लक्ष्मीनगर खेळघर

लक्ष्मीनगर ही डहाणूकर कॉलनीच्या शेजारच्या डोंगरउतरवर वसलेली सुमारे १५०० घरांची झोपडवस्ती आहे.तेथील ६ ते १८ या वयोगटातील दरवर्षी सुमारे २०० मुलांसोबत खेळघर काम करत आहे. मुलांच्या शाळेव्यतिरिक्तच्या वेळात रोज दोन तासांचे हे काम आहे. मुलांच्या वयोगटानुसार ७ वर्गांमध्ये मुलांची विभागणी केली आहे. १५ शिक्षक आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी ह्या कामाची जबाबदारी घेतली आहे.आंनदानं शिकण्याचं हे स्वप्न प्रत्यक्षाच्या भूमीवर उतरवायचं तर आजची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती समजावून घ्यायला हवी.

[/vc_row]

त्या कामाच्या अनुभवांतून मुलांच्या विकासातील काही अडथळ्यांची मांडणी केली आहे. थोड्याफार फरकाने हे मुद्दे सगळ्या वंचित मुलांना भोगाव्या लागणाऱ्या परिस्थितीचे चित्र उभे करायला मदत करतात.

‘गरिबी’ हा या मुलांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न! त्यामुळे पुरेसे अन्न, कपडे, शैक्षणिक साहित्य, संगोपन अशा सर्व बाबतीत वंचिततेचे चटके ती अगदी लहानपणापासून अनुभवत असतात. एवढेच नव्हे तर घरात पुरेशी जागा, स्वच्छ सूर्यप्रकाश, मोकळी हवा देखील अभावानेच मिळते.

वस्त्यांमधील वातावरण कमालीचे अशांत, असुरक्षित असते. भांडणे, मारामाऱ्या तर नेहमीच घडताना दिसतात. अनेकदा जाती, धर्मभेदांवर आधारलेल्या दंगलींचे परिणामही भोगावे लागतात.

बरीच कुटुंबे स्थलांतरित असतात. त्यांच्या मनांवर रूढी-परंपरा, अंधश्रद्धा यांचा पगडा असतो.

आई-वडील बहुधा निरक्षर अथवा अल्पशिक्षित असतात. त्यामुळे त्यांना मुलांच्या अभ्यासात आवश्यक ती मदत करता येत नाही.

वस्त्यांमधली बहुसंख्य मुले महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जातात. तिथे ती अभ्यासात रमत नाहीत. अनेकांना शाळेत जायला अजिबात आवडत नाही.

त्यामुळे बरीचशी मुले आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस, या ना त्या कारणाने शाळेला बुट्टी मारतात. त्यामुळे त्यांना शाळेत शिकवलेले समजत नाही. त्यांच्या शिकण्यासाठीच्या क्षमतांचा पुरेसा विकास होत नाही.

शहरी वस्त्यांमध्ये बरीच स्थलांतरित अमराठी कुटुंबे असतात. मराठीपेक्षा वेगळी (कानडी, हिंदी इत्यादी) भाषा ज्यांच्या घरात बोलली जाते त्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणे फार अवघड जाते.

अनेकदा मुलांची बोलीभाषा पाठ्यपुस्तकांतील प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते. त्यामुळे मुलांना शिकण्यात अडचणी येतात. शिवाय त्यांच्या बोलीभाषेला तुच्छ लेखले गेल्याने मुले स्वतःला कमी लेखू लागतात.

चौथी-पाचवी किंवा अगदी आठवीत गेलेल्या अनेक मुलांनाही लिहिता – वाचता येत नाही. गणित आणि इंग्रजीसंदर्भात त्यांच्या मनात भीती ठाण मांडून बसलेली असते. या भीतीला ओलांडून मुले विषय संकल्पनांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.

शिक्षणातला रस संपलेले मुलगे वस्तीत भटकत राहतात. त्यांच्याही नकळत वयाने मोठ्या, गुंडगिरीकडे झुकलेल्या मंडळींशी त्यांची दोस्ती होते. शिव्या देणे, भांडणे – मारामाऱ्या, छोट्या – मोठ्या चोऱ्या, व्यसने, छेडछाड अशा अनेक नकारात्मक गोष्टींमध्ये ती गुंतत जातात.

बाहेरची आकर्षणे, चैनीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, मोबाईल यांकडे साहजिकच मुलांचे मन ओढ घेते. त्यासाठी त्यांना हातात पैसा हवासा वाटतो. मुले कधी कधी छोटी-मोठी कामे करून पैसे मिळवतात तर कधी गैरमार्गांनी पैसे मिळवायलाही प्रवृत्त होतात. एका बाजूला त्यांना आसपासची झगमगीत आकर्षणे खुणावत असतात आणि प्रत्यक्षात मात्र त्यापैकी बरीचशी उपभोगणे शक्य नसते. ह्यातून सुटकेचा मार्गच न दिसल्याने सकारात्मक विचारांपासून ती अधिकाधिक दूर जाण्याच्या शक्यता वाढतात.

मुलींना सर्वसाधारणपणे आठ – नऊ वर्षांपासूनच रस्त्यावर खेळायला बंदी असते. शाळा, घरकाम आणि भांवडांना सांभाळणे हेच त्यांचे जीवन बनते. त्यांना बंद घरात टीव्ही पाहणे आणि मैत्रिणींशी गप्पा मारणे एवढाच विरंगुळा असतो. त्यामुळे त्या टीव्ही मालिकांच्या काल्पनिक जगात गुंतत जातात. नटणे, मैत्रिणींबरोबरच्या गप्पा, मुलांवरून एकमेकींना चिडवाचिडवी, मुलग्यांच्या छेडछाडीला प्रतिसाद अशा गोष्टींमध्ये त्या रमून जातात. लहान वयात मुला-मुलींमध्ये भाबडी प्रेमप्रकरणे घडतात. पण त्यांचे परिणाम मात्र मुलींनाच भोगायला लागतात. त्यांची शाळा, खेळघर बंद होऊ शकते, गावाला रवानगी होऊ शकते किंवा लहान वयात लग्न लावून दिले जाऊ शकते.

वस्तीतल्या मुला-मुलींचे आईवडील दिवसाचे दहा-बारा तास कामात असतात, त्यामुळे मुलांना वळण, चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टीने त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. बऱ्याचदा रागावणे, मारणे, अपमान करणे अशा चुकीच्या मार्गाने वळण लावण्याचा प्रयत्न होतो, परिणामी पालक आणि मुले यांच्यातील संवाद दुरावतो.

‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा’ अशा मानसिकतेमुळे मुलग्यांचे लाड आणि मुलींवर कामाचा अति बोजा अशी परिस्थिती दिसते. त्यामुळे मुलांना कामाची सवय नसते. ताट वाढून घेणे, घर झाडून काढणे, पाणी भरणे ही कामेदेखील त्यांनी कधीच केलेली नसल्याने हस्तनेत्रसमन्वय, एकाग्रता यासारख्या जीवनावश्यक क्षमता अविकसित राहतात. त्यांच्या वैयक्तिक कामांसंदर्भातही ते घरातल्या स्त्रियांवर अवलंबून राहतात. मुलींवरच्या कामाच्या बोजामुळे आणि बंधनांमुळे त्यांना खेळघरात यायला कमी वेळ मिळतो.

याही परिस्थितीत शाळेत जाणारी, चांगली शिकणारी, दहावीनंतरही पुढचे शिक्षण घेणारी, कुटुंबाशी प्रेमाचे संबंध असलेली मुले-मुलीही असतात. तरी एकूण बाकीच्या सर्वच मुलांसंदर्भात वर मांडलेले प्रश्न कमी-अधिक प्रमाणात जाणवतातच.

शाळा, घर आणि समाज या तीनही ठिकाणी मिळणाऱ्या अनुभवांतून मूल शिकत असते. या तीनही ठिकाणी वारंवार अनुभवाला येणारे नकारात्मक अनुभव वंचित मुलांच्या शिक्षणाच्या वाटेवर अनेक अडथळे उभे करत आहेत. म्हणूनच वंचित मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सामाजिक आणि शैक्षणिक अशा दोन्ही बाजूंनी समजावून घ्यायला हवा. उत्तरांची दिशाही फक्त शैक्षणिक असून भागणार नाही तर त्यात सामाजिक पालकत्वाचे भानही असायला हवे हे प्रकर्षाने लक्षात येते.


खेळघराचे ध्येय

1)शिकण्याची गोडी निर्माण होणे

शिकण्याच्या वाटेवरचे अडथळे शक्य तितके दूर करून मुलांना किमान खेळघरात तरी प्रेमाचे, आदर – विश्वासाचे सकारात्मक अनुभव मिळावेत यासाठी प्रयत्न करणे.

2)मुलांच्या क्षमतांचा विकास होणे

ऐकणे, पाहणे, चव घेणे, स्पर्श करणे, वास घेणे या माणसाला उपजत प्राप्त झालेल्या संवेदना आहेत. प्रयत्नांनी त्या चांगल्या विकसित होतात. याशिवाय वाचणे, लिहिणे, बोलणे, निरीक्षण करणे, विचार करणे, अंदाज करणे, विश्लेषण करणे व निर्णय घेणे इत्यादी क्षमता माणूस अवगत करतो. शिकण्यातला आनंद समजलेले मूल या क्षमतांमध्ये सरस होण्याचा आपणहून प्रयत्न करते. अशा क्षमतांच्या विकासासाठी पूरक संधी/वातावरण मिळवून देणे.

3)विचारांचा विकास होणे

क्षमतांच्या विकासामुळे मुलांचे परिस्थितीविषयीचे, त्यातल्या भल्या – बुऱ्या गोष्टींचे आकलन वाढते, विचार समृद्ध होऊ शकतो. आसपास घडणाऱ्या घटना, त्याबद्दल स्वत:च्या तसेच इतरांच्या भावना समजावून घेता याव्यात आणि त्यावर सर्व बाजूंनी विचार करता यावा, विचारपूर्वक निर्णय घेता यावा आणि या निर्णयांची प्रयत्नपूर्वक अंमलबजावणी करता यावी यासाठी मुलांना मदत करणे.

4)मूल्यांचा विकास होणे

स्वातंत्र्य, समता, बंधुता, विवेकनिष्ठ विचार अशा सामाजिक मूल्यांचा अर्थ उलगडेल असे अनुभव मुलांना खेळघरात मिळतील असा प्रयत्न करणे.

ध्येय कसे साधायचे?

मुलांनी आनंदाने शिकायचे तर खेळघरातले शिक्षण – मूलकेंद्री, आनंददायी, सर्जनशील आणि अर्थपूर्ण असायला हवे. ह्या शब्दांमध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे. शिक्षणासंदर्भात केल्या गेलेल्या सर्जनशील प्रयोगांचा आणि संशोधनांचा अभ्यास आपल्या अनुभवांशी जोडून घेत कार्यकर्त्यांचे शिक्षण चालू राहिले तर हळूहळू या शब्दांचा अर्थ मनात आकार घेऊ लागतो.

वंचित मुलांसमवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी काही पथ्ये आम्हाला महत्त्वाची वाटतात.

खेळघरात मुलांना मज्जा यायला हवी. कंटाळा अजिबात येता कामा नये. त्यांनी आपण होऊन उत्साहाने खेळघरात यायला हवे. इथे कार्यकर्त्यांच्या सर्जनशीलतेची, चिकाटीची आणि अभ्यासाची कसोटी लागते. जर कार्यकर्त्याला मुलांचे मन जिंकता आले तर मुले कार्यकर्त्यांना मोठ्या आनंदाने मित्र मानतात आणि मग कार्यकर्ताही या कामात रमून जातो.

मुलांसमवेत मैत्रीचे नाते जोपासण्यासाठी मुलांना समजून घ्यायला हवे. त्यांच्या जीवनानुभवांची, भावविश्वाची, त्यांच्यातील बदलांची सातत्याने दखल घ्यायला हवी. ज्या गोष्टींचा कुणालाही राग येऊ शकतो अशा गोष्टी मुलांशी वागताना आवर्जून टाळायला हव्यात. उदाहरणार्थ अपमान करणे, तुलना करणे, अनादराने वागणे, आपले म्हणणे मुलांवर लादणे असे वागणे आपल्याकडून चुकूनदेखील होणार नाही याकडे कार्यकर्त्याने सदैव लक्ष ठेवायला हवे.

