प्रयाग जोशी
शिकणं ही अशी मानवी क्रिया आहे ज्यामध्ये दुसर्याचा कमीतकमी हस्तक्षेप आवश्यक असतो. शिकवण्यानं शिक्षण होत नाही. एखाद्या अर्थपूर्ण उपक्रमात सातत्यानं सहभागी झाल्यास त्यातून शिकणं आपोआप होत राहतं.
एखाद्या व्यक्तीनं – उदाहरणार्थ मी – शांती, शिक्षण किंवा संवाद यासारख्या भाषिक रचनांना कसं धरावं वा हाताळावं? ह्या अमूर्त संज्ञांचा माझ्यासाठी काय अर्थ आहे आणि त्यांचं महत्त्व काय? याबद्दलचं चिंतन कोणत्या पातळीवर व्हावं – वैयक्तिक की सामाजिक? ह्या रचनांमध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत? हा लेख लिहायला घेतला तेव्हा असेच काही प्रश्न मनात येत गेले.
खरं सांगू, मला अमूर्त भाषिक रचनांची अॅलर्जी आहे. त्या सारख्या सगळीकडे गर्जत असतात, आणि हमखास कमी पडत असतात. शिक्षणाची, शांतीची, संवादाची, देशभक्तीची, नैतिकतेची, प्रामाणिकपणाची… सर्वत्र बोंबाबोंबच असते. त्यांना नीट बघावं, हाताळून पाहावं, समजावं म्हटलं, तर त्या हातीच येत नाहीत कुठेही! मग त्यांना धरून कसं जगायचं हे काही समजत नाही बुवा आपल्याला. म्हणूनच ह्या भाषिक रचनांवर फार भाष्य न करता, त्यांच्याबद्दलचे माझे काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे.
ह्या वर्षी मे महिन्यात आम्ही काही मित्र-मैत्रिणी एका ग्रामीण शाळेत ‘संवादा’साठी जमलो होतो. ह्या वार्षिक संवादासाठी जायला मला खूप आवडतं. घरच्या (सं)वादांनंतर हा बदल छान वाटतो. तीन दिवस सगळ्यांबरोबर मस्त गप्पा होतात, गाणी ऐकायला आणि म्हणायला मिळतात, सुंदर वाटांवर लांब चालायला जातो आणि घरी परतताना जवळून एकमेकांचे निरोप घेतो.
ह्या वार्षिक संवादात आम्ही सगळे जण एकमेकांचं म्हणणं छान ऐकून घेतो. एखादी व्यक्ती आपल्या मनात साचलेलं बोलू शकेपर्यंत घाई न करता तिच्यासाठी थांबतो. इतर लोक काय म्हणत आहेत याबद्दलची आपापली मतं बनवणं जाणीवपूर्वक टाळतो. ती बनलीच तर तात्पुरती बाजूला ठेवतो, किंवा त्यांना टाळल्याचं छान नाटक तरी करतो. आपापल्या मतांकडे, मनात उत्पन्न होणार्या भावनांकडे बघतो. त्यावेळी मला माझी मूल्यं, तत्त्वं आणि पूर्वग्रह पडताळायला मिळतात. माझ्या विचार-प्रक्रियेकडेपण पाहायला मिळतं. हे निरीक्षण चालू असताना काही मतं, मूल्यं, तत्त्वं, पूर्वग्रह, भावना बाजूला गळू लागतात तर इतर काही शांत होतात. आपण फक्त इतरांचं म्हणणं इतरांसोबत शांतपणे ऐकतोय हे जाणवतं.
इथे माझं म्हणणं सर्वांसमोर मांडताना इतर सर्वजण माझ्यासोबत आहेत असं वाटतं. अनेकदा आमचे विचार परस्परविरोधी असतात. तरीही वातावरणात कडवटपणा पसरत नाही. संवादाच्या दरम्यान जर आम्हाला आढळलं, की आमच्यापैकी कोणी दुसर्या व्यक्तीला उद्देशून मत व्यक्त करत आहे, तर आम्ही ते त्या व्यक्तीच्या निदर्शनास सहजपणे आणून देतो. ऐकण्यातून आणि सहवासातून खूप शिकायला मिळतं आणि त्यातून मनही शांत होतं हे आमच्या वार्षिक संवादात मी नेहमी अनुभवतो.
