आपण गिऱ्हाईक होतोय का ?
बाजार तुमच्यावर किती आणि कसा परिणाम करतोय असं वाटतं तुम्हाला? जर मी म्हणालो, की बाजारपेठ किंवा बाजारव्यवस्था केवळ तुमच्या खरेदीविक्रीवरच नाही, तर तुमच्या विचारांवर, सवयींवर, लिंगभावावर आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वत:शी असणाऱ्या ‘ओळखीवर’ परिणाम करते आहे, तर तुम्ही किती चिंतेत पडाल?
सर्वात आधी एक स्पष्ट करणं गरजेचं आहे, की या लेखात बाजारव्यवस्था हा शब्द, घाऊक उत्पादन करणाऱ्या मोठमोठ्या आधुनिक कॉर्पोरेट व्यावसायिकांनी उभारलेल्या व्यवस्थेसाठी वापरला आहे. माणसाचा बाजारव्यवस्थेशी खूप काळ संबंध आहे आणि त्याचे बाजारावरील अवलंबित्वही काही नवीन नाही. मात्र, औद्योगिकीकरणानंतर वस्तूंचं कमी श्रमात बरंच अधिक उत्पादन घेणं शक्य झालं. भारतात नव्वदच्या दशकात बाजारपेठ खुली झाल्यानंतर तर कितीतरी मोठमोठ्या कंपन्यांनी इथे बस्तान बसवलं. टेलिकॉम क्रांतीनंतर ही बाजारव्यवस्था आता प्रत्येकाच्या घरातच नव्हे, तर मोबाइलद्वारे हातात आली आहे.
आधुनिक विक्रीव्यवस्था प्रामुख्यानं ‘फायदा’ निर्माण करण्यासाठी राबवली जाते. अर्थातच, जितक्या प्रमाणात घाऊक उत्पादन घेणं शक्य आहे, तितक्या उत्पादनाला प्रत्यक्ष मागणी असेलच असं नाही. त्यामुळे आधुनिक बाजारव्यवस्था ही मागणी ‘निर्माण’ करण्याच्या मागे असते. येनकेनप्रकारेण गरज निर्माण करणं किंवा गरज आहे असा आभास निर्माण करणं या व्यवस्थेला आवश्यक ठरतं. या सगळ्या चक्रात ही व्यवस्था पालकांवरच नव्हे, तर मुलांवरही परिणाम करत असते. या लेखात, नक्की कोणत्या प्रकारचा परिणाम ही व्यवस्था करत असते आणि पालक म्हणून आपण त्याबद्दल काही करू शकतो का, याबद्दल आपण थोडा विचार करणार आहोत.
बाजार आणि ग्राहक
बाजारव्यवस्था सर्वात आधी काही करत असेल, तर ती हरेक व्यक्तीचं रूपांतर ग्राहकात करते. म्हणजे नेमकं काय करते, तर दुकानांतील वