ह्या वर्षभरात दर महिन्याला आपण अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत वाचतो आहोत.
एखादी गोष्ट आधी न येणं आणि मग ती येणं, यांच्या मधल्या अंतराला बेकी ‘लर्निंग स्पेस’ म्हणतात. हे अंतर कमीतकमी कसं होईल, एखादी गोष्ट मूल चटकन कशी शिकेल, असा बरेचदा आपला प्रयत्न असतो. शिकणं, मग ते चप्पल घालणं असो किंवा गणित असो, अवघड असतं, कारण ते शिकत असताना, न येण्याच्या अवस्थेत बराच काळ राहावं लागतं. गंमत म्हणजे, नेमकं किती काळ हे आधी सांगता येत नाही! ही अवस्था सहन न होणारी व्यक्ती / मूल ‘नाही येत मला, मी नाही करणार!’ म्हणून प्रयत्न सोडून देताना / त्रागा करताना दिसते. अशा वेळी बेकी म्हणतात, की मुलाला ती गोष्ट लवकरात लवकर यावी हे मोठ्यांचं ध्येय नसावं, कारण ते व्हायचं तेव्हा होईलच. ‘लर्निंग स्पेस’मध्ये राहणं मुलाला जास्त काळ सहन व्हावं, हे ध्येय असावं.
हे ध्येय गाठण्याची पहिली पायरी म्हणजे ‘लर्निंग स्पेस’मध्ये ‘लाज’ वाटू न देणं! कसली लाज?
अगदी ८-१० वर्षांच्या मुलांनादेखील दात घासणं, अंघोळ करणं, नाश्ता करणं, दप्तर भरणं, घरचा अभ्यास करणं, वगैरे रोजच्या गोष्टी करताना डोकं लावावं लागतं, त्यात त्यांच्याकडून चुकाही होतात. त्याचवेळी हे सगळं सहज करणारी मोठी माणसं त्यांना आजूबाजूला दिसत असतात. आपण किती पटपट आवरतो, झटकन वरच्या कप्प्यातली टोपी घेतो, बुटाच्या नाड्या बांधतो, ताट वाढून घेऊन खातो… हे मूल पाहत असतं. त्यातच कधीकधी अगदी सहजपणे आपण मुलाला म्हणून जातो, ‘बघ! पुन्हा विसरलास पाण्याची बाटली!’ जणू लक्षात ठेवणं ही एक खूप सोपी गोष्ट असून फक्त त्यालाच ती जमत नाहीये! म्हणजे ‘एखादी गोष्ट करायला शिकणं अवघड आहे’ म्हणूनच फक्त वैतागून मूल प्रयत्न करणं सोडतं असं नाही. तर न येणारे, चुका होणारे आपण एकटेच आहोत, अशी एक प्रकारची लाजही त्यामागे असते.
ह्या लाजेपासून मुलाला दूर कसं ठेवावं ?
बेकी म्हणतात, की आपण मुलांसमोर मुद्दाम आपल्याला न येणाऱ्या गोष्टींविषयी, आपल्याकडून झालेल्या चुकांविषयी आणि त्यातून आपण कसा मार्ग काढतोय ह्याविषयी बोलत राहावं. मूल बोलतं त्या भाषेत बोलून दाखवावं. ‘नाही येत मला हा केक करता! मी नाही करणार!’ पासून सुरू करून, ‘थांब, थांब बेकी!’ म्हणत मोठा श्वास घेत ‘केक करणं खूपच अवघड आहे!’ असं मान्य करत ‘पण जमणारे तुला! एकदा बघ पुन्हा करून.’ वगैरे म्हणत, चुकांबद्दल बोलत, केक करणं चालूच ठेवत, हळूहळू यश मिळालेलं दाखवावं. मुलाला चटकन यश मिळवून देणारी मदत करण्यापेक्षा, यश मिळवून देणारी कामाची पद्धत शिकायला मदत करावी.
रुबी रमा प्रवीण

ruby.rp@gmail.com
पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.