पालकनीती परिवाराची ओळख

आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परीघात सजगपणे पालकत्व निभावणं हे सोपं काम नाही. घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणं अवघड होतं. मात्र हा कुणा एकाचा प्रश्न नाही, उघड्या डोळ्यांनी बघणार्‍या सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव होतच असते. ह्यासाठी ह्या काळात पालकत्व निभावणार्‍या सर्वांशी जोडून घ्यावे, म्हणजे प्रश्नांची समज विस्तारेल, उत्तरांच्या दिशा नजरेत येतील ही ‘पालकनीती’मागची कल्पना आहे.

पालकनीती हे मासिकपत्र 1987 साली सुरू झाले तेव्हा ते वैयक्तिक जाणीवेतून. त्यानंतर 1996 साली पालकनीती परिवार ह्या न्यासाची स्थापना करण्यात आली.  त्यानंतरआजपर्यंत दर महिन्याला पालकनीती मासिकपत्र काढले जाते. तसेच 1996 पासून वस्तीतल्या मुलांसाठी खेळघर हा उपक्रम चालवला जातो. विज्ञान शिक्षणाला वाहिलेले शैक्षणिक संदर्भ हे द्वैमासिकही प्रसिद्ध केले जाते.