आदरांजली – डॉ. गेल ऑम्व्हेट
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्तीदलाच्या संस्थापक सदस्या डॉ. गेल ऑम्व्हेट ऊर्फ शलाका पाटणकर ह्यांचे 25 ऑगस्ट रोजी निधन झाले. डॉ. गेल ह्या मूळच्या अमेरिकन. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर चळवळींचा अभ्यास करण्यासाठी त्या भारतात आल्या आणि इथल्याच झाल्या. महात्मा फुल्यांच्या चळवळीवर ‘वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ हा प्रबंध अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सादर करून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली. बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या विचारांची तसेच संत साहित्याची डॉ. गेल ह्यांनी नवी मांडणी केली. त्यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. स्त्री आणि आदिवासी चळवळीमध्येही त्यांनी काम केले. पती डॉ. पाटणकर यांच्यासमवेत समन्यायी पाणीवाटपासाठी त्यांनी मोठा लढा दिला. स्त्री-प्रश्न जातीशी जोडलेला आहे, याची जाणीव समाजाला करून देण्यासाठी त्या शेवटपर्यंत प्रयत्नरत राहिल्या.
पालकनीती परिवाराकडून डॉ. गेल ह्यांना विनम्र अभिवादन.