची लोखंडाची भांडी वापरायला काढायला हवीत.)
ग्लोबिन तयार होण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे डाळी, कडधान्यं, काही अल्प प्रमाणात भात, गहू इ. तृणधान्यं, शेंगदाणे, दूध, दही, अंडी, मांस, मासे, कलेजी इत्यादी. पण नेमक्या याच गोष्टींची गरीबांच्या अन्नात कमतरता असते.
ऍनिमियावर उपाय करताना, आहारात लोह आवश्यक असल्याची जितकी आठवण ठेवली जाते, तितका भर प्रथिनांवर दिला जात नाही.
ही प्रथिनं लोहाइतकीच, किंबहुना जास्तच आवश्यक असतात.
खरं तर स्त्रियांनी, मुलींनी लोहयुक्त आणि प्रथिनयुक्त अन्न जास्त खायला पाहिजे. कारण दर महिन्याला पाळीतून त्यांचं रक्त जात असतं. त्याची भरपाई व्हायला पाहिजे.
पण एवढं करूनही सतत, वारंवार आणि जास्त रक्तस्त्राव होत असेल तर मात्र अन्नातलं लोह कमी पडतं. पाळीच्या वेळी अंगावरून जास्त रक्त जात असेल, मूळव्याधीतून रक्त पडत असेल किंवा आतड्यात ‘हुककृमी’ (आकडे-कृमी) असतील तर ऍनिमिया वाढतो. त्या वेळी त्या त्या कारणावर उपाय करावा लागतो.
हे सगळं खायला हवं असं म्हटलं की मनात पहिला विचार येतो तो महागाईचा. खरं तर महागाई विरुद्ध सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं हादेखील ऍनिमियाविरुद्धचाच लढा आहे. परंतु या महागाईच्या काळातदेखील आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा. कारण खाण्यापिण्यात आज थोडी काटकसर केली तर उद्या नाही तर परवा, ऍनिमिया आणि ऍनिमियामुळे होणारे आणखी काही रोग होतात. मग दवाखाना, हॉस्पिटल ऍडमिशन, महागडी औषधं, अमाप खर्च हे सगळं मागं लागतं.
ऍनिमिया जास्त असेल तर मात्र प्रथिनयुक्त आहारासह लोहयुक्त गोळ्या आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्या जरूर घ्याव्यात. या गोळ्यांमुळे संडासला काळसर रंगाची होते. त्यानं घाबरून जायचं नाही. या गोळ्या जेवणानंतरच घ्यायच्या. म्हणजे पोटात भगभग (जळजळ) होत नाही. हा उपचार किमान सहा महिने तरी करावा. बरं वाटलं तरी मध्येच सोडू नये. उपचार चालू असताना आणि नंतरही सकस आहारच घ्यावा. या गोळ्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात मोफत मिळतात. फॅशनेबल महागडी टॉनिके, कॅप्सूल्स घेण्याचं काही कारण नाही. काही डॉक्टर अशी औषधं लिहून देतात, पण त्यानं आपला काही फायदा होत नाही. आपल्या पैशानं औषध कंपन्यांना आणि नफेखोर डॉक्टरांनाच बाळसं येतं.
ऍनिमिया होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वारंवार गर्भारपण आणि बाळंतपण. बाळाला हवं ते पोषण त्याच्या आईच्या रक्तातूनच मिळतं. या काळात आईनं नीट जेवण घेतलं नाही तर तिला ऍनिमिया होतो. प्राणवायू कमी पडतो. डिलीवरीच्या ऐन प्रसंगी तिला भयंकर दम लागतो. कधी कधी डिलीवरीमध्येच बाईचा मृत्यूही होऊ शकतो. लहान वयात लग्न, वारंवार गरोदरपणा, बाळंतपणं, गर्भपात यामुळे ऍनिमिया होण्याची शक्यता जास्त असते. काहीवेळा गरोदरपणात किंवा बाळंतपणात बाईला सांगितलं जातं की हे खाऊ नको ते खाऊ नको. काही बायांना असं वाटतं की गरोदरपणात या गोळ्या खाल्ल्या की बाळ मोठं होतं आणि बाळंतपणाला त्रास होतो. पण हे खरं नाही. बाळाला आवश्यक तेवढंच लोह बाळ आईच्या रक्तातून घेतं. जास्त घेत नाही. असं बघा की आईच्या रक्तातच लोह पुरेसं नसेल तर बाळ त्यातनं घेणार तरी किती? मग बाळालाही ऍनिमिया होतो.
यापलीकडे बाईला ऍनिमिया होण्याची आणखी कारणं आहेतच. सगळ्यांची जेवणं झाल्यावर एकटीनं जेवणं, उसळ, डाळ, भाजी, मासे, मटण यापैकी फक्त त्याचा रस्सा तिच्यासाठी उरणं, फक्त लोणच्याशी जेवणं हेही एक महत्त्वाचं कारण आहे. ते घरातल्या सगळ्यांना मिळून टाळता येतं. कारणा कारणानं उपास करणं आणि तेव्हा चहा पिऊन भूक मारणं हेही एक मोठंच कारण आहे. तेही टाळावं.
हे सगळं समजून घेऊन घरोघरच्या पालकांनी घरातल्या मायलेकींच्या पोषणाकडेे लक्ष दिलं, सर्वांनी एकत्र बसून जेवायचं ठरवलं, जेवणात आवश्यक घटकांचा समावेश केला तर ऍनिमियाशी लढा देता येईल.
mohandeshpande.aabha@gmail.com

मुलांचा भारत !
• जगातल्या मुलांपैकी एक तृतीयांश मुलं, म्हणजेच जवळजवळ ४० कोटी मुलं भारतात
• अर्धी मुलं कुपोषित (राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण अहवाल ३, २००५-०६)
• जन्माला आलेल्या प्रत्येक १००० मुलांमागे ५५ मुलांचा पाच वर्षांच्या आत मृत्यू. (राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण अहवाल ३, २००५-०६ )
• जन्माला आलेल्या मुलांपैकी २२% मुलं अपुर्‍या वजनाची.
• सहा महिने ते ३ वर्षांपर्यंतची ७९% मुलं ऍनिमिक ! आणि १५ ते १९ वयोगटातल्या ५६% मुली ऍनिमिक
• १००० मुलग्यांमागे फक्त ९१४ मुली (२०११ ची जनगणना)
• अठरा पूर्ण होण्याच्या आतच ४५% मुलींचं लग्न लावून दिलं जातं.
• साधारण ४.५ कोटी बालमजूर. त्यातली ३.६ कोटी मुलं मजुरीच्या विळख्यात.

ऍनिमिया कसा ओळखतात?
१) नेहमीचं काम केल्यावर किंवा थोडं चालल्यावर दम लागतो का?
२) सारखी चक्कर येते का?
३) मासिक पाळीमध्ये किंवा इतर कारणामुळे रक्त जास्त बाहेर जातं आहे का?
यातल्या कोणत्याही प्रश्‍नाचं उत्तर ‘हो’ असेल तर तपासणी करावी.

ऍनिमियाची तपासणी कशी करायची?
१) आरसा समोर ठेवा. डोळ्याची खालची पापणी ओढून पापणीचे आतली बाजू किती लाल आहे किंवा फिक्कट गुलाबी आहे, की पांढरट आहे हेही पहावं.
२) ओठाचा आतला भागही असाच तपासावा.
३) ऍनिमिया असेल तर हाताचे तळवे, जीभ, नखे फिक्कट दिसतात.

ऍनिमिया होऊच नये म्हणून काय करावे ?
• चणे/हरभरे, गूळ यांचा भरपूर वापर असावा.
• विशेषत: पावसाळ्यात मिळणार्‍या भाज्या जरूर वापराव्यात.
• हातसडीचे तांदूळ, नाचणी, बाजरी, यांचाही वापर भरपूर करावा.
• आहारात आवळा, लिंबू असावं. त्यातून ‘क’ जीवनसत्व मिळतं. त्यामुळे आपल्या अन्नातलं लोह आतड्यातून रक्तात लवकर मिसळतं.
• जेवणात डाळी, कडधान्य, मांस, मासे, अंडी, दही, दूध यांचा समावेश असावा. त्यामुळे ग्लोबिन तयार होण्यासाठी मदत मिळते.
• जमेल तेव्हा अळीवाचे लाडू किंवा खीर करावी. अळीवामध्ये लोहाचं प्रमाण खूप चांगलं असतं. अळीवाच्या लाडूत तीळ, शेंगदाणे वेगवेगळे भाजून, कुटून घालावेत, खजूर/गूळही वापरावा.
• भाजलेले अळीव, तीळ, शेंगदाणे यांची चटणी करून खावी.

कुटुंबसभा

मागील प्रकरणात आपण मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वयंशिस्त रुजावी आणि वर्गातली शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया आनंदाची व्हावी यासाठी ठरावीक काळानं घेतल्या जाणार्‍या वर्गसभा कशा उपयोगी पडतात हे बघितलं. या लेखात आपण घरांमध्ये, घरातल्या सगळ्या माणसांमध्ये स्वयंशिस्त रुजावी या संदर्भातल्या काही कल्पना पाहू. सकारात्मक शिस्तीच्या दिशेनं जाताना परस्पर-आदर आणि समजुतीच्या पायावर आधारलेल्या संवादाची फार आवश्यकता असते. सर्वांनी मिळून एकत्र निर्णय घेण्यासाठी, आखणी करण्यासाठी, वाद-भांडणं सोडवण्यासाठी वर्गसभेप्रमाणेच, घरातल्या सर्वांनीही एकत्र बसून ठरावीक काळानं चर्चा-विनिमय करणं आवश्यक आहे. मात्र घर आणि शाळा यात काही मूलभूत फरक आहेत. त्यामुळे शाळांमधल्या वर्गसभेसारखीच ‘कुटुंबसभा’ घरात शक्य होत नाही. घरातलं वातावरण अनौपचारिक असतं. दिवसभराची कामं करताना औपचारिक वातावरणात झालेली मनाची आणि शरीराची झीज घरात भरून निघते. मायेच्या धाग्यांनी बांधल्या गेलेल्या नात्यांमधून आपलेपणा मिळणं, समजून घेतलं जाणं, काळजी घेतली जाणं ही घरातल्या प्रत्येकाचीच गरज असते. मात्र अनेकदा आपल्या माणसांना गृहीत धरलं जातं आणि त्यांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होतं, कधी त्यांच्यावर अन्याय होतो हेही आपल्या अनुभवास येतं.

आपल्या देशातल्या इतर व्यवस्थांप्रमाणेच कुटुंबामध्येही स्वातंत्र्य, समानता ही मूल्यं नवीन आहेत. अगदी मागच्या पिढीपर्यंत कुटुंबातील नात्यांची रचना उतरंडीचीच होती. घरातल्या स्त्रियांकडे सगळ्यांची देखभाल करण्याचं काम दिलेलं होतं आणि पारंपरिक संस्कारातून स्त्रियाही ते मनापासून पार पाडायचा प्रयत्न करत होत्या. घरातल्या स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जाई त्यांनाही ते मान्य असे. गेल्या ५०-६० वर्षांत स्त्रिया शिकू लागल्या, कमावू लागल्या आणि स्वतंत्र विचार करू लागल्या. विभक्त कुटुंबांचं प्रमाण वाढलं. स्त्री-पुरुष समानतेचा विषय अद्याप कृतीत पुरेसा आलेला नसला तरी विचारांमध्ये स्वीकारला जातो आहे. शिक्षणाच्या-विकासाच्या संकल्पनांमध्येही आमूलाग्र बदल होत आहेत. मोठ्यांनी सांगायचं आणि मुलांनी ऐकायचं या सत्ताधारित संकल्पनांवर आता साधकबाधक विचार होऊ लागला आहे. मुलांनाही व्यक्त होण्याची संधी हवी, विचार करायचा मोकळेपणा हवा, भीती-धाक या भावनांमुळे विचार थांबतात, शिस्त ही वरून लादून चालणार नाही तर मनातून रुजायला हवी या विचारांना समर्थन मिळू लागलं आहे.

सकारात्मक शिस्तीच्या या लेखमालेत नमूद केलेल्या पद्धती या नव्या संकल्पनांच्या पायावरच विकसित झाल्या आहेत. सामान्यपणे घरातल्या मुला-माणसांमध्ये प्रेम असतंच, पण म्हणून ते आपोआप आनंदातच राहतील असं गृहीत धरता येणार नाही. व्यक्तींना एकत्र आनंदानं रहायचं तर एकमेकांना समजून घेण्यासाठी, मोकळा संवाद प्रस्थापित करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. या लेखातील कल्पनांमुळे या मोकळ्या संवादात निश्‍चित भर पडेल असा विश्‍वास आहे.
कुटुंबामध्ये स्वयंशिस्त रुजावी, निर्णय घेण्यामध्ये आणि त्यांच्या कार्यवाहीमध्येही लहान-मोठ्या सर्वांचा सहभाग असावा. परस्परांमधले मतभेद समजुतीनं मिटावेत याकरता घरांमध्ये चर्चा-विनिमयासाठी खास अवकाश निर्माण करायला हवा. या चर्चा विनिमयास इथे ‘कुटुंबसभा’ हे नाव दिलं आहे. हे नाव आपल्याला काहीसं औपचारिक वाटेल! आपण हे नाव बदलू शकता. ‘संवाद-संध्या’ किंवा अशा प्रकारचं नाव आपण योजू शकता. मात्र आठवड्यातून एकदा मुद्दाम ठरवून घरातल्या सर्वांनी चर्चा-विनिमयासाठी एकत्र येणं ही संकल्पना लक्षात घेऊया. कुटुंबाची अशी एखादी खास वही बनवता येईल. त्यात ज्या मुद्यांवर चर्चा व्हायला हवी असेल ते मुद्दे सर्वांनीच नोंदवून ठेवावेत. वर्गसभेपेक्षा कुटुंबसभेचं वेगळेपण आपण लक्षात घ्यायला हवं. वर्गात एक शिक्षक मोठे असले, तरी सगळी मुलं एकाच वयाची असतात. सर्वांचं काम, जबाबदारी सारखीच असते. त्यामुळे एकच नियम सर्वांना लागू पडावा असा आग्रह धरणं सोपं जातं. घरातल्या लोकांच्या वयात खूपच फरक असतो. तीन पिढ्या एकत्र नांदत असू शकतात. घरातील व्यक्तींची एकमेकांशी वेगवेगळी नाती असतात. त्यातले हक्क आणि कर्तव्यंही वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ मोठ्या माणसांवर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असते. त्यामुळे मुलांना आणि मोठ्यांना समान नियम लावणं अवघड बनतं. मात्र कुटुंबातील लोकांची संख्या मर्यादित असते आणि ते जास्त वेळ एकमेकांच्या सहवासात असतात. त्यामुळे संवादाच्या संधी जास्त असतात. त्यामुळे नियम बनवतानाच वेगवेगळ्या लोकांसाठीच्या शक्यतांचाही विचार करावा लागतो किंवा त्या त्या वेळी येणार्‍या प्रश्‍नांनुसार नियमांना वळणही द्यावं लागतं.

