आत्मकथा
माणसांमध्ये पुरुष (XY) आणि स्त्री (XX) ह्या व्यतिरिक्तही शारीरिक लिंग असू शकतात. दर २००० माणसांमध्ये १ माणूस असा असतो अशी आकडेवारी उपलब्ध आहे. त्यांना ‘इंटरसेक्स’ असे म्हणतात. शारीरिक लिंग काहीही असले तरी मानसिकदृष्ट्या आपण स्वतःला कोणत्या लिंगाचे समजतो हे वेगळे असू शकते. दर ५००० माणसांमध्ये १ माणूस असा असतो अशी आकडेवारी उपलब्ध आहे. त्यांना ‘ट्रान्सजेन्डर’ असे म्हणतात. ही आकडेवारी अशा लोकसंख्येचा केवळ एक अंदाज देते. वास्तवात ही संख्या ह्याहून जास्त असणार. कारण अशा माणसांना पुढे यायला समाज अजूनही पुरेशी मोकळीक देत नाही. बिंदुमाधव खिरे यांच्या सप्तरंग आणि इंटरसेक्स ह्या पुस्तकांमधे अशा काही मुलांच्या आत्मकथा आहेत. (ही पुस्तके आणि ह्या विषयाशी संबंधित अजूनही काही पुस्तके samapathik.org/books-for-sale/ वर मराठी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहेत.) त्यातील काही भाग पुढे उद्धृत केला आहे. त्यातून अशा मुलांना पालकांनी समजून घेण्याची किती गरज आहे हे लक्षात येतं.
———————————————————————————————————————————-
मी पाच-सहा वर्षांचा असेन. तो होळीचा दिवस होता. माझ्या घरासमोर असलेल्या हनुमान मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी मांडण्यात आली होती. गल्लीतील सर्वांत मोठी होळी म्हणून मंदिरावर मोठ्या आवाजात लाउडस्पीकर लावण्यात आला होता आणि माझ्यासारखी पाच-सहा वर्षांची मुलं मंदिराच्या ओट्यावर खेळत होती. मोठी मुलं आणि काही मोठी माणसं होळीची सजवासजव करत होती. मीसुद्धा मंदिराच्या ओट्यावर खेळायला गेलो. माझा मोठा भाऊ मोठ्या मुलांसोबत होळीची साजवसजव करत होता.
अचानक लाऊडस्पीकरवर गाणं लागलं –“मेरे हाथों मे नौ-नौ चुडियाँ है, जरा ठेहरो सजन मजबुरीयाँ है”… त्या गाण्याचे बोल ऐकताच मला काय झाले कोण जाणे, मी अगदी भान हरपून खेळणं सोडून श्रीदेवीसारखं नाचू लागलो. गीताचे बोल तर त्या वयात कळत नव्हते, पण बांगडया घालून नाचणारी श्रीदेवी मात्र कळत होती. एका चित्रपटाच्या गाण्यावर मला बेभान होऊन अगदी मुलीसारखं नृत्य करताना पाहून गल्लीतील सर्व लोक हसायला लागले, पण त्यांची तमा न बाळगता माझं नाचणं सुरूच होतं. सगळे लोक मला पाहून हसत असल्याचं बघून माझ्या मोठ्या भावाला अपमानकारक वाटलं. त्यानी रागाच्या भरात माझ्या कानाखाली एक ठेऊन दिली आणि कानाला ओढत घरी घेऊन गेला. आईनं मला जवळ घेतलं. मी रडत होतो. मला शांत केलं आणि तिथे जाऊ नको असं सांगितलं.
मला कळतं आणि चांगल्या प्रकारे आठवतं, की मी असा मुलींसारखं वागल्याची ही पहिली घटना. मला हेसुद्धा आठवतं, की मी लहानपणी खेळत असताना मुलांपेक्षा मुलींमध्येच जास्त रमायचो. मुलांच्या खेळापेक्षा मला बाहुली, खेळभांडे, लगोरी यासारखे मुलींचे खेळच आवडत होते. एकदा तर मी मुलींसोबत फुगडी खेळत होतो म्हणून माझ्या वडिलांनी मला अंगणातून मारत घरात आणलं.
या घटनांनंतर मला चांगलं कळलं होतं, की माझ्या अशा वागण्यामुळे मी मार खात आहे. त्यामुळे मी माझं हे वागणं घरच्यांसमोर येऊ देत नव्हतो आणि इथूनच सुरवात झाली, माझ्या दुहेरी आयुष्याची.
मी स्वतःला मुलगा कधीच समजत नव्हतो. माझ्या काल्पनिक जगात मी एक मुलगी म्हणूनच राहायचो; पण याच बरोबर माझं हे काल्पनिक जग जर वास्तविक जगासमोर आलं तर मी अडचणीत येईन याची मला जाणीव होती. म्हणून घरात कुणी नसताना मी आईच्या बांगडया घालून पाहायचो. ताईची ओढणी, तिच्या उंच टाचेच्या सँडल्स घालून पाहायचो. का कोण जाणे, पण हे सगळं करण्यामध्ये मला स्वर्गीय आनंद मिळत होता. …
-श्रेया, यवतमाळ. लेखकाने स्वतःचा मुलगी म्हणून स्वीकार केल्यापासून ‘श्रेया’ हे नाव घेतले आहे. ‘सप्तरंग’ पुस्तकातून साभार.
———————————————————————————————————————————-
मी मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. माझे जन्मदाते वडील ‘ढोलकी’ हे अस्सल महाराष्ट्रीयन वाद्य वाजवत आणि माझी आई एक यशस्वी नर्तिका होती. त्यामुळे नाच आणि ताल हे माझ्या रक्तातच होतं म्हणा ना. पण माझ्या आईनी मला कधीही नाच शिकवला नाही. कारण पुरुषांनी नाच करणं हे कमीपणाचं समजलं जातं.
मी मात्र एकलव्यासारखा तिचा रंगमंचावरचा प्रत्येक प्रोग्रॅम बघायचो. बारीक निरीक्षण करायचो आणि तिच्या अदांचा एकांतात रियाज करायचो. कधीकधी मी आईचे कपडे घालून आजूबाजूच्या मुलींसाठी ‘शो’ करायचो. लहानपणापासून मी खूप बायकी होतो आणि माझा बहुतेक वेळ घरातच खेळण्यात जायचा. मला मेक-अप आणि दागदागिन्यांची खूप हौस होती.
एके दिवशी आईला बरं वाटत नव्हतं म्हणून ती अचानक लवकर घरी आली. तिला दिसलं की मी साडी घालून शेजारच्या एका मुलासमोर नाचत आहे. तिला भयंकर राग आला आणि तिने मला खरपूस चोप दिला. त्या रात्री तिने मला हजारदा तरी देवासमोर या कृत्याबद्दल माफी मागायला लावली.
मला अपराधी वाटत होतं, पण त्याचवेळी मनात विचार येत होता, की मी काय चुकीचं केलं? त्या दिवसापासून माझ्या पालकांनी माझ्यावर पाळत ठेवली. मला सांगण्यात आलं, “इतर मुलांबरोबर बाहेरचे खेळ खेळत जा.” माझा आवाज आणि हातांच्या अदांवर त्यांनी नियंत्रण ठेवण्यास सुरवात केली. …
-अबिना, मुंबई. लेखकाने स्वतःचा मुलगी म्हणून स्वीकार केल्यानंतर ‘अबिना’ हे नाव घेतले आहे. ‘सप्तरंग’ पुस्तकातून साभार.
———————————————————————————————————————————-
माझ्या आईवडिलांना माझं वेगळेपण माहीत होतं; इतर जवळच्या नातेवाईकांनाही कल्पना आहे. पण कोणीच त्यासंदर्भात बोलत नाही. मी जेव्हा अकरावीत होते तेव्हा मला पाळी येत नाही म्हणून वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा माझ्या आईवडिलांना माझ्यात नेमकं वेगळेपण काय आहे हे कळलं व मला आपण वेगळे आहोत याची संपूर्ण जाणीव झाली. पण घरात या वेगळेपणाची चर्चा कधीच झाली नाही.
मी स्वतःला स्त्री समजते. पण असंही वाटतं, की मी मुलगा असते तर बरं झालं असतं. पण माझ्याकडे स्वतःला आहे तसं स्वीकारण्यापलीकडे पर्याय नाही. मी पूर्वी देवाला नवस बोलायचे की मला इतरांसारखं बनव. मी एक परिपूर्ण स्त्री नाही ही खंत कायम मनात असते. या अशा अवस्थेचा मला प्रचंड राग येतो. कधीकधी आपण ‘ऍबनॉर्मल’ आहोत असं वाटतं.
माझ्या वेगळेपणाविषयी मी कुणालाच सांगितलं नाही. घरच्यांना व जवळच्या नातेवाईकांना माहीत आहे तेवढंच. माझ्या वेगळेपणाबद्दल इतरांना सांगावं अशी जवळची माणसं फार कमी आहेत. दुसरं असं वाटतं, की आपल्या वेगळेपणाची माहिती इतरांना का देत बसावं? आपण जे आहोत ते आहोत. कोणाला त्याच्याशी काय देणं घेणं आहे?
-मीना, महाराष्ट्र. ‘इंटरसेक्स’ पुस्तकातून साभार.
———————————————————————————————————————————-
माझा जन्म एका खेडेगावात, माझ्या आईच्या माहेरी झाला. आईची प्रसूती घरच्या घरी केली गेली. माझ्या वडिलांनी जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी माझ्यात असलेलं वेगळेपण त्यांच्या लक्षात आलं. मी जशी मोठी झाले तसं इतर लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. परंतु मला माझ्यात काही कमी आहे असं वाटतच नव्हतं. आमच्या शेजारच्या बाई आमच्या आईला सारख्या म्हणायच्या, “ही अशी पुरुषासारखी खांदे उडवत का चालते?” माझ्या आईला याची लाज वाटली व तिने मला माझी चालण्याची पद्धत बदलायला सांगितली. मी त्यावेळी सहावी-सातवीत होते.
मी माझ्या वेगळेपणाविषयी कुणाशीच बोलायचे नाही. कुटुंबापलीकडे तेवढा विश्वास मला कुणावरच वाटत नव्हता. मी अभ्यासात चांगली होते. अभ्यासाची आवडही होती. माझा समज असा होता, की मी वेगळी आहे, म्हणून मला खूप अभ्यास केला पाहिजे. मी माझी उणीव अभ्यासात भरून काढत होते. माझ्या सर्व शिक्षकांना माझं कौतुक वाटायचं. मी महत्त्वाकांक्षी होते. मला असं वाटतं, की जर का मी इतरांसारखीच असते तर अतिशय सामान्य राहिले असते व असली महत्त्वाकांक्षा माझ्यात आलीच नसती.
माझ्या जवळच्या सर्व नातेवाईकांना माझ्या वेगळेपणाविषयी माहीत आहे. म्हणूनच ते मला कधीच वैयक्तिक प्रश्न विचारत नाहीत. मात्र त्यांनी मला कधीच दुजेपणाची वागणूक दिली नाही. माझ्या सर्व नातेवाईकांना मी प्रिय आहे. माझ्या हुशारीविषयी कौतुक व कर्तृत्वाविषयी आदर आहे. सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. एखाद्या विषयावर प्रसंगानुसार आपुलकीने माझं मत विचारतात. आता आमचे शेजारीही माझ्या शिक्षणाचं कौतुक करतात. मला आनंद वाटतो, की या सर्वच लोकांना माझ्यातल्या लैंगिक वेगळेपणापेक्षा माझं कर्तृत्व जास्त महत्त्वाचं वाटतं.
-वैशाली, महाराष्ट्र. ‘इंटरसेक्स’ पुस्तकातून साभार.