आदरांजली – मोहन हिराबाई हिरालाल
गडचिरोली जिल्यातील मेंढा (लेखा) गावाला देशपातळीवर नेणारे ग्रामस्वराज्याचे प्रणेते आणि वनमित्र मोहन हिराबाई हिरालाल ह्यांचे २३ जानेवारी रोजी निधन झाले. पालकनीती परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली. पालकनीतीच्या संपादक गटातल्या रुबी रमा प्रवीण ह्यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत…
मोहनकाकांच्या कामाविषयी, त्यांनी सर केलेल्या ग्रामदानासारख्या शिखरांविषयी आपण सगळे जाणतोच. ‘मोहन हिराबाई हिरालाल’ गूगल-सर्च केलं, तर त्यातील अनेक गोष्टी वाचायला मिळतील. पण मला आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना ते गेल्यावर त्यांची एकदम कळवळून आठवण झाली ती आणखीनच वेगळ्या कारणांनी.
देवाजी तोफा यांचं एका सभेतलं तुफान भाषण आणि त्यानंतरची मोहनकाकांची मांडणी ऐकून आदिवासी शिक्षणप्रणालीबद्दलची पुढची दिशा मोहनकाकांना सविस्तर भेटून सापडेल अशी खात्री पटली. त्यांना गाठून ‘तुमची अपॅाइंटमेंट मिळेल का?’ म्हणून विचारलं. तर ते म्हणाले, “तुम्ही आधी काही तरी लिहून मला मेल पाठवा. तुम्हाला काय अस्वस्थ करतंय, कुठल्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत, वगैरे. मग बघू भेटीचं!”
आपले विचार आपल्यालाच नीट मांडायला लावणारे काका! मग काय, केले विचार एकत्र आणि विचारले त्यांना इमेलमधून! त्यावर काही दिवसांनी उत्तर आलं, भेटीची ठरवाठरवी सुरू झाली. भेटलो! आणि मग भेटतच राहिलो… कारण ते सहज भेटायचे! एवढा मोठा माणूस, स्वतः फोन करून कळवायचा – ‘पुण्यात आहे, या भेटायला’. आम्ही नागपूर किंवा गडचिरोलीला जाणार असलो, की त्यांना कळवायचो आणि मग ते वेळ काढून हमखास भेटायचे. तरुणांना वेळ देणं, त्यांचं जीवन समजून घेणं, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं, त्यांना मोक्याचे प्रश्न विचारून विचारात पाडणं, वेगवेगळे सामाजिक सिद्धांत समजावून सांगणं, ते करू शकतील अशी अनेक कामं सुचवत राहणं… ह्या सगळ्यात एवढा रस असणं हे किती विशेष आहे! खूप मोठं सामाजिक काम आयुष्यभर करून त्याबद्दल प्रसिद्धी आणि मोठा ‘फॅन-फॉलोइंग’ मिळाल्यानंतर आणि वयाचाही एक मोठा टप्पा ओलांडल्यानंतर, समोरच्यातला रस आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याचं कुतूहल कमी होणं अगदी सहज शक्य आहे; पण काका तसं वागताना दिसले नाहीत.
एकदा तर आम्ही बारा जण मेंढ्याला गेलो होतो; जवळजवळ आठवडाभर! पहिल्याच बैठकीत काकांनी प्रत्येकाला स्वतःची गोष्ट सांगायला लावली आणि बाराच्या बारा गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या! मग त्यांनी स्वतःची गोष्ट सांगितली, गावातल्या अनेक प्रक्रिया समजावल्या-दाखवल्या, त्यांचा अभ्यास करायला लावला. पुढची वाटचाल कशी असेल हेही सांगितलं. नंतरचा कहर म्हणजे ‘गावात जाऊन गावकऱ्यांशी बोलून सध्याची गावची परिस्थिती समजून घ्या आणि मग मला सांगा तुमची मतं’ असंही करायला लावलं आम्हाला. आपल्या जीवितकार्याचं, काही वर्षांनंतरचं, काही कच्च्याबच्च्यांनी केलेलं मूल्यांकन कोण मागून घेतं?
आमच्या भेटींमध्ये दरवेळेस कोणीतरी नवीन मित्रमैत्रीण सोबत असायचे. दरवेळेस आमच्या गोष्टी तर काका ऐकून घ्यायचेच, पण कॅपिटॅलिझम-कम्युनिझम, करियर म्हणजे काय, सर्वसहमतीची प्रक्रिया कशी चालू शकते, वगैरे हव्या त्या चर्चाही भरपूर व्हायच्या. मग गंमत व्हायची एक! काका बेमालूमपणे आपल्याला ‘मग ह्या सगळ्यात तुम्ही काय करणार?’ पर्यंत आणून ठेवायचे. मग पुढे आपण काय काय करू शकतो हे आपणच ठरवू लागायचो आणि मग पुढे करूनही पाहायचो! कारण भेट संपली, की साधारण दर दोन महिन्यांत काकांचा फोन येत राहायचा! विशेषकरून आमच्या माडिया मित्रमैत्रिणींच्या करियरची काका खास विचारपूस करायचे. पुण्यात करियर करणाऱ्या माडिया मुलांना काय वाटतं, परत जाऊन गावात त्यांना काही करायचंय का, त्यात काय अडचणी आहेत, वगैरे नीट समजून घ्यायचे.
काका गेल्याची बातमी आली तेव्हा एक विचार खूप जोरात डोक्यात घुसला. काकांनी आमच्यात रस दाखवला तेवढा आम्ही त्यांच्यात दाखवला का? त्यांची विचारपूस केली का तेवढी? त्यांच्या अपेक्षेच्या थोडं तरी जवळपास एखादं काम केलं का?
मग लक्षात आलं…
त्यांनी नव्हत्याच ठेवल्या अपेक्षा… ठेवल्या असत्या तर जाणवल्या असत्या की…!
लहानांमध्ये निरपेक्ष भावनेनं एवढा रस घेण्याच्या मोठेपणाला सलाम!
…काकांची खूप आठवण येत राहील!