प्रख्यात मानसशास्त्रज्ञ, लेखक आणि चित्रपट अभ्यासक डॉ. श्यामला वनारसे ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्या पुण्यातील ‘सेंटर फॉर सायकॉलॉजिकल सर्व्हिसेस’ ह्या संस्थेच्या संस्थापक होत्या. पुण्यात १९८५ साली मुलांसाठी सुरू झालेले गरवारे बालभवन, कलाछाया सांस्कृतिक केंद्र, अक्षरनंदन अशा अनेक संस्थांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. स्वभावाला औषध असते, सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर, संगीताचे मानसशास्त्र ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके आहेत. पालकनीतीमध्येही त्यांनी वेळोवेळी लिखाण केले होते.

त्यांच्या निधनाने साहित्य, बालकारण आणि मानसशास्त्र क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

पालकनीती परिवाराच्या वतीने श्यामलाताईंना भावपूर्ण आदरांजली!  

लेखक-समीक्षक वंदना भागवत ह्यांनी श्यामलाताईंबद्दलच्या भावना व्यक्त केल्या…

स्वतःला राष्ट्रसेवा दलाचा सैनिक म्हणवून घेणाऱ्या श्यामलाताई, म्हणजे ’सुंदराचा वेध लागलेल्या’, ‘भावार्थ जीविके’चे महत्त्व जाणणाऱ्या, कलासक्त आनंदमयी होत्या. जीवन समजून घेताना आपण एका स्थानावर उभे राहून जीवनाकडे बघितले, तर जीवनाचा वेध घेणे सोपे जाते. सामाजिक जबाबदारीचे भान असते तेव्हा तर स्थानदृष्टी फार महत्त्वाची ठरते. कारण जीवन इतके गुंतागुंतीचे आणि आवाक्यात न येणारे असते, की त्याच्या काठाकाठाने जाताना देखील भांबावायला होते. तिथे श्यामलाताईंचा ठाम सूर कानात घुमतो, ‘याच काठावर मला घाट बांधू दे’… मग उनाड पोरे मस्ती करतील, झिपऱ्या पोरी धावत सुटतील अशा प्रतिमांनी ते गीत पुढे सरकते. समाजाप्रती आस्था आहे, मुलांबद्दल अतोनात प्रेम आहे, मुले स्वतःचा आनंद कसा मिळवतील याचा शोध सुरू आहे, त्यांचा आनंद निर्मळ आणि जबाबदारही राहील यासाठी काय करता येईल, त्याचबरोबर समाजाचे जबाबदार घटक म्हणूनही मुलांना कसे उभे राहता येईल… असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी गोंधळले होते तेव्हा अक्षरनंदन आणि अनुषंगाने ना.ग. नारळकर फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून श्यामलाताई भेटल्या. पुढे स्त्री-चळवळीच्या खंद्या कार्यकर्त्या विद्या बाळ आणि गीताली वि. मं. कडेही त्या भेटल्या. आमच्या अनेक चर्चा व्हायच्या, सत्यजित रें च्या चित्रपटांपासून ते पुण्यातील एका कारखान्यात झालेल्या संपाची हाताळणी त्यांनी कशी केली इथपर्यंत. कविता, नाटक हे तर त्यांच्या रोमारोमात भिनलेले. बाल भवनवर आलेल्या संकटात ठामपणे रस्त्यावर उतरलेल्या श्यामलाताईपण आठवतात. त्यांचे खळखळून हसणे, सुस्पष्ट बोलणे, मुद्देसूद मांडणी, स्वतःच्या साध्या सोप्या पण अर्थगर्भ कविता गाणे आणि त्याच जोडीने अभिजात साहित्य व कलांचे दाखले देणे, या सगळ्या लोभसवाण्या गोष्टी होत्याच; पण त्यामागची त्यांची मानसशास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय बैठक आशयाला वजन प्राप्त करून देई. मग त्यांचे म्हणणे नेमक्या रेषांनी चितारलेल्या आकारबद्ध रूपात समोर येई. त्यात निखळ सौंदर्य असे.  

सुंदरतेचा ध्यास तुमचे सगळे आयुष्य पणाला लावू शकतो. मग तो भोवतालचा कचरा असो, मानसिक जळमटे असोत, वैचारिक विखार असो किंवा निर्मम लढली जाणारी युद्धे असोत, या सगळ्यांना विरोध म्हणजे सौंदर्याचा ध्यास. व्यक्तिगत असोत वा सामाजिक, नात्यांचे सौंदर्य हाच आपला ध्यास असतो. नाती सुंदर असणे म्हणजे काय? त्यात सच्चेपणा आणि विश्वासार्हता असावी असे आपण म्हणतो म्हणजे सत्याचा ध्यास असतो. त्यात विखार आणि दुष्टपणा नसावा म्हणजे शिवाचा अनुभव असावा अशी आपली इच्छा असते. आणि त्यात भावनांचे वैविध्य, वैचारिक संवाद, विसंवादाबद्दलची आस्थापूर्ण सहिष्णुता, आनंदाचे अनेको विभ्रम असावेत असेही वाटते. म्हणजे त्यात तैलरंगाचे जाड ठळक रंग असतील तशाच जलरंगाच्या तरल छटाही असतील अशी आस वाटणे म्हणजे सौंदर्याचा ध्यास असतो. श्यामलाताईंची स्थानदृष्टी या सौंदर्याच्या ध्यासावर उभी होती. आज भारतीय समाजजीवनाची चिकित्सा करताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे आपली सौंदर्यदृष्टी बिनसली आहे. तिला वैचारिक किंवा भावनिक तोल राहिलेला नाही. व्यक्तिनिष्ठतेचा कडेलोट एका बाजूला आणि व्यक्तिलोपाचा राष्ट्रवाद दुसऱ्या बाजूला अशा दोन टोकाच्या भावनांमध्ये आपण फाटत आहोत. सम्यक करुणेचा स्पर्शही आपल्या भावनांना नाही, मग मूल्यांचा तोल कसा राहणार? ती तशीच स्वमग्न आणि बटबटीतपणाच्या अर्थहीन फटकाऱ्यांनी विद्रूप होणार. आणि विद्रूपतेचे काही वाटेनासे झाले, की मग आयुष्य निरर्थक व्हायला वेळ लागत नाही. सौंदर्याचा ध्यास जीवनाला भावार्थाने व्यापत असतो असे श्यामलाताईंचे म्हणणे होते. सौंदर्यशास्त्राच्या स्थानावरून त्या जीवनाकडे बघत होत्या. त्यातूनच त्यांना अक्षय आनंद मिळत असावा. 

श्यामलाताईंची सकारात्मकता आणि आनंदी वृत्ती भोवतालच्या माणसांची मने उत्फुल्ल करायची. त्यांची बुद्धिमान निरीक्षणे त्या विलक्षण सहजतेने मांडत. त्यांची सर्जनशीलता विविध ज्ञानक्षेत्रांत उत्साहाने भरारी घेई. चित्रपट, नृत्य, नाट्य, साहित्य, अशी विविध कला क्षेत्रे त्यांच्या मर्मदृष्टींनी खुलून उठत. त्यांची सामाजिक भूमिका त्या तितक्याच स्पष्टतेने मांडत. त्यांच्याशी गप्पा मारणे ही पर्वणी असे. कोणत्याही विधानाने त्या अस्वस्थ होत नसत. ऐकून घेत आणि शांतपणे त्यांचे मत मांडत. त्या विविध कलात्मक विश्वांमध्ये इतक्या रममाण होत, की त्यातून भोवतालची माणसेपण समृद्ध होत. स्वतःचा मोठेपणा न मिरवता सहज फोन करून गप्पा मारणारी थोर माणसे विरळाच. श्यामलाताई त्यांच्यापैकी एक होत्या. मराठी समाज सांस्कृतिक समजेने समृद्ध करणारी आणि तो तसा व्हावा याची मनापासून आस्था असणारी माणसे संपत चालली आहेत. आता आपले आपले संचित सांभाळणे, वाढवणे आणि त्यातून स्वतःसाठी संधी मिळवणे अशा बाजारपेठीय संस्कृतीत आपण आलो आहोत. त्यामुळे श्यामलाताईंसारखी आपणच मोर झालेली लच्छी, आनंदाचे निधान होणारी माणसे हरवत जाण्याचे दुःख मोठे आहे.

लच्छी* -‘सावित्री’ ह्या पु.शि.रेगे ह्यांच्या कादंबरीतील एका गोष्टीत लच्छीचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेखाच्या शीर्षकाचा अर्थ समजायला सावित्री वाचून बघायला हवी. – संपादक 

वंदना भागवत 

 onlyvandan@gmail.com

लेखक वरिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीच्या निवृत्त प्राध्यापक आहेत. अक्षरनंदन शाळेच्या संस्थापक सदस्य. समीक्षक आणि भाषांतरकार.