News not found!

दिवाळी अंक

शिक्षणमाध्यम विशेषांक - दिवाळी २०१२

Magazine Cover

जगभरात सर्वत्र शिक्षणतज्ञांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून म्हणजेच पहिल्या चार-पाच वर्षात बाळाच्या आसपास नांदणार्‍या भाषेतूनच दिलं जावं हे मांडलेलं आहे. मूल ज्या सामाजिक वातावरणात वाढतं त्याचा परिणाम त्याच्या वाढ-विकासावर होत असतो. विशेषत: मुलाच्या शिक्षणाची बीजं ही मुलाच्या परिसरातल्या भाषेतच रुजू लागतात. त्याचं भोवतालच्या जगाचं आकलनही भाषेसोबतीनंच आकार घेत असतं. मूल शिकतं, विचार करू लागतं, आपल्या स्वत:च्या मनात आपला आपला विचार करू लागतं. किती अदभूत गोष्ट! भाषेशिवाय विचार होऊ शकतो की नाही हे अद्याप नेमकं सांगता आलेलं नाही.

खेळ विशेषांक – २०११

Magazine Cover

बहात्तर वेळा नाचवलास पाय
छुमछुम कसं वाजतं ते बघायला.
त्या घुंगरांच्या नादाला
बेचाळीसच्या वर्गानं गुणलं की येतं
ते तुझं खिदळणं - आभाळभर झालेलं.

कधी घरात आहेस की नाहीस इतकी
एकाग्र निःशब्द रममाण असतेस भातुकलीत
किंवा तोंडानं ‘ब्रुम-ब्रुम’ म्हणत
हात पसरून धावतेस
दहा बाय दहाच्या विशाल अवकाशात.

कठड्यावरून जिन्याच्या
सुळ्कन येतेस घसरत
माझा श्वास मला आवरत नाही.
म्हणूनच गच्चम्गर्दीच्या रस्त्यावर
तुझ्या क्रिकेटमध्ये मी
आधीच झेलबाद व्हायला तयार आहे.

कधी चौकात समोर येतेस
खेळणी विकतेस, कसरती करतेस
परवा म्हणालीस घ्या ना गजरे
मला खेळायला जायचंय.
त्या अक्राळ विक्राळ जगापासून
तुझा खेळ छातीशी संभाळून धरण्याऐवजी
पाकिटाकडे गेलेला माझा हात
आपण कलम करून टाकूया?

साबणाचे बुडबुडे काढतेस
वास्तवाची प्रतिबिंबं त्यावर
सोनेरी वर्खानं मांडतेस.
जगाचे नियम झुगारत ते वर..वर..वर.. जातात
माझं मनही कलम करायला हवं,
त्या वरचढ कल्पनाचित्रांची किंमत
फुटकळ ठरवल्याबद्दल...

वास्तवाच्या काठावरून
तू छलांग मारतेस,
आमच्या खुरट्या मनांची
मग, आम्हालाच लाज वाटते.
दगडांवरून धावणार्‍या
तुझ्या चकारीची टणटण..
मला निकरानं बजावते,
‘आता तरी ठरवायलाच हवं
तुझ्या हक्काचं सारं सारं
तुझ्या वाट्यात यायलाच हवं
- हो, अगदी खेळसुद्धा.’

संवादकीय - दिवाळी २०१०

मूल वाढवताना आपली जाणीव जागी ठेवण्याची गरज कुठल्याही काळात असतेच आणि ती एकंदर बदलांच्या पटीत वाढतही जाते आहे. आपल्या मुलाला जगात कधीही - आपल्याला आपली माणसं आहेत, ती आपल्या सुखदु:खांशी सहभावी आहेत ह्याची खात्री असणं सर्वात महत्त्वाचं असतं. जगाचा मायावीपणा सातत्यानं वाढत जात असताना ही गोष्ट अधिकाधिक कठीण होऊन बसली आहे.
काळ कितीही बदलला तरी आपल्या मुलाबाळांवर आपलं प्रेम असणारच. मुलांनी काय शिकावं, कुठं राहावं ह्याचे निर्णय ज्याचे त्यानंच घ्यायचे असतात, आणि पेलायचेही असतात. तरीही कुणाला कधी फसवू नकोस आणि कुणावर बळजबरी करून दुसर्याचे मानवी हक्क लुबाडू नकोस एवढं तरी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवायला साधलंच पाहिजे. अर्थात शब्दांपेक्षा कृतीमधून पोचता आलं तर ते अधिक फलदायी ठरेल हे काय आम्ही कुणाला सांगायला हवं?

दिवाळी २०१०

Magazine Cover

या अंकाचं मुखपृष्ठ आमच्यासाठी ‘खास’ आहे. पालकनीतीच्या खेळघरातल्या काही मुलांच्या कलाकृती त्यावर दिसत आहेत. त्यांच्या दादानं - विनय धनोकरनं मातीकाम शिकायला सुरुवात केली आहे. हे तंत्र तो आत्मसात करायला लागलाय. ‘आम्हाला पण दाखव ना कसं करायचं’ म्हणताना एक दिवस तो भिजवलेली माती घेऊनच आला. छोट्या छोट्या टाइल्स कशा बनवायच्या, त्याच्यावर नक्षी कशी करायची हे त्यानं छान सांगितलं - दाखवलं. बबन पवार, अमित पवार, अनिल सोनावणे, अक्षय लोंढे, ऐश्वर्या यादव, शुभांगी जाधव, माया गायकवाड, सुगंधी पासलकर ही सारी मुलं त्याच्याबरोबर काम करताना रमून गेली. या सगळ्यांच्या पहिल्या टाइल्स आपण मुखपृष्ठावर पाहतो आहोत.

दिवाळी २००७

Magazine Cover

आजच्या भोवंडून टाकणार्या बदलांच्या वेगामध्ये ‘थांबून विचार करायला’ सवड काढणं कठीण जातं. पण स्वतःच्या विचारांना, जगण्याला आकार देता येण्याच्या क्षमतेमुळेच आपण ‘माणूस’ बनलो आहोत. त्यामुळे ‘थोडं थांबून, स्वतःला तपासून पाहण्यास’ तसं म्हणाल तर पर्यायही नाही. ह्या प्रक्रियेत नेहमी आपल्याबरोबर ठेवावा असा हा अंक ! अंक तयार होण्याच्या प्रक्रियेत अनेकांचा हातभार लागला.
त्या सर्वांचे, विशेषतः आमच्या जाहिरातदारांचे आणि ‘प्रयास’ मधील सर्व सहकार्यांचे
मनापासून आभार.