News not found!

सामाजिक प्रश्न

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्‍न

श्री. मोहनी यांनी ‘धर्म आणि धर्म निरपेक्षता’ या विषयावर ‘आजचा सुधारक’ या मासिकामध्ये १९९० साली तीन लेख लिहिले होते. हे तिन्ही लेख याच मासिकाच्या जून, जुलै, ऑगस्ट २०१४ मध्ये पुनर्प्रकाशित होत आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्तानं यातील दुसरा लेख या अंकात आवर्जून देत आहोत. यातल्या अनेक संकल्पना आपल्याला परिचित आहेत, पण त्याची श्री. मोहनी यांनी केलेली मांडणी या संकल्पना काहीशा उकलून, वेधकपणे स्पष्ट करते.

समजा, मी इहवादी आहे. माझा परलोक वगैरेवर विश्‍वास नाही. त्यामुळे अर्थातच कोणत्याही अवतारावर नाही. त्याचप्रमाणे मला माझ्या कुळाचा अभिमान नाही. मी कुळामुळे एखाद्या जातीत व धर्मात पडत असल्यामुळे त्या जातीचा वा धर्माचाही मला अभिमान नाही. मी लौकिक अर्थाने धार्मिक माणूस नाही. मला कुळाचा अभिमान नाही याचा अर्थ मी माझ्या कुळाला इतरांच्या कुळाहून श्रेष्ठ मानत नाही. माझा भर समतेवर आहे. सर्व समान असावेत व श्रेष्ठकनिष्ठभाव मानवी व्यवहारात कोठेही नसावा असे मला मनापासून वाटते. मी तशा आचरणात कमी पडत असेन, पण समानतेचे तत्त्व मूल्य म्हणून मला मान्य नाही असे नाही.

सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’

Magazine Cover

मार्च २००६ मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओ.बी.सी. प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना २७% आरक्षण देण्याची घोषणा केली. ओ.बी.सी. आरक्षण लागू झालं तर आपला ‘उच्चशिक्षणाचा हक्क’ हिरावून घेतला जाईल, आपण बेरोजगार होऊ या भावनेतून उच्चजातीय तरुणांनी निदर्शनं सुरू केली होती. या निदर्शनांचा एक भाग म्हणून या तरुणांनी रस्त्यांवर उतरून रस्ते झाडणं, गाड्या पुसणं, बूट पॉलिश करणं, भाज्या विकणं अशी ‘हलकी’ कामं सुरू केली होती. या ‘आंदोलनाला’ तेव्हाच्या माध्यमांनी -(तुलनेनं कमी आक्रमक, पण स्वभावतः ब्राह्मणी) - भरपूर प्रसिद्धी दिली.

सकारात्मक शिस्त - उपायांच्या दिशेनं...

मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात...
‘केली आहेस ना चूक... भोग आता आपल्या कर्माची फळं !’

‘आता अजिबात पांघरूण घालू नका तिच्या चुकांवर, नाहीतर आणखी बेजबाबदार बनेल ती !’

‘निस्तरणार कोण आता हा घोळ !’

संवादकीय – मे २०१४

पालकनीतीसारख्या लहानशा मासिकाची ताकद, समाजपरिस्थितीत बदल घडवण्याची गरज वाचकांपर्यंत पोचवावी आणि वाचकांना विचार करायला सुचवावं, एवढीच मर्यादित असते याची तुम्हाआम्हाला जाणीव आहे. आपल्याला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी बाल-लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नाबद्दल पालकनीतीत चर्चा केलेली होती. त्या संदर्भात शाळा-बालरंजन केंद्रं अशासारख्या (जिथं लहान मुलं जातात अशा) ठिकाणी शिक्षक, कार्यकर्ते, पालक यांचं प्रशिक्षण करावं, बाल-लैंगिक अत्याचार-विरोधी कायद्याची (पॉक्सो) ओळख करून द्यावी आणि बालसुरक्षा धोरण जाहीरपणे प्रदर्शित करावं अशी सूचनाही केली होती. पॉक्सोबद्दल आजही अनेकांना माहिती नाही.

सांगा, कसं शिकायचं...?

‘‘अभ्यासाला बसले का अभ्यास करून देती नाही. नुसती कामं सांगत्यात...’’ ‘‘कामाला घरी राह्य, शाळेत जाऊ नको असं घरचे म्हणत्यात...’’ ‘‘कालच्या राती अभ्यास करीत बसले व्हते, बाप दारू पिऊन आला त्यानं सारी वह्या-पुस्तकं फाडून फेकून दिली.आमाला समद्यांला लई मारलं. आमी उपाशीच झोपलो...’’‘‘कोणती बी गोष्ट घेताना घरचे मला कधीच विचारती नाही. भैयाला बाजाराला घेऊन जात्यात. त्याच्या आवडीचं दप्तर, वह्या, कपडे घेत्यात...’’ ‘‘सारखं सांगतात, तू आता लहान नाहीये, मोठी झालीये. आज-उद्या नवर्‍याच्या घरी जायचंय, जरा नीट वागावं...’’

एक सहज आणि साधं जगणं, किती दुर्मीळ, किती आश्‍चर्यकारक !

Magazine Cover

रुळलेल्या वाटेनं जाताना काहीतरी चुकतंय असं जाणवल्यानं थांबून, विचार करून मग काही वेगळी वाट धरणं, हेही विशेषच असतं. पण सगळं जग जातंय त्या रस्त्यानं न जाता, आपला असा एक मार्ग धरून; कसलाही अभिनिवेश न दाखवता, ठामपणे त्यावरून चालत राहणं हे तर जास्तच विशेष आहे! हेमा साने याचं जगणं अक्षरशः असंच आहे.

पुण्यात लक्ष्मी रोडपासून दोनेक मिनिटाच्या अंतरावर एक लहानशी देवराई म्हणावी अशी जागा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कदाचित काही लोकांना हे माहीत असणार. या ठिकाणी १९५१ सालापासून उगवलेलं एकही रोप किंवा गवताचं पातं कुणीही तोडलेलं नाही. गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख हेमा साने यांच्या घराबद्दलच बोलते आहे मी. आजूबाजूच्या आधुनिक, उंचच उंच झगमगाटी इमारतींच्या मध्येच एक दार आहे, ते त्यांच्याच वाड्याचं. आता वाडा शिल्लक नाही, समोर टोकाशी एक खोली आहे. शेजारी आड, त्यावर पाणी शेंदायचा रहाट.

‘सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल धत्तुरा?’

‘उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर.’ अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या परिपाठात आम्ही ती वाचली. बातमीवर चर्चा सुरू झाली. मुलं मतं मांडू लागली. ‘‘शेतकर्‍यांला भावासाठी आंदोलन का बरं करावं लागतं?’’ एकानं मधेच प्रश्‍न विचारला. मुलांच्या प्रश्‍नांना, शंकांना आधी मुलांनीच उत्तरं द्यायची असा एक नियम आम्ही आखून घेतलेला आहे. त्याप्रमाणे मुलांनीच प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा होता.

मातीचा सांगाती

काही वर्षांपूर्वी केरळमध्ये एका कम्युनिस्ट युवक-गटाने आयोजित केलेल्या युवक शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. श्री. नारायणभाई देसाई यांच्या ‘गांधीकथा’चा एक कार्यक्रम यामध्ये आयोजित केला होता. गांधीविचार समजावून घेण्याचा हा प्रयत्न मोठा वेधक होता. संध्याकाळी तीन तास नारायणभाई देसाई गांधींबद्दल हिंदीमधून सांगत. ते भाषण भाषांतरित करून इंग्रजी आणि मल्याळममधून ताबडतोब एफ.एम. रेडिओवरून प्रसारित होई. त्यामुळे घरोघरी, कामाच्या जागी, मोबाईलवरूनसुद्धा ते ऐकलं जाई.

दिवसभरात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी होत. ते आपापल्या कामाबद्दल मांडणी करत. इथं ज्या कामांची ओळख झाली, त्यापैकी उडुपीचे श्रीकुमार यांनी केलेली मांडणी मनात ठसा उमटवून राहिली. जे. सी. कुमारप्पा यांच्या ‘इकॉनॉमी ऑफ पर्मनन्स’ या पुस्तकाच्या आधारे त्यांनी शाश्‍वत जीवनशैलीबद्दल अतिशय सुंदर मांडणी केली होती अगदी प्रामाणिक आणि मनाला भिडणारी! त्यात विचारांची स्पष्टता आणि भविष्याबद्दलची कळकळही होती. शिबिराच्या आयोजकांपैकी एक, सहदेवन, आणि श्रीकुमार हे दोघंही ‘सांगत्य’ या उडुपी इथल्या संस्थेचं काम करतात. आपल्या वागण्यानं पृथ्वीवरच्या काही संसाधनांचा नाश होतो, तो टाळावा आणि शक्य असेल तितकी निसर्गस्नेही जीवनशैली ठेवावी; शेतजमिनीची सुपीकता वाढवावी, तिची स्थिति सुधारावी, या दिशेनं या संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे तसं जगून पाहण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे. उडुपीच्याजवळ नक्रे या गावात सांगत्यची शेतजमीन आहे. गेली काही वर्षं श्रीकुमार तिथे राहताहेत, शेती करताहेत. बाकीचे जमेल तसतसे येऊन यात सहभागी होतात, हातभार लावतात. पर्यावरणाच्या पालकत्वाचा त्यांचा हा प्रयोग पालकनीतीच्या कक्षेबाहेरचा नाही, असा विश्‍वास आम्हाला वाटतो, म्हणूनच श्रीकुमारचे एक जवळचे मित्र आणि ‘सांगत्य’चे एक सदस्य टी. विजयेन्द्र यांना आम्ही त्याबद्दल लिहिण्याची विनंती केली.

श्री कुमार - माझा जिवाभावाचा मित्र, अत्यंत मुळापासून विचार करणारा, शाश्‍वत जीवनाचा विचार प्रत्यक्ष आयुष्यात आणणारा. शाश्‍वतता या तत्त्वाभोवतीच त्यानं स्वत:चं जगणं गुंफलेलं आहे आणि सहृदयता हा तर त्याचा स्थायीभाव आहे. याची बीजं बालपणापासून त्याच्यात असतीलही, पण जाणत्या वयात त्यानं त्याचा खरा अंगीकार केलेला आहे. आपण त्याची रीतसर ओळखच करून घेऊया.

गुटखा खायचाय... अन् दारूबी प्याचीय..!

मुलं कोणत्या वातावरणात वाढतात, त्यांच्या मनाला कोणत्या अडचणी-अडथळ्यांचा, प्रश्न-समस्यांचा भुंगा कुरतडत असतो, हे समजून घेण्यात आपली शिक्षणव्यवस्था (म्हणजे शाळा, समाज, शिक्षक, पालक) खूप कमी पडतेय, असं माझं रास्त मत झालं आहे. मी लिहिलेले हे प्रसंग, किस्से म्हणजे शिक्षणप्रवाहाच्या उगमस्थानी जे अनुभवलं त्याचं प्रांजळ कथन आहे. मला आशा आहे की, हे अनुभव, लहान मुलांकडे थोडेफार का होईना संवेदनशीलतेनं बघायला शिकवतील. किमान तशी वाट दाखवतील.

मुस्कान एक हास्य लोभवणारं

झोपडवस्तीमध्ये राहणार्‍या वंचित मुलांना आनंददायी शिक्षणाचे जिवंत अनुभव घेता यावेत यासाठी पालकनीतीचे खेळघर कार्यरत आहे. हे काम अधिक सघन, अर्थपूर्ण व्हावे यासाठी इथे काम करणार्‍या ताई-दादांनी विविध अनुभवांना भिडावे, लोकांना-संस्थांना भेटून आपली समज वाढवावी यासाठीही नेहमीच प्रयत्न केले जातात. भोपाळमधल्या ‘मुस्कान’ संस्थेचे काम बघणे हा याच प्रक्रियेचा एक भाग होता. मुस्कानच्या कामाने खेळघराच्या कार्यकर्त्यांना विलक्षण भारावून टाकले. हे काम वाचकांपर्यंतही पोहोचावे या उद्देशाने खेळघराच्या ताईने हा लेख लिहिला आहे.