पालकनीती मासिक ओळख

जगातल्या प्रत्येक लहान मुलाला समजदार पालक मिळावेत ही मोठ्यांची जबाबदारीच आहे. यासाठी सामान्यपणे कुणी शिक्षण घेत नाही किंवा त्यासाठी कुठले नियम-कायदेही असत नाहीत. संगोपन, बालविकास, बालशिक्षण याबद्दलचा विचार, त्याबद्दलचे वाचन तो आपल्या अभ्यासाचा विषय असल्याशिवाय केले जात नाही. अर्थात, आपल्याजवळ अनुभवाची एक शिदोरी नक्की असते – आपल्या बालपणात आपल्याला जसे वाढवले गेले त्याची! त्याप्रमाणे आपण आपल्या बाळाला वाढवू बघतो किंवा काही वेळा आपल्यावर झालेला अन्याय टाळू पाहतो, आपल्याला न मिळालेल्या गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यातच असा जिवापाड प्रयत्न करू पाहतो. अशा आपापल्या धारणांनुसार आपापली पालकनीती तयार होत असते. या प्रयत्नांत आपल्याशी संवाद साधण्यासाठी सातत्याने कोणी आपल्या सोबतीला असले, तर आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे मिळतील, आपल्या अनुभवांना अभ्यासाची आणि विवेकाची जोड मिळेल. यासाठी १९८७च्या २६ जानेवारीला ‘पालकत्वाला वाहिलेले मासिकपत्र – पालकनीती’ सुरू झाले. पालकत्वाबद्दलच्या सर्व विषयांना या मासिकात स्थान असते. मूल वाढवणे हा व्यापक विकासनीतीचा एक भाग आहे असेच पालकनीती मानते. त्यामुळे समाजातल्या प्रश्नांचा, प्रथांचा इतकेच नव्हे तर समजुती, संकल्पना आणि संवेदनशील विचारांचाही पालकनीतीशी अन्योन्य संबंध आहे.

पालकनीतीचा प्रवास आज ३८ वर्षांनीही त्याच संवेदनशीलतेने सुरू आहे. २०१४ साली, पालकनीती मासिक आता नव्या पिढीच्या संपादकांनी चालवावे अशी अपेक्षा संपादक-मंडळाने व्यक्त केली. काळ बदलला, समाजाच्या प्रेरणा बदलल्या, तंत्रज्ञान तर खूपच बदलले, या सगळ्या संदर्भांशी जोडून नवी पालकनीती असावी असे संपादक-मंडळाला वाटले. या कल्पनेला प्रतिसाद मिळून २०१५ साली प्रगत शिक्षण संस्था, फलटण यांनी तर २०१६ साली क्वेस्ट या संस्थेने पालकनीतीच्या संपादनाची जबाबदारी आवडीने घेतली. त्यानंतर एक वर्ष (२०१७) भारतभरातल्या अनेक बालकारणी संस्थांचा, शाळांचा परिचय पालकनीतीने वाचकांसमोर आणला. त्यानंतर काही युवक-युवतींनी पालकनीतीच्या संपादनात सहभाग घ्यायला सुरवात केली. फक्त पुण्यातूनच नाही, तर देशभरात इतरत्र राहूनही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करता येणे एव्हाना शक्य झाल्याने ही मंडळी कुठूनही पालकनीतीशी संलग्न राहतात. केवळ मराठी भाषकच यात आहेत असेही नाही. पालकनीतीच्या आधीच्या संपादक-मंडळातले काहीजण तरुण गटाला आवश्यक वाटले तरच साहाय्य करतात. यापुढेही अनेक तरुण कार्यकर्ते संपादनाची जबाबदारी घेतील आणि नवचैतन्याने नटलेली पालकनीती आपल्यासमोर येत राहील अशी खात्री वाटते.