“वा! छान! शाब्बास!”

“बाबा! हे बघ माझं चित्रं!”
“वा! छान काढलंस! शाब्बास!”
मुलाच्या चित्राचं असं कौतुक करणं ठीकच; पण बेकी म्हणतात की ह्याच्या पलीकडे जायला हवं.
आधी स्वतःच्या आत डोकावणं आणि मग बाहेर बघणं, हे शिकल्यानं माणसाचा आत्मविश्वास वाढीस लागतो.
म्हणजे काय? सध्याचं जग आपल्याला आधी बाहेर बघायला लावतंय – सगळे बघा मी काय बनवलंय! कोणी मला लाईक करेल का? कोणी सांगेल का माझं काम / मी ठीक आहे ना?… त्यातून आपण आतून पोकळ, नाजूक आणि चिंताग्रस्त होत चाललो आहोत. त्यामुळे आधी आत पाहायला शिकणं महत्त्वाचं आहे.
मुलांनी काहीही बनवलं, की कोणीतरी त्यांना ‘छान! शाब्बास!’ म्हणेल ह्याचं वायरिंग त्यांच्या डोक्यात होऊन त्याचं एक सर्किट बनून राहिलं, तर बाहेरच्या जगात गेल्यावर बरेचदा हे सर्किट पूर्ण न झाल्यानं ते ‘छान! शाब्बास!’ च्या शोधातच राहतील.
जरा पुढचा विचार करून पाहू. विशी-तिशीतल्या माणसाला काय उपयोगी पडेल? ह्या वयात आपण करत असलेल्या कामाच्या गुणवत्तेबद्दल, इतर लोक काही म्हणायच्या आधी, आपल्यालाच आपला अंदाज बांधता येणं हे स्वतःला जपण्याच्या, अॅन्ग्झायटी-डिप्रेशनपासून सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त ठरतं. ‘मी हे प्रोजेक्ट चांगलं केलं आहे, बॉसनं अजून त्यावर काही टिप्पणी केलेली नाहीये म्हणून थोडी चिंता वाटतेय. पण ठीक आहे, केवळ कोणी मला काहीच म्हटलं नाही म्हणून मी चिंतेच्या खोल गर्तेत जाणार नाहीये.’
‘आहा! निबंधातला हा मुद्दा कसा सुचला रे? मला सांग नं!’, ‘छान! इथे लाल रंग का निवडलास ग?’, अगदीच कमी वेळ असेल तेव्हा ‘अरे वा! मला आवडेल समजून घ्यायला हे तुझं काम, थोड्या वेळानं बोलूया!’ असा मुलांना बोलतं करणारा, त्यांच्या कामाचे बारकावे समजावून सांगण्याची संधी देणारा संवाद आवडतो मुलांना. गंमत म्हणजे, मुलांनी सांगितलेले तपशील बरेचदा आपल्यासाठी आश्चर्यकारक आणि खूप काही शिकवून जाणारे असतात! खरं तर मुलांनाच नाही, आपल्यालाही आवडतं घरी आलेल्या मित्रानं नुसतंच ‘छान घर आहे हं!’ ऐवजी ‘अरे! ही अशी खिडकीत बसता येण्याची रचना कशी काय केलीस तू?’ असं म्हटलेलं! आपणही उत्साहानं खिडकीची गोष्ट सांगायला लागतो!
“अशा संवादातून, आत डोकावण्याचा सवयीतून, आपण करतोय त्या कामातला कोणता भाग आपल्या नियंत्रणात आहे हे समजायला मदत होते आणि पैकीच्या पैकी मार्क नाही मिळाले, तरी त्या निकालात अडकून राहण्याऐवजी पुढच्या कष्टांकडे लक्ष देणं सोपं होतं…” बेकी सांगतात.
रुबी रमा प्रवीण

पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.