पंकज मिठभाकरे

आपल्या वागणुकीचा म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे मानसशास्त्र.

स्मिथ या शास्त्रज्ञाने ‘वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास’ अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. जॉन वॉटसन हा वर्तनवादी विचारसरणीचा जन्मदाता.  त्यांच्या मते मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी बोध, अबोध या संकल्पना पूर्णपणे बाजूला सारून निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

नेमके याच काळात पॅव्हलोव ह्या मेंदू आणि आरोग्यशास्त्राच्या रशियन अभ्यासकाने अनैसर्गिक उद्दीपकाबरोबर नैसर्गिक उद्दीपक पुन्हा पुन्हा सादर केला असता, कालांतराने, नैसर्गिक उद्दीपकाला दिली जाणारी प्रतिक्रिया अनैसर्गिक उद्दीपकालाही दिली जाते, असे सिद्ध केले. त्याला ‘अभिजात अभिसंधान’ असे म्हटले जाते. वॉटसन यांनी अल्बर्ट नावाच्या बाळावर प्रयोग करून हे विधान माणसांसाठीही सिद्ध केले होते. या प्रयोगात अल्बर्टला पांढरा उंदीर खेळायला दिला जाई. छोटा अल्बर्ट त्या उंदराला मुळीच घाबरत नसे. पण मग अल्बर्ट जेव्हा त्याला हात लावे, तेव्हा हातोडी धातूवर आपटून कर्णकटू आवाज केला जाई. अल्बर्ट घाबरून रडू लागे. यानंतर काही काळाने म्हणजे सुमारे दोन वर्षांनी अल्बर्टसमोर पुन्हा पांढरा उंदीर आणला. आता हातोडीचा आवाज न करताही अल्बर्ट घाबरला, रडू लागला. अशाच प्रकारे शिक्षा करणार्‍या शिक्षकांबद्दलचा भयगंड अभिसंधानातून निर्माण होतो. तसा झालेला असेल, तर त्याच अभिसंधानातून निर्माण झालेली प्रेरणा, शिस्त, सदगुण, क्रियाकलाप, शिक्षण हेही भयगंडाने ग्रासलेले असतील. एखादी गोष्ट स्वयंप्रेरणेने केली जाणे आणि ती कुणी तरी करून घेणे, शिकवणे आणि त्यासाठी शिक्षा किंवा बक्षीस वापरले जाणे यात खूप फरक आहे. अपेक्षित प्रतिसादाला बक्षीस मिळणार आणि अयोग्य प्रतिसादाला किंवा चुकीच्या प्रयत्नालासुद्धा शिक्षा मिळेल किंवा काहीही मिळणार नाही, या आणि अशा नियमावलीवर शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यातले बहुतांश प्रयोग प्राण्यांवर केलेले आहेत. खरे तर वर्तनवादाचा विचार केवळ समस्या शोधण्यासाठी केला पाहिजे; समस्या सोडवण्यासाठी नाही. हे न कळलेल्या पद्धतीने विचार झाला आणि त्यामुळे मानवी जीवनात फार मोठे बदल झाले. ते चुकीचे आहेत की बरोबर हा वाद इथे नको; मात्र वर्तनवादातून निर्माण झालेली शिक्षा याला माझा नक्कीच विरोध आहे.

सिग्मंड फ्रॉइड यांना ‘फादर ऑफ सायकॉलॉजी’ म्हणून ओळखले जाते. ‘ईड’ आणि ‘सुपर इगो’ या दोन संकल्पना मांडत असताना त्यांनी अतिशय सूक्ष्म विचार केला आहे. माणसाला मूल्यांचे आणि नीतिमत्तेचे कळत-नकळत जाणवणारे दडपण यांचे प्रतिनिधित्व करणारा विचारसमूह म्हणजे सुपर इगो, तर ईड म्हणजे मनाच्या तळाशी वावरणार्‍या स्वाभाविक, मूलभूत प्रेरणा आणि त्याचा विचार-समूह. यातली गंमत पाहा. आदर्श प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिला, तर त्यासाठी बक्षीस मिळणार आहे, म्हणजे सुपर इगोला बक्षीस आहे. आणि आदर्श प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद दिला नाही, तर त्यासाठी ईडला शिक्षा मिळणार आहे. ईड आणि सुपर इगो यांचा संघर्ष नेहमीच सुरू राहणार आहे.

