आनंदाने शिकण्याच्या दिशेने… या विषयासंदर्भाने आम्ही खेळघरच्या माध्यमातून गेली 18 वर्षे वर्कशॉप्स घेत आहोत. महाराष्ट्रातल्या आणि विप्रो फाउंडेशनच्या मदतीने भारतभरातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचणे त्यामुळे शक्य झाले.

अनेक संस्थांतल्या लोकांबरोबर एकत्र workshop घेण्याचे फायदे वेगळे असतात…तिथे एकमेकांकडून शिकणे अधिक चांगले बहरते.

मात्र एकाच संस्थेच्या कार्यकर्त्यांसमवेत वर्कशॉपच्या माध्यमातून काम करण्यातला आनंद काही औरच!

नुकतीच मला वर्धिष्णू या जळगावच्या संस्थेतील कार्यकर्त्यांसमवेत काम करण्याची संधी मिळाली. वर्धिष्णू ही आमची मित्र संस्थाच! त्यांचे काम विकसित होताना मी जवळून पाहिले आहे. जळगावमध्ये कचरावेचकांच्या मुलांबरोबर सुरू केलेले हे काम आता चोपडा, अमळनेरमध्ये देखील विस्तारित झाले आहे.

एका ध्येयाने काम करणाऱ्या १५ समविचारी कार्यकर्त्यांसोबतचा संवाद सगळ्यांनाच उभारी देऊन गेला.

ज्यात जीवन आहे, जे शिक्षण जीवनाशी जोडलेले आहे ते जीवन कौशल्याचे शिक्षण अशा नोट वरून कार्यशाळेची सुरुवात झाली.
मुलांबरोबरचे काम बहारदार व्हावे म्हणून, मुलाची शिकण्याची प्रक्रिया, मुलांसमवेत मोठ्यांचे नाते, प्रत्यक्ष वर्गाची आखणी, जीवन कौशल्ये विकसित होतील यासाठीची सर्जनशील माध्यमे अशी चारी बाजूनी कार्यशाळेचा परीघ आखला होता.

एकातून एक उलगडत जाणाऱ्या लडीसारखी कार्यशाळा पुढे जात गेली. आणि वर्गनियंत्रणाच्या प्रश्नांवरची उत्तरे शोधून थांबली.

एकमेकांच्या साथीने शिकत जाण्याची फार सुंदर प्रक्रिया होती ती!

वर्धिष्णूचे सर्व साथी, प्रणाली आणि अद्वैत यांचे खूप खूप आभार. सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा!