सचिन नलावडे

मुले शाळेत का येतात? साधे उत्तर आहे – शिकण्यासाठी. मात्र ‘काय शिकण्यासाठी’ याचा गांभीर्याने विचार होणे महत्त्वाचे वाटते. शाळा हा काही स्पर्धेचा आखाडा नाही. मुलांनी एकमेकांच्या गरजा, क्षमता, कमतरता यांचा विचार करून त्यांच्यापुढे येणार्‍या प्रश्नांना, अडचणींना, आव्हानांना एकत्रितपणे भिडण्याची ही एक जागा आहे. येणार्‍या अनुभवांना, यशापयशाला कसे सामोरे जायचे हे इथे शिकायचे आहे. यात स्पर्धेचा विचार नेमका कधी आणि कसा डोके वर काढतो? स्पर्धा ही मुलांच्या मनातली भावना आहे, की शिक्षक, पालक आणि आजूबाजूचा समाज ही भावना त्यांच्या मनांत रुजवतो? विचार करताना जाणवले, की माणसाला आपल्या वैयक्तिक आयुष्यात एकाकीपणा जाणवला किंवा आपण प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहोत ही असुरक्षितता वाटायला लागली, की त्याची स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सुरू होते. मग सतत ‘मी किती भारी आहे’ हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न केले जातात. मानवाची ही सहज प्रकृती आहे.

‘प्रक्रिया को-लर्निंग स्पेस’मध्ये आम्ही स्पर्धेबद्दलची भूमिका जाणीवपूर्वक वेगळी ठेवलेली आहे. उदाहरण म्हणून अगदी सुरुवातीच्या वर्षांतला एक प्रसंग सांगतो. मी मुलांना एक गणित सोडवायला दिले होते.

काही वेळातच एक मुलगा म्हणाला, ‘‘दादा माझे झाले, दादा माझे झाले.’’

मी म्हणालो, ‘‘नाही झाले. परत तपासून बघ.’’

थोड्या वेळाने तो पुन्हा म्हणाला, ‘‘दादा, तपासून बघितले मी. माझे बरोबर आहे.’’

पण मी ‘तुझे नाही झाले रे,’ या उत्तरावर ठाम होतो.

अखेर वैतागून त्याने मला विचारले, ‘‘दादा, आता तूच सांग का नाही झाले ते?’’

मी त्याला माझी सूचना काय होती ते आठवायला सांगितले. ‘दोन गट केलेले आहेत, गटाचे काम झाले की सांगा’.

‘‘बघ मी  गटात आहे आणि माझे काम झालेले आहे.’’ बोलता बोलता त्याच्याच लक्षात आले, की फक्त आपले गणित झाले आहे; पूर्ण गटाचे नाही.

आता थोडा वेळ शांतता. ‘‘दादा मग मी आता काय करू?’’

‘‘तुझे झालेले आहे, पण गटाचे नाही. पूर्ण गटाचे होणे अपेक्षित आहे. अशा वेळी काय करायला हवे?’’

‘‘दादा मला समजले. आता माझ्या गटातल्या इतरांना हे गणित सोडवण्यासाठी काय मदत लागते आहे ते बघितले पाहिजे; म्हणजे मग पूर्ण गटाचे गणित होईल.’’

घरी गेल्यावर तो आईला म्हणाला, ‘‘अग आई इथे फक्त आपले उत्तर आले म्हणजे झाले, असे चालत नाही. आपल्या सर्व मित्रांचे उत्तर येणे हीपण आपली जबाबदारी असते.’’

म्हटले तर गोष्ट साधीच आहे, पण प्रत्येक कृतीत मुलांचा दृष्टिकोन बदलणारी आहे.

प्रत्येक मुलामध्ये काही ना काही क्षमता असतात. त्या ओळखणे आणि त्या अनुषंगाने त्याचा विकास साधणे ही शाळेची जबाबदारी आहे असे आम्ही मानतो. या पद्धतीने काम करत असताना मुलांची एकमेकांशी तुलना, स्पर्धा किती फसवी असते हे जाणवते. ‘प्रक्रिया’मध्ये सुरुवातीला आम्ही मूल नेमके कुठे आहे हे भरपूर वेळ घेऊन, त्याला वेगवेगळे अनुभव देऊन शोधतो आणि मग वर्षभरात ते कुठे पोचू शकेल याचा अंदाज घेतो. याबद्दल पालकांशी, इतर प्रवर्तकांशी बोलून त्या मुलाबाबत काय धोरण असावे हे निश्चित करतो. त्या मुलामध्ये होणार्‍या बदलांची विशेष नोंद ठेवतो. इथे कोणी ‘ढ’ किंवा ‘हुशार’ अशी भाषाच नसते. कामात मागच्यापेक्षा यावेळी किती आणि कशी सुधारणा झाली याबद्दल प्रत्येकाशी व्यक्तिशः बोलतो. तुझ्यामध्ये कोणते गुणात्मक बदल होत आहेत, ते कसे व का घडत आहेत याची जाणीव त्याला या चर्चांतून करून  देतो. त्यामुळे इतर मुलांसोबत तुलना किंवा स्पर्धेला काही स्थानच उरत नाही. परीक्षा आणि त्यात मिळणारे गुण मुलांमध्ये स्पर्धा जन्माला घालते. आपण पास झालोत की नापास, पास झालो तर किती गुणांनी, कोण कोणाच्या मागे-पुढे आहे, किती गुणांना समाजमान्यता आहे, याबद्दल मुलांपर्यंत पालक, शिक्षक आणि इतरांच्या देहबोलीवरून काय पोचायचे ते पोचते. एखादे मूल नापास झाल्यास शिक्षक, पालक त्या मुलाला कसा काय दोष देतात, असा मला नेहमी प्रश्न पडतो. कारण खरे तर अशा वेळी पालक आणि शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असते.

स्पर्धा असूच नये असे माझे म्हणणे नाही; पण स्पर्धेमध्ये जिंकणे-हरणे, इतरांना हरवणे या पलीकडे जो अनुभव मिळाला, त्यातून मला काय शिकायला मिळाले, स्पर्धेला सामोरे जाताना माझ्या मनात इतरांना हरवण्याचा भाव होता, की स्वतःच्या क्षमता तपासून बघण्याचा, या स्पर्धेच्या अनुभवाने मुले एकमेकांशी जोडली गेली की दूर गेली, या स्पर्धेमधून अर्थपूर्ण शिक्षण झाले का, एकमेकांबद्दल  आपुलकी निर्माण झाली की असूया, हे तपासून बघणे अपेक्षित आहे.

स्पर्धात्मक वातावरण असलेल्या शाळांतून ‘प्रक्रिया’मध्ये आल्यावर इथल्या पद्धतीमध्ये रुळण्यास मुलांना बराच वेळ लागतो. कारण आधीच्या वातावरणात मूल स्वतःपासून आणि एकमेकांपासून तुटलेपणाने जगत असते. त्यामुळे सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड असते; मग ती योग्य पद्धतीने असो वा अयोग्य पद्धतीने. या धडपडीतून बाहेर येऊन स्वतःकडे बघण्याची प्रक्रिया होण्यासाठी आम्ही त्याला भरपूर वेळ देतो. बटण दाबल्याप्रमाणे ताबडतोब त्याच्यात बदल घडून यावा अशी अपेक्षा ठेवत नाही. मुलाला स्वतःकडे बघायला संधी देणारे काही उपक्रम घेतो. त्यातून त्याचे स्वतःशी आणि आमच्याशी नाते निर्माण होण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळतो. इथे सहयोगाने जगायचे आणि शिकायचे आहे हे तत्त्व मूल हळूहळू अंगीकारते आणि खर्‍या अर्थाने त्याची शिकण्याची प्रक्रिया सुरू होते.

स्पर्धेप्रमाणेच शिक्षेच्या बाबतीतही ‘प्रक्रिया’ची एक वेगळी भूमिका आहे.

आपल्याला नको असलेली गोष्ट मुलाने परत करू नये म्हणून मोठी माणसे  जे जे करतात ते म्हणजे शिक्षा.

शिक्षा दोन प्रकारची असते.

1. मुलाला नको असलेली गोष्ट जबरदस्तीने देणे. उदा. फटका देणे.

2. मुलाला हव्या असलेल्या गोष्टीपासून त्याला दूर ठेवणे. उदा. खेळायला न जाऊ देणे किंवा स्क्रीन टाइम न देणे.

शिक्षा मिळाल्यावर प्रत्येक मुलाच्या मेंदूमध्ये काही बदल घडतात. त्यामुळे मेंदू सारासार विचार करण्याच्या विवेकी पातळीवरून भावनिक स्तरावर येतो. मुलाची चलबिचल व्हायला लागते. त्याचे वर्तन बिघडते. शिक्षा केली की मुले थरथर कापतात, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. थोडक्यात, शिक्षेच्या नावाखाली आपण स्थिर मेंदूला अस्थिर करतो आणि मग आपल्याला अपेक्षित असलेले वर्तन मुलाने त्या अस्थिर मानसिक स्थितीत करावे अशी अपेक्षा करतो. हे किती विचित्र आणि चुकीचे आहे याची आपल्याला कल्पनाही नसते. मुले अपेक्षित कृती करतात पण ती भीतीमुळे. या शिक्षेमुळे

त्यांच्या मनावर कायमचा एक ओरखडा उमटतो. मुलांचे लक्ष योग्य त्या गोष्टीवर केंद्रित करण्यासाठी  माझी क्षमता कुठे कमी पडते, मी नक्की कधी हतबल होतो, कधी मुलांवर शिक्षेचा आसूड उगारतो हे पालकांनी / शिक्षकांनी जाणून घेणे गरजेचे आहे.

दुसरे म्हणजे मूल एखादी चुकीची गोष्ट वारंवार करताना दिसते, तेव्हा पालक / शिक्षक म्हणून  त्या मुलाच्या वर्तनाकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय हे फार महत्त्वाचे आहे. मुळात अशा कृतीतून मूल आपल्यापर्यंत काही तरी पोचवण्याचा प्रयत्न करत असते. माझ्यामध्ये काही तरी कमतरता आहे किंवा त्या विशिष्ट कृतीवर नियंत्रण आणण्यासाठी मला मदतीची, आधाराची गरज आहे हे त्याला सांगायचे असते. अशा वेळी ‘प्रक्रिया’मध्ये आम्ही मुलांशी व्यक्तिगत संवाद साधतो. त्याच्या कृत्याबद्दल रागाने, वाईट बोलणे कटाक्षाने टाळतो. जे घडते आहे, ते तुलाही आवडत नसणार, यावर काम करायची तुझीही मनापासून इच्छा असणार, यासाठी तुला माझ्या मदतीची आवश्यकता आहे का, हे आवर्जून विचारतो. यात तुला येणार्‍या अडचणी तसेच तू जे काही सांगशील ते आपल्या दोघांमध्येच राहील. कुणीही तुला जाब विचारणार नाही. सकारात्मक बदल करण्यासाठी मी तुला मदत करेन. प्रश्नाच्या मुळाशी जाऊन उत्तर शोधण्याचा आपण मिळून प्रयत्न करू. असा संवाद साधत आम्ही पुढे जातो. आपण केले ते योग्य की अयोग्य हे प्रत्येक मुलाला ती कृती करतानाच माहीत असते. तेव्हा काय घडले त्याबद्दल न बोलता, त्यात  बदल करण्यासाठी लागणारी थेट मदतीची कृती आपण केली की मुले आपोआप खुलतात. अर्थात, ती सवय लगेच जाते असे नाही. म्हणूनच त्याच्याशी बोलताना आम्ही त्याला हेही सांगतो, की बदल लगेच होणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. तू परत तसाच वागतो आहेस हे मला जाणवले तर मी तुला आठवण करून देईन. तेव्हा तू परत बदल कर. त्यांना वेळोवेळी अशी जाणीव करून दिली जाते. आपल्यामध्ये बदल व्हावा म्हणून मला मदत केली जाते आहे, असा विचार मग मुलेही करू लागतात.

स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी तुला वेळ हवाय का, गटाबाहेर बसून तू आधी शांत होतोस का,  बरे वाटले, की परत सामील हो असे सांगून आम्ही त्या मुलाला थोडी विश्रांती घ्यायला लावतो. स्वतःच्या वागण्याचा शांतपणे विचार करण्यासाठी, आपणहून त्यात बदल करण्यासाठी मुलांना हा वेळ मिळणे आवश्यक आहे, हे अनुभवाने पटलेले आहे. मुलासोबत आमचे काम सुरू असताना पालकांची भूमिका काय असावी याविषयी पालकांशीही बोलणे होत असते. पालक, मूल आणि ‘प्रक्रिया’ ह्यांनी एकत्रितपणे काम केले, तरच हा बदल घडू शकतो हे नक्की. माझ्या वागण्यात, माझ्या भावनांमध्ये, विचारांमध्ये, त्यावर आधारित कृतींमध्ये काय आणि कसा बदल होतो आहे हे स्वतःला तपासायचे तंत्र यातून मुलाला अवगत होते.

एकूणच स्पर्धा आणि शिक्षा या मुलांना एकमेकांपासून आणि स्वतःपासून तोडतात, दूर नेतात. जोडलेपणाच्या अनुभवातूनच मुलांचे अर्थपूर्ण जीवन घडणार आहे, ही जाणीव पालक आणि शिक्षकांना होणे आवश्यक आहे. मुलाला त्याची स्वतःची पूर्ण ओळख झाली, की तो कुठल्याही स्पर्धेच्या ताणाला बळी पडणार नाही. शिक्षा आणि स्पर्धेतून येणारे ताण हाताळायला शिकेल. ही शिदोरी त्याला संपूर्ण आयुष्यासाठी उपयोगाची ठरणार आहे.

सचिन नलावडे

nalawade2005@gmail.com

लेखक प्रक्रिया को-लर्निंग स्पेस, पुणे चे संचालक आहेत.