रुबी रमा प्रवीण
नशिबानं असं घडलंय, की इयत्ता पहिलीपासून ते एम.एस.सी.पर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक/दादा/ताई अशा एका विस्तृत शैक्षणिक गटाच्या मी संपर्कात येत असते, त्यांच्यासोबत वेगवेगळे प्रकल्प करत असते. हे प्रकल्प बरेचदा मुलांच्या अनुभवविश्वातले असतात. रोजच्या जगण्यात जे घडतं त्यातलं काहीतरी उकल करून बघणं आणि त्याद्वारे आपसूकच गणित-विज्ञान-इतिहास-भूगोल-कला-भाषा वगैरे ‘वेगवेगळ्या’ विषयांची एकत्रित प्रचिती घेणं, असा काहीसा हा प्रयत्न असतो. ह्याला मी ‘रिलेटेबल एज्युकेशन’ (relatable education) म्हणते. कितीही अनुभवविश्वातली असली, तरी ‘चला मुलांनो आज पाहूया…’ ही आपण त्यांच्यासाठी रचलेली चौकटच. म्हणजे ‘मुलांना आपापलं असू दे, शोधू दे, समजू दे’ पेक्षा कृत्रिमच. त्यामुळे, ह्या कृत्रिम चौकटीत राहून मुलांना त्यातल्या त्यात आपापलं असू देण्याचा फुटकळ प्रयत्न कसा दिसतो ते सांगण्याचा हा प्रपंच आहे, हे अगोदरच मान्य करायला हवं!
एक जरा सर्वसाधारण, ढोबळ, शहरापुरता ठोकताळा मांडायला हवा – पहिलीपासून ते एम.एस.सी.च्या वयापर्यंत आणि त्यापुढेही, कुतूहल आणि उत्साहाची जागा हळूहळू लाज आणि आळसानं घेतलेली दिसते. एकूणातच, काहीतरी समजून घेण्यासाठी बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक कष्ट सोसावे लागतात हे लक्षात ठेवणं वयानुरूप, आपल्या देशातल्या मुख्य प्रवाहातल्या शैक्षणिक अनुभवांनुरूप आणि जगातल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुरूप अवघड होत गेलं असावं. त्यामुळे कॉलेजवयीन आणि त्यापुढील विद्यार्थ्यांच्या बाबतीत ‘अरे ह्यांना असू काय द्यायचंय! ह्यांना गदागदा हलवून जागं करायला हवंय!’ अशी प्रबळ इच्छा ‘हाडाच्या शिक्षकी’ डोक्यात येणं स्वाभाविक आहे. पण त्यातच अडकून राहिलो तर गदागदा हलवणं महत्त्वाचं होऊन जाईल, शिकणं कदाचित राहून जाईल. ‘आपापलं असणं-शोधणं-समजणं’ ही शिकण्याची उत्तम प्रक्रिया आहे हे मान्य असेल, तर मग ह्या तरुण मुलांची ‘आपापलं असण्याची’च क्षमता कमी झाली आहे ह्याबद्दल, आधी थोडं थांबून, जरा नीट घाबरूया तरी!
साधारण भारतीय शहरी कॉलेजवयीन मूल लक्षात घेतलं, तर ‘एखाद्या प्रश्नासोबत जगण्याची’ त्याच्या आईवडिलांचीच क्षमता जवळजवळ शून्य झाली होती; त्याच्या जन्माच्या अगोदरच! प्रश्न पडला की उत्तर ‘गूगल’ करायचं हे आता गेली २०-२५ वर्षं अंगवळणी पडलेला नागरी समाज आहोत आपण. ह्या पिढीची मुलं म्हणजे ‘आपापलं शोधणं’ ही पायरी वगळून शिकलेल्या पिढीची पुढची पिढी. त्यातही, ‘आपापलं असण्या’चा अनुभवही त्यांना क्वचितच मिळालेला. त्यांच्यात ‘आपापलं असणं-शोधणं’ ह्या दोन्ही पायऱ्या वगळून समज तयार होताना दिसते. ती बरेचदा ‘आपापलं इंटरनेटसोबत असणं आणि समजल्यासारखं वाटणं’ ह्या प्रकारची वाटते. पण म्हणजे काय? त्यांना मुळात ‘आपापलं असणं’ म्हणजे काय हेच समजायला हवंय! कसं? ह्या मुलांचे ताई/ दादा/ शिक्षक, म्हणजे ‘आपापलं शोधणं’ ही पायरी वगळून शिकलेल्या पिढीतील लोक त्यांना समजवणार?
झालं घाबरून! पुढे? मी समजवणार असेन तर मलातर स्वतःकडेच आधी पाहावंसं वाटतं. माझ्यात किती बौद्धिक आळस भरलाय आणि तो कशामुळे, ह्याकडे पाहावंसं वाटतं. ते कसं करावं?
मला अतिशय आवडतं आणि उत्तम येतं असं काय काय आहे ते आधी पाहते – घरच्या कचऱ्याचं कंपोस्ट खत करणं, गणितातील काही संकल्पना, बागकाम, कोशिंबिरी करणं, आहार संयमन. हे सर्व मी कसं शिकले? कंपोस्ट करायला मी शिकले ते कंपोस्टर तयार करणाऱ्या एका कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीपत्रकं वाचून आणि मग शेकडो वेळेला, गरजेनुसार, वेगवेगळ्या प्रकारे, करून बघत. कंपोस्ट भारी जमलं, की त्याचा आनंद घेत. ते कंपोस्ट घालून रोपांचं काय होतं हेही बघत. हवामानानुसार आणि कचऱ्यानुसार पाणी आणि ढवळणं कमी-जास्त करत. वर्षानुवर्षं करणं चालूच ठेवत. गणित मी कसं शिकले? उत्तम शिक्षक, पुस्तकं, खेळ, कोडी, व्हिडिओ, विद्यार्थी, सहकारी आणि काम मला नशिबानं मिळत राहिले आहेत. त्या सर्वांकडून मी भरपूर गणित शिकतेय. पण त्यातल्या ज्या कल्पना मला उत्तम येतात त्यांच्यावर मी खूप विचार, चर्चा, चित्र काढणं, पुनःपुन्हा वाचणं, जरा वेळानं विचार करणं, उदाहरणं सोडवणं, खऱ्या जगाशी जोडून पाहणं, अगदी लहान मुलाला समजावण्याचा प्रयत्न करून पाहणं, सराव वगैरे आपणहून केलं आहे, करत आहे. ‘माझं चुकलं’ आणि ‘मला हे अजूनही नीट येत नाहीये’ हे मान्य करण्याची सवय लावतेय. कंटाळा आला तरी करावंच लागेल अशा परिस्थिती / डेडलाईन्स निर्माण करतेय. ‘मला सगळे ढ ठरवतील’ची लाज कमी करायचा प्रयत्न करतेय. माझ्याहून जास्त येणाऱ्यांच्या संपर्कात राहतेय. खरंच भारी येणं / समजणं म्हणजे काय ह्याची सतत बदलणारी व्याख्या करत राहतेय. एखादी संकल्पना पुनःपुन्हा नव्यानं उमगल्यावर ‘अहाहा!’, ‘ओहोहो!’ करत आनंद-उड्या मारतेय! असंच काहीसं बागकाम, कोशिंबिरी वगैरेंबद्दल सांगता येईल मला.
गणित आणि कंपोस्टिंग शिकण्यात इंटरनेटसोबतच ‘आपापलं असणं-शोधणं-समजणं’ आहे असं दिसतंय. एकूणच वरची यादी पूर्ण केली तर आवडीच्या आणि चांगल्या प्रक्रारे येणाऱ्या गोष्टी शिकण्याची माझी प्रक्रिया मला नीट लिहून काढता येईल. मग जी गोष्ट मी नव्यानं शिकू पाहतेय पण जमत नाहीये, तिथे ह्या प्रक्रियेतलं सगळं काही करून झालं आहे का, हे प्रामाणिकपणे बघता येईल. कारण मुळात आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे कोणते-का-कसे येतात, ह्याकडे जायचंय. (माझ्यासमोरचं मूल नवीन काहीतरी शिकताना अडखळतंय ना, त्यामुळे त्याला अक्कल शिकवण्यापूर्वी नव्यानं काहीतरी शिकणाऱ्या माझी अक्कल आधी तपासून बघावी म्हणते!) उदाहरणार्थ, सध्या मला एक प्रकारचा व्यायाम शिकावा असं खूप वाटतं पण जमत नाहीये. गंमत म्हणजे, का जमत नाही ह्याची हजार कारणं मला देता येतात. (एकदम सेम-टू-सेम मुलांसारखं!) मी ऑनलाईन शिकण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर व्हिडिओ बघण्यात भरपूर वेळ घालवला-घालवत आहे. थोडक्यात ‘आपापलं इंटरनेटसोबत असणं आणि समजल्यासारखं वाटणं’ हा प्रकार करून झाला आहे! (पुढच्या पिढीतली नसले तरी त्यांच्या काळातच आहे ना मी! कालानुरूप सवयी लागल्याच!) कंपोस्ट करते तसं दररोज नेटानं तो व्यायाम करणं, त्यातून काय काय होतंय ह्याची अनुभूती घेत विचार करत पुढे जाणं, हे काही घडत नाहीये. तो व्यायाम करणारे दिसतात तसं एकदम पिळदार, ताकदवान आणि निरोगी शरीर माझंही असेल ही कल्पना मला अत्यंत आवडते! पण गणित शिकताना केलं तसं हा वर्षा-अखेरीस मिळेल असा भलामोठा आनंद रोजच्या छोट्या छोट्या आनंदांमध्ये मोडून मी घेतलाच नाहीये बहुतेक!
असं सगळं नीट समजून घेत घेत माझ्यात किती बौद्धिक आळस भरलाय आणि तो कशामुळे, ह्याकडे पाहता येतंय हळूहळू, नाही का? (तुम्हालाही सुचत असेल काहीतरी मला सांगायला तर पत्राद्वारे सुचवा नक्की! किंवा तुमच्या आयुष्यातलं असं काही दिसत असेल तरी सांगा!) ते नीट जमलं, की ह्या व्यायामप्रकाराच्या बाबतीत ‘आपापलं असणं-शोधणं-समजणं’ ह्यातल्या कुठल्या पायऱ्या वगळल्या जात होत्या ते समजेल. मग तो व्यायामप्रकार जमेल. मग ‘आपापलं असणं-शोधणं-समजणं’ ही प्रक्रिया कशी जमत नव्हती आणि काय काय केल्यावर ती थोडीफार जमली, हे नीट उमगेल. मग माझं ‘आपापलं असणं’ माझ्यातून मुलांपर्यंत पोचण्याची शक्यता निर्माण होईल.
त्यामुळे मग आता मला व्यायामप्रकार जमला तरच पुढची बडबड करेन मी!
रुबी रमा प्रवीण

ruby.rp@gmail.com
पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.
