अर्थपूर्ण पालकत्व

आपल्या प्रत्येक कृतीबद्दल सजग असणं, तिच्याशी एकरूप होणं म्हणजे माइंडफुलनेस. विपुल शहा हे माइंडफुलनेस कौशल्यावर आधारित मानसोपचारतज्ज्ञ आहेत. मुले, पालक, शिक्षक ह्यांच्यासाठी ते माइंडफुलनेसची सत्रं  घेतात तसेच वैयक्तिक समुपदेशन-सत्रंही घेतात. माइंडफुलनेस, स्वतःला ओळखणं, जीवनाचा उद्देश, पालकत्व अशा विविध विषयांवर पालकनीतीच्या आनंदी हेर्लेकर ह्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यातील काही मुद्दे… 

प्रश्नउद्देशपूर्ण, अर्थपूर्ण जगणं आणि स्वतःला समजून घेत जगणं म्हणजे काय? माइंडफुलनेस यासाठी कशी मदत करतं?

उत्तर – ह्या तिन्ही गोष्टी एकमेकींना पूरक आहेत. पण स्वतःला समजून घेणं हा ह्या साऱ्याचा गाभा आहे.

उद्देशपूर्ण जगणं म्हणजे कुठल्यातरी उद्देशासाठी जगणं.

हा उद्देश ध्रुवताऱ्याप्रमाणे बाहेरून आपल्या कृतींना दिशा देतो. त्यामुळे आपल्याला काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते, त्या दिशेनं आपण प्रयत्न करू लागतो. जगणं अर्थपूर्ण, उत्साही होऊ लागतं. स्वतःहून काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. चालढकल करणं, मरगळ, आपल्याच आरामदायक कोशात राहण्याची वृत्ती या मागे खेचणाऱ्या शक्तींना जीवनध्येय धक्का देतं. अर्थात, जीवनध्येय स्वतःला समजून घेऊन, प्रश्न विचारून, स्वतः ठरवलेलं असावं. इतरांनी थोपवलेल्या ध्येयाच्या मागे धावताना दमछाक होते. म्हणून उद्देशपूर्ण जगणं आणि स्वतःला समजून घेत जगणं हे हातात हात घालून व्हावं लागतं. तरच जगणं अर्थपूर्ण होतं. 

जीवनध्येय एकच एक असेल असं नाही. आपण जसं स्वतःला समजून घेऊ, रोजच्या अनुभवांतून शिकू तसतसं ते अधिकाधिक स्पष्ट होत जातं, बदलत जातं. ते काही तरी खूप मोठं, भव्यदिव्य असलं पाहिजे असंही नाही. आयुष्याला काही उद्दिष्ट नसलं, तर मी आयुष्यात अपयशी ठरलो असं मानायची गरज नाही. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती अर्थपूर्ण व्हावी असा प्रयत्न व्हावा. हेच एक जीवनध्येय! पुन्हा इथे ‘मला काय अर्थपूर्ण वाटतंय’ हे शोधण्यासाठी स्वतःला समजून घेण्याचा मुद्दा येतोच.

इथे माइंडफुलनेस मदतीला येतं. दात घासण्यासारखी अगदी छोटी गोष्ट समरसून केली, की ती रोजची सवय न राहता हेतुपूर्वक केलेली कृती होते.

‘मी करतोय ते मी का करतोय?’ असा प्रश्न विचारत, स्वतःला चूक-बरोबरच्या तराजूत न तोलता, कोणतीही टीका किंवा प्रतिक्रिया न देता स्वतःच्या आत बघणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचा स्वीकार करणं  हा माइंडफुलनेसचा भाग आहे. त्यामुळे मला माझ्या भावना समजू लागतात. माझ्या वागण्यामागचं कारण समजू लागल्यानं आपले निर्णय, निवडी रूढ समजुतींना, बाह्य प्रभावांना बळी न पडता अधिक विचारपूर्वक, सजगतेनं घडतात. स्वतःला समजण्याच्या ह्या आतून सुरू होणाऱ्या क्रियेचं प्रतिबिंब बाह्य कृतीमध्ये उमटतं. प्रत्येक क्षण आनंददायक होतो कारण त्या कृतीमागे अर्थपूर्ण हेतू असतो.  