मुलांबरोबर शिक्षणाचे काम करायचे तर शिस्त हवी. खेळघरात कुणीतरी वरून लादलेल्या शिस्तीपेक्षा मुलांमध्ये स्वयंशिस्त रुजावी यासाठी सहृदय संवादाचे वातावरण हवे. मुलांनी शिस्त पाळावी म्हणून बक्षिसे, शिक्षा आणि स्पर्धा या गोष्टींना खेळघरापासून शक्यतोवर दूर ठेवायला हवे. एखाद्या वेळेस अपरिहार्यपणे रागावणे घडले तरी त्याचे नकारात्मक परिणाम कमी व्हावेत म्हणून प्रयत्न करावेत.

मुलांच्या बोलीभाषेला कमी न लेखता त्यांच्या भाषेचा सहज स्वीकार व्हायला हवा. ‘बोलीमध्ये बोलतात म्हणजे मुले चुकीचे बोलतात’ असे नाही. बोलीभाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळी असते. मात्र त्यांच्यात उच्चनीच, श्रेष्ठकनिष्ठ अशी तुलना व्हायला नको.

प्रमाणभाषा आत्मसात होणे व्यापक पातळीवरच्या देवाण-घेवाणीसाठी आवश्यक असते. हळूहळू विविध उपक्रमांतून प्रमाणभाषा आत्मसात करण्यासाठी मुलांना खेळघरात मदत करायला हवी.

खेळघरात कोणते उपक्रम घ्यायचे यासंदर्भातल्या निर्णयप्रक्रियेत मुलांचा सहभाग आवश्यक आहे. तरच निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची जबाबदारी घेणे ही क्षमता मुलांमध्ये रुजेल.

अंधश्रद्धा, धार्मिकता यापासून खेळघराने दूर रहायला हवे. प्रत्येक गोष्टीला ‘असे का?’ हा प्रश्न विचारून ती गोष्ट तपासून घ्यायला शिकणे हा वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये आणि म्हणून आधी कार्यकर्त्यांमध्ये रुजायला हवा.

मुलांमध्ये जे बदल व्हावेत असे आपल्याला वाटते त्या गोष्टी, क्षमता आपल्याकडे आहेत का हेही आपण मोठ्यांनी सतत तपासत राहणे गरजेचे आहे. खरे तर आपल्याकडे बघून, आपल्या सहवासात राहूनच मुले शिकणार आहेत, घडणार आहेत हे भान खेळघराच्या कार्यकर्त्याने सतत ठेवायला हवे.

मुलांची परिस्थिती – वंचितता – त्यातून उद्भवणारी संकटे दूर करणे हे फार मोठे आव्हान आहे. व्यापक समाजव्यवस्था बदलल्याखेरीज ते खऱ्या अर्थाने शक्यही नाही. मात्र आपण त्यांच्या आयुष्यात काही प्रकाशाचे कवडसे तर नक्कीच आणू शकतो. खरे तर संवेदनशीलतेने मुलांना जाणून घेत-घेत आपणही थोडे अधिक चांगले माणूस बनणे… ही खेळघराच्या कामाची एक दिशा आहे.

[/vc_row]

 

खेळघर संकल्पना – शुभदाजोशी ( विचार वेध मधील मुलाखत )
 

 

 

 


[/vc_row]

खेळघर कृती कार्यक्रम

 
 

१. खेळ, कला आणि संवाद यांच्या माध्यमांतून विकास

खेळघरात खेळ, कला आणि संवाद या माध्यमांतून शरीर, मन आणि बुद्धी यांच्या समन्वयातून काम व्हावे. त्यातून मुले विचार करायला, निर्णय घ्यायला आणि त्यांची अंमलबजावणी करायला शिकतात.

‘खेळघर’ आणि ‘संवादगट’ या आठवडी उपक्रमांतून मुलांच्या जाणिवांचा विकास व्हावा यासाठी खालीलप्रमाणे काही विषयांची निवड करता येईल.
– स्वतःला शोधताना
– नातेसंबंध
– आपण कसे शिकतो?
– माझी वस्ती
– माध्यमांचा प्रभाव

अर्थातच वेळोवेळी यात बदल करण्याची, भर घालण्याची मुभा खेळघराच्या कार्यकर्त्यांना असायला हवी. या विषयांच्या माध्यमातून, विविध शैक्षणिक साधने वापरून मुलांना जाणिवांच्या विकासापर्यंत कसे पोहोचता येते याची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.