खरं तर माझ्या दैनंदिन जीवनातही प्रत्येक क्षणी मला इतर व्यक्तींशी ‘संवादात’ असणं नक्कीच शक्य आहे. पण दुर्दैवानं तसं होत नाही. लहान वयापासून मला दुसर्याचं म्हणणं शांतपणे ऐकायची सवयच नाही. अजूनही कित्येकदा दुसर्या व्यक्तीचं बोलणं संपण्यापूर्वीच मी बोलायला लागतो. प्रत्येक गोष्टीबद्दल माझं काहीतरी मत असलं पाहिजे, ते मला मांडता आलं पाहिजे, आणि ते व्यक्त करणं महत्त्वाचं आहे – ह्या सर्व बाबी माझ्या स्वभावात मुरल्या आहेत. दुसरी व्यक्ती बोलायला लागली, की मतं, विचार आणि भावना मनातून वेगानं वाहू लागतात. त्या क्षणी माझं ऐकणं थांबतं, त्या व्यक्तीसोबतचा सहवास थांबतो आणि संभाव्य संवाद होऊ शकत नाही.
शाळा-कॉलेजात वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्पर्धात्मक गटचर्चा होत असत. त्यात भाग घेताना दुसर्याचं म्हणणं मोडून काढण्यावर सगळा जोर असायचा. त्यामुळे नीट ऐकायचं कसं ते शिकायचं राहून गेलं. माझ्या माहितीतल्या सर्व यशस्वी व्यक्तीही युक्तिवादात स्पष्ट आणि बोलण्यात वाकबगार होत्या. अव्यक्त व्यक्ती दुर्लक्षित अथवा पार्श्वभूमीवर असायच्या, अजूनही असतात. साहजिकच माझ्या जीवनाचं ध्येय यशप्राप्ती आणि जीवनाच्या शर्यतीत आपण सतत पुढे कसं जायचं हे होत गेलं. आपण आपल्या सभोवतालची सर्व माणसं, जीवजंतू आणि वस्तूंपेक्षा वेगळे आहोत, आपलं एक निराळं अस्तित्व आहे आणि आपली जबाबदारी सर्वप्रथम आपल्यापुरती आहे ही समज माझ्या मनात चांगली रुजली.
लौकिकार्थानं भरपूर यश मिळवल्यानंतर जेव्हा त्याचा वीट आला, तेव्हा थोडं चिंतन झालं. ग्रामीण आदिवासी लोकांमध्ये पंधरा वर्षं राहायला मिळालं. सभोवतालच्या सर्व गोष्टींशी आपले परस्परसंबंध आहेत या धारणेवर ते जगत आहेत हे जाणवलं. जीवनाविषयीच्या माझ्या समजुतींच्या विपरीत असलेलं भौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड बोम ह्यांचं वैज्ञानिक साहित्य (क्वांटम सिद्धांत) वाचनात आलं. ते म्हणतात, ‘‘वेगळ्या जिवाची कल्पना तसेच त्याची सीमादेखील स्पष्टपणे एक अमूर्तता आहे. जरी आपली सभ्यता अशा प्रकारे विकसित झाली आहे, की भागांमध्ये विभक्त होण्यावर खूप जोर देण्यात आला आहे, तरीही या सर्व गोष्टींचा अंतर्निहित अखंड संपूर्णपणा आहे.’’ इथूनच वाटायला लागलंय, की आपलं खूप चुकतंय. आपण आपल्या जगण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल केले पाहिजेत. आपण सतत संवादातच असलं पाहिजे.

पावसाळ्यात खूप पाऊस झाल्यानंतर सूर्य ढगांबाहेर डोकावतो, तेव्हा आमच्या अंगणात लगेचच फुलपाखरं उडायला लागतात. कधी कधी एखादं पाखरू माझ्या अंगावर बसतं. त्याची हलकी उपस्थिती मला गुदगुल्या करते. त्या वेळी मी फुलपाखरासोबत पूर्णपणे असतो – त्याचं नाजूक अस्तित्व, हलका स्पर्श आणि उत्कृष्ट रंगद्रव्य शोषून घेत. फुलपाखरू मला काय सांगू पाहत आहे ते मला समजत नाही; पण ते निघून जाईपर्यंत, माझं सगळं लक्ष त्याच्याकडे असतं. त्याला मला काही सांगायचं असेल, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मनातल्या मनात मीपण त्याला काहीतरी सांगतो. मग ते उडून जातं. संवाद?
तुम्ही कधी झाडाच्या खोडाला कान लावला आहे किंवा गाल धरला आहे का? निव्वळ त्या झाडासोबत राहण्यासाठी किंवा त्याला समजून घेण्यासाठी? आमच्या घराजवळच्या रानात हिंडताना मी कधी कधी असं करतो. झाडाच्या खोडातून येणारे आवाज ऐकणं आणि आपल्या गालावर त्याच्या सालीचा खडबडीतपणा जाणवणं हे विलोभनीय तर असतंच, शिवाय आपण त्या झाडासोबत आहोत हे जाणवत राहतं. आवश्यकतेशिवाय एकमेकांना स्पर्श करू नये या सभ्यतेच्या कल्पनेनं आपल्याला बांधून टाकलं आहे. परंतु मला माझी पाच ज्ञानेंद्रियं केवळ व्यक्तींशीच नव्हे तर वनस्पती, प्राणी आणि निर्जीव वस्तूंशीही संवाद साधण्यासाठी मदत करतात. हल्ली मी फुलपाखरं, पक्षी, वनस्पती, बिया, खडक, ढग, कुत्री, खुर्च्या आणि टेबलांशी असाच ‘संवादात’ असतो.
डेव्हिड बोमनं म्हटलंय, ‘‘संपूर्ण विचारप्रक्रियेत जाणे आणि एकत्रितपणे विचारप्रक्रिया घडण्याची पद्धत बदलणे हा संवादाचा खरा उद्देश आहे. विचार करण्याकडे आपण एक प्रक्रिया म्हणून खरोखरच जास्त लक्ष दिलेले नाही. आपण विचारांमध्ये गुंतलो आहोत. आपण केवळ सामग्रीकडे लक्ष दिले आहे, प्रक्रियेकडे नाही. विचारांकडे लक्ष का आवश्यक आहे? प्रत्येक गोष्टीकडे खरोखर लक्ष देणं आवश्यक आहे. आपण लक्ष न देता मशीन चालवलं तर ते खराब होईल. आपला विचारदेखील एक प्रक्रिया आहे आणि त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे, अन्यथा ती चुकीची होईल… संवादात प्रत्येक व्यक्तीला आधीच ज्ञात आहेत अशा विशिष्ट कल्पना किंवा माहिती सामान्य बनवण्याचा प्रयत्न नसतो. त्याऐवजी, असं म्हणता येईल की एकत्रितपणे त्या सर्व व्यक्ती काहीतरी सामाईक बनवत असतात.’’ बोम आपलं लक्ष एकत्रितपणे आपल्या विचारप्रक्रियेचं निरीक्षण करण्याकडे का वेधतोय? शांती आणि शिक्षणाचा अफाट खजिना त्याला तिच्या खोलगटाखाली लपलेला दिसतोय का?
संवादाची शैक्षणिक क्षमता जाणून कित्येक शाळांत, विशेषतः जे. कृष्णमूर्तींच्या म्हणण्यातून प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या, संवादाच्या तासिका घेतल्या जातात. अशा वर्गांत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये मुक्त चर्चा होतात, एकमेकांचं म्हणणं शांतपणे, मतं न बनवता, भावुक न होता लक्षपूर्वक ऐकण्याचे प्रयत्न केले जातात. अशा काही शाळांमध्ये शिक्षक एकमेकांशी आणि विद्यार्थ्यांशी वर्गाबाहेरही सतत संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात, हे विशेष आहे. या शाळांमधील खेळ, अभ्यास व इतर उपक्रम स्पर्धात्मक नाहीएत ह्याचीही काळजी घेतली जाते. अशा वातावरणात वाढणार्या विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच संवादाच्या विलक्षण शैक्षणिक क्षमतेचं आणि त्यात वास करणार्या शांतीचं दर्शन होत असतं. परंतु अशा मुलांना शाळेबाहेरच्या स्पर्धात्मक वातावरणात संवादाचा किती त्याग करावा लागतो, हे ती मुलंच जाणतात.
आतापर्यंत मी जीवनात काय काय शिकलो, ते कसं, कुठे आणि कोणाकडून शिकलो, असे प्रश्न मी स्वत:ला विचारतो तेव्हा उत्तरं नेहमी तीच व त्याच क्रमानं येतात : सायकल चालवायला, फाटलेले कपडे शिवायला, स्वयंपाक करायला, पोहायला, पाच-सहा भाषा बोलायला, वस्तू खरेदी करताना मनातल्या मनात हिशोब करायला ह्या सर्व गोष्टी मी जशा करत गेलो तशाच त्या शिकत गेलो. त्या अजूनही शिकतच आहे. कुठल्याही विशिष्ट व्यक्तीकडून त्या शिकल्या आहेत, असं वाटत नाही. घरात, रस्त्यावर, दुकानात, शाळेत आणि इतर ठिकाणी त्यांचा अनायास सराव होत राहिला; त्या कधी शिकत गेलो ते कळलंच नाही.
आपल्याला अर्थपूर्ण वाटणारी प्रत्येक गोष्ट आपण सहजपणे शिकत गेलो. अशा गोष्टींशी आपला संवाद होतच होता, हे जाणवतं. जे शिकत होतो त्यात पूर्णपणे गढून गेलो होतो. त्यावेळी आपलं चित्त शांत झालं होतं हे जाणवतं. अशा वेळी इवान इलिचच्या ‘डीस्कूलिंग सोसायटी’ ह्या पुस्तकाची आठवण होते. तो म्हणतो, ‘शिकणं ही अशी मानवी क्रिया आहे ज्यामध्ये दुसर्याचा कमीतकमी हस्तक्षेप आवश्यक असतो. शिकवण्यानं शिक्षण होत नाही. एखाद्या अर्थपूर्ण उपक्रमात सातत्यानं सहभागी झाल्यास त्यातून शिकणं आपोआप होत राहतं.’
कुठल्याही विद्यार्थ्यासाठी ‘आपण काय शिकलो’ या प्रश्नाबरोबरच ‘आपण अजूनही काय शिकलो नाही’ हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असतो. आपल्या भावना, वासना, दुःख, पूर्वग्रह, उद्देश इत्यादी मानसिक आविष्कारांना आपण अजूनही समजू शकलेलो नाही, या सर्व विचारांच्या अभिव्यक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता प्रकट होतात आणि माझ्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवतात, माझ्या मनातला निरीक्षक आणि ज्याचं निरीक्षण केलं जातं आहे तो, यांच्यातील द्वैत दूर झालेलं नाही… अशा खूप गोष्टी शिकायच्या राहिल्या आहेत. त्या मनात गोंधळ घालत असतातच. त्यांच्याबद्दल ज्ञान मिळवायचं असेल तर विचारप्रक्रियेचं निरीक्षण करावंच लागेल, वैचारिक अभिव्यक्तींशी संवाद करावाच लागेल आणि तिथेच शांतीही असेल, हे जाणवतं.
अखेर ह्या चिंतनातून बाहेर डोकावताना दिसतंय, की आपल्या विचारांचं सतत निरीक्षण करत राहणं आणि इतरांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकणं ह्या दोन्ही कृतींमध्येच संवाद, शिक्षण व शांतीचा मोठा खजिना लपलेला आहे, त्यापर्यंत पोचणं प्रत्येकाच्या हातात आहे.
प्रयाग जोशी
prayaag_joshi@yahoo.com
हल्ली प्रयागचा बराच वेळ आपल्या कुटुंबासोबत फिरणं, वाचन, घरातील कामं करणं, आपल्या लहान मुलींसोबत खेळणं, त्यांना गोष्टी वाचून दाखवणं अशा दैनंदिन कामांमध्ये जातो. चिंतन आणि त्यावर लिहिण्याची अधूनमधून मिळणारी संधीही त्याला आवडते.
चित्रे : अनंत डेरे