प्रश्नआयुष्यातला आनंद आणि जीवनाचं उद्दिष्ट एकमेकांशी कसे जोडलेले आहेत?

उत्तर – जीवनाच्या उद्दिष्टासाठी जगताना अर्थपूर्णता येते आणि आयुष्य आनंदी होतं.

माझं शिक्षण झालं व्यवस्थापनशास्त्रात, सिम्बायोसिस विद्यापीठातून; पण त्यात काम करण्याची मला आतून अजिबात इच्छा होत नव्हती. फार उद्देशहीन, हताश वाटत होतं. मग मी एक वर्ष थांबायचं  ठरवलं. या एका वर्षात मी प्रवास केला, बऱ्याच गोष्टी शिकलो. स्वतःला ओळखण्यासाठी, मला खरंच काय करायचंय, काय आवडतंय हे शोधण्यासाठी मी हा वेळ वापरला. ‘टीच फॉर इंडिया’ची पाठ्यवृत्ती (फेलोशिप) हे माझ्या जीवनाचा उद्देश शोधण्याच्या मार्गावरचं मोठं पाऊल होतं. ही फेलोशिप संपताना मला एक कळलं, की मला मुलांबरोबर, युवकांबरोबर शिक्षणक्षेत्रात काम करायचंय. मुलांसोबत काम करताना मला मानसशास्त्रामध्ये आवड निर्माण होऊ लागली.  शिकवताना मजा येत होती; पण समाजव्यवस्था, शिक्षण, मूल्याधारित शिक्षण ह्याबद्दल बरेच प्रश्न पडू लागले. खरं शिक्षण म्हणजे काय? आनंदानं, स्वास्थ्यपूर्ण जगण्यासाठी काय लागतं?

मुलांची अस्वस्थता कमी करण्यासाठी मी वर्गात ध्यानाचे प्रयोग करू लागलो. माझा स्वतःचा अध्यात्माकडे असलेला कल, योग, विपश्यना या गोष्टी एकत्र आल्या. हळूहळू मी माझ्या जीवनाच्या उद्दिष्टाच्या जवळ जाऊ लागलो. कॉलेजमधून बाहेर पडताना हताश, निराश असलेला मी, उद्दिष्ट सापडल्यावर अतिशय उत्साही झालो. मुलांसोबत झपाटून काम करू लागलो. नवनवीन कल्पना राबवू लागलो. माझ्यासाठी ते काम न राहता तेच माझं जगणं झालं. 

दुर्दैवानं रूढ शिक्षणप्रणालीनं मला हा उद्देश शोधायला मदत केली नाही. त्यातून बाहेर पडून चाकोरीबाहेरच्या गोष्टी केल्या, माझ्या सुरक्षित चौकटीतून बाहेर पडलो, तेव्हा कुठे हे उद्दिष्ट दृष्टिपथात आलं.

मुलांना ते करत असलेल्या कामात आनंद वाटत असेल, तरच त्यांना जगणं अर्थपूर्ण वाटेल, आपण काही करू शकू असा आत्मविश्वास येईल, या जगात आपली काही भूमिका / वाटा आहे असं वाटेल.

प्रश्नपालक आणि शिक्षकांना आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट माहीत असणं महत्त्वाचं का आहे?

उत्तर –  मुलांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट माहीत असणं गरजेचं आहे. वर्गात जाण्याचा शिक्षकांना उत्साह असला, तर मुलांना त्यातून ऊर्जा मिळते. तीही कामात आनंद शोधायला लागतात. हे मी सतत बघत असतो. एखादी गोष्ट शिकवताना मला मजा येत असली, तर मुलांनाही त्यात मजा वाटते. याउलट मलाच ती गोष्ट अर्थहीन वाटत असेल, तर मुलांचाही उत्साह कमी होतो. पालकांकडे पाहून मुलंही अर्थपूर्ण, उद्देशपूर्ण आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करतात. शिवाय पालकांना आपल्या अर्थपूर्ण जगण्यातून जी ऊर्जा, आनंद मिळतो, त्याचं प्रतिबिंब पालकत्वात उमटतं. मुलांशी स्वस्थ, शांत आणि अर्थपूर्ण संवाद व्हायला लागतो. स्वीकार वाढतो. माझ्या पालकत्वाचा उद्देश काय आहे, माझी मुलं कशी असावीत असं मला वाटतं, माझ्या आणि मुलांच्या दृष्टीनं पालकत्व अधिक अर्थपूर्ण कसं होऊ शकेल, याबद्दल पालकांनी चिंतन करणं गरजेचं वाटतं. ‘आता आलंय वाट्याला तर निभवावं लागेल’ असं पालकत्वाकडे न बघता त्यामागचा उद्देश जाणून सजगतेनं, आनंद घेत पालकत्व निभावण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा पोत, गुणवत्ता वेगळीच, सुंदर असेल. पालक होण्याआधीच ‘मला पालक का व्हायचं आहे?’ याचा शक्यतो विचार व्हावा.

प्रश्नस्वतःचा शोध, आयुष्याचा हेतू शोधणं हे सुखवस्तू, कुठली भ्रांत नसलेल्या लोकांचा विषय आहे का?

उत्तर – आयुष्य अर्थपूर्ण करण्याच्या इच्छेतून स्वतःला शोधण्याची, दुःखावर प्रेमानं मात करण्याची प्रक्रिया सुरू होते. सामान्य वाटणाऱ्या कितीतरी लोकांना मी अर्थपूर्ण, एखाद्या उद्दिष्टासाठी जगताना पाहिलंय. अर्थपूर्ण जगणं ही वृत्ती आहे. रस्ता झाडणारी व्यक्ती आणि सुंदर चित्र काढणारी व्यक्ती, दोघांनाही आपलं काम तितकंच अर्थपूर्ण वाटू शकतं. मंदिर बांधणाऱ्या तीन व्यक्तींना ‘तुम्ही काय करताय?’ म्हणून विचारलं, तर पहिला म्हणतो, “मी विटा रचतोय”, दुसरा म्हणतो, “मी भिंत बांधतोय” आणि तिसरा म्हणतो, “मी मंदिर बांधतोय”. मी माझं काम किती समजून करतोय यावर माझा कामातला आनंद अवलंबून असतो. व्हिक्टर फ्रँकल हे छळछावणीत, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत त्यातून तरले, ते केवळ जीवनाचं ध्येय मनात असल्यामुळेच. मुलांच्या सोबत पुन्हा आयुष्याचा अर्थ शोधणं ही पालकांसाठी एक संधी असू शकते. हेच स्वतःला शोधण्याचं कारण बनू शकतं. 

मी सध्या जगभरातल्या किशोरवयीन आणि तरुण, उच्च आर्थिक गटातल्या मुलांसोबतसुद्धा काम करतोय. त्यांना आपल्या आयुष्याचा काही अर्थच दिसत नाहीये. आपण शाळेत का जातोय हे कळत नाहीये. त्यांच्या पुढ्यात सर्व सुखसोयी आहेत. सगळं आयतं मिळतंय. ‘मग मी कशाला प्रयत्न करावेत? कशाची चिंता करावी?’ असा त्यांना प्रश्न पडतोय. मला वाटतं काही प्रमाणात आयुष्यात संघर्ष असणं, वास्तवाशी, जगातल्या कष्टांशी संपर्क असणं हे अर्थपूर्ण जगण्यासाठी महत्त्वाचं असतं. मी पालकांना नेहमी सांगतो, ‘‘मुलांची अवास्तव काळजी करू नका, त्यांना अति-संरक्षित करू नका, सगळंच सहज उपलब्ध करून देऊ नका. त्यांना बाहेर जाऊ द्या, जग बघू द्या, प्रवास करू द्या, कुठे स्वयंसेवक म्हणून काम करू द्या. अर्थपूर्ण जगणं म्हणजे काय ते कळू द्या. स्वतःच्या अस्तित्वाचं कारण शोधू द्या.” नाहीतर ती खूप दुबळी बनतात. त्यांना नैराश्य येतं, ती चिंताग्रस्त होतात, गोंधळून जातात, हरवतात. त्यातून स्क्रीनच्या, व्यसनांच्या आहारी जातात. मग पुन्हा नैराश्य… असं जीवघेणं चक्र सुरू होतं. एक अभ्यास सांगतो, की ज्यांना जगण्याचा अर्थ, प्रयोजन सापडलं आहे, ती माणसं अधिक काळ जगतात. शरीरानं आणि मनानं ती अधिक निरोगी असतात.

आयुष्यात चांगले मित्र मिळणं खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतात. कृष्णमूर्ती म्हणतात, की नात्यांच्या आरशात स्वतःला समजून घेता येतं. शिक्षक आणि पालक ही आरशाची भूमिका बजावू शकतात.

केवळ पालक आणि शिक्षकच नाही, तर आजूबाजूचा समुदाय आणि समाजातील इतरांशी असलेली नातीसुद्धा आरसा दाखवण्याचं काम करतात. अशा नात्यांची आणि सजगपणे संवादाची  संधी मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी पालक आणि शिक्षक प्रयत्न करू शकतात. कोणत्याही नात्यामधील संघर्षाकडे स्वतःला समजून घेण्याची संधी म्हणून बघता येऊ शकतं.

जीवनाचं उद्दिष्ट शोधणं हे एखादं शिल्प घडवण्यासारखं आहे. नको असलेलं काढून टाकलं जातं. संकटाचे क्षणही संधी देऊ करतात –  नको असलेल्या गोष्टी सोडून देण्याची आणि अधिक अर्थपूर्ण, ऊर्जादायी, आनंददायी गोष्टींचं स्वागत करण्याची.   

पूर्वी आयुष्याच्या उद्दिष्टाबद्दल बोललं जायचं नाही. समाज, कुटुंब, व्यवसाय, परंपरेत रचना होत्या, ठरलेली मूल्यं होती. धर्म किंवा घरातली वयस्कर मंडळी ती भूमिका बजावायची. उद्दिष्ट ठरवण्यासाठी त्याची मदत व्हायची. आता समाज झपाट्यानं बदलतो आहे. पूर्वीची रचना आता डळमळली आहे. सांगितलेलं सगळं मुलं जसंच्या तसं स्वीकारत नाहीत. अर्थात, ते चांगलंच आहे. त्यामुळे स्वतःचा शोध घेऊन आपलं ध्येय निश्चित करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे आहे. त्यातच अनेक व्यवधानं, निरुद्देश जगणं यामुळे ती स्वतःपासून दूर जाण्याची, सहज भरकटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत माइंडफुलनेससारख्या तंत्रांचं महत्त्व अजूनच अधोरेखित होतं. 

प्रश्नसजग पालकत्वाचं प्रशिक्षण देणारी शिबिरं आणि माइंडफुलनेस शिबिर यामध्ये पालकांनी काय निवडावं?

उत्तर – खरं तर हे प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर अवलंबून असतं. दोन्ही महत्त्वाची आहेत. त्वरित परिणाम दिसण्यासाठी काही वेळा इतर प्रशिक्षणांची मदत घ्यावी लागते.

पण स्व-जाणीव, माइंडफुलनेस हा पाया आहे. उदा. स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे ही जाणीव झाली, की योग्य थेरपी, योग्य मदत कोणती व ती कशी घ्यायची हे स्वतःचं स्वतः ठरवता येतं. थेरपी घ्यायची हा आतून आलेला निर्णय असल्यानं त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात.

स्वजाणीव, माइंडफुलनेस यामुळे मुळापासून बदल होण्यास सुरुवात होते. बदलाचा निर्णय स्वेच्छेनं घेतलेला असल्यानं जास्त परिणामकारक ठरतो, जास्त काळ टिकतो. इतर प्रशिक्षणांमध्ये केवळ बाह्यवर्तनावर लक्ष केंद्रित असतं. बाहेरून सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे माइंडफुलनेसशिवाय प्रशिक्षणाचा परिणाम तात्पुरता असतो आणि पुन्हा पूर्वस्थिती येण्याची शक्यता असते.

माइंडफुलनेसचा गटात एकत्रितपणे आणि नियमित सराव करावा. एकमेकांना अनुभव सांगण्या-ऐकण्यातून प्रेरणा मिळते. शाळांमध्येही मुलांना माइंडफुलनेसचं तंत्र शिकवलं, तर त्यांच्या

स्व-जाणिवा विकसित करता येतील. बाहेरून प्रशिक्षण देणं हे वरून खत घालण्यासारखं आहे; माइंडफुलनेस हा मुळातून जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. हे अंतर्मनाशी जोडलं जाणं आहे. त्यामुळे उद्दिष्टं, मार्ग आपोआप सापडू लागतात, शोधावे लागत नाहीत. म्हणून मनातला गोंधळ शांत करणं, काही क्षणापुरती का होईना आतली शांतता अनुभवणं हे रोजच व्हावं.

प्रश्नवर्गात / कुटुंबात माइंडफुलनेस आणण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्न करता?

उत्तर – आमच्याकडे सखोल चिंतन करण्यासाठी म्हणून एक कोपरा असतो. काही प्रश्न आले तर मी मुलांना कागद-पेन घेऊन तिथे जायला सांगतो. काय झालं, माझी भूमिका काय होती, मी वेगळं काय करू शकलो असतो, मी यातून काय शिकलो… अशा प्रश्नांवर चिंतन करून त्यांना रोजनिशी लिहायला सांगतो.

कुटुंबामध्ये काही काळ एकत्र शांतपणे गोलात बसून मग आपल्याला वाटणारी भीती, असुरक्षितता ह्यासारख्या एखाद्या विषयावर बोलणं, कुणाचं कौतुक, काही अभिप्राय देणं, अशा गोष्टींतून सच्चेपणा वाढतो, सगळ्यांची एकत्रित समज वाढायला मदत होते. प्रत्येकजण दुसऱ्यासाठी आरसा बनतो. प्रत्येकाला स्वतःला समजून घ्यायला मदत होते. आणि एकमेकांमध्ये घट्ट नातं निर्माण होतं. प्रत्येक लहानसहान कृतीत माइंडफुलनेस कसा

आणता येईल याचा सराव करता येतो. त्यातून  वर्तमानात जगण्याची हळूहळू सवय होते. सुरुवातीला हा सराव रोज काही मिनिटं करत मग हळूहळू प्रत्येक कृतीत सजग राहणं जमायला लागतं.

माइंडफुलनेस ही रोज, प्रत्येक क्षणी करण्याची गोष्ट आहे. त्यासाठी सरावाची गरज असते. ध्येयरहित आयुष्य दयनीय असतं हे एक कटू सत्य आहे. पालक आणि शिक्षक म्हणून मुलांना त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट शोधण्यासाठी मदत करणं हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं ध्येय असू शकेल!

विपुल शहा

vipul.shaha@post.harvard.edu

शिक्षक-सुलभक (टीचर फॅसिलिटेटर), मानसिक आरोग्य विशेषज्ञ, समुपदेशक आणि मान्यताप्राप्त योग-प्रशिक्षक. मुख्यत्वे किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसोबत काम करतात.
शब्दांकन : आनंदी हेर्लेकर