खेळघर संवाद गट

 
 


२. अभ्यासवर्ग

मूल शालेय विषयांच्या अभ्यासात मागे पडत गेले तर ते शाळेतून बाहेर पडण्याची भीती असते. शाळा सोडून जर ते मूल रोजंदारीवर काम करू लागले तर खेळघरातून मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधींची शक्यताही संपते. प्रत्येक मुला-मुलीने किमान दहावीपर्यंत तरी शिकावे म्हणून खेळघराला शालेय विषयांतल्या मूलभूत संकल्पनांच्या शिक्षणाची जबाबदारी काही प्रमाणात घ्यावी लागते.

भाषेने निर्माण केलेल्या वातावरणात मूल जगत असते. ‘भाषा’ मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असते. मुख्यतः भाषेच्या माध्यमातूनच मूल विचार करते, विचार व्यक्त करते आणि ज्ञान आत्मसात करते. त्यामुळे ‘भाषिक क्षमता विकसित होणे’ ही मुलांच्या विकासासाठी फार महत्त्वाची गोष्ट ठरते.

शालेय शिक्षणातून अनेकदा मुलांच्या मनांमध्ये गणिताची भीती निर्माण होते. मुले गणितापासून फटकून राहतात. खरे तर ‘गणित’ मुलांना तर्क करायला, अंदाज बांधायला शिकवते.

गणिती क्षमतांचा विकास आणि जीवनाशी जोडलेले व्यवहारातील गणित या दोन्ही अंगांनी मुलांना गणित शिकवणे अतिशय आवश्यक आहे. सर्जनशील, अर्थपूर्ण पद्धतीने खेळघरात होणारे भाषा आणि गणिताचे शिक्षण ही मुलांसाठी आत्मविश्वसाच्या दिशेने नेणारी फार मोलाची शिदोरी ठरते.

 
 


३. विशेष उपक्रम

खेळघर उपक्रम

शनिवार खेळघर

 
 

वाचन जत्रा

 

खेळघरातील वर्गांना सण – उत्सव – दिन – शिबिरे – जत्रा अशा उपक्रमांची जोड फार आवश्यक आहे.
दिवाळी, गणपती, दहीहंडी, संक्रांत, ख्रिसमस, मोहरम अशा पारंपरिक सणांच्या सादरीकरणातील अनिष्ट प्रथांना छेद देऊन सकारात्मक गोष्टींना महत्त्व दिले जावे.

पारंपरिक सणांच्याबरोबरीने महिला दिन, शिक्षक दिन, पऱ्यावरण दिन इत्यादी नवे सण साजरे केले जावेत.
मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, अभ्याससहली इत्यादी.
शैक्षणिक विषयांशी जोडून – विज्ञानजत्रा, आरोग्यजत्रा, वाचनजत्रा इत्यादी उपक्रमही मोठे बहारीचे ठरतात.

अशा उपक्रमांच्या निमित्ताने सलग काही दिवस एखाद्या विषयावर काम होते. त्यामुळे असे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या फायद्याचे तर ठरतातच शिवाय त्या दरम्यान जो उत्साह, आनंद मनात भरून राहतो त्यामुळे खेळघर – कुटुंबातल्या सगळ्यांमधील नात्याची वीण पक्की होते.

 
 


४. कृतीतून शिक्षण

‘करता करता शिकणे’ हे गांधीजींनी सांगितलेले फार महत्त्वाचे शिक्षणतत्त्व आहे. खेळघरात – बागकाम, स्वयंपाक, स्वच्छता, सजावट, वस्तूंची – साहित्याची व्यवस्था, दुरुस्ती अशा अनेक गोष्टी गटाने पार पडतात. हा दैनंदिन कामाचाच एक भाग असावा.

आर्थिक मदत
सरकारी मोफत शिक्षण संपले की मुलांचे पुढील शिक्षण आर्थिक प्रश्नांमुळे बंद पडू शकते. अशा वेळी सल्ला आणि प्रत्यक्ष आर्थिक मदत या दोन्हींचीही गरज असते.

 
 


५. पालकांबरोबरचे काम

मुलांचे पालक हा खेळघराच्या कामातील एक महत्त्वाचा दुवा आहे. पालकांनी मुलांना खेळघरात पाठवावे आणि त्यांना खेळघर संकल्पनेबद्दल, इथल्या सर्जनशील पद्धतींबद्दल माहिती असायला हवी, यासाठी पालक आणि खेळघर यांच्यामध्ये विश्वासाचे, संवादी नाते असायला हवे. पालकांशी होणाऱ्या अनौपचारिक गप्पांमधून मुलांचे जगणे, भावना आणि प्रश्न कार्यकर्त्यांच्या लक्षात येऊ शकतात. हे शक्य व्हावे म्हणून पालकसभा, शिबिरे, सहली यासारख्या उपक्रमांची मुद्दाम आखणी करणे गरजेचे आहे. याशिवाय खेळघरातल्या सण, उत्सव, प्रदर्शन यासारख्या शैक्षणिक उपक्रमांमध्येही पालकांना सहभागी करून घेता येते.

 
 


६. कामाचे मूल्यमापन

एखादे निश्चित ध्येय घेऊन त्यानुसार आपण काम करतो, तेव्हा या कामातून आपण खरेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत आहोत का हेही तपासून बघायला हवे. आपण योग्य दिशेने जात आहोत का हे आपल्याला कसे समजावे?

मुले जर खेळघरात नियमित, वेळेवर, आपण होऊन आली तर समजावे की त्यांच्या मनात खेळघराने स्थान मिळवले आहे.

अभ्यासवर्गांमध्ये अजिबात लक्ष देऊ न शकणारी मुले आता दहा – पंधरा – वीस मिनिटे मनापासून वर्गात बसू लागली, लक्ष देऊ लागली तर ती खेळघरात रमू लागली आहेत असे समजावे.

खेळघरातील वर्गामध्ये, उपक्रमांमध्ये, कामामध्ये मुले जर सहभाग घेऊ लागली, पुढाकार घेऊ लागली तर त्यांना खेळघर आपले वाटू लागले आहे असे समजावे.

मुलांच्या वर्तनासंदर्भात अगदी संताप आणणाऱ्या प्रसंगातही कार्यकर्ते जर ठामपणे आणि सहृदयतेने वागू शकले आणि त्यानंतर मुलांमध्ये छोटेसेही वर्तन बदल दिसले तर कार्यकर्ते दोन पावले पुढे गेले आहेत असे समजावे.

खेळघरातले नियम ठरवण्यात, स्वतः पाळण्यात आणि इतरांनी पाळावे म्हणून प्रयत्न करण्यात मुले रस घेत आहेत असे दिसले आणि गटाने काम करताना भांडणे कमी होऊन सहकार्य जाणवले तर… फारच छान !

मुले – मुली आपण होऊन पुस्तके वाचायला घेऊ लागली, त्यावर बोलू लागली तर दिशा योग्य आहे असे म्हणता येईल.

खेळघरात पाठवावे म्हणून मुली पालकांकडे हट्ट धरू लागल्या तर त्या आत्मविश्वासाच्या वाटेवर चालू लागल्या आहेत असे समजावे.

अशा प्रकारे किमान काही गोष्टी साधल्या तर आपल्याला हे काम जमते आहे असे समजायला हरकत नाही.

काही विशिष्ट काळानंतर मुले काय शिकली, कुठे मागे राहिली हे नेमकेपणाने लक्षात यावे यासाठी मूल्यमापनाच्या उपक्रमांची आखणी करायला हवी. भाषा आणि गणिताच्या मूल्यमापनासाठी लेखी परीक्षांचे आयोजन करता येते. मात्र हे मूल्यमापन मुलांचा दर्जा ठरवण्यासाठी नसून मुलांनी काय आत्मसात केले आहे आणि त्याला कार्यकर्त्याच्या मदतीची नेमकी कुठे गरज आहे हे लक्षात यावे यासाठी व्हावे.

विशेष कार्यक्रमांत प्रकल्पांचे, सहलींचे निर्णय घेणे, आखणी करणे, कामांच्या जबाबादाऱ्या घेणे, समजलेल्या मुद्यांचे सादरीकरण करणे यातूनही मुलांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होऊ शकते.

 
 


७. युवक प्रकल्प

या प्रकल्पासाठी आम्हाला सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सर्व लोकांकडून मदत मिळते.

दहावीनंतर मुलांना सक्षमपणे आपल्या पायावर उभं राहाण्याकरता व्यवसाय शिक्षणाची शाखा निवडता यावी यासाठी मार्गदर्शन, आर्थिक मदत, मानसिक प्रश्नांवर सल्ला यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात. १६ ते २० वयोगटातल्या मुलांना वस्तीतील व्यसनं, मारामाऱ्या, गुन्हेगारी, छेडछाड यासारख्या गोष्टी आकर्षित करीत असतात. यापासून स्वतःला व मित्रांना वाचवणं मुलांना शक्य व्हावं आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या मनात रुजावी यासाठी युवक गटात उपक्रम आखले जातात.

[/vc_row]

 


काय साधलं?

वंचित मुला-मुलींच्या शिक्षणाच्या वाटेवरचे अडथळे, प्रश्न काय आहेत याचा अभ्यास करून त्यातून मार्ग कसा काढता येईल याची पद्धती खेळघरानं स्वानुभवातून विकसित केली आहे. या पद्धतीने अनेक मुला-मुलींसमवेत सातत्यानं काम करून त्यातील यशही आजमावलं आहे.

लक्ष्मीनगरमधील खेळघरात नियमित येणरी मुलं सहसा भांडणं, मारामाऱ्या, गुन्हेगारी, व्यसनं, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडत नाहीत. समजा चुकून त्या दिशेनं झुकली तरी खेळघराच्या आणि मित्रांच्या मदतीने सावरतात. मुली कौटुंबिक हिंसेला सक्षमपणे विरोध करतात.आत्मविश्वासानं वावरतात.

खेळघरातील मुलांच्या पालकांचा एक सक्षम गट बनला आहे. मुलांच्या शिक्षणसंदर्भात ते सजगपणे प्रयत्न करतात.

गेल्या वीस वर्षात लक्ष्मीनगरमधील सुमारे ४०० मुला-मुलींसमवेत आणि ८०-१०० पालकांसमवेत खेळघराने काम केलं. आजही खेळघराचे १५-२० कार्यकर्ते २०० मुलांसोबत हे काम नेटानं करत आहेत. खेळघरात किमान ४ ते ५ वर्ष नियमित सहभाग घेणारी मुलं दहावीपर्यंत पोचतात. त्यापुढे शिक्षण घेण्याचीही त्यांची इच्छा असते. आज अनेक मुलंमुली शिक्षण पूर्ण करून सन्मानाने जगत आहेत. खेळघरात येणाऱ्या मुली आता १८-२० वयानंतरच लग्न करतात.

गेली दहा वर्षे खेळघराच्या विस्तार प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षणे घेतली गेली. या प्रयत्नातून महाराष्ट्राच्या विविध भागांत सुमारे २५ ठिकाणी खेळघराच्या धर्तीवरची कामं उभी राहिली. त्यातली १० खेळघरं आजही कार्यरत आहेत. या १० पैकी ६ संस्थांची अनेक वाड्यावस्त्यांमध्ये गट खेळघरं आहेत. या नव्या खेळघरांच्या माध्यमातून सुमारे २००० मुलांपर्यंत खेळघर संकल्पना पोचते आहे.

प्रशिक्षणामध्ये शिकलेल्या गोष्टी संगतवार, लिखित स्वरुपात या कार्यकर्त्यांच्या हाताशी रहाव्यात आणि त्यांना काम करायला बळ लाभावं यासाठी २०११ मध्ये खेळघर ह्स्त्पुस्तीकेचं काम हाती घेतलं. या ह्स्त्पुस्तीकेला नव्या खेळघराच्या कार्यकर्त्यांबरोबरच शिक्षणक्षेत्रात काम करणऱ्या अनेकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाषा, गणित, जीवनकौशल्ये, सकारात्मक शिस्त आणि मूल्यमापन अशा अनेक विषयांवर खेळघरानं कार्यशाळांची आखणी केली आहे. महाराष्ट्रातून अशा प्रशिक्षणांसाठी खेळघरातील कार्यकर्त्यांना आवर्जून बोलावलं जातं.

[/vc_row]