मुलं लहान असताना अनेकदा आया नोकरी न करता घरी रहाणं स्वीकारतात असं दिसतं. मुलांची जबाबदारी मुख्यत: आईची, ह्या आपल्याकडच्या गृहीतकाचा हा परिणाम आहे. परंतु ही परिस्थिती आता बदलते आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील दोघंही पूर्ण वेळाचं काम करतात. (अभ्यासानुसार शहरातल्या आया काहीशा अधिक प्रमाणात घरात राहतात. ६४%) घरात आजी-आजोबा असतील तर त्यांची निश्‍चितच मदत होते. पण दुसर्‍या बाजूला त्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे प्रश्‍नही उद्भवू शकतात. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मुख्यत: आई-बाबांचीच. शाळेतून घरी आल्यावर घरात कुणी नसेल तर लहान मुलांना कमालीचं असुरक्षित, एकटं वाटू शकतं. किमान मुलं दहा वर्षांची होईपर्यंत आई किंवा वडिल यांच्यापैकी एकानं आळीपाळीनं घरासाठी जास्त वेळ द्यायला हवा. कुटुंबसभेच्या माध्यमातून होणार्‍या घरातल्या चर्चा-विनिमयातून काय साधतं, हे समजावून घेण्याकरता आपण आई-बाबा दोघंही पूर्णवेळ नोकरी करतात अशा विभक्त कुटुंबाचं उदाहरण पाहूया.
रमा वय वर्षं आठ, सलील वय वर्षं दहा आणि आई-बाबा असं हे चौकोनी कुटुंब! आई-बाबा दोघंही पूर्ण वेळ नोकरी करणारे. मुलं दुपारी तीनच्या सुमारास शाळेतून घरी येत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत घरात एकटीच असत. शेजारच्या आजींची एखादी चक्कर असे. मुलांना काही अडचणी नाहीत ना याकडे त्या लक्ष देत.

हातानं जेवण वाढून घेणं, कुलूप लावून क्लासला किंवा खेळायला जाणं इत्यादी गोष्टी मुलांना जमू लागल्या होत्या. पण शाळेतून घरी आल्यानंतर रिकाम्या घरात त्यांना अजिबात करमायचं नाही. चिडचिड व्हायची. अनेकदा भांडणं व्हायची. अशा मनस्थितीत स्वत:च्या वस्तू, खेळ, जागेवर व्यवस्थित ठेवणं हे काही त्यांना झेपायचं नाही.

सायंकाळी सहा वाजता आई दमून घरी येत असे. त्यावेळी घरभर पसरलेला पसारा बघून ती अगदी वैतागून जात असे. बाबा सातला घरी यायचे. संध्याकाळचे तीन-चार तास ही सगळीजणं घरात एकत्र असत. या एकत्र असण्याची सुरुवातच अनेकदा आई-बाबांची चिडचिड, मुलांचं उलटून बोलणं, आरोप-प्रत्यारोप यातून होत असे. त्यामुळे घरातलं वातावरण एकदम बिनसून जायचं.

कुटुंबसभेत हा मुद्दा घेतल्यावर मुलं शिस्तीत वागणं मान्य करायची. परिस्थिती थोडी सुधारायची, पुन्हा काही दिवसांनी जैसे थे! विचार केल्यावर आईबाबांना मुलांचं वागणंही समजू शकत होतं. पण परिस्थितीपुढे त्यांनाही पर्याय नव्हता. एकमेकांना समजून घेतच काही मार्ग निघणं शक्य होतं. एका कुटुंबसभेत आईनं शेजारच्या आजींनाही आवर्जून बोलावलं. सुरुवातीलाच आईनं मुलांची आणि स्वत:चीही होणारी ओढाताण, दमणूक, अस्वस्थता आणि परिस्थितीची अपरिहार्यता सर्वांसमोर मोकळेपणानं मांडली. ‘‘असं असलं तरी आपल्या सगळ्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आपण एकमेकांबरोबर आनंदात रहावं असं आपल्याला मनापासून वाटतं!’’ हेही मांडलं. त्यानंतर संभाषणाची दिशा बदलली आणि एकमेकांना दोष न देता सगळेच उपायांच्या दिशेनं विचार करू लागले. घर स्वच्छ, नीटनेटकं असावं त्यामुळे वस्तू वेळच्यावेळी सापडतातच त्याचबरोबर मन:स्थितीही छान राहते हे सर्वांना पटत होतं. या सभेत प्रत्येकानं हॉल आणि स्वयंपाक घरात आपल्या कोणकोणत्या वस्तू विसरून राहतात आणि पसारा होतो याची यादी तयार केली आणि त्या तशा न विसराव्यात यासाठी, ‘मी काय करेन’ यावर बोलणं झालं. आई आणि बाबांंच्याही वस्तू या पसार्‍यात असतात हे या निमित्तानं लक्षात आलं. पसारा पडू द्यायचा नाही म्हणजे नेमकं काय करायचं, हे सर्वांच्या लक्षात आलं. त्यानंतरही ‘पसारा राहिला तर काय करायचं?’ या प्रश्‍नावर सलीलला एक भारी कल्पना सुचली. घरात नुकताच नवीन टीव्ही आला होता. त्याचं रिकामं खोकं त्यानं समोर आणून ठेवलं. कुणाचाही ‘पसारा’ दिसला की त्याची रवानगी सात दिवसांकरता या खोक्यात म्हणजे जादूच्या पेटीत करायची, असं त्यानं सुचवलं. प्रत्यक्षात असं करताना अनेक प्रश्‍न येऊ शकतात हे आजींनी ताडलं. त्यांनी सुचवलं, ‘‘समजा सलीलची एखादी वस्तू रमाला हॉलमधे पडलेली दिसली, तर तिनं एकदा सलीलला सांगावं. तरीही त्यानं ती वस्तू उचलली नाही तर मात्र तो पसारा जादूच्या पेटीत जाईल.’’ कल्पना सर्वांनाच आवडली, जादूच्या पेटीचा इंगा दुसर्‍या दिवसापासूनच लक्षात यायला लागला. सलीलचे बूट जादूच्या पेटीनं गिळंकृत केल्यानंतर, शाळेत जाताना काय घालायचं असा प्रश्‍न निर्माण झाला. शाळेला उशीरही झाला होता. सलीलला घाई-घाईत घरातल्या सपाता घालून शाळेत जावं लागलं. खेळाच्या तासाला बूट नाहीत म्हणून खेळताही आलं नाही. राग आला, पण तो गिळावा लागला, कारण त्यानंच नियम सुचवला होता. आठवण करून देऊनही रमा स्वेटर विसरली तेव्हा सलील उत्साहानं तो जादूच्या पेटीत टाकायला निघाला, तेव्हा बुटांची घाण स्वेटरला लागू नये या इच्छेनं आईनं घाई-घाईनं एक प्लॅस्टीकची पिशवी त्याला दिली. त्यानंतरच्या कुटुंबसभेत, जप्त होताना वस्तू खराब होऊ नयेत, तुटू-फुटू नयेत यासाठी काळजी घ्यायचं ठरलं.

रमाला थंडी बाधते, म्हणून दुसर्‍या दिवशी आईलाच नियम मोडून खोक्यातून स्वेटर काढून द्यावा असं वाटू लागलं. नियम तर मोडायचा नाही पण रमाला मदत तर व्हायला हवी म्हणून सलीलनं त्याचा लहान झालेला स्वेटर तेवढ्या गडबडीतही शोधून रमाला दिला.

एकदा सलील गृहपाठ करत असतानाच मित्राची हाक आली म्हणून खेळायला गेला आणि आईनं गृहपाठाची वही-कंपास असं सारंच जादूच्या पेटीत टाकलं. आता मात्र सलील वैतागला. दुसर्‍या दिवशी त्यानं गृहपाठ पूर्ण केला नसता तर त्याला शिक्षा झाली असती. बाबा घरात नव्हते. लगेचच आई, रमा आणि सलीलनं चर्चा करून ठरवलं की या जप्तीचे परिणाम गंभीर होतील त्यामुळे इथं नियमाला अपवाद करायचा. पुढच्या कुटुंबसभेत बाबांनी यावर आक्षेप घेतला. तेव्हा सलीलनं त्यांना विचारलं, ‘‘समजा तुमचा पेनड्राईव्ह जादूच्या पेटीत गेला असता आणि दुसर्‍या दिवशी तुमचं प्रेझेंटेशन असतं तर तुम्ही काय केलं असतं?’’ बाबा जरा नरमले. त्यानंतर असं ठरलं की वस्तूची जर तातडीनं गरज असेल किंवा ती वस्तू नसल्यानं गंभीर नुकसान होणार असेल तर नियम शिथिल होईल. मात्र त्यावेळी हजर असलेल्या किमान एका व्यक्तीशी सल्लामसलत होऊनच हा निर्णय होईल. ती व्यक्ती ती वस्तू जादूच्या खोक्यातून काढून देईल. मात्र त्यानंतरच्या कुटुंबसभेत यावर चर्चा होऊन योग्य-अयोग्यता तपासून बघितली जाईल.

कुटुंबसभेतल्या या चर्चा-विनिमयाची परिणती म्हणून आपापल्या वस्तूंचा ‘पसारा’ न बनवण्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकजण आवर्जून घेऊ लागला. उपाय मुलांकडूनच आल्यामुळे गैरसोय झाल्यानंतरदेखील मुलांना मोठ्यांचा राग आला नाही. नियम सर्वांना सारखेच आहेत ही कल्पना मुलांना आवडली. घरातल्या पसार्‍यात आपल्याही वस्तू असतात हे आई-बाबांच्याही लक्षात येऊ लागलं. मुलांकडून अपेक्षा करण्याआधी आपण तसं वागून दाखवायला हवं हे आई-बाबांना जाणवलं. मुख्य म्हणजे आपल्या घरातले प्रश्‍न सोडवायची जबाबदारी फक्त मोठ्यांचीच नाही तर मुलंही त्यात बरोबरीनं सहभाग घेऊ शकतात हा अनुभव मुलांना अधिक संवेदनाक्षम आणि जबाबदार बनवणारा ठरला.
मुलं-मुलांचे वडील यांना कितीही सांगितलं तरी पसारा आवरतच नाहीत, तेव्हा अनेकदा आया तो स्वत:च आवरून टाकतात किंवा चिडचिड करत राहतात, येता जाता टोमणे मारत राहतात. मुलं आणि बाबाही ‘आईचं हे नेहमीचंच’ म्हणून तिच्या बोलण्याकडे कानाडोळा करायला शिकतात. हे आपणही अनेकवार अनुभवलं असेल. यातून साधत काहीच नाही. ना घरातल्या कामांत इतरांचा सहभाग मिळतो, ना मुलांना शिस्त लागते. नात्यांमधलं अंतर मात्र वाढत जातं.
कुटुंबामध्ये येणार्‍या प्रश्‍नांवर चर्चा होऊन त्यातून सकारात्मक उत्तरं पुढं यावीत आणि प्रश्‍न सोडवण्यात सर्वांना सहभाग घेता यावा, याकरता कुटुंबसभेत होणार्‍या चर्चा-विनिमयाचा फार उपयोग होतो. या चर्चेमध्ये एकमेकांच्या प्रश्‍नांचा आणि परिस्थितीमुळे उद्भवलेल्या मुद्यांचा सहृदयतेनं विचार झाला तर एकमेकांना आधार देण्यासाठी प्रयत्न होतात मात्र बदल पटकन आणि सहज होत नाहीत. त्यासाठी न चिडता सातत्यानं पाठपुरावा करावा लागतो. कुटुंबसभेसारखी, उभयपक्षी आदर आणि समजुतीची अपेक्षा असणारी रचना यासाठी फार महत्त्वाची ठरते.

कुटुंबसभेची रचना
वर्गसभेप्रमाणेच कुटुंबसभेमध्येही खालील गोष्टी असायला हव्यात.
१) कुटुंबसभेची निश्‍चित वेळ आधी ठरलेली असायला हवी.
२) आठवडाभरात सभेसाठीचे मुद्दे नोंदवून ठेवण्यात सर्वांचा सहभाग हवा. आपसातील वाद-मतभेद मिटवणं, घरातील अडचणींवर तोडगा शोधणं, विशेष कार्यक्रमांची आखणी करणं, रोजच्या कामांची विभागणी करणं ह्या चार विषयांवर कुटुंबसभेमध्ये प्रामुख्यानं काम व्हावं.
३) कुटुंबसभा घेण्याची संधी आळीपाळीनं सर्वांना मिळावी. सुरुवातीला मदत लागली तरी यातूनच मुलांमध्ये पुढाकार घेण्याची वृत्ती विकसित होते.
४) एकमेकांच्या गुणांची, चांगल्या वागण्याची
दखल घेण्यामुळं घरातलं वातावरण सकारात्मक राहतं. सर्वांनाच प्रोत्साहन मिळतं. कुटुंबात एकमेकांना गृहीत धरण्याची सवय मोडण्यासाठी याचा निश्‍चित उपयोग होतो.
५) अनेकदा समोर येणार्‍या प्रश्‍नांकडे वरवर बघून पुरत नाही. विशेषत: आई-वडिलांनी त्या प्रश्‍नांच्या कारणांपर्यंत जाऊन विचार करायला हवा. तो मुलांसमोर मांडायला हवा.
६) चुकूनही कुटुंबसभा एकमेकांच्या चुका, दोष उगाळून परिणामांची चर्चा करण्याकडेच कलत नाही ना, याचं भान ठेवायला हवं. आपला हेतू उपाय शोधायचा आहे.
७) सर्वांनी मिळून घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी प्रत्येकानं घ्यायला हवी. ती घेण्यामधे आलेले प्रश्‍न हा पुढच्या कुटुंबसभेचा विषय व्हावा.

घरातील कामांची विभागणी
घरात प्रत्येकानं स्वत:चं काम स्वत: करायचं हा स्वयंशिस्तीचा पहिला टप्पा. जेव्हा आया ‘जेवायला वाढणं, गृहपाठ करवून घेणं, सर्वांच्या कपड्यांची व्यवस्था ठेवणं’ ह्या सवयींतून बाहेर पडतील आणि घरातली इतर माणसं आणि मुलंही आपापल्या वस्तूंची आपापल्या पद्धतीनं काळजी घेऊ लागतील, तेव्हा हा पहिला टप्पा साधला म्हणायचा.
मुलांच्याही आधी प्रश्‍न मुलांच्या वडिलांचा असतो. लहानपणापासून ‘मुलगा’ म्हणून मुलींपेक्षा वेगळं वाढवलं गेलेल्या वडिलांच्या हातांना घरातल्या कामांची सवयच नसते. घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती, परंपरेच्या चौकटीतून अनेकदा पुरुषांचीच बाजू घेतात. बाबांना शिस्त नसेल तर मुलांना ती लागणं अवघड जातं. बाबांमध्ये हा बदल व्हावा म्हणून सातत्यानं विरोध पत्करून संवाद करत राहणं याला आज तरी पर्याय दिसत नाही. मात्र हे करताना बाबांच्या सवयीमागची कारणंही आईनं समजून घ्यायला हवीत. बाबांमध्येे आधी विचारांत आणि हळूहळू कृतीत बदल होणार आहेत हे स्वीकारायला हवं. नात्यांमधली ही समजूतच बाबांनाही स्वत:मध्येे बदल करण्यासाठी प्रोत्साहन देईल आणि कुटुंबातल्या आनंदाला ग्रहण लागणार नाही.
स्वत:चं काम स्वत: करणं, हा स्वयंशिस्तीतला पहिला टप्पा! मात्र कुटुंबात एकत्र राहताना तेवढं पुरत नाही. घरात अशी अनेक कामं असतात जी अनेकदा आई सर्वांसाठी करत असते. अतिशय प्रेमानं करत असते. खरं तर त्यामुळेच घराला घरपण येत असतं. स्वयंपाक, घरातल्या वस्तूंची निगा राखणं, स्वच्छता अशा अनेक गोष्टी घरातल्या वातावरणाला आकार देत असतात. हे एकट्या आईचं किंवा घरातल्या स्त्रियांचं काम नाही. ही जबाबदारी सर्वांनी मिळून घ्यायला हवी. स्त्रिया कामानिमित्त बाहेर पडू लागल्यामुळे साहजिकच पुरुषांकडून आणि मुलांकडून घरातल्या कामांमधल्या सहभागाची अपेक्षा वाढली आहे. अर्थातच पारंपरिक सवयींमुळे या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे वाद उद्भवतात.
‘घरातल्या कामांची विभागणी’ हा कुटुंबसभांतला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा! कुटुंबसभेत तक्रार मांडताना प्रत्येकानंच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ‘आपली मांडणी रागाच्या-उद्वेगाच्या भरात करायची नाही.’ रागाला रागाचंच उत्तर मिळतं आणि समजुतीच्या दिशेनं काहीच काम होत नाही. हा विषय मोठा आणि वारंवार समोर येणारा असल्याने या विषयावरील कामाची सुरुवात तक्रारींपासून करू नये. ‘घरातील कामांमध्ये सर्वांनी सहभाग घेणं आवश्यक आहे’, ही गोष्ट आधी सर्वांना मान्य हवी. तरच चर्चा पुढे जाऊ शकते. सर्वांनी हे आनंदानं मान्य केल्यानंतर सुरुवातीला घरातील प्रत्येकानं स्वत: घरासाठी करत असलेल्या कामांची यादी करावी. त्यापुढे ह्या कामासाठी रोज, आठवड्यातून, महिन्यातून किती वेळ द्यावा लागतो हेही लिहावं. अर्थातच आईच्या कामाची यादी लांबलचक होते. ही यादी सविस्तर करावी. उदाहरणार्थ स्वयंपाक हे एक काम नसतं तर त्यात खरेदी, आखणी, पूर्वतयारी, प्रत्यक्ष स्वयंपाक आणि नंतरची स्वच्छता अशा बर्‍याच कामांचा समावेश असतो.
त्यानंतर प्रत्येकाला आपल्या उपलब्ध वेळानुसार, क्षमतांनुसार आणि आवडीनुसार स्वत:साठी काम निवडायची संधी असावी. काही कामं स्वत:ला करता येणारी असावीत तर काही न करता येणारी. न करता येणार्‍या गोष्टी शिकायची ही संधी असते. जरी ते काम शिकवण्यासाठी सुरुवातीला आईला वेळ द्यावा लागला तरी त्यातून क्षमता विकसित होतात आणि त्याचा त्या त्या व्यक्तीला तसंच घरालाही फायदा होतो.
कामांच्या याद्या करणं, स्वत:ला काम नेमून देणं इथवर सारं उत्साहानं पार पडतं. ‘न्याय’ ही कल्पना सर्वांनाच पटतेच. पण हे कृतीत येणं मात्र म्हणावं तेवढं सोपं नसतं. हळूहळू मुलांचा उत्साह कमी होतो. नंतर तक्रारी वाढू लागतात. त्यामुळे पुन्हा-पुन्हा हे मुद्दे चर्चेसाठी घ्यावे लागतात. अशा वेळी ‘आपणच ठरवून घेतलेल्या गोष्टी करणं का शक्य होत नाही’ यावर चर्चा व्हावी. परीक्षा, आजारपण, मानसिक प्रश्‍न अशा एकमेकांच्या अडी-अडचणी लक्षात घेऊन परस्परांना मदत करायला हवी. कामांच्या वेळेसंदर्भात, पद्धतीसंदर्भात, दर्जासंदर्भात मुलांची मतं पालकांपेक्षा वेगळी असू शकतात. ह्या वेगळेपणाचा स्वीकार होऊन सर्वानुमते, किमान आवश्यक निकष शोधावे लागतात. कोणतंही काम, ‘मी करते तसंच झालं पाहिजे’, हा आग्रह आईनं सोडावा लागतो. नियमितपणा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा यांचा अतिआग्रह सोडून आपण सगळेजण एकमेकांसाठी आनंदानं मदतीला उभे राहतो आहोत ना इकडं लक्ष हवं.
एकमेकांना सहृदयतेनं समजून घेत आणि त्याचवेळी न्यायासाठी ठाम राहात जर हा संवाद झाला तर हळूहळू सर्वांनी एकत्रपणे काम करण्यातल्या आनंदापर्यंत पोचणं शक्य होतं.

मुलांच्या वयोगटामुळे पडणारे फरक
पाच-सहा वर्षांपुढच्या वयाची मुलं कुटुंबसभांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकतात. त्यापेक्षा लहान मुलंही सभेदरम्यानच्या गमतीच्या खेळांमध्ये सहभाग घेऊ शकतात. मोठ्यांच्या मांडीवर बसून गप्पा-चर्चा ऐकता-ऐकता मोठी होणारी मुलं कधी स्वत:ही सहभागी होऊ लागतात हे कळतदेखील नाही. एवढा वेळ शांत राहणं त्यांच्यासाठी कठीण आहे. अशावेळी त्यांना शक्य आहे तोवर सहभागी होऊ देणं आणि नंतर त्यांच्यासाठी खेळ काढून देणं, त्यांना झोपवणं असे मार्ग काढता येतात.
कुमारवयीन मुलांसमवेत काही वेगळे प्रश्‍न समोर येतात. मोठ्या माणसांचा वरचष्मा त्यांना अगदी सहन होत नाही. राग, त्यातून येणारी सूडाची भावना, प्रसंगी स्वत:बद्दलची कमीपणाची भावना बळावणं अशा चक्रांतून ती जात असतात. अशावेळी मोठ्या माणसांनी नियंत्रकाच्या भूमिकेतून बाहेर येणं, ‘आपलं हे चुकतंय’ हे स्वत:शी आणि मुलांसमोरही मान्य करणं आवश्यक आहे.
पालकांची ही समजुतीची भूमिका, मुलांना स्वत:च्या भावनांवर काम करण्याकरता बळ देते. कुमारवयीन मुलांचा उद्धटपणा सहन करणं मोठ्या माणसांसाठी सोपं नाही. अशा वेळेला सकारात्मक शिस्तीचा मार्ग फोल वाटायला लागतो. मात्र या पद्धतीत मुलांचं उद्धट वर्तन सहन करायचं नसलं तरी समजून मात्र जरूर घ्यायचं आहे. मोठ्या माणसांनी टाकलेलं समजुतीचं एक पाऊलदेखील मुलांनाही सकारात्मकतेकडे वळण्यासाठी आधार देतं.

धमाल येईल अशा गोष्टी ठरवणं
घरात सगळ्यांनी एकत्र घालवयाचा वेळ अधिक आनंदाचा आणि अर्थपूर्ण रीतीनं आखणं हाही कुटुंबसभांचा एक उद्देश असावा. अनेकांची अशी समजूत असते की, ‘आपलं एकमेकावर एवढं प्रेम आहे तर एकमेकांबरोबर छान वाटणारच ना!’ पण प्रत्यक्षात असं होत नाही. एकत्र करायच्या गोष्टींची सर्जनशीलतेनं आखणी करावी लागते. हे ठरवताना प्रत्येकाच्या आवडीनिवडींचा विचार केला गेला आहे ना, याकडे लक्ष द्यावं लागतं. स्वत:च्या इच्छांना थोडी मुरड घालावी लागते.
सण-समारंभांची आखणी करताना चुकीच्या जुन्या प्रथा टाळून नवे सर्जनशील पर्याय निघू शकतात, उदाहरणार्थ वाढदिवसाला भेटी अथवा पुष्पगुच्छ विकत आणण्यापेक्षा स्वत: लिहिलेलं पत्र, कविता किंवा बनवलेली एखादी वस्तू देणं, भाऊबीजेला बहीण आणि भावांनी एकमेकांना ओवाळणं इत्यादी. वार्षिक स्वच्छता, दिवाळीचं सुशोभन, स्वयंपाकाचा विशेष बेत अशी घरातली मोठी कामं आनंदानं एकत्र
करण्यासाठी कुटुंबसभांमध्ये नियोजन करता येईल.
सगळ्यांना आवडतील अशा गोष्टी घरानं आवर्जून ठरवाव्यात. यात खेळांचा समावेश जरूर करता येतो. मुलांबरोबर मुलांएवढे बनून खेळताना फार धमाल येते. एखाद्या पुस्तकाचं एकत्र जाहीर वाचन, एखादी टी.व्ही मालिका सर्वांनी मिळून बघणं आणि त्यावर बोलणं, एखादं पक्वान्न बनवणं, भेटवस्तू तयार करणं अशा अनेक कल्पना सुचू शकतात. कधी कधी एखादी संध्याकाळ दोघा-दोघांनीच एकत्र घालवायचं ठरवावं. आई आणि मुलगी, बाबा आणि मुलगा असा आलटून पालटून एकत्र वेळ घालवता येईल. फक्त दोघांच्या अशा खास वेळात नात्यांमधली वीण अधिक पक्की होते.
कुटुंबसभेची एखादी वही किंवा फाईल बनवता येईल. त्यात एकमेकांचं कौतुक करणं, कृतज्ञता नोंदवणं, ठरलेले नियम नोंदवणं असं असायला हवं. काही वर्षांनी हे सारं एकत्र वाचायला मजा येते.
माझे गुण-दोष, माझ्या आवडी-निवडी, माझ्यातले बदल, माझ्या चुका आणि त्यांतून मी शिकलेल्या गोष्टी यापैकी एखादा विषय निवडून त्यावर प्रत्येकानं लिहायचं आणि सर्वांना वाचून दाखवायचं. मधूनमधून अशा वेगळ्या पद्धतीनंही कुटुंबसभा आखता येईल. मात्र हे सगळं घडण्याच्या आधी घरातल्या सर्वांची मनं स्वच्छ असायला हवीत. एकमेकांबद्दलचा राग, द्वेष, भीती यांचा लवलेशही मनात राहणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत. शब्दांच्या मदतीनं आणि शब्दांविनाही. तरच मायेचे हे बंध आणखी बळकट होतील.
ठरावीक काळानं कुटुंबसभा घेणं हे कुटुंबातील नातेसंबंधांची वीण पक्की होण्याकरता फार महत्त्वाचं ठरतं. त्यातून लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही अनेक कौशल्यं शिकायची संधी मिळते.
ऐकणं, बोलणं अशा भाषिक कौशल्यांबरोबरच, विचार करून प्रश्‍नांवर उपाय शोधणं आणि आपण घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी घेणं या महत्त्वाच्या क्षमतांचा विकास होतो. तसंच एकमेकांशी आदरानं, आस्थेनं वागणं, सहकार्य करणं, सर्वांसाठी भल्याचा उपाय शोधणं अशा सामाजिक कौशल्यांचा विकास होतो. स्वत:च्या भावनांचं समायोजन करणं, चुका झाल्या तर त्याकडे शिकण्याची संधी म्हणून बघणं अशा सकारात्मक भावनिक क्षमतांचाही विकास होतो. पालकही खूप काही शिकतात- सत्ता फक्त एकहाती न राहता, ती राबवण्याची संधी सर्वांना मिळाली तर प्रश्‍न तुलनेनं सहज सुटतात ह्यावर विश्‍वास बसतो. एखादं काम करण्याची आपल्यापेक्षा वेगळी पद्धत असू शकते, याचा स्वीकार वाढतो. मुलांनी चांगलं वागावं यासाठी मुलांसमोर पालकांनी सकारात्मक आदर्श ठेवणं आवश्यक असतं.

shubha_kh@yahoo.co.in

शब्दबिंब - ऑक्टोबर नोव्हेंबर 2014

व्रात्य
एखादा मुलगा अतिशय खोडकर, कल्पनाही करता येणार नाही असे खोडकर वर्तन करणारा असतो तेव्हा त्याला व्रात्य म्हटले जाते. ‘व्रात्य कार्टी’, ‘व्रात्य मेला’ असा या मुलांचा उद्धारही केला जातो. (हा शब्द मुलींसाठी फार वापरला जात नाही असे माझे निरीक्षण आहे.) थोडक्यात हा शब्द अवगुणदर्शक, निंदा करणारा असा शब्द आहे. या शब्दाचा संदर्भ मात्र एका सामाजिक, ऐतिहासिक वास्तवाशी आहे.

व्रात्य या शब्दाचा (वेदकाळातला) अर्थ आहे भटकी जमात/भटके. त्यातही विविध काळात विविध लोकांना व्रात्य म्हटले गेले आहे. त्यातला एकही अथर्र् ना खोडकर होता, ना दंगेखोर!

(१) व्रात्य म्हणजे ज्याच्यावर उपनयन संस्कार झालेला नाही, म्हणजे मुंज झालेली नसल्यामुळे जी जातिभ्रष्ट झालेली आहे अशी व्यक्ती. वैदिक धर्मसंस्कारात उपनयन या विधीला महत्त्व होते. या विधीमुळे किंवा त्यातील संस्कारामुळे तो मुलगा खर्‍या अर्थाने द्विज समजला जात असे. ज्याला हा संस्कार मिळाला नाही अशा व्यक्तीची नुसती हेटाळणीच होत असे असे नाही, तर वर्णव्यवस्थेत त्याला वेगळेही मानले जाई.
(२) सामवेदामध्ये ‘व्रात्यस्तोम’ नावाच्या विधीचे वर्णन आहे. या विधीने व्रात्यांना शुद्ध करून घेऊन त्यांचा आर्य ब्राह्मणात समावेश केला जाई. या विधीत व्रात्यांचे चार प्रकार सांगितले आहेत. आचारभ्रष्ट, नीच कर्मे करणारा, जातिभ्रष्ट आणि जननेंद्रियाची शक्ती नष्ट झालेला.
(३) दुसरा अर्थ आहे तो असा : दोन भिन्न वर्णातील विवाहाला मान्यता नव्हती. विशेषतः शूद्राशी उच्चवर्णीय महिलेने विवाह करणेही मान्य नव्हते. म्हणून शूद्र पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांच्या विवाहातून झालेल्या संततीलाही व्रात्य म्हटले जाई.
(४) भारतातील आर्येतर समाजालाही ‘व्रात्य’ म्हटले जाई. अथर्ववेदातील पंधरावे कांड हे ‘व्रात्यकांड’ असून, त्यात व्रात्यांचा गौरव केला आहे. ह्या कांडाच्या नवव्या व दहाव्या सूक्तांत म्हटले आहे की, सभा, समिती, सेना आणि सुरा ज्याला अनुकूल आहे, असा व्रात्य ज्या राजाकडे अतिथी म्हणून जातो, त्या राजाने त्या व्रात्याला स्वत:पेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा सन्मान करावा.

असे असले तरी हळूहळू वर्ण आणि जातिव्यवस्था जसजशी घट्ट होत गेली तसतसे व्रात्य म्हणजे वैदिक धर्मसंस्कार नसणारे, अंतर्वर्णीय विवाहातील संतती असणारे समूह आणि आर्येतर समूह हे जातिव्यवस्थेत खालचे स्थान असणारे समूह बनले. मग त्यांची टवाळी, हेटाळणी, निंदा, रागराग करणे, त्यांच्या वर्तनाबद्दल शंका घेणे अशा सर्व सांस्कृतिक धारणा तयार झाल्या आणि व्रात्य हे हेटाळणी करणारे संबोधन बनले. वैदिक धर्म, रिती-रिवाज, वर्णाश्रम धर्म मानणारे यांना मान्यता आणि बाकीच्यांशी भेदभावपूर्ण व्यवहार हाच या सामाजिक धारणांचा संदेश आहे.

थेरं करणे
एखाद्या व्यक्तीचे वर्तन विचित्र असेल, समाजमान्य नसेल,
पोशाख, देहबोली वेगळी असेल, वयानुरूप किंवा वर्गानुरूप, लिंगभावानुसार वर्तन नसेल तर ती व्यक्ती ‘थेरं करते’ असे म्हणून तिला नावे ठेवली जातात. तिची टवाळी केली जाते, अपमानही केला जातो.
थेरं करणे या शब्दाचा काय अर्थ आहे? हे कोणते क्रियापद आहे? रोमिओगिरी, मजनुगिरी या शब्दांना जसे ऐतिहासिक संदर्भ आहेत त्याप्रमाणे थेरं करणे या शब्दाला भारतीय इतिहासातील एका सामाजिक धार्मिक परिवर्तनाचा संदर्भ आहे.
हा पाली भाषेतील शब्द आहे. थेर म्हणजे बौद्ध भिक्षू असा एक अर्थ होतो. संसारमार्गावर दुःखाचे कारण आणि त्यावरचा उपाय याचे ज्ञान घेऊन स्थिर झालेला तो किंवा ती म्हणजे थेर. बौद्ध धर्म स्वीकारून, यज्ञ- कर्मकांड-पुनर्जन्म-विषमता यावर आधारलेला वैदिक धर्म नाकारून, या थेर-थेरींनी नवी जीवनपद्धती स्वीकारली. त्यांच्या अनुभवावर आधारित थेर गाथा आणि थेरी गाथा असे वाङ्मयही आहे. या दोन्ही लिखाणातून त्या काळातील विषमता, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, हिंसा या सर्वांचे दर्शन होते.

वैदिक धर्म नाकारून हा नवा धर्म स्वीकारणे ही सहज प्रक्रिया नव्हती, शेकडो-हजारो स्त्री-पुरुषांनी वैदिक धर्म नाकारून बौद्ध धर्म स्वीकारला. एक नवी जीवनपद्धती आणि नवीन जीवनमूल्ये स्वीकारली. वैदिक धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक सत्तेला बसलेला तो मोठा धक्का होता. स्त्री-पुरुषांवरील धार्मिक सत्ता जाऊ लागली होती. हे परिवर्तन शांततामय मार्गाने होत होते. लोकांशी संवाद घडवून त्यांचा ‘विवेक’ जागा करून केलेले हे परिवर्तन होते. पारलौकिकाची भीती घालून, पुनर्जन्माचे आमिष दाखवून, फसवणूक करून केलेले ते परिवर्तन नव्हते. आणि म्हणून या परिवर्तनाचा धसका वैदिक धर्म मानणार्‍यांना होता. याविरुद्ध ते गप्प बसले नाहीत. बौद्धांचे हे आव्हान थांबविण्याचे त्यांनी हरतर्‍हेने प्रयत्न केले. बौद्ध होणार्‍या व्यक्तींची टवाळी, निंदा, सामाजिक अपमान हा या प्रयत्नांचाच एक भाग होता आणि या टवाळीला एक सामाजिक मान्यता मिळाली. ‘काय थेरं करतो’ यामध्ये दुसरी उपासनापद्धती, जीवनपद्धती स्वीकारण्याची टवाळी आहे. यातूनच थेरडा, थेरडी हे अपमानस्पद शब्दही आले आहेत.

आज आपल्या समाजात हक्कांची भाषा करणार्‍या स्त्रियांची स्त्री- मुक्तीवाल्या म्हणून जशी टवाळी केली जाते, तशीच थेर व्यक्तींची, पर्यायाने बौद्ध व्यक्तींची टवाळी ‘थेरं करणे’ या शब्दामधून होते. वैदिक धर्माला नाकारले तर समाजात कशी वागणूक मिळेल याबद्दल संदेश दिला जातो, वैदिक धर्मांधतेचाच हा एक अविभाज्य भाग आहे हे विसरून चालणार नाही. या शब्दामागचा हा संदर्भ पाहता ‘थेरं करणे’ हा शब्द वापरणे सोडले पाहिजे.

लता भिसे-सोनावणे
lata_fem@yahoo.com
(या वेळचे शब्द लता भिसे-सोनावणे यांनी सुचविले. तसेच शब्दबिंब लिहूनही दिले. त्यांचे मन:पूर्वक आभार)

शाळेतलं पुस्तक

सहीरचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस. अभिमानानं वडिलांचा हात धरून तो चालत शाळेत निघाला होता. जवळजवळ त्यांना ओढतच नेत होता. नवा शर्ट, नवं दप्तर, नवी छत्री. अजून ती उघडलीसुद्धा नव्हती एकदाही. बसस्टॉपपासून तर तो उड्या मारतच शाळेत पोचला, अगदी खूश होता, पण त्याला शाळेत पोचायची घाई झाली होती. पाऊस पडला तर? शर्ट भिजला तर? खराब नाही का होणार?

‘बाबा असेच रोज आपल्याबरोबर येणार की काय? बहुतेक नाही. रोज रोज नाही.’ त्याला त्याच्या मोठ्या भावाबहिणींबरोबर हसत खेळत जायला जास्त मजा आली असती. ‘पण मी काही वडलांना तसं सांगणार नाही की कुरकुरणार नाही. शाळेत जायलाच नको म्हणाले म्हणजे?’ खूप हट्ट करून, मागे लागून, किती दिवस वाट पाहून आता कुठे शाळेत जायला मिळत होतं त्याला.

घरातली, शेजारपाजारची सगळी मुलं जेव्हा शाळेत जायची, तेव्हा सहीर त्यांच्याबरोबर शेताच्या टोकापर्यंत जायचा. सुट्टीमध्ये त्या मस्त चौकोनी डब्यातून खायचं, ती छान छान चित्रं असलेली पुस्तकं वाचायची, वहीमधे सर रंगीत पेनांनी बरोबरच्या खुणा करणार, काय मस्त मजा असेल शाळेमधे... असंच त्याला वाटायचं. संध्याकाळी दादा घरी येतो तेव्हा कसले मळवून येतो कपडे. शाळेत मोठ्ठं मैदान असणार. त्या तिथे चोर शिपाई खेळायला काय धमाल येत असेल.
मग सहीर आईच्या पदराला धरून सारखं ‘मला शाळेत ने’ म्हणायचा. सहीरचा उत्साह आणि हट्ट पाहून एकदा त्याच्या वडलांनी विचारलंसुद्धा शाळेमधे. पण त्यांनी सांगितलं की पाच वर्षांचा तरी होऊ दे त्याला.
आज आता दप्तर भरून स्वप्नं घेऊन सहीर शाळेत पोचला होता. मोठ्ठा मुलगा झाल्यासारखं वाटत होतं त्याला. होता होता तो सहावीत गेला. दरवर्षी त्याच्या बेकार अक्षरापुढे सर बरोबर- चूकच्या खुणा करत राहिले.

कधीतरी त्याला मारही खावा लागायचा. त्याला तर कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की शाळेत कधी कुणी मारतही असेल. मार खायला लागला की त्याला भारी दु:ख व्हायचं. मनातल्या मनात तो सरांची छडी खेचून फेकून द्यायचा खिडकीतून.
पण एकूणात त्याला शाळा आवडायची.

गोविंद सर, गंगाधरन् सर, शैला मॅडम, सुलेमान सर सगळे त्याला आवडायचे. पण तरीसुद्धा कधी कधी त्याला शाळेत उदास वाटायचं. त्याला वाटायचं त्याचे आई-वडील, आजी आणि सगळी जवळची माणसं लांब कुठे तरी जात आहेत. त्याची सगळी प्रेमाची माणसं कुठे तरी हरवून गेली आहेत. त्याची दुनियाच शाळेपासून खूप वेगळी आहे.

कोझीकोडजवळच्या एका छोट्याशा गावात पुथनकुन्नूमधे सहीर राहत होता. तिथे त्याचे खूप मित्र होते. रशीद, अब्दुल्ला, रहमान, शफीक, शम्सुद्दीन, रहीम... कितीतरी! कुराणातल्या आयतींचा आवाज हवेत भरून असे. रोज सकाळ संध्याकाळ त्या ऐकू येत. दिवसातून पाच वेळा उस्ताद अब्दुल्लांची अजान ऐकू यायची. वडलांच्या हातात माळ असायची. त्यांची प्रार्थना, गुरूवार संध्याकाळची भक्तिगीतं, त्यानंतर होणारा चहा, खाणं, मशिदीच्या अंगणात चेंडू खेळणं... त्याला आठवत होतं, तेव्हापासून ही सारी त्याची दुनिया होती.

रोज सकाळी तो मदरशात जायचा. सात ते नऊ. मम्मू उस्ताद अरबी अक्षरं, कुराणचे पाठ, नमाज, प्रार्थना शिकवत. तिथून मग सहीर भराभरा घरी येई. शाळेत जाण्यासाठी. शाळा तीन कि.मी. लांब होती. सकाळी एकदा चहा-बिस्किटं घेऊन तो मदरशात जायचा. तिथून येईपर्यंत आई दप्तर-डबा भरून ठेवायची. ते घेऊन तो शाळेला पळायचा.

शाळा नऊ पन्नासला सुरू व्हायची. वर्ग दहा वाजता भरायचे. दहा मिनिटं जरी उशीर झाला, तरी त्याला तेवढा तास वर्गाबाहेर थांबावं लागायचं. पुन्हा सरांच्या मागे मागे शिक्षक-खोलीत जावं लागायचं. उपस्थिती लागायला हवी म्हणून. तिथं सर सगळ्यांच्या समोर खूप रागवायचे.

सहीरचं आयुय म्हणजे मदरशापासून शाळेपर्यंत लावलेली पळण्याची शर्यत होऊन बसलं होतं. उशीर होण्याची भीती... सर रागावण्याची भीती... तास चुकण्याची भीती. कधीकधी तर त्याला वाटायचं तो पी.टी. उषा इतक्या वेगानं पळतोच आहे.
मदरसा न् शाळा सोडून सहीरची एक आवडती दुनिया होती. आजीच्या गोष्टींची, गाण्यांची. जेव्हा आजी अशा गोष्टी सांगायची, जवळपासचे सगळे ऐकत थांबायचे. तिच्या आवाजातच एक गोडवा होता. शिवाय तिची तालासुराची सुंदर समज तिच्या गोष्टींना ‘विशेष’ बनवत असे. इतिहास असाच तर शिकला होता सहीर. आजीच्या पुराणकथा आणि दंतकथांमधून. या कथा तर त्याच्या बालमासिकांमधेसुद्धा नसत. मोइनुद्दिनशेख, बदरची लढाई, अलियार थंगलच्या गोष्टी, बदारूल मुनीर व हुसूल जमालची प्रेमकथा, अवलियांच्या कथा... आजी गोष्टी सांगायची तेव्हा या सगळ्यांना तो प्रत्यक्ष भेटायचाच मुळी! ‘कशा आजीला या गोष्टी लक्षात राहत असतील कोण जाणे’ त्याला आश्‍चर्य वाटायचं.

त्याला अगदी वाईट वाटायचं की त्याच्या वर्गातल्या कोणालाच या गोष्टी कशा माहीत नाहीत! त्यानं एकदा आजीला विचारलंसुद्धा होतं, ‘‘या गोष्टी-गाणी शाळेच्या पुस्तकात का नाही देत?’’ पण आजीनं उत्तर दिलं नाही. मग सहीरनं पुन्हा हा प्रश्‍न विचारला नाही... आजीला माहीत नसणार म्हणून. त्याला वाटायचं की एकदा आजीला शाळेत नेऊन शैला मॅडमच्या खुर्चीवर बसवावं. मग ती सगळ्या वर्गाला तिची गाणी म्हणून दाखवेल, गोष्टी सांगेल. पण असं शैला मॅडमला आवडेल का?
सहावी ‘ब’चा चौथा तास नेहमीच मल्याळम्चा असे. ओणमच्या आधीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. सगळे शिक्षक वर्गात सराव घेत होते. मल्याळम् शिकवणारे गंगाधरन् सर पुस्तकामधे खुणेसारखी छडी ठेवून आले. त्यांनी जुन्या प्रश्‍नपत्रिका आणल्या होत्या. त्यावर नजर टाकून त्यांनी मुलांना प्रश्‍नपत्रिकेचं स्वरूप समजावून सांगितलं. मग ते म्हणाले, ‘‘तुम्हाला ‘संदर्भ सांगा’ सारखेे प्रश्‍न अवघड जातात. धड्यांमधल्या माणसांची नावंसुद्धा लक्षात राहत नाहीत तुमच्या!’’ त्यांनी मुलांना अभ्यास दिला - प्रत्येक धड्यातल्या व्यक्तींची नावं वहीत लिहून काढण्याचा.

सहीर भराभर लिहायला लागला. चार धड्यांमधे अकरा जणांची नावं मिळाली. सगळ्यांची लिहून झाल्यावर, सर उत्तरं तपासायला लागले. ‘‘सहीर, वाच पाहू तुझं उत्तर.’’ सहीर वाचायला लागला. ‘‘धडा पहिला : चांगला मित्र; व्यक्ती- कुट्टन, उन्नी, कुंजुलक्ष्मी आणि अम्मू. धडा दुसरा : धूर्त रामू; व्यक्ती- रामू, माधवी, अरोमल. धडा तिसरा : कष्टाचे फळ, व्यक्ती- रमण, कुंजुन्नी, सत्यन...’’
तो जरा अडखळला... दु:खाने पण निश्‍चयाने म्हणाला... ‘‘आणि रशीद.’’

सगळा वर्ग स्तब्ध झाला. सरांनी छडी काढून हातात घेतली. ते चष्म्याच्या सोनेरी फ्रेमवरून पाहत होते. ‘‘काय म्हणालास? कुठून आलं हे नाव? कुठल्या धड्यात आहे हे? पूर्ण पुस्तकात कुठेही हे येत नाही.’’
सहीर चाचरला, ‘‘सर पण पुस्तकात कुठे मुस्लीम नाव येतच नाही कधी...म्हणून...’’

सगळा वर्ग हसायला लागला. मग सगळं धैर्य एकवटून सहीरनं गंगाधरन् सरांकडे पाहिलं. त्यांनी छडी टेबलावर आपटली. वर्ग शांत झाला. सरांना भयंकर राग आला होता. कसाबसा आवाज शांत ठेवत त्यांनी विचारलं, ‘‘तू काय सांप्रदायिकतेबद्दल बोलणार आहेस? का धर्मनिरपेक्षतेबद्दल?’’

सहीरला मुळी काहीच कळलं नाही. तो खरं विचारणार होता सरांना त्याचा अर्थ... पण तेवढ्यात डबा खाण्याची सुट्टी झाली. डबा उचलून सहीर हात धुवायला धावला, सगळ्यांच्या पुढं जायचं म्हणून.

चित्रे : चित्रा के. एस्.
अनुवाद : वंदना कुलकर्णी
हिंदी शैक्षणिक संदर्भ, जुलै २०१० मधून साभार.

घर

‘‘हा पोरगा काही कामाचा नाही’’, मुलालाही ऐकू जावं म्हणून कपूरसाहेब जरा मोठ्यानंच बोलत होते. ‘‘मोठेपणी काय दिवे लावणार आहे कोणास ठाऊक! त्याचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीय.’’
सूरजचे वडील गावाहून आल्याआल्या सूरजचंं प्रगतीपुस्तक बघत होते. ‘क्रिकेट चांगलं खेळतो’ प्रगतीपुस्तकात लिहिलं होतं, ‘अभ्यासात कच्चा. वर्गात लक्ष नसतं.’

सूरजची आई स्वभावानं शांत होती. ती काहीच बोलली नाही. सूरज खिडकीपाशी उभा होता. त्याला काही बोलायची इच्छाच नव्हती. तो बाहेर पावसाकडे बघत होता. रागानं त्याच्या भुवया आक्रसल्या होत्या, डोळे लाल झाले होते आणि मनात बंडखोरी पेटून उठली होती. त्याचे वडील बोलतच होते, ‘‘ह्याची अभ्यासात काहीच प्रगती दिसत नाहीय. मग आम्ही याच्या शिक्षणाचा खर्च तरी का करायचा? कधीही उगवतो, आडवा-उभा हात मारून जेवतो, पैसे मागतो आणि मित्रांबरोबर उनाडक्या करत फिरतो.’’

सूरज काहीतरी उत्तर देईल ह्या अपेक्षेनं त्याचे वडील बोलायचे थांबले. म्हणजे मग त्यांना आणखी आगपाखड करायची संधी मिळाली असती! पण सूरजला पक्कं माहीत होतं की त्याच्या गप्प बसण्यामुळेच वडिलांना जास्त त्रास होणारय. आणि अशा वेळी वडिलांना त्रासच तर द्यायला हवा.

‘‘आता मी ह्याचं असलं वागणं बिलकूल खपवून घेणार नाहीय. तुला जर मेहनत करायची नसेल तर तू घर सोडून जाऊ शकतोस.’’ असं बोलून ते निघून गेले.

सूरज थोडावेळ तसाच खिडकीपाशी उभा राहिला. मग दरवाजा उघडून पावसातच बाहेर पडला आणि त्यानं आपल्यामागे दरवाजा धाडकन बंद केला. पावसात भिजत उभा राहून तो आपल्या घराकडे बघत होता. ‘‘ मी आता परत येणारच नाहीय.’’ तो रागारागानं बोलला, ‘‘मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही की काय! मी परत यावं असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी स्वतः येऊन मला परत बोलावलं पाहिजे.’’

खिशात हात घालून तो चालायला लागला. खिशात हात घालताच, त्याच्या हाताला पाच रुपयाची नोट लागली. ह्या जगात आत्ताच्याक्षणी त्याला त्या नोटेचाच काय तो आधार होता. त्यानं ती हातात घट्ट पकडून ठेवली. खरं तर तो ते पाच रुपये सिनेमासाठी खर्च करणार होता. पण आता त्याहून जास्त गरजेच्या गोष्टींसाठी ते पैसे उपयोगी पडणार होते. फक्त आत्ता तो चिडलेला होता, त्यामुळे जास्त गरजेच्या म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी हे काही त्याच्या चटकन लक्षात आलं नाही. चालतचालत तो मैदानाजवळ पोचला तेव्हा वाढत्या उन्हाबरोबर त्याचा निश्चय आणखी पक्का झाला.

त्याला त्याच्या दोस्ताची, रंजीची आठवण झाली. त्यानं विचार केला की काम मिळेपर्यंत रंजीच्या घरी राहू. लवकर काम मिळालं नाही तर आपण फार काळ घरापासून दूर राहू शकणार नाही हे त्याला पक्कं माहीत होतं. त्याच्या मनात आलं की तेराव्या वर्षी आपल्याला कसलं काम मिळणार! चहाच्या दुकानात काम करणं किंवा वर्तमानपत्र टाकणं असली कामं तर त्याला करायची नव्हती.

एव्हाना पाऊस थांबला होता. सूरज धावतच रंजीच्या घराशी पोचला. तिथे जातो तो काय, रंजीच्या घराला कुलूप! त्याचं सारं अवसानच गळालं. त्यानं घराभोवती तीन चकरा मारल्या. त्याला वाटलं कुठेतरी पार्टीला वगैरे गेले असतील. येतील थोड्या वेळानं. या विचारानं त्याला जरा धीर आला. मग तो बाजाराच्या दिशेला वळला.

बाजारात भटकणं हा तर सूरजचा एकदम आवडता उद्योग! आधी तो चहा-भज्याच्या दुकानापाशी गेला. पण शेजारच्या दुकानात यो-यो बघितल्यावर त्याला मोह आवरेना. कारण यो-यो दिसत असताना, तो खेळायचा नाही म्हणजे काय? ‘‘दोन रुपयाला’’ दुकानदार म्हणाला, ‘‘पण रोजचं गिर्‍हाईक म्हणून तुला एक रुपयाला देतो.’’ ‘‘म्हणजे हा नक्कीच जुना असणार.’’ सूरजच्या मनात आलं. पण त्यानं तो घेतला. यो-यो खेळत तो बाजारात भटकत राहिला.

खिशातले उरलेले चार रुपये चाचपताना त्याला जाणवलं की आपल्याला तहान लागल्येय. त्यामुळे मग मिल्कशेक पिणं भागच होतं! त्याचा एक डोळा घड्याळावर होता. एक वाजायला आला होता. आता रंजी आणि त्याच्या घरचे लोक आले असतील असा विचार करून तो उठला. मिल्कशेकचे पैसे दिल्यावर त्याच्याकडे दोन रुपये शिल्लक होते.

रंजीच्या घराला अजूनही कुलूपच होतं. असं काही होण्याची शक्यता सूरजच्या डोक्यातही आली नव्हती. तेवढ्यात त्याला रंजीकडचे म्हातारे माळीबुवा भेटले. ‘‘सगळेजण कुठे गेलेत?’’ सूरजनं त्यांना विचारलं. ‘‘सगळेजण दिल्लीला गेलेत. आठवड्याभरानं येतील.’’ माळीबुवा म्हणाले. ‘‘काय रे, काही अडचण तर नाहीय ना?’’ सूरजनं त्यांना बिनधास्तपणे सांगून टाकलं, ‘‘मी घर सोडून आलोय. मी आता रंजीसोबत त्याच्याच घरी राहणार आहे. मी दुसरीकडे कुठेही जाणार नाहीये.’’
म्हातार्‍यानं क्षणभर विचार केला. त्याचा चेहरा आक्रोडासारखा सुरकुतलेला होता आणि हातपायही. डोळे मात्र निर्मळ आणि चमकदार होते. तो त्या गल्लीतल्या बर्‍याचशा घरांमध्ये माळीकाम करत होता. ‘‘तू घरी परत का जात नाहीस?’’ त्यानं सुचवलं. ‘‘छे छे, एवढ्यात नाही जाणार. मला बाहेर पडून फार वेळ नाही झालाय. मी पळून गेल्याचं त्यांच्या लक्षात तर आलं पाहिजे ना! म्हणजे मग त्यांना वाईट वाटेल.’’ सूरज म्हणाला. त्यावर हसून माळी म्हणाला, ‘‘बाहेर पडण्यापूर्वी तू नीट विचार करायला हवा होतास. थोडेफार पैसे तरी आहेत का तुझ्याजवळ?’’ ‘‘आज सकाळी माझ्याजवळ पाच रुपये होते. आता फक्त दोनच रुपये उरलेत.’’ आपल्या यो-यो कडे नजर टाकत तो म्हणाला, ‘‘तुम्ही हा विकत घ्याल?’’ ‘‘ह्याच्याशी कसं खेळतात ते मला येत नाही.’’ माळी म्हणाला, ‘‘सध्या तू घरी परत जाणंच चांगलं. रंजी परत येईपर्यंत थांब. आणि मग पळून जाण्याचा विचार कर.’’ सूरजला त्याचा सल्ला एकदम पटला. पण अजूनही त्याचा निर्णय होत नव्हता.

आईवडिलांना अजून थोडा वेळ गोंधळात राहू द्यावं, असा विचार करून तो मैदानाजवळ येऊन तिथल्या गवतावर बसला. खाली बसताक्षणी त्याला पोटातल्या भुकेची जाणीव झाली. इतकी भूक त्याला यापूर्वी कधीच लागली नव्हती. तंदुरी कोंबडी, खमंग खरपूस रोटी, छान छान मिठाई त्याच्या डोळ्यापुढे नाचायला लागली. त्याच्या मनात आलं की खेळणीवाल्यानं यो-यो परत घेतला नाही तर? आता घरी जाण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्याला माहीत होतं, आई काळजी करत असेल, वडील व्हरांड्यात येरझार्‍या घालत असतील, दर दोन मिनिटांनी घड्याळात बघत असतील. त्यांना चांगला धडा मिळाला असेल. त्यांच्यावर उपकार केल्यासारखा तो आपल्या घरी परत जाणार होता. आपल्यासाठी थोडंतरी जेवण शिल्लक ठेवलं असेल अशी त्याला आशा होती. सूरज बैठकीच्या खोलीत शिरला. त्यानं यो-यो सोफ्यावर टाकला. कपूरसाहेब परत ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांच्या आवडत्या खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. सूरज खोलीत आला तेव्हा ते उठले आणि म्हणाले, ‘‘यायला खूप उशीर केलायस.’’ आणि परत वर्तमानपत्र वाचायला लागले. सूरजनं आईकडे आणि स्वयंपाकघरात झाकून ठेवलेल्या जेवणाकडे पाहिलं. आईनं विचारलं, ‘‘भूक लागल्येय ना?’’ सूरज तोंडानं नाही म्हणत घाईघाईनं जाऊन जेवला आणि परत बैठकीच्या खोलीत आला. खोलीत आल्यावर तो आश्चर्यचकित झाला ... त्याचे वडील चक्क यो-योशी खेळायचा प्रयत्न करत होते. त्यांनी विचारलं, ‘‘कसं बुवा खेळतात ह्या खेळण्याशी?’’

सूरज उत्तरच देऊ शकला नाही. वडिलांच्या तोंडाकडे नुसतंच बघत राहिला. शेवटी त्याला हसू आलं, ‘‘सोप्पं आहे. द्या इकडे मी दाखवतो.’’ वडिलांकडून यो-यो घेऊन त्यानं कसं खेळायचं ते दाखवलं.
त्याच्या आईला मात्र आश्‍चर्य वाटलेलं दिसलं नाही. नवरे असेच असतात... वाढतच नाहीत!

त्यांना परत ऑफिसला जायचंय, हे कपूरसाहेब पार विसरून गेले होते. सूरजही पळून गेल्याचं विसरला होता. दोघं सकाळची बोलाचालीही विसरले होते. इतकी की जशी काही ती जुनीपुराणी घटना होती!

रूपांतर : प्रीती केतकर हिंदी शैक्षणिक संदर्भ मे २०११ मधून साभार

किल्ला

किल्ला म्हटलं की पिंकूचे डोळे विस्फारत आणि हातातलं खेळणं टाकून जिथं म्हणाल तिथं तो जायला तयार असे. दिवाळीत गल्लीतल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामावर पिंकूनं हजेरी लावलेलीच असे. दगड, माती, मातीची शिल्पं, किल्ल्यावर उगवणारी हरळी, किल्ल्यासमोरचं कारंजं, बुरुजावरचे शिपाई सर्व सर्व त्याला हवंहवंसं वाटे. तासनतास तो किल्ल्यावर घालवी. जेवणाची वेळ झाली की अम्मी त्याला शोधत येई आणि पाठीत धपाटा मारून घरी नेई...
आज शाळा सुटली आणि पहिलीतला पिंकू पळत घरी निघाला. खरं तर त्याचं नाव अब्रार, पण पिंकू ग्राईप वॅाटरच्या बाटलीवरच्या गुटगुटीत बालकासारखा तो दिसत असल्यामुळं, बारशाआधीच त्याचं नामकरण पिंकू असं झालं. रीतसर झालेल्या बारशाच्या अब्रार या नावाला पिंकूच्या जगात फक्त दाखल्यावरच जागा होती. कित्येकांना त्याचं नाव अब्रार आहे हेही माहीत नव्हतं.

आज दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्याच्याच गल्लीत राहणार्‍या यशवंतनं आणि विलासनं काल दगडं गोळा करून ठेवली होती.
‘‘कुटला करनार यंदा?’’ यशवंतच्या मागं मागं पिंकू काल दिवसभर फिरत होता.
‘‘प्रतापगड’’

रचत जाताना होणारी दगडांची रचना पाहावी का वाजीदभाईकडे घरी जाऊन पटकन पुस्तकात ‘प्रतापगड’ कसा आहे ते पाहावं ह्या संभ्रमात पिंकू पडला. त्यानं यशवंतकडं पाहिलं. तो शांतपणे दगडांची वर्गवारी करत होता. मोठेमोठे एकीकडे, लहान एकीकडे, गोलगोल गोटे एकीकडे, कडा असणारे एकीकडे. यशवंतला रचना करायला अजून अवकाश होता. तो सगळं काम पद्धतशीर आणि सावकाश करी. सगळेजण त्याच्या नीटनेटकेपणाची तारीफ करत. दहावीतला यशवंत त्याच्या किल्ल्यासाठी गावभर प्रसिद्ध होता. यशवंतचा किल्ला बघायला आसपासच्या गावातूनही लोक येत. पिंकूनं विचार केला, ‘‘दगडं लावायला अजून टायमय, तवर मी जावून चित्र बघून यीन’’ आणि पळत घर गाठलं. चौथीतला त्याचा मोठा भाऊ वाजीद चहात मसाला बटर बुडवून खात होता. शेजारी अम्मी इफ्तारसाठी विळीवर बोंबील सोलत होती. त्याला बघून अम्मी म्हणाली.
‘‘आ! चा पी’’
‘‘मजे नक्को चा’’ म्हणत त्यानं वाजीदकडं मोर्चा वळवला, ‘‘भाई, शिवाजी का पुस्तक दिका मजे’’
‘‘कायकू?’’
‘‘किल्ला देकनेकाय’’ पिंकू हळूच त्याच्या कानात कुजबुजला.
‘‘अम्मी इने देक वापस ऊ किल्ले के पिच्चे लग्याय’’ वाजीदनं चहाडी केली.
‘‘अरे माटी मिले...अब्बा मारींगेना.’’ अम्मी ओरडली.

पिंकू गप्प झाला. अब्बांकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. दोनच दिवसांपूर्वी त्यानं अब्बांकडे ‘‘आपल्या घरी किल्ला करू’’ असा आग्रह धरला होता तर ‘‘अपलेमे किल्ला नै करते’’ म्हणत अब्बांनी हा प्रश्न, डोळे वटारून आणि आवाज चढवून निकालात काढला होता.

आज दिवाळीची सुट्टी लागल्यामुळं पिंकू हरखून गेला होता. कारण उद्या सकाळपासून यशवंत किल्ला कसा करतो हे त्याला नीट बघायला मिळणार होतं. मागच्या वर्षी यशवंतनं सुट्टी लागायच्या आधी किल्ला केला आणि त्यामुळं किल्ला बनताना बघायची पिंकूची संधी हुकली होती. यंदा ती होती. घरी पळत निघालेला पिंकू दम लागल्यावर थांबला आणि चालू लागला. चालता चालता काय काय करायचं याची जोडणी करू लागला. घरी किल्ला हा विषय निकालातच निघाला होता. त्यामुळे यशवंतच्या किल्ल्यावर कसं जायचं हा प्रश्न पिंकूला पडला होता.

‘‘अल्लामिया, आज करंजाचं काम करू नाय यशवंतनं’’ पिंकू देवाला साकडं घालू लागला. यशवंतच्या किल्ल्याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्याचं कारंजं. किल्ल्याच्या समोर एक गोल खड्डा करून त्याला सिमेंटनं लिंपलेलं असे. त्याच्या मधोमध एक इंजेक्शनची सुई लावलेली असे. त्यामधून उंच असं कारंजं उडे. पण त्याला पाणी कुठून जातं हे कधीच कळत नसे. रोज संध्याकाळी त्यांची आई किल्ल्यावर पणती ठेवी मग यशवंत एकेक करत किल्ल्यावर मातीची चित्रं मांडी. किल्ल्यासमोरच्या मैदानात लालमातीवर शिपाई, वाघ, सिंह, घोडे मांडी. तळ्यात प्लास्टिकचं बदक सोडी आणि मगच कारंजं चालू करी. लोक गर्दी करून कारंजं बघायला उभे राहत. सगळ्या बघणार्‍या लोकांना फार कुतूहल वाटे.
‘आयला पानी कुटनं फिरवलंय?’

पिंकू आठवू लागला, मागच्या वर्षी त्यानं काय पाहिलं होतं ते. यशवंतनं किल्ला करतानाच सलाईनची नळी जमिनीखालून पुरून घेतली होती. फक्त कारंज्यात इंचभर उघडी ठेवलेली. बाकी नळी जमिनीत पुरूनच घरापर्यंत आणलेली. मग घरात एका खुंटीला सलाईनची काचेची उलटी बाटली टांगून त्यातून कारंज्याला पाणी दिलं होतं. सबंध संध्याकाळभर प्रेक्षक असेपर्यंत, यशवंत लक्ष ठेवून मोकळी बाटली काढून भरलेली लटकवत होता. पिंकू हे सारं पाहून वेडा झाला होता. मागच्या वर्षी हे पाहिल्यामुळं यंदा हे सगळं विस्मयकारी जग उभं राहताना त्याला पाहायचं होतं.

चालत चालत पिंकू यशवंतच्या घराजवळ आला. यशवंत कुदळीनं जमीन खोदत होता. शेजारी मोकळ्या तीन सलाईनच्या काचेच्या बाटल्या आणि नळ्या पडल्या होत्या.
‘‘आजच करंजं करनार?’’ पिंकूनं दप्तर जमिनीवर टाकलं आणि पळत जाऊन त्या खोदलेल्या पाटाजवळ उकिडवा बसला.
‘‘माती पाडू नको त्यात’’ यशवंत शांतपणे म्हणाला.
‘‘व्हय? आजच करनार?’’ पिंकूच्या डोळ्यातलं आश्चर्य बघून यशवंतला हसू आलं, ‘‘जा त्या बाटलीत पाणी भर त्या बादलीतलं’’
पिंकूचा आनंद गगनात मावेना. यशवंतनं आपल्याला किल्ल्यातलं काम दिलं हे त्याला मित्रांना सांगायला सुट्टीभर पुरणार होतं. तेवढ्यात तिथे यशवंतचा नववीतला धाकटा भाऊ विलास आला.
‘‘कारं पिंक्या...बापाला सांगू का तुज्या? हितं किल्ल्याव आलाय म्हनून? व्हय रं?’’ म्हणत त्यानं पिंकूची चड्डी खाली ओढली आणि त्याच्या गुटगुटीत ढुंगणावर चापट हाणली.
‘‘आयो नको नको’’ पिंकूच्या हातातली बाटलीच सटकली. कशीबशी त्यानं ती सावरली आणि चड्डी वर ओढली.
‘‘कशाला पोरं घाबरवतोरं? चल दगडं रच’’ यशवंत म्हणाला पण विलास ह्या ह्या ह्या करत हसत उभा राहिला. पिंकूला आठवलं की अब्बांनी सांगितलेलं, किल्ल्यावर जायचं नाही म्हणून. त्यानं निरीच्छेनं दप्तर उचललं आणि घराकडे चालू लागला.
‘‘अब्बा कामावर गेले की ये’’ यशवंतनं पाठमोर्‍या पिंकूला आवाज दिला.

पिंकूनं वळून पाहिलं आणि हसर्‍या चेहर्‍यानं यशवंतला टाटा केला आणि घराकडे पळत सुटला.
रमजान ईद चार दिवसावर आल्यानं अब्बांनी सुट्टी काढली होती. ते घरीच होते. रोजा असल्यामुळं ते दिवसभर घरात असत. संध्याकाळी चारच्या आसपास ते फार चिडचिड करत. नेमकी हीच वेळ खेळायला जायची असल्यामुळं पिंकूला निमूट घरात बसावं लागे.

दोन दिवस असेच गेले.
एका संध्याकाळी अब्बांची धाकटी बहीण खतिजा आली. अब्बांचा रोजा होता. ते पलंगावर हाशहुश करत पहुडले होते.
‘‘आज रोज लग्या जनू भाई कू’’ खतिजा
त्यांच्याकडं बघत म्हणाली.
‘‘रोजकाच है उनका! सोसता नै तो नै करना ना’’ अम्मी शिर्खुर्म्यासाठी खजूर सोलत होती. पिंकू शेजारीच नेहमीप्रमाणे साबणाच्या खोक्यानं गाडी गाडी खेळत होता.
‘‘सुनो तो भाबी...मजे सपेद पानी जातंय देको आंगपेशे, क्या करनेका इता?’’ खतिजाफुफ्फु अम्मीला म्हणाली. पिंकू गाडी गाडी खेळत खतिजाफुफु शेजारी आला आणि थांबला. दोघींकडे आळीपाळीनं बघू लागला.
‘‘क्या बड्यांक्या बाता सुंता?’’ जा भायेर खेल्नेकू अम्मी डाफरली.

ध्यानीमनी नसताना बाहेर जाण्याची संधी मिळाली! पिंकूनं गाडी टाकून घराबाहेर धूम ठोकली, ते थेट यशवंतच्या प्रतापगडावर.
गडावर छान पणत्या पेटल्या होत्या. चित्रं, शिपाई ठेवले होते. कारंजं उडत होतं. किल्ला तयार सजून रुबाबदार दिसत होता. यशवंतसुद्धा शेजारी निवांत बसला होता. पिंकूनं पाहिलं. नेमक्या त्या दोन दिवसात यशवंतनं किल्ला पूर्ण केला होता. मागच्यावर्षी शाळा, तर या वर्षी अब्बांमुळे त्याचं कारंजं कसं करतात हे पाहायचं हुकलं. समोर दिसणारं मनोहारी दृश्य पाहून हे करतात कसं हे पाहाण्याची इच्छा आणखीनच तीव्र झाली. ‘पुढच्या वर्षी नक्की’ असं पिंकू ठरवत असताना विलास आला आणि जमलेली पोरं बघून तो म्हणाला,
‘‘चला लपाछपी खेळू या’’
सगळ्या पोरांनी हुर्रे केलं.
‘‘चल की दाद्या’’ विलास यशवंतला म्हणाला.
तोही काही कुरबुर न करता तयार झाला. पोरांनी पुन्हा गलका केला. बघता बघता नऊ दहा पोरं जमा झाली आणि लपाछपी सुरू झाली. गल्लीच्या शेवटी एक जुनाट चित्रपटगृह होतं, सागर चित्र मंदिर. त्याच्या एका बाजूला कोनाडा होता. दारुडे लोक तिकडं लघवीला जात. तिथून एक जिना वर जात होता. सिनेमा संपल्यावर लोक तिथून खाली उतरत. त्या जिन्याखाली अंधारी होती. डाव सुरू होताच विलासनं पिंकूचा हात धरला.
‘‘टाकीजच्या जिन्याखाली चल. तितं कुणालाच दिसनार नाय आपन ये’’
‘‘अम्मी म्हन्ते तिकडं जायचं नाय.’’
‘‘बस मग...आज येतंय तुज्याव राज्य’’

अंधार पडू लागला होता. आपल्यावर राज्य येऊ नये असं पिंकूला वाटत होतं कारण अंधार पडल्यावर एक दोन डाव होत आणि ज्याच्यावर राज्य आहे त्याला उद्या पुन्हा नव्यानं राज्य घ्यावं लागे. वाजीदभाई अशा चक्रात अडकून एकदा सलग चार दिवस राज्य घेत होता. आपल्यावर अशी पाळी येऊ नये असं पिंकूला मनापासून वाटत होतं. गल्लीत लपायला बरीच जागा होती. अंधार पडल्यावर त्या जागांमध्ये भर पडत असे. त्यामुळे अंधार पडताना ज्याच्यावर राज्य येई त्याचं काही खरं नसे.
‘‘थांब थांब मी आलो’’ पिंकू पळत विलासच्या मागे निघाला.

पिंकू आणि विलास त्या अंधार्‍या जिन्याखाली आले आणि लपले. राज्य घेणार्‍याचा अंदाज विलासनं घेतला आणि तो पिंकूकडे वळला.
‘‘माजी नुन्नी तू हातात धरली तर आपन कदीच ईशटॉप होनार नाय’’ विलास पिंकूच्या कानात कुजबुजला.
‘‘खरं??’’ पिंकूचे डोळे विस्फारले.
नुन्नीबद्दल सगळं वाईटच असतं असं त्याला वाटत असे. एकदा दुपारी अम्मी भाजी निवडत होती आणि पिंकू अंघोळीच्या साबणाच्या फुटक्या खोक्याबरोबर गाडी गाडी खेळत होता. नकळत पिंकूचा हात त्याच्या जननेंद्रियावर गेला आणि तो ते चिवडू लागला. अम्मीनं ते पाहिलं आणि त्याच्या पाठीत रट्टा हाणला ‘‘ये हात निकाल उदरशे!! घान्यारडापना करू नको’’ अम्मीचे वटारलेले डोळे बघून आपण भयंकर काही केलंय याची जाणीव त्याला झाली होती. त्यांनंतर आजच त्याच्यासमोर नुन्नीबद्दल कोणीतरी बोललं होतं. विलासनं चड्डीची बटनं उघडून लिंग बाहेर काढलं.
‘आयो... य’ आकार बघून पिंकूच्या तोंडातून आश्चर्य बाहेर पडलं.
पिंकूनं राज्याच्या भीतीनं ते धरलं. ताठर. गरम. विलास डोळे मिटत होता.
‘‘धपका!!!!’’ मुलांचा बाहेर गलका झाला. विलासनं पटकन डोळे उघडले, झटकन चड्डी नीट केली आणि पिंकूला म्हणाला, ‘‘ही उद्या तोंडात धर! मी तुला सालयीनची बाटली अन नळी दीन, कारंजं करायला’’
विलास पळत मुलांच्या गलक्यात सामील झाला. पिंकू हळूहळू चालत मुलांकडे निघाला. विलास काय म्हणाला यावर तो विचार करत होता, सलायीनची बाटली!!!!....पन विलासनं आपल्या तोंडात शू केली म्हंजे?? त्याचा फार गोंधळ उडाला.
पुन्हा डाव सुरू झाला. यावेळी यशवंत आणि पिंकू एकत्र लपले. त्याच ठिकाणी. पिंकू वाट पाहू लागला की यशवंत कधी धर म्हनतोय ते...पण यशवंत काहीच बोलला नाही.
‘‘धरू का?’’ पिंकूनं भीत भीत विचारलं
‘‘शू... गबस आवाज करू नको’’ यशवंतनं पिंकूच्या तोंडावर हात ठेवला.
‘‘पन आपल्यावर राज्य आलं तर?’’ पिंकू
‘‘शू...बडबड करू नको, नायतर खरंच यील राज्य आपल्यावर.’’
तेवढ्यात पुन्हा आवाज झाला ‘धपका!!’ राज्य संपलं.

यशवंत आणि पिंकू तिथून बाहेर पडले. यशवंतनं पिंकूच्या डोक्यात टप्पल दिली, ‘‘लई बडबड करतो लेका तू ...आता परत तुज्याबर नाय लपनार बाबा.’’

विलास आणि यशवंतसोबत आलेल्या पाठोपाठ अनुभवामुळं आता पिंकूच्या छातीत धडधडू लागलं. त्याला विलासबरोबरचं लपणं पुन्हा दिसलं आणि अम्मीनं गाडी गाडी खेळताना मारलेलं आठवलं. गलका करणार्‍या मुलांकडं टाकलेली नजर वळवून त्यानं प्रतापगडाकडं एकवार डोळे भरून पाहिलं आणि आपल्या घराकडं पळत निघाला.

किल्ल्याची खूप आवड असूनही तो यशवंत-विलासच्या प्रतापगडावर पुन्हा गेला नाही.
wasim@biroba.com

पत्र

रतननं उत्सुकतेनं प्रश्‍नप्रत्रिका घेतली आणि भराभर वाचून काढली. एकूण सात प्रश्‍न: हत्ती किंवा गाय यांच्यावर निबंध, नाम, सर्वनामाच्या व्याख्या, समानार्थ, उलट अर्थ-सगळं त्यानं आज सकाळीच वाचलं होतं. यावर्षी सुद्धा आपलाच पहिला नंबर येईल असं वाटतंय. कित्ती सोप्पा पेपर! त्याला खूप आनंद झाला.

पण या आनंदानं फुललेल्या मनात एक प्रश्‍न टोचू लागला. तो म्हणजे तिसरा प्रश्‍न... आपल्या वडिलांना पत्र लिहा. शाळेच्या बक्षीस समारंभाबाबत वडिलांना पत्र.

वडील? रतनच्या मनात कल्लोळ माजला. तो इतर प्रश्‍नांकडे मन वळवायचा प्रयत्न करत होता. पण पुन्हा पुन्हा तो तिसरा प्रश्‍न समोर येत होता.

रतन शाळेतल्या सगळ्यात हुशार पण तितकाच बिचारा मुलगा. दुबळं शरीर, सावळा रंग, शिवून शिवून घातलेला शर्ट आणि पाच ठिगळांची पॅन्ट. पण हुशारी आणि स्वभाव यात मात्र तो सर्वांत पुढे. श्रीमंत घरातली चांगल्या कपड्यातली मुलं गणित सोडवायला धडपडत असायची पण हा मात्र सगळ्यांच्या आधी गणितं करून तयार. चित्रकला, संगीत, खेळ सगळ्यातच अव्वल, एक नंबर मुलगा - रतन.
रतन जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हाच गावात मजुरीवरून एक आंदोलन झालं होतं. शेतमजुरांनी संप केला. खूप मारामार्‍या झाल्या.जमीनदारांच्या लोकांनी मजूरवस्तीला आग लावली. अनेक लोक मारले गेले. याच हल्ल्यात रतनचे वडीलही मारले गेले.

वडिलांच्या निधनानंतर आठच दिवसांनी रतनचा जन्म झाला. चार दिशांना दु:खाचे डोंगर आणि मधे अश्रूंचा पूर. त्याची आई करेल तरी काय? तिला आणि रतनला एकमेकांशिवाय कोणी नव्हतं. पण या सगळ्यातून रतन जणू काही तावून सुलाखून निघाला. तेजस्वी, हुशार बनला.

त्या तिसर्‍या प्रश्‍नामुळे रतनच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण जीवन चित्रपटाप्रमाणे तरळून गेलं. ज्या वडिलांना कधी पाहिलंच नाही त्यांना पत्र कसं लिहिणार?

छोट्याशा रतनच्या मनातले छोटेसे विचार. त्याला वाटे वडील स्वर्गात आहेत. कधी तरी उडत्या गालिच्यावर बसून पृथ्वीवर येतात आणि मी झोपलेला असताना मला कुरवाळतात. आई म्हणते कधी कधी दिवसाही भुंगा, मधमाश्या आणि फुलपाखराच्या रूपात येऊन वडील त्याला पाहतात. त्यामुळे अशा सगळ्या छोट्या छोट्या प्राणी कीटकांवर रतनचा फार जीव आहे. न जाणो कुणाच्या रूपात आपले वडील असतील?

रतनला आईनं सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. उडणारा गालिचा, चंद्रावरची म्हातारी, फुलपाखरांचे पंख आणि भुंग्यांचा गुंजारव त्याच्या मनात घिरट्या घालू लागले. या कल्पनेच्या राज्यातच वडिलांची एक मूर्ती त्याच्या नजरेपुढे आली.
प्रिय बाबा... त्यानं उत्तरपत्रिका नीट केली. पेपर लिहायची तयारी केली. पहिल्यांदा निबंधच लिहावा. गाईवर निबंध. त्याच्या डोळ्यासमोर भाई पंडितांची गाय आली, चार पाय, दोन शिंगं, एक शेपूट, करडा रंग... तो विचारात बुडून गेला. कमालच आहे या प्रश्‍न काढणार्‍यांची! गाय किंवा हत्तीवर निबंध लिहा. कसा लिहिणार? आमच्याकडे गायच नाही आणि हत्तीचा तर प्रश्‍नच नाही.

त्यांच्या गल्लीत फक्त पंडितांकडे गाय होती. सकाळ-संध्याकाळ तिचं दूध बीडीओ साहेबांकडे जाई. ‘दूध पिऊन त्यांच्या मुली चांगल्या गोलमटोल झाल्यात. त्यांना गाईवर निबंध लिहायला सांगा. मी काय लिहू?’ त्याच्या मनात आलं. ‘हत्ती किंवा गाईपेक्षा आईवर निबंध आला असता तर मी खूप छान लिहिला असता.’

आईची आठवण येताच त्याला गलबलून आलं. माझी आई... पहाडासारखं तिचं दु:ख, गंगेसारखे पवित्र मन आणि पाखरासारखे प्रेमळ डोळे. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. टपकन एक अश्रू बाकावर पडला. इतक्या चांगल्या आईची लोक तक्रार करतात, तिला नावं ठेवतात. का?

त्याच्या छोट्याशा मनाला हा भावनांचा भार पेलवेना. त्याचा गळा भरून आला. त्यानं पेन बाकावर ठेवलं आणि तो डोळे पुसू लागला. पुढच्या बाकावर जमुनादास तिवारींची नात बसली होती. मागे वळून ती हळूच म्हणाली, ‘‘ए रतन सर्वनामाची व्याख्या सांग ना.’’

जमुनादास तिवारीच्या बंदुकीमुळेच रतनचे वडील मरण पावले. त्याला आईनं सगळं सांगितलं होतं आणि आता ही तिवारींची नात. काय करावं? ती पुन्हा म्हणाली. ‘‘सांग ना रतन. मी तुला खव्याची बर्फी देईन.’’ तिला रतन अगदी राजकुमारासारखा वाटला. रतनही आपसूकच कर्णाचा अवतार झाला आणि त्यानं उत्तर सांगितलं.

तेवढ्यात एक तासाचा टोल पडला. बापरे! आता मात्र तो पटपट उत्तरं लिहू लागला. निबंध, व्याकरण, धड्यावरचे प्रश्‍न भरभर लिहून झाले. राहता राहिला तिसरा प्रश्‍न. वडिलांना पत्र. काय लिहायचं? कसं लिहायचं? आईचं दु:ख लिहायचं का लोकांच्या तक्रारी? मुलं चिडवतात ते लिहू की... त्याला सुचेना

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी सगळी मुलं रंगीबेरंगी कपडे घालून आली होती. तो मात्र रोजच्याच पोशाखात. उलट खांद्यापाशी फाटलेला शर्ट आईनं त्याच दिवशी पुन्हा शिवला होता. घरात एक दाणाही शिल्लक नव्हता. कसंतरी करून आईनं मऊभात करून दिला नाहीतर उपासच घडला असता. समारंभात जेव्हा तो फाटक्या कपड्यात पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घ्यायला गेला तेव्हा बीडीओसाहेबांची मुलगी टाळ्या पिटत हसत होती. तो जेव्हा बक्षीस घेऊन आला तेव्हा वर्गातल्या एका मुलानं त्याला आईवरून डिवचलं. सगळेजण फिदीफिदी हसले. हे सगळं लिहायचं का पत्रात?

बाबांना हे वाचून किती दु:ख होईल! आपली, आईची काळजी वाटेल. त्यांना रडू येईल. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून स्वर्गाच्या राजानं कारण विचारलं तर बाबा काय सांगतील? नको नको, यातलं काहीच लिहायला नको.
बाबांना तर असं पत्र लिहायला हवं ज्यात इंद्रधनुष्याचे सात रंग असतील, फुलपाखराच्या पंखाची नक्षी असेल, आंब्याच्या मोहराचा गंध असेल, कोकिळेच्या गाण्याची मिठास असेल. बाबांना हे पत्र मिळेल तेव्हा त्यांना अभिमान वाटेल. त्यांचे बंदुकीचे घाव भरून येतील. अस्संच पत्र लिहूया.

कल्पनेवर स्वार होऊन मन वेगानं धावू लागलं. श्‍वास जोरात होऊ लागला. डोळ्यात विजेसारखी चमक आली. मनात एक लक्ष फुलं फुलली आणि मन रंगीबेरंगी झालं. इतक्यात त्याला दिसलं की तिवारीच्या नातीनं पेपर दिला आणि ती बाहेर गेली. अरेच्चा वेळ फारच कमी उरलाय. तो लगबगीनं मनातल्या मनात पत्राचा मसुदा तयार करू लागला.

प्रिय बाबा, नमस्ते
तुम्हाला कधी पाहिलं नाही तरीपण पत्र लिहितो आहे. तुम्ही तर स्वर्गात आहात. तिथं खूप सुख असतं असं म्हणतात. मी आणि आई कसेतरी राहतो आहोत.
बाबा, आई म्हणते तुम्ही उडत्या
गालिच्यावरून किंवा फुलपाखराच्या रूपात येऊन मला भेटता. एकदा खर्‍या रूपात या ना! मला तुम्हाला डोळे भरून पाहायचंय. मी काही नाही मागणार. जमुनादास तिवारी तुम्हाला आता काही करू शकणार नाही. काही वर्षांपूर्वी तो सरपंचाची निवडणूक हरला. लोकांनी त्याची बंदूक काढून घेतली.
बाबा, माझ्या शाळेत बक्षीस समारंभ खूप छान झाला. मी पहिला आलो. मला एक थुलथुलीत जाड्या आणि मिचमिच्या डोळ्यांच्या ऑफीसरनं बक्षीस दिलं. त्यांनी मला विचारलं, ‘‘मोठेपणी तू कोण होणार?’’ मी सांगितलं, ‘माणूस’ बरोबर सांगितलं ना बाबा?

रतनच्या मनाचा प्रवास चालूच होता इतक्यात तिसर्‍या तासाची घंटा झाली. टण् टण्! वेळ संपली. मनातलं पत्र मनातच राहिलं. गुरुजी आले आणि उत्तरपत्रिका ओढून घेऊन गेले.

रतन उदासपणे बाहेर आला. खाली मान घालून घरी निघाला. तेवढ्यात गोड आवाजात हाक आली - ‘‘रतन, ए रतन’’ त्याने वळून पाहिलं तर तिवारीची नात रुमालात खव्याची बर्फी घेऊन त्याची वाट पाहत उभी होती.

चित्रे : उदय खरे, भोपाळ
अनुवाद : यशश्री पुणेकर
हिंदी शैक्षणिक संदर्भ - मार्च २००९ मधून साभार

अनारकोच्या गावात पुलाचं उद्घाटन

येणार येणार म्हणून गाजत असलेला तो दिवस शेवटी आला एकदाचा! गेले दहाबारा दिवस अनारकोच्या कानावर सतत हेच पडत होतं की प्रधानमंत्री येणार आहेत. जिकडे बघावं तिकडे एकच चर्चा-प्रधानमंत्री येणार, प्रधानमंत्री येणार. शाळेतले सगळे शिक्षक, पप्पा, त्यांचे मित्र, दुकानांमधले रस्त्याने जाणारे येणारे लोक... सगळ्यांच्या तोंडी एकच विषय-प्रधानमंत्री येणार! प्रत्येक जण एवढंच काय अगदी आईसुद्धा, आपापल्या पद्धतीनं बोलत होता. त्या सगळ्यांच्या सुरावरून वाटत होतं की फार महत्त्वाची घटना घडणार आहे.

पहिले दोन दिवस अनारकोनं हे इतके वेळा ऐकलं की ती अगदी बोअर होऊन गेली. त्यामुळे तिनं कोणालाच काही विचारलं नाही. नंतर ती सगळं विसरूनही गेली. पण आज सकाळी सकाळीच अनारको अंथरुणात लोळत असताना पप्पांचा आरडाओरडा ऐकू आला, ‘‘घरातली एक तरी वस्तू जागच्या जागी सापडेल तर शपथ!’’ तेव्हा अनारकोला कळलं की ते त्यांचे मोजे शोधतायत. तेवढ्यात स्वयंपाकघरातून आईचा आवाज आला, ‘‘आत्ता शोधून देते मी मोजे!’’ अनारकोच्या लक्षात आलं की आज पप्पा सकाळी लौकर बाहेर पडतायत. पण एवढा आरडाओरडा कशाला करायचा? लोळतालोळता अनारको जरा उदास झाली. ‘अच्छा, म्हणजे प्रधानमंत्री आज येणार तर!’ तिला आठवलं.

पप्पा नाश्ता करत होते. अनारकोला माहीत होतं की नाश्ता करताना त्यांचा मूड जरा चांगला असतो म्हणून चटकन उठून ती त्यांच्याजवळ येऊन बसली आणि विचारलं, ‘‘पप्पा, प्रधानमंत्री कशाला येणार आहेत?’’ पप्पा म्हणाले, ‘‘नदीवर तो नवीन पूल झालाय ना, त्याचं उद्घाटन करायला येणार आहेत.’’ ते मूडमधे आहेत असं बघून तिनं विचारलं, ‘‘उद्घाटन म्हणजे काय पप्पा? तो पूल प्रधानमंत्र्यांनी बांधलाय का?’’ पप्पा म्हणाले, ‘‘नाही गं, तू पाहिलं नाहीस का, पूल मजुरांनी बांधलाय ते?’’ अनारकोनं हळूच विचारलं, ‘‘मग उद्घाटन करायला प्रधानमंत्री कशाला येणार आहेत?’’ पप्पांचा मूड जरा बदलल्यासारखा वाटला, ‘‘अं...कारण...कारण ते देशाचे प्रधानमंत्री आहेत!’’

तरी धीर करून तिनं विचारलं, ‘‘पुलासाठी दगड कुठून आले, प्रधानमंत्र्यांनी दिले का?’’ आता पप्पा जरा अस्वस्थ झाले, ‘‘डोंगरातून, मोठेमोठे खडक फोडून ते दगड आणतात बेटा.’’ ‘‘मग प्रधानमंत्री त्यासाठी पैसे देतात का?’’ आता पप्पा जरा वैतागले, तरी पण म्हणाले, ‘‘अगं वेडे, लोकांकडून येतात पैसे. लोक सरकारला पैसे देतात.’’ ‘‘अच्छा, म्हणजे पूल लोकांनी बांधला, दगड डोंगरातून आणले, पैसेही लोकांनीच दिलेत. मग पुलाचं उद्घाटन करायला प्रधानमंत्री कशाला?’’ अनारको जरा जोरातच बोलली.

आता मात्र पप्पा चिडले, ‘‘कितीदा तेचतेच सांगायचं तुला? एकदा सांगितलं ना ते देशाचे प्रधानमंत्री आहेत म्हणून? ऊठ आता, तोंड धुऊन अभ्यासाला बस बघू!’’ अनारको वैतागली. कळलं तर काहीच नाही आणि वर काय तर म्हणे अभ्यासाला बस! शी! नाइलाजानं ती पुस्तंक काढून बसली. एक एक करून पुस्तकांची नावं वाचायला सुरुवात केलीन. सगळ्या पुस्तकांची नावं वाचून होईपर्यंत शाळेची वेळ झाली.

तिनं आज शाळेत जरा वेगळ्या रस्त्यानं जायचं ठरवलं. काहीजण रस्त्याकडेची लांबलचक भिंत खरवडून स्वच्छ करत होते. त्या भिंतीवर लोकांनी लाल-काळ्या रंगामधे झिंदाबाद, मुर्दाबाद आणि असंच कायकाय लिहिलेलं होतं. कधी तिथून जाताना अनारकोनं ते वाचलं होतं. एका कोपर्‍यात कशी कोण जाणे पण थोडीशी जागा कोरी राहिली होती. तिथे मग अनारको, किंकु आणि त्यांची दोस्तमंडळी या सगळ्यांनी मिळून काही चित्रं काढली होती. झाडाची पानं, विटेचे तुकडे, खडूचे तुकडे वगैरे वापरून काढलेले डोंगर, त्याच्यामागून उगवणारा सूर्य, झरे, उंच उडणार्‍या चिमण्या अशी ती चित्रं होती. कधी येता जाता मनात येईल तेव्हा ते त्यात भरही घालत. कधी एखादा ढग काढला तर कधी डोंगरावर एखादं झाड काढलं, असं काहीतरी. खूप मजा यायची. पण आज ते सगळंच खरवडून काढत होते.
अनारकोला आठवलं, एक दिवस किंकुनं फळ्यावर गणिताच्या मास्तरांचं चित्र काढलं होतं. आणि मास्तरांची चाहूल लागताच घाबरून घाईघाईनं ते पुसून टाकलं होतं. पण ते ठीक आहे ना! इथे या भिंतीवरच्या चित्रांपासून कसली आलीय भीती. अजबच लोक आहेत! प्रधानमंत्री येणार तर खुशाल येवोत. पण आमची चित्रं का म्हणून पुसता? तिला खूप राग आला. आज रस्तासुद्धा अगदी स्वच्छ, चकचकीत दिसत होता. कडेनं लाल माती पसरली होती, त्यावर चुन्याचे सफेद पट्टे ओढले होते. एक विजेचा खांब वाकडा होऊन कुर्निसात केल्यासारखा दिसत होता तो आता सरळ केला होता. एकंदरीत हे सगळं बघून प्रधानमंत्री म्हणजे कोणीतरी जबरदस्त ताकदवान माणूस असणार अशी अनारकोची अगदी खात्रीच पटली.

शाळेजवळ पोचते तो तिला किंकु दिसला. ती घाईघाईनं त्याला सांगायला लागली, ‘‘किंकु, प्रधानमंत्री कसे येणार माहित्येय? सर्वात पुढे एक गाडी शिटी वाजवत जाणार. मागून पांढर्‍या गाडीतून प्रधानमंत्री जाणार. त्यांच्या गाडीच्या मागेपुढे गाड्या आणि बाजूनं मोटरसायकलस्वार. गाड्यांमधे बंदुका घेतलेले लोक आणि...’’ बोलताबोलता तिच्या लक्षात आलं की किंकु विचारात गढलाय. म्हणून तिनं विचारलं, ‘‘कसला विचार करतोयस किंकु?’’ किंकु म्हणाला, ‘‘मी विचार करतोय की असं जात असताना जर प्रधानमंत्र्यांना शू लागली तर काय होत असेल? सगळ्या गाड्या थांबत असतील. प्रधानमंत्री रस्त्याच्या कडेला शू करत असताना हे मोटरसायकलवाले, बंदूकवाले लोक काय करत असतील?’’

अनारको हा प्रसंग डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्नात असतानाच शाळेची घंटा झाली आणि किंकु आणि ती धावत जाऊन त्यांच्या वर्गाच्या रांगेत उभे राहिले. रांगेत उभी असलेली अनारको तिच्या पुढे उभ्या असलेल्या मुलीचे केस निरखण्यात दंग झाली होती. आणि तिकडे हेडमास्तर सांगत होते, ‘‘आज डबा खायची सुट्टी झाली की सगळ्यांनी घरी जायचंय. प्रत्येकानं स्वच्छ कपडे घालून एक-एक फुलांचा हार घेऊन शाळेत यायचं आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून प्रधानमंत्र्यांची गाडी तिथून जात असताना हातातला हार हलवायचा आहे. सगळ्यांचं लक्ष पांढर्‍या गाडीकडे असलं पाहिजे. धक्काबुक्की अजिबात चालणार नाही.’’ मग प्रार्थना झाली आणि सगळे आपापल्या वर्गात गेले.

पहिला तास गणिताचा होता तो कसातरी पार पडला. दुसरा तास ड्रॉईंगचा होता. मास्तरांनी झाडाला लागलेला आंबा काढायला सांगितला. अनारकोनं खूप प्रयत्न केला पण मास्तर फळ्यावर काढतात तसा आंबा आजपर्यंत कधीच तिच्या बघण्यात आला नव्हता. मग फुलपत्तीनं तिला समजावून सांगितलं की, झाडावरचा आंबा आणि फळ्यावरचा आंबा यात फरक असतो. तिनं हेही सांगितलं की इतर कोणत्याही तासाला भलेही कोणी झाडावरचा आंबा काढू दे, ड्रॉईंगच्या तासाला मात्र फळ्यावरचा आंबाच काढावा लागतो. म्हणून अनारको फळ्यावरचा आंबा काढायला लागली.

तेवढ्यात घंटा झाली. तिसरा तास सामाजिक शास्त्राचा होता. तो तिला आवडायचा कारण सामाजिक शास्त्राच्या मास्तरांची तिला भीती वाटत नसे. ते मास्तर ठेंगणे होते आणि वयानंही लहान होते. पण आज त्यांचाही नूर काही औरच दिसत होता. आल्याआल्या विचारायला लागले, ‘‘सांगा बरं आज आपल्या इथे कोण येणार आहे?’’

अनारकोनं उभं राहून विचारलं, ‘‘प्रधानमंत्री म्हणजे कोण?’’ मास्तर जरा ताठ्यानंच बोलले, ‘‘तुला प्रधानमंत्री म्हणजे कोण माहीत नाही? देशाचे प्रधानमंत्री! बरं, आपल्या प्रधानमंत्र्यांचं नाव सांगा बरं?’’ अनारकोला माहीत असून तिनं सांगितलं नाही. उलट असं विचारलं, ‘‘सर, त्यांना माझं नाव माहित्येय?’’ यावर मास्तरांचा ताठा कमी झाला आणि ते गडबडलेच. ते म्हणाले, ‘‘त्यांना तुझं नाव लक्षात ठेवण्याशिवाय काही कामं नाहीत का? चल बस खाली!’’

मग मास्तर शिकवायला लागले आणि अनारको विचार करायला लागली, ‘हे प्रधानमंत्री तरी कसे आहेत-सगळेजण त्यांना ओळखतात पण ते मात्र कोणाला ओळखत नाहीत. किती एकटं वाटत असेल त्यांना?’ तिला त्यांची दया आली. इकडे मास्तर सरकार-निवडणूक-देश-नेता-जनता-विधानसभा... असं बरंच काही बोलत होते. अनारको धड ऐकतही नव्हती आणि तिला नीटसं काही समजतही नव्हतं पण तरी तिला प्रधानमंत्री खूप ताकदवान आहेत असं मात्र वाटायला लागलं होतं हे नक्की.
तास संपतच आला होता, तेवढ्यात दरवाजात घंटा देणारे दादा आले. मास्तर बाहेर जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलले, मग परत येऊन टेबलावरची स्वत:ची पुस्तकं घेऊन बाहेर निघून गेले. अनारकोला समजत नव्हतं की हे सगळं चाललंय तरी काय. तेवढ्यात घंटावाल्या दादांनी आत येऊन सांगितलं की प्रधानमंत्र्यांचं येणं रद्द झालंय. आता घरी जाऊन हार आणायची गरज नाही. तेव्हा एकच दंगा सुरू झाला.

घंटा होताच अनारकोच्या वर्गातली आणि इतरही वर्गातली सगळी मुलं आरडाओरडा करत बाहेर पडली आणि मैदान गोंगाटानं भरून गेलं. पण अनारको ह्या दंग्यात सामील झाली नव्हती. तिचं मन कसल्यातरी विचारात गढलं होतं. कट्ट्यावर बसून डबा खात खात ती किंकुला म्हणाली, ‘‘ए किंकु, प्रधानमंत्री खूप ताकदवान असतात ना रे?’’ तिनं एवढं म्हणायचा अवकाश, किंकु कट्ट्यावरून खाली उतरून उभा राहिला आणि त्यानं जे तोंड सोडलं...म्हणाला, ‘‘अरे, प्रधानमंत्री असतील आपल्या घरी. कितीही ताकदवाले असले तरी मी नाही घाबरत. मला काय वाटतं सांगू? प्रधानमंत्री असले तरी शी करताना कपडे काढतच असतील ना... माझ्यासारखे...’’

किंकुचं बोलणं संपायच्या आतच अनारको हसायला लागली. आज दिवसभरात पहिल्यांदाच ती अशी हसत होती. हसता हसता घास तिच्या घशात अडकला आणि ती खोकायला लागली-खों खों - खों ऽऽऽ !

अनुवाद : प्रीती केतकर.
शैक्षणिक संदर्भ अंक ४७ मधून साभार