रेणुका करी
काही वर्षांपूर्वीच्या फेब्रुवारी महिन्यातली ही गोष्ट. मुले शहरात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी होत असलेली पाहत होती. दादा, भाऊ, अण्णा ह्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे फ्लेक्स चौकाचौकात लागलेले होते.
इतिहासाच्या तासाला मुले म्हणाली, “ताई आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकतो, तर आपणही शिवजयंती साजरी करूयात का?”
मी म्हणाले, “कशी साजरी करूया?”
“फोटो आणू, हार घालू, पोवाडे म्हणू, नाटकं बसवू…” समाजात किंवा आजूबाजूला जे दिसले त्याचेच प्रतिबिंब मुलांच्या बोलण्यात उमटले होते.
“तुम्ही एक काम करा. मी काही मुद्दे देते, त्याप्रमाणे तुमच्या घराजवळ शिवजयंती कशी साजरी करतात ते बघून या.”
मग मी त्यांना काही मुद्दे दिले – शिवजयंती उत्सवाचा मांडव किंवा स्टेज रस्त्याच्या मधोमध होता की कडेला, त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता का, तिथे गाणी कोणत्या प्रकारची लावलेली होती, आवाजाची पातळी किती होती, त्यामुळे ध्वनी-प्रदूषण होत होते का, लोकांना त्याचा त्रास होत होता का, मंडळाद्वारे काही सामाजिक उपक्रम राबवला जात होता का, मंडळाने कुठले खेळ किंवा स्पर्धांचे आयोजन केले होते का, तुम्हाला त्यातले काय आवडले, कुठल्या गोष्टी खटकल्या… वगैरे.
मुलांनी खूप मनापासून हा गृहपाठ केला. आठ-दहा मुलांनी त्यांना काय दिसले, त्याचे वर्गात वाचन केले. इतरांनी त्यात आणखी मुद्द्यांची भर घातली.
वर्गातील वाचनातून आलेले मुद्दे आम्ही फळ्यावर लिहिले – काही ठिकाणी शिवाजी महाराजांची मूर्ती होती, काही ठिकाणी फोटो ठेवलेला होता. रांगोळी काढलेली होती. लोक मूर्तीची पूजा करत होते. होमहवन चालू होते. काही मंडळांनी किल्ल्यांची माहिती सांगणारी पोस्टर्स लावलेली होती, पोवाडे सुरू होते, गाणी-गोष्टी सांगितल्या जात होत्या. गाण्यांवर नाचदेखील सुरू होते. ह्या साऱ्यात रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाल्रेली होती. काही मंडळांनी मिरवणूक काढली होती. गरीबांना धान्यवाटप केले जात होते. प्रसाद देत होते. दिव्यांची रोषणाई केलेली होती. ध्वनी-प्रदूषण होत होते… असे अनेक मुद्दे आले.
मुलांना त्यातल्या कुठल्या गोष्टी योग्य वाटल्या, काय अयोग्य वाटले, ते त्यांना विचारून मी फळ्यावर लिहिले. शिवाजी महाराजांची मूर्ती, तिची पूजा, आरती करणे इत्यादी गोष्टी मुलांना बरोबर वाटल्या. म्हणून मी त्यांना विचारले, “पूजा करायची तर शिवाजी महाराज देव होते का?”
“नाही, पण ते देवमाणूस होते,” मुले.
“म्हणजे काय?”
“त्यांनी खूप चांगली कामे केली, म्हणून ते देवमाणूस.”
“त्यांनी चांगली कामे केली हे अगदी बरोबर; पण म्हणून त्यांची पूजा करायची का? की आपणही त्यांच्यासारखे वागायचा प्रयत्न करायचा? त्यांच्यासारखी लढाई करायची, स्वराज्य स्थापन करायचे, की आणखी काही करायचे?”
आता मुले विचारात पडली.
“आपणही चांगली कामे करायची.”
“ताई त्यांनी माणसांमध्ये भेदभाव केला नाही तसा आम्हीपण मित्र-मैत्रिणींमध्ये भेदभाव न करता एकत्र राहू.”
“शिवरायांनी माणसांमधल्या गुणांना महत्त्व दिले तसे आम्हीही एकमेकांमध्ये चांगले काय ते पाहू.”
मुले बोलत होती. अर्थात, प्रत्यक्ष इथपर्यंत पोहोचायचा प्रवास मोठा असतो.
हाच धागा पकडून मी म्हटले, “अगदी बरोबर. आजचा भारत देश स्वतंत्र आहे. मग तुमचे धाडस, साहस, ऊर्जा तुम्ही कोठे वापरणार? खूप खेळा, व्यायाम करा, गड चढा, त्यांची माहिती घ्या. शिवाजी महाराजांचा ‘नियोजन’ हा गुण आपल्या दिवसाची आखणी करण्यासाठी, गृहपाठ, परीक्षेचा अभ्यास ह्यासाठी वापरा, म्हणजे तुम्हीसुद्धा छोटे शिवराय व्हाल. तुमच्या प्रत्येकात एक छोटे शिवाजी महाराज दडलेले आहेत.”
तास संपताना मुलांना त्या दिवशीचा गृहपाठ दिला – ‘शिवजयंती कशी साजरी करणार ते ८ ते १० वाक्यांत लिही.’
मुलांनाही आता ह्या विषयाची गोडी लागली होती. काय करेन ते प्रत्येकाने लिहून आणले होते. त्यांच्या मुद्द्यांमध्ये बरेच वैविध्य होते. कुणी समाजासाठी काही करणार होता, तर कुणी कुटुंबासाठी. काहींनी स्वतःमध्ये काय बदल करणार ते लिहिले आणि खरेच तसे वागलेसुद्धा.
मुलांनी लिहिले – मी माझ्या सोसायटीत स्वच्छता केली. पाणी जपून वापरले. एक झाड लावले. माझे कपाट आवरले. बाथरूम स्वच्छ केले. न आवडणारी भाजी खाऊन बघितली. गृहपाठ नियमित पूर्ण केले. मोबाईल न बघता वाचन, चित्र काढले…
मुलांचा हा दृष्टिकोन तयार होणे, त्यांना असे बदल करावेसे वाटणे ही काही एका दिवसात घडणारी प्रक्रिया नाही. वेळोवेळी, अनेक प्रसंगी होणाऱ्या चर्चांतून मुलांची मनोभूमिका तयार होत असते. त्यातून शिक्षकही शिकत असतात. यासाठी आमच्या शाळेने तयार केलेल्या ‘पूरक-पुस्तिके’चा आम्हाला, मुलांना आणि शिक्षकांनाही, खूप उपयोग होतो.
इतिहास ही इतिहासकारांनी पुराव्यांच्या आधारे रचलेली गोष्ट असते; मात्र कथा, कादंबऱ्या, सिनेमांमध्ये काल्पनिक – पुराव्यांच्या आधाराशिवाय – गोष्टी सांगितलेल्या असू शकतात हा फरक मुले पूरक-पुस्तिकेच्या माध्यमातून समजून घेतात. त्यांना काळाची समज येऊ लागते. शिवाजी महाराजांचा इतिहास कधी घडून गेला, चारशे वर्षे म्हणजे किती मागे, हे एका कालरेषेवर दाखवले तर ते त्यांना चांगले कळते. वर्तमान – इतिहास, राजेशाही – लोकशाही यातला फरक कळायला लागतो. त्या काळातली जातिव्यवस्था कशी होती, जातींची बंधने, अस्पृश्यता म्हणजे काय ह्या गोष्टी समजून घेतात. ह्या चर्चेदरम्यान मुले वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. कुणाला खूप चीड येते, कुणाला दुःख होते, तर काही मुले अंतर्मुख होऊन विचार करायला लागतात. यावर चर्चा झाल्यावर मुले शिवकालीन गावाचे चित्र काढतात.

यातून मुले फक्त शिवरायांचा इतिहास शिकतात असे नाही. त्यांना त्या काळातल्या समाजजीवनाबद्दलही कळते. त्या काळातल्या जातिव्यवस्थेनुसार गावांची, वस्त्यांची, घरांची रचना कशी असायची, जातीनुसार श्रेष्ठ-कनिष्ठ दर्जा कसा ठरायचा, आणि माणसाकडे माणूस म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या जातीच्या चष्म्यातून कसे पाहिले जायचे, अस्पृश्य लोकांना तर स्पर्श करणे हे पाप / गुन्हा समजला जायचा, हे सर्व सांगितल्यावर त्याची दाहकता मुलांच्या लक्षात येते. अशा परिस्थितीत शिवरायांनी जातिभेद न पाळता माणसांमधल्या गुणांना महत्त्व देऊन स्वराज्य स्थापन केले याचे महत्त्व त्यांना पटते. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जातीतल्या माणसांना स्थान होते. त्यात त्यांनी स्पृश्य-अस्पृश्य असा भेद केला नाही. सुतार, लोहार, चांभार, महार, मांग अशा सर्व जातींमधल्या लोकांसाठी काम होते. आपल्या स्वराज्याच्या कामात त्यांनी प्रत्येकाला सामावून घेतले. शिवरायांचा हा गुण मुलांच्या लक्षात येतो. आणि मग, प्रत्येकामध्ये काहीना काही तरी गुण असतातच हे जाणवून स्वतःमधले आणि आपल्या मित्र-मैत्रिणींमधले विविध गुण त्यांना दिसू लागतात. चौथीच्या वर्गात मुले प्रत्येकाला त्याच्या वाढदिवशी देण्यासाठी त्याचे गुण सांगणारे भेटकार्ड तयार करतात. अशा प्रकारे इतिहासाची जोडणी स्वतःसोबतसुद्धा होते.
पूरक-पुस्तिकेत ‘त्या काळातील शिक्षण कसे होते?’ असा एक पाठ आहे. त्यात जातीनुसार व्यवसायाचे शिक्षण, तेपण फक्त मुलग्यांनाच मिळे, आणि लिहिण्या-वाचण्याचे अधिकार, धर्मग्रंथांचे शिक्षण फक्त ब्राह्मणांच्या मुलग्यांनाच घेता येई हे मुलांना कळते. मुली फक्त घरकाम करत आणि धाकट्या भावंडांना सांभाळत, त्यांना शिक्षणाचा अधिकार नसे, हे कळल्यावर मुलांना खूपच आश्चर्य वाटते. हा अन्याय आहे अशी त्यांची तत्काळ प्रतिक्रिया असते.
इतिहासाच्या अभ्यासातून मुले इतर विषयांशीही जोडली जातात. शिवरायांचे किल्ले, सह्याद्री पर्वतावर असलेले त्यांचे स्थान, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात, कोणत्या दिशेला ते किल्ले आहेत हे नकाशावर पाहताना मुले भूगोलात शिरतात. मग त्या काळातली वाहतुकीची साधने कोणती होती, संपर्क-व्यवस्था कशी होती यावरही बरीच चर्चा होते.
माझी जडणघडण, संवेदनशीलता ह्यांचा नागरिकशास्त्रामध्ये विचार होतो. संतांच्या शिकवणीचा, जिजाबाईंनी सांगितलेल्या गोष्टींचा, त्या काळातील परकीय सत्ता, लोकांवर होत असलेले अत्याचार, या गोष्टींचा बालशिवाजीवर परिणाम झाला. स्वतःचे राज्य कसे असावे ह्याबद्दल लहान वयातच त्यांचे विचार तयार झाले. मुलेही स्वतःची जडणघडण करणारा, त्यांच्या विचारांना दिशा देणारा एखादा प्रसंग लिहितात. शिवरायांचे मावळ्यांवरील, रयतेवरील प्रेम, त्यांची न्यायव्यवस्था इत्यादीतून संवेदनशीलता शिकत जातात.
शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मुलांची सहल जाते. गडकोट किल्ला, बुरुज, तटबंदी, चिरेबंदी बांधकाम, कोनाडा, तांदळा (देवीची स्वयंभू मूर्ती)… मुलांच्या शब्दकोशात भर पडत जाते. किल्ल्याच्या विविध दरवाजांची माहिती, धान्याचे कोठार, जलव्यवस्थापन, कडेलोटाची जागा… अनेक गोष्टी मुले बघतात. इतिहास प्रत्यक्ष जाणून घेतात. स्वतः त्याबद्दल लिहितात. हा झाला त्यांचा भाषेच्या प्रांतातला प्रवास!
शिवरायांची मुद्रा, त्यावरील लेखन, आकार ह्या गोष्टी समजून घेतल्यावर शाळेच्या वैशिष्ट्यांबद्दल चर्चा करून, त्यातील काही वैशिष्ट्ये, आवडीचा आकार निवडून मुले शाळेची मुद्रा तयार करतात. इतिहासाचे शिक्षण असे वर्तमानाशी जोडले जाते.

इतिहास शिकवताना शिक्षकाने तटस्थ राहून शिकवणे महत्त्वाचे. स्वतःला जात, धर्म, धारणा, पूर्वग्रह असले, तरी वर्गात शिकवताना आपली विचारधारा त्यावर हावी होणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. आपल्या बोलण्यातून कुठल्याही विशिष्ट धर्माचा, जातीचा पुरस्कार तर होत नाहीये न ह्याबाबत जागरूक राहायला हवे. उदा. शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणजे काय हे सांगताना ‘हिंदू धर्मात शुभकार्याची सुरुवात करताना तोरण बांधण्याची प्रथा आहे’ असेच शिक्षकाने म्हणायला हवे. ‘आपल्या’ हिंदू धर्मात, ‘आपल्या’ घरी सणाला आपण तोरण बांधतो, अशा वाक्यरचना कटाक्षाने टाळायला हव्यात.
इतिहासाचे अभ्यासक राजा दीक्षित म्हणतात तसे इतिहास हा विषय संपूर्ण जीवनाशी जोडलेला आहे. आपल्याला साधायचे काय आहे, तर इतिहासाच्या अभ्यासातून दृष्टी निर्माण होऊन तिचा आयुष्यभर उपयोग व्हावा. शिवाजी महाराज हे साऱ्यांचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे हे खरेच; पण शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडली, अफजलखानाचा वध केला… अशा चित्तथरारक प्रसंगांपुरता त्यांचा इतिहास सीमित न राहता मुलांमध्ये इतिहास-साक्षरता निर्माण होणे महत्त्वाचे!
अंजूताईंनी आम्हाला इतिहास हा विषय खूप चांगल्या पद्धतीने शिकवला. फक्त धडा वाचला आणि प्रश्नोत्तरे घेतली असे न करता धड्यातील घटनांवर वर्गात चर्चा घेतल्या. धड्यात न आलेल्या पण महत्त्वाच्या पूरक गोष्टी सांगितल्या. एखाद्या गोष्टीचे पुरावे उपलब्ध नसले, तर तसे सांगितले. मोठे झाल्यावर किंवा आत्ता शिवजयंतीचा उत्सव कसा साजरा करणार असा त्यांनी आम्हाला प्रकल्प दिला होता. बुधवारी इतिहासाचे दोन तास असायचे म्हणून त्या पाच मिनिटे ‘शिवाजी म्हणतो’ हा खेळ घ्यायच्या.
शारव मुळे
लहानपणापासून मला आईबाबा, आजीआजोबा शिवरायांच्या गोष्टी वाचून दाखवायचे त्यामुळे त्यात मला फार रस होता. चौथीत अंजूताई आम्हाला शिवरायांचा इतिहास शिकवायला आल्या. पूर्वी गाव कसा असायचा, लोक कसे राहायचे, त्यांच्या जाती, रीतीरिवाज अशी ताईंनी सुरुवात केली. आम्हाला त्या काळच्या गावाचे चित्र काढायला सांगितले. नंतर संतांचा इतिहास, भजने, जिवंत समाधी… त्यानंतर जिजाबाई, शहाजी महाराज आणि मग शिवरायांचा जन्म! पुढे त्यांचे शिक्षण, स्वराज्य-स्थापना. ताईंनी आम्हाला त्यांच्या संस्कृतमध्ये असलेल्या मुद्रेचा अर्थ सांगितला. शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम, बाजीप्रभूंनी शर्थीने खिंड लढवली, पन्हाळ्याहून सुटका, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची फजिती… असा आम्ही शिवरायांचा इतिहास शिकत गेलो.
स्वरा कीर्ती तुषार
इतिहास म्हणजे एक काल्पनिक गोष्ट नाही, तर खरी घडून गेलेली गोष्ट असते. आपल्या प्रत्येकाला स्वतःचा इतिहास असतो. तसेच प्रत्येक शहर, राज्य आणि देशालाही एक इतिहास आहे. ताई वर्गात धडे वाचतात तेव्हा मला वाटतं, की त्या गोष्टीच वाचत आहेत. म्हणून धडे ऐकायची आम्हाला खूप उत्सुकता असते. आमची चौथीच्या सत्राची पहिली सहल इतिहासाची होती. आम्ही शिवनेरी किल्ला आणि नाणेघाट बघायला गेलो होतो. परत आल्यावर आम्ही नाणेघाटाचे रांजण, शिवजन्मस्थान, धान्याचे कोठार, लेण्या अशा विविध विषयांवर गटात चित्रे काढली आणि लेखन केले.
विस्तार दळवी भडवाल
रेणुका करी

kari.renuka@gmail.com
पुण्याच्या अक्षरनंदन शाळेत इतिहास व भूगोलाच्या शिक्षक.