नंतर

त्या दोन वीरांगना आल्या होत्या

सरहद्दीच्या दोन्ही बाजूंनी!

डोळे सुजवून

रडून भेकून

आक्रोश करून

आल्या होत्या

पण आता शूर

आणि सशस्त्र होऊन

एकमेकींच्या समोर आल्या

काही तावातावाने बोलल्या

शस्त्रे अस्त्रे पाजळली…

काळ थांबला होता स्तब्ध

बघत

काय घडणार आता म्हणून

दातांनी आपल्याच क्षणांची

नखे कुरतडत

थोड्या वेळाने त्याने पाहिले…

ती अजस्र भिंत आणि

काटेरी तारेचे कुंपण

उद्ध्वस्त

जमीनदोस्त!

पायासकट!

म्हणजे आता सरहद्दीचे थडगेही

सुदूर कुठे

दिसत नव्हते

आता

पक्षी

वारे

पराग

बीजे

धूळ

हवेतून

आणि

भूजल

झरे

मुळे

गांडुळे…

जमिनीतून

आणि

मुले-बाळे

सायकली

गुरे-ढोरे

कुत्री

आठवडी बाजार…

जमिनीवरून

इकडून तिकडे

तिकडून इकडे

सगळी

मुक्त जात येत राहिली

आणि दोन्हीकडे

लहरत राहिला

सप्तरंगी भव्य

इंद्रधनूचा

झेंडा!

ता. क.

सीमांत करणार्‍या

त्या राष्ट्रद्रोही बाया आता

दोन्हीकडच्या तुरुंगात आहेत

अर्थात निःशस्त्र!

आणि दोन्हीकडचे सत्ताधारी

आपल्या आपल्या

सीमारेषा शोधत

रानोमाळ

अर्थात सशस्त्र!

मोहन देस

mohandeshpande.aabha@gmail.com