आपल्यापैकी बरेचजण शिक्षा अनुभवलेले, शिक्षा भोगलेले किंवा शिक्षा करणारेही असतील. एक तर आपण भोगणारे तरी असू किंवा भोगायला लावणारे तरी असू. मग आपली या लेखाच्या अनुभवातून सुटका नाही. या चक्रव्यूहात आपण अडकलो आहोत एवढे नक्की!

चांगल्या गोष्टींसाठी वरदान आणि वाईट गोष्टींसाठी  शाप, हे आपण अगदी अनादि-अनंत काळापासून आपल्या पुराणकथांमधून ऐकत-वाचत आलेलो आहोत. सर्व धर्मग्रंथांतूनही तसेच सांगितले गेलेले आहे. शाप आणि वरदान म्हणजे नकारात्मक आणि सकारात्मक सबलीकरण आहे. हे शाप किंवा वरदान कधी शारीरिक तर कधी मानसिक, कधी बौद्धिक तर कधी सामाजिक असतात आणि व्यावहारिक जगात ते आर्थिकसुद्धा होतात. खरे तर हे शिक्षेचेच एक स्वरूप झाले. चॉकलेट तेच आहे, फक्त वेष्टन बदलले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण  शिक्षेला सामोरे जात असतो. जेव्हा त्या शिक्षा बालपणी होतात, लहानपणी अनुभवाव्या लागतात, तेव्हा त्याचा परिणाम भविष्यातल्या संपूर्ण वाटचालीवर कसा होतो हे पाहायला हवे. शिक्षा कुठल्याही प्रकारची असो, भूतकाळात तर त्याचे परिणाम झालेले असतातच; पण वर्तमान आणि भविष्यावरसुद्धा होतात.

समुपदेशनासाठी माझ्याकडे अनेक ‘शुभार्थी’ (क्लायंट्स) येत असतात. त्यापैकी एक-दोन  केसेस मला इथे आवर्जून सांगाव्याशा वाटतात. साधारण पंचेचाळिशीचे एक गृहस्थ आहेत. नामांकित कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या  हुद्यावर आहेत. त्यांनी मला त्यांच्या पौगंडावस्थेत घडलेली एक घटना सांगितली. नववीत असताना तारुण्यसुलभ आकर्षण वाटून ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यांनी तिला प्रेमपत्र लिहिले आणि गुपचूप जाऊन ते तिच्या वहीमध्ये ठेवले. अर्थातच, त्यानंतर जे होऊ नये किंवा व्हावे ते झालेच. मुलीने ते प्रेमपत्र शिक्षकांना दाखवले. यथावकाश ते प्रेमपत्र कोणी लिहिले आहे, याचा छडा लागला. मग हेडमास्तरांकडे त्यांची रीतसर वरात काढण्यात आली. त्या काळातील परंपरेनुसार दोघा-तिघा मास्तरांनी त्यांना चोपून काढले. या सगळ्या प्रकरणात एका कानाला त्यांना तीव्र दुखापत झाली. घरच्यांना सांगितले असते तर पुन्हा अधिकचा मार पडला असता, त्यामुळे लपवण्याशिवाय पर्याय उरला नाही. कालांतराने कानाचे ऑपरेशन झाले; मात्र आजही त्यांना एका कानाने कमी ऐकायला येते. त्यावर मी त्यांना म्हटले, की मग तुम्हाला कान-नाक-घसा तज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. ते हसून म्हणाले, ‘‘गंपूदादा अहो, ते सगळे करून झालेय माझे. माझ्या कानाचे जे नुकसान झाले आहे, ते कधीही भरून निघणार नाही. मी तुमच्याकडे त्यासाठी आलेलो नाही. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. माझा मुलगा आता नववीत आहे. खूप चांगला मुलगा आहे तो. आजवर मी त्याला कधीही मारलेले नाही. पण उद्या माझ्यासारखेच त्याला एखाद्या मुलीबद्दल आकर्षण वाटले आणि त्याने काही तरी केले; काही तरी म्हणजे, प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला शिक्षा झाली तर?’’ हे बोलताना त्यांना हुंदका फुटला. ते ढसाढसा रडू लागले. त्यांच्या पौगंडावस्थेत त्यांना दिली गेलेली शिक्षा शारीरिक होती; पण परिणाम मात्र मानसिकही झालेच होते. त्यामुळे त्यांचे व्हायचे ते नुकसान झालेच; परंतु त्यांना एक भयगंडही आला. त्यांच्या बाबतीत जे घडले ते त्यांच्या मुलाच्या बाबतीतही घडू शकेल, अशी त्यांना भीती वाटते. त्यांच्या मुलाच्या बाबतीत असे घडेल किंवा घडणारही नाही. परंतु त्यांचे मन आधीच तशी कल्पना करून मोकळे झाले आहे. आता त्यांना मानसिक त्रास होतो आहे. त्याला कोण जबाबदार आहे? शिक्षाच!

भूतकाळात जे घडले आहे त्याचा विचार करत राहणे, वर्तमानाला सामोरे न जाता येणे आणि भविष्यकाळाचा विनाकारण विचार करत राहणे किंवा नकारात्मक विचार करत राहणे, ही चिंताजन्य विकृती आहे. त्याला मानसशास्त्रात ‘अँग्झाइटी’ असे म्हणतात. त्या गृहस्थांना झालेली शिक्षा शारीरिक वाटत असली, तरीही ती मानसिकरित्या किती खोलवर रुतलेली आहे, याची कल्पना या केसमधून येऊ शकेल.

साधारण चाळीस वर्षांच्या एक बाई आहेत. कलेच्या क्षेत्रात त्या खरे म्हणजे छान  काम  करत आहेत. पण लहानपणी कधी तरी नाचत असताना काकाने त्यांना ‘पुन्हा तुझ्या पायात घुंगरू दिसले, तर पाय सोलून काढीन’ अशी धमकी दिली होती, ती अजूनही त्यांच्या मनात रुंजी घालत असते. आता काका जिवंत नाहीत; पण त्यांचे शब्द आजही त्यांच्या मनावर परिणाम करतात. घुंगरांचा नुसता आवाज आला तरी त्यांना काकांची धमकी आठवते. त्यामुळे मधूनच त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. हात थरथरतात, घाम येतो, भीती वाटते, नाचता येत नाही, नाचायला सुरुवात केली तर संकोचल्यासारखे वाटते. ठेका धरत कृत्रिमरित्या नाचण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्यातून आत्मिक समाधान मिळेल याची खात्री तर मुळीच देता येत नाही.

बालपणी केल्या जाणार्‍या शिक्षा सुरुवातीला शारीरिक, मग परिणामी मानसिक, परिणामी बौद्धिक, मग सामाजिक आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून आर्थिक स्तरावर कधी पोचतात, हे कळतच नाही. शिक्षा चुकीचीच आहे; मग ती कुठल्याही स्वरूपाची असली तरीही. कोणत्याच अर्थाने आणि कोणत्याच अंगाने शिक्षेचे समर्थन करताच येणार नाही.

आपण वर पाहिलेल्या पहिल्या केसमध्ये शारीरिक शिक्षा झाली. त्याचा परिणाम ती व्यक्ती आयुष्यभर भोगते आहे, तर दुसर्‍या केसमध्ये फक्त धमकीचे शब्द वापरले गेले. अर्थात, त्यामुळे मानसिक शिक्षा तर झालीच. शारीरिक शिक्षेची धमकीही दिली गेली, त्याचे परिणामही वाईटच झाले आहेत.

आता प्रश्न असा आहे, की शिक्षेच्या परिणामांतून बाहेर कसे पडायचे?

यासाठी खूप मानसिक परिश्रम घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. आत्मविश्वास परत मिळवावा लागतो. स्वयंप्रेरणेने या सर्व गोष्टींवर मात करता येते असा विश्वास स्वतःला द्यावा लागतो. तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. वेळप्रसंगी औषधेही घ्यावी लागतात.

सिग्मंड फ्रॉईडच्या संकल्पना वेगवेगळ्या अर्थांनी, वेगवेगळ्या पद्धतींनी,  कमी-अधिक सूक्ष्मतेने तर कधी आपापल्या पद्धतींनी मांडण्याचा पुढच्या पिढीतल्या तज्ज्ञांनी प्रयत्न केला आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यातले मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारे मानसशास्त्र मला जास्त भावते.

हे सगळे सांगायचे कारण असे, की मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारे मानसशास्त्र अभ्यासले जायला हवे. अब्राहम  मॅस्लो, कार्ल रॉजर्स या तज्ज्ञांनी मानसशास्रात मानवतावादी दृष्टिकोन मांडला आहे.

मानवतावादी दृष्टिकोनाचे सार असे, की प्रत्येक माणसामध्ये विकास पावण्याची क्षमता आणि तो प्रत्यक्षात आणण्याची ताकद असतेच. त्यामुळे कोणतीही समस्या सोडवताना त्या माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच  विचार केला पाहिजे.

शिक्षेचा वापर करत असताना, त्याच्या होणार्‍या दूरगामी परिणामांचा विचार करणे फार गरजेचे आहे. समुपदेशक म्हणून काम करताना माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, की शिक्षेच्या परिणामातून बाहेर पडत असताना मानवतावादी दृष्टिकोन असणार्‍या व्यक्तिकेंद्रित उपचार-पद्धतीचा जास्त उपयोग होतो.

रचनावादी विचार म्हणजे कोणतीही परिस्थिती आपल्याला कशी दिसते, त्यावरून आपली वर्तणूक ठरते. त्याचा अंदाज आपल्याइतका  दुसर्‍या माणसाला येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला येणार्‍या अडचणीतून आपण स्वत:च सर्वोत्तम मार्ग काढू शकतो, असे कार्ल रॉजर्स यांनी  म्हटले आहे.

रचनावादी विचार करताना त्यातले चार टप्पे लक्षात घ्यायला हवेत.

(1) उच्च उद्देशाकडे होणारा  प्रवास.

(2) आपल्याला जे पोचवायचे आहे त्याचा हेतू, आशय महत्त्वाचा.

(3) आपण काय देत आहोत आणि काय घेत आहोत. म्हणजे देणारा आणि घेणारा यांच्या भूमिका समसमान आणि बदलत राहणार्‍या असायला हव्यात.

(4) आपण जे दिले ते किंवा जे घेतले त्याबद्दल दोघांनाही समाधान झाले आहे ना?

म्हणजेच अनुभवाकडून अनुभूतीकडे प्रवास होणे गरजेचे असते. यालाच ‘रचनावादी विचारसरणी’ म्हणायचे.

दुर्दैवाने आजही शिक्षा केल्या जातात. आपण शिस्त लावायला जातो आणि त्यासाठी शिक्षेचाच वापर करतो. आपल्या शिक्षण-पद्धतीवरही तोच प्रभाव जाणवतो. दिले जाणारे शिक्षण-प्रशिक्षण हे संपूर्णतः वर्तनवादावरच अवलंबून आहे. थोडक्यात काय, तर आपण वर्तनवादाचे गुलाम झालेलो आहोत. या प्रकारात रचनावादाला आणि म्हणूनच संवेदनेला महत्त्व राहत नाही; महत्त्व दिले जाते ते परिणामांना. वाईट बाब अशी, की त्यासाठी आयुष्यभर मोजावी लागणारी किंमत फार मोठी आहे. ती शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आर्थिक आहे, हे विसरून चालणार नाही. हे असे चालत राहिले, तर आपल्या पुढच्या पिढ्या असुरक्षित, भयगंडाने ग्रासलेल्या, आत्मविश्वास गमावलेल्या, मात्र रोबोटसारख्या अत्यंत कौशल्यपूर्ण काम करणार्‍या अशा घडत राहतील. आणि चुकीचे आदर्श, चुकीच्या संकल्पना आपण सगळेजण पुढच्या पिढीपर्यंत भरभरून पोचवत राहू.

जॉन वॉटसन यांनी प्रयोग केलेल्या अल्बर्ट बाळाप्रमाणे आपल्याला आपली पुढची पिढी नकोय. अल्बर्ट हा वर्तनवादाचा पहिला बळी आहे. आपल्याला जिज्ञासू वृत्ती, सृजनशीलता, संवेदनशीलता आणि भावात्मक बुद्धिमत्ता भरभरून असलेली पिढी हवी आहे. आपली मुले ही प्राण्यांची पिल्ले नसून माणसांची मुले आहेत. आत्तापर्यंत आपल्या हातून जी पडझड झालेली असेल, ती सुधारण्याचा प्रयत्न करूया. जिथे ज्ञानात्मक आकलन होऊन अंधार दूर होऊ शकेल, तिथे तिथे नवीन ज्ञानाचे, मानवतावादी आणि रचनावादी दृष्टिकोनाचे दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात करूया.

पंकज मिठभाकरे

pankaj.mith@gmail.com

लेखक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि थेरपिस्ट आहेत. ‘अ‍ॅबनॉर्मल होम’ ह्या विशेष मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या केंद्राचे संस्थापक -संचालक.

शिक्षेचे दूरगामी परिणाम