News not found!

पर्यावरण

पर्यावरण

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो...

Magazine Cover

मी लहान असल्यापासून घरातल्या सगळ्यांना, शेजार्‍यांना सतत संघर्ष करतानाच पाहत आलो. एखाद्या प्रसंगी नव्हे तर आयुष्यभर त्यांची जगण्याची लढाई चालूच असे. तेव्हापासून मला समाजातला अन्याय दिसत राहिला आहे.

अदिती-अपूर्वा, तुम्ही कमाल आहात !!

विचार करणारी मुले

मळलेल्या वाटेनं, यशाच्या-प्रतिष्ठेच्या चाकोर्‍यांनी आखलेल्या वाटेनं बहुतेक जण जाताना दिसतात. काही जण मात्र वेगळ्याच दिशेनं, रस्त्यानं जायला निघतात आणि सरळ चालू पडतात. आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी पहातात, समाजाचे, परिस्थितीतले प्रश्न समजावून घेतात. त्यांना उत्तरंही शोधतात. त्यांचं हे शोध घेणं, त्यासाठी धडपड करणं, बघताना आपण चकित होतो. अशी काही वेगळी तरुण मुलंमुली आम्हाला दिसली. ही सगळीजणं वीशी ते तीशीच्या आतबाहेरचीच आहेत. त्यांच्या विचारांकडे, करत असलेल्या कामांकडे, जीवनदृष्टीकडे बघताना अंधारलेल्या भविष्याच्या आशंकेनं काहीसं धास्तावलेलं आपलं मन उचल खातं. कदाचित काही बरं घडेलही, असा दिलासा या मुलांच्या अस्तित्वानं मिळून जातो.
वेगवेगळी कौटुंबिक, आर्थिक-सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमी असणारी ही मुलंमुली ‘आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी’ धडपडत आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात, उत्तरांच्या शोधात निघालेली, त्यासाठी धडपडणारी अशी कितीतरी तरूणमंडळी असणार. त्यातला हा केवळ एक नमुना आहे. आम्हाला भेटलेली, परिचयातली असल्यानं त्यांची ओळख आम्हाला अधिक विश्वासानं करून देता येते आहे इतकंच.

या मुलामुलींना सगळं जग समजलंय, गवसलंय असा आमचा दावा नाही, त्यांचा तर नाहीच नाही. मात्र आपल्याला नेमकं काय वाटतंय, पुढे काय करायचंय याचा अंदाज घेण्याइतकी त्या वाटेवर ती सरावली आहेत. एक साम्य मात्र वैविध्यांना मागं सारून ठळकपणे समोर दिसतं, ते म्हणजे, या सगळ्यांच्या घरातून त्यांना पाठिंबा आहे. घराच्या, पालकांच्या सोबतीमुळे निर्णय घेणं, वाट चालणं सोपं झालं असलं तरी ती वाट चालण्याचा निर्णय मुलांचा स्वत:चाच आहे.

या अंकात अशा काही मुलामुलींची ओळख वाचकांशी करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अदिती तीन वषार्ची असल्यापासून आणि अपूर्वाच्या जन्मापासून मी त्यांना जवळून पाहिलंय. पंचविशीच्या आसपासच्या या दोघी बहिणी पुण्याजवळ सिंहगड रस्त्यावरच्या सणसवाडी गावात, डोंगरपायथ्याजवळ गेली तीन वर्षं शेतीचे प्रयोग करतायत. प्रत्येक ऋतूमध्ये होणार्‍या बदलांचं आणि त्यामुळे जमिनीवर होणार्‍या परिणामांचं निरीक्षण करत, हळूहळू जमिनीची मशागत करतायत आणि जमीन घडवताना स्वतःही घडतायत. तिथंच त्यांनी स्वतः कष्ट करून हातांनी घरही बांधलंय.
अदिती-अपूर्वाची शेती करण्याची तळमळ, त्यांना त्यातून मिळणारा आनंद, त्यासाठी पडतील ते शारीरिक कष्ट घ्यायची तयारी, त्यांचा साधेपणा आणि सच्चेपणा शब्दात पकडता येणं फारच कठीण आहे.

एक सहज आणि साधं जगणं, किती दुर्मीळ, किती आश्‍चर्यकारक !

Magazine Cover

रुळलेल्या वाटेनं जाताना काहीतरी चुकतंय असं जाणवल्यानं थांबून, विचार करून मग काही वेगळी वाट धरणं, हेही विशेषच असतं. पण सगळं जग जातंय त्या रस्त्यानं न जाता, आपला असा एक मार्ग धरून; कसलाही अभिनिवेश न दाखवता, ठामपणे त्यावरून चालत राहणं हे तर जास्तच विशेष आहे! हेमा साने याचं जगणं अक्षरशः असंच आहे.

पुण्यात लक्ष्मी रोडपासून दोनेक मिनिटाच्या अंतरावर एक लहानशी देवराई म्हणावी अशी जागा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित काही लोकांना हे माहीत असणार. या ठिकाणी १९५१ सालापासून उगवलेलं एकही रोप किंवा गवताचं पातं कुणीही तोडलेलं नाही. गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख हेमा साने यांच्या घराबद्दलच बोलते आहे मी. आजूबाजूच्या आधुनिक, उंचच उंच झगमगाटी इमारतींच्या मध्येच एक दार आहे, ते त्यांच्याच वाड्याचं. आता वाडा शिल्लक नाही, समोर टोकाशी एक खोली आहे. शेजारी आड, त्यावर पाणी शेंदायचा रहाट.

मातीचा सांगाती

काही वर्षांपूर्वी केरळमध्ये एका कम्युनिस्ट युवक-गटाने आयोजित केलेल्या युवक शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. श्री. नारायणभाई देसाई यांच्या ‘गांधीकथा’चा एक कार्यक्रम यामध्ये आयोजित केला होता. गांधीविचार समजावून घेण्याचा हा प्रयत्न मोठा वेधक होता. संध्याकाळी तीन तास नारायणभाई देसाई गांधींबद्दल हिंदीमधून सांगत. ते भाषण भाषांतरित करून इंग्रजी आणि मल्याळममधून ताबडतोब एफ.एम. रेडिओवरून प्रसारित होई. त्यामुळे घरोघरी, कामाच्या जागी, मोबाईलवरूनसुद्धा ते ऐकलं जाई.

दिवसभरात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी होत. ते आपापल्या कामाबद्दल मांडणी करत. इथं ज्या कामांची ओळख झाली, त्यापैकी उडुपीचे श्रीकुमार यांनी केलेली मांडणी मनात ठसा उमटवून राहिली. जे. सी. कुमारप्पा यांच्या ‘इकॉनॉमी ऑफ पर्मनन्स’ या पुस्तकाच्या आधारे त्यांनी शाश्‍वत जीवनशैलीबद्दल अतिशय सुंदर मांडणी केली होती अगदी प्रामाणिक आणि मनाला भिडणारी! त्यात विचारांची स्पष्टता आणि भविष्याबद्दलची कळकळही होती. शिबिराच्या आयोजकांपैकी एक, सहदेवन, आणि श्रीकुमार हे दोघंही ‘सांगत्य’ या उडुपी इथल्या संस्थेचं काम करतात. आपल्या वागण्यानं पृथ्वीवरच्या काही संसाधनांचा नाश होतो, तो टाळावा आणि शक्य असेल तितकी निसर्गस्नेही जीवनशैली ठेवावी; शेतजमिनीची सुपीकता वाढवावी, तिची स्थिति सुधारावी, या दिशेनं या संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे तसं जगून पाहण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे. उडुपीच्याजवळ नक्रे या गावात सांगत्यची शेतजमीन आहे. गेली काही वर्षं श्रीकुमार तिथे राहताहेत, शेती करताहेत. बाकीचे जमेल तसतसे येऊन यात सहभागी होतात, हातभार लावतात. पर्यावरणाच्या पालकत्वाचा त्यांचा हा प्रयोग पालकनीतीच्या कक्षेबाहेरचा नाही, असा विश्‍वास आम्हाला वाटतो, म्हणूनच श्रीकुमारचे एक जवळचे मित्र आणि ‘सांगत्य’चे एक सदस्य टी. विजयेन्द्र यांना आम्ही त्याबद्दल लिहिण्याची विनंती केली.

श्री कुमार - माझा जिवाभावाचा मित्र, अत्यंत मुळापासून विचार करणारा, शाश्‍वत जीवनाचा विचार प्रत्यक्ष आयुष्यात आणणारा. शाश्‍वतता या तत्त्वाभोवतीच त्यानं स्वत:चं जगणं गुंफलेलं आहे आणि सहृदयता हा तर त्याचा स्थायीभाव आहे. याची बीजं बालपणापासून त्याच्यात असतीलही, पण जाणत्या वयात त्यानं त्याचा खरा अंगीकार केलेला आहे. आपण त्याची रीतसर ओळखच करून घेऊया.

निसर्ग जोपासनेचे तत्त्वज्ञ

इकॉलॉजीकल सोसायटी या नामवंत संस्थेचे संस्थापक, पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ आणि सुप्रसिध्द पक्षीतज्ज्ञ प्रकाश गोळे यांचे नुकतेच निधन झाले. निसर्गाकडे, पर्यावरणाकडे बघण्याचा एक वेगळा आणि सर्वंकष दृष्टिकोन हे त्यांच्या विचाराचे मर्म होते. हा दृष्टिकोन प्रत्यक्ष जमिनीवर रुजवण्यासाठीचे त्यांचे मार्गही तितकेच कसदार होते. निसर्गसंवर्धनाकडे व्यापक परिप्रेक्ष्यातून बघणार्‍या आणि हा विचार अभ्यासक्रमातून पोचवण्याचा प्रयत्न करणार्‍या गोळेसरांच्या वेगळेपणाचा वेध त्यांच्या विद्यार्थिनीने या लेखातून घेतलेला आहे.

सर्वायतन

Magazine Cover

ऑगस्ट २०१३च्या पालकनीतीच्या अंकात आपण मोहन हिराबाई हिरालाल यांचा लेख वाचलात. या लेखात मोहनभाऊंनी स्वत:च्या वैयक्तिक पालकत्वासंदर्भात आणि सामाजिक कामातल्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत सविस्तर मांडणी केलेली आहे. मेंढा (लेखा) हे गडचिरोलीपासून तीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं आदिवासी गाव आहे. या गावानं फार मोठी कामं करून दाखवलेली आहेत. २००६ सालच्या वनहक्क कायद्यानुसार गावाच्या १८०० हेक्टर जंगलाच्या व्यवस्थापनाचा आणि उत्पन्नावरचा हक्क मोठ्या हिंमतीनं मिळवलेला आहे. सरकारकडून असा हक्क मिळवणारं आणि या हक्कांचा वापर करून गावाचा सर्वांगीण विकास घडवणारं मेंढा (लेखा) हे भारतातलं पहिलं गाव आहे.

मेंढ्यातली सर्वसहमतीनं निर्णय घेण्याची, जबाबदारीनं या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची आणि सर्वांच्या हिताची पाठराखण करत विकास साधण्याची पद्धत अचंबित करणारी आहे. ही संपूर्ण प्रक्रियाच फार वेधक आहे. मेंढ्याची गेल्या सव्वीस वर्षांची ही प्रदीर्घ वाटचाल समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. मोहनभाऊंनी लिहिलेल्या पुस्तिका आणि मिलिंद बोकील यांचं ‘गोष्ट मेंढा गावाची’ हे पुस्तक वाचलं, त्यातून हा आगळा-वेगळा प्रयोग अधिक खोलवर समजून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मेंढ्याच्या प्रत्यक्ष भेटीतून, मोहनभाऊ आणि देवाजी तोफा यांच्याशी झालेल्या गप्पांमधून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. अनेकदा तर आपण वास्तव जगात नाही, जणू स्वप्नातल्या गावाबद्दल वाचतो, ऐकतो आहोत असं वाटावं असा हा अनुभव होता. पण ते तसं नाही. जित्याजागत्या माणसांचं आणि आपल्याच देशातलं हे अगदी खरंखुरं गाव आहे.

मेंढा गावाचं चित्र

आपण आपला मार्ग शोधूया

Magazine Cover

आपल्याला आपल्या लहानपणीच पालकत्वाची ओळख होते, घरातली मंडळी - आईवडील यांच्याकडून. त्यातले आईवडील सर्वात जवळचे असतात. आमचं घर व्यावसायिकांचं होतं. घरी शिक्षणाचं फारसं वातावरण नव्हतं. पण माझ्या आईला मात्र शिक्षणाची फार आवड होती. ती पुण्याला सेवासदनमध्ये शिकली होती. शाळेत ती कायम पहिला नंबर मिळवीत असे. पण लग्न झाल्यावर ती चंद्रपूरला आल्यामुळे तिचं शिक्षण बंद झालं. वडील मॅट्रिकही झालेले नव्हते. पण हे सारं स्वीकारून तिनं ठरवलं की मुलांना शिकवायचं. माझा मोठा भाऊ शिक्षणात फार हुशार होता. शाळेत नेहमी पहिला यायचा. तो तिची आकांक्षा पूर्ण करायचा, त्यामुळे घरच्यांचं माझ्यावर फार लक्ष नसायचं.

पडकई - शाश्वत विकासासाठी...

‘शाश्वत’ ही संस्था पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या जवळपास २५ गावांमधल्या आदिवासींसोबत काम करते आहे. डिंभे धरणामुळे निर्माण झालेल्या विस्थापितांचा प्रश्न, भीमाशंकर अभयारण्यातल्या आदिवासींच्या जमीन-नोंदणीचा प्रश्न, मुलांसाठी बालवाडी, निवासी शाळा, रोजगार अशा अनेक प्रश्नांना घेऊन ‘शाश्वसत’चे काम चालू आहे. त्यांच्या या कामाची नोंद जागतिक स्तरावरही घेण्यात आलेली आहे. नुकतेच त्यांना युएनडीपीतर्फे दिल्या जाणार्याी मानाच्या ‘इक्वेटर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
कुसुम कर्णिक यांनी प्रत्येक काम अनोख्या उत्साहाने, धडाडीने सुरू केले, पुढे नेले. त्यांच्या कामात आणि जीवनातही त्यांना साथ मिळाली आनंद कपूर यांची.
त्यांच्या कामाचा आणि त्याबरोबरीने झालेल्या वैयक्तिक आणि सामाजिक पालकत्वाचा प्रवास त्यांनी इथे मांडलेला आहे.

पडकई -प्रत्येकाची भातखाचरं विनामोबदला, एकमेकांच्या सहकार्यानं तयार करण्याची आदिवासींची पारंपरिक पद्धत

ढवळा आपल्या मुलाला भेटण्याकरता बराच चालून आणि मोठा डोंगर उतरून आश्रमशाळेत गेला होता. तिथे गेल्यावर त्याला कळले की त्याच्या गावचा एक मुलगा बराच आजारी झालाय. परत जाताना ढवळाने त्याला खांद्यावर घेतले आणि मोठा डोंगर चढून, बरेच चालून, गावी आला; आणि त्या मुलाला त्याने त्याच्या आईबाबांच्या स्वाधीन केले. हे मला कळले, तेव्हा मला ते सुंदर आणि मानवी वाटले. त्यातून मला पालकत्वाची अनोखी ओळख पटली. आदिवासी - कोळी महादेव लोकांमध्ये काम करताना कितीतरी अनुभव असे आले की सुजाण पालकत्वाच्या संकल्पनेची रुंदी आणि खोली वाढली.