आदरांजली – गुणेश डोईफोडे
अॅक्टिव्ह टीचर्स फोरममधील उत्साही, उमदा शिक्षक आणि पालकनीतीचा मित्र गुणेश डोईफोडे ह्यांचं दुःखद निधन झालं.
माजी विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ असणारा आणि त्यांच्यातील सामाजिक जाणीव जपत त्यांना सोबत घेऊन काम करणारा, विद्यार्थ्यांना घरी आणून हवी ती मदत करणारा, सतत नाविन्याचा ध्यास धरून पुढे जाणारा हा व्यासंगी शिक्षक होता.
कोविड पहिल्यांदा आला तसा सुरुवातीच्या काळापासून गुणेशनं कल्याण डॉक्टर आर्मीसोबत रुग्णांच्या समुपदेशनाचं काम नोव्हेंबरपर्यंत केलं. स्वतः कोविडमधून बरा झाल्यावरसुद्धा एकीकडे हेल्पलाईनचं काम आणि दुसर्या बाजूला चांगल्या व्यवस्थेसाठी प्रशासनाशी भांडणं या दोन्ही कामांमध्ये गुणेश सक्रिय होता.
ऑनलाईन शिक्षण चालू करावं लागल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना जगातील इतर लोकांशी जोडता येईल असं पाहून ती संधी देणारा हा गुणी शिक्षक. यात गूगल कंपनीत काम करणार्या मित्रांपासून ते पुस्तकातील कवितेच्या कवींपर्यंत अनेकांना बोलवून मुलांशी गप्पा मारायला लावणारा. एटीएफमधील सर्वांना ‘व्हर्च्युअल’ आणि खरंखुरं चॉकलेट देणारा आणि ‘मला व्हर्च्युअल चॉकलेट नको, खरं हवं’ म्हणणार्या परगावातील मैत्रिणीला मित्राकरवी खरं चॉकलेट पोहोचवणारा…
गुणेश तू आणि तुझं कार्य सतत स्मरणात राहील दोस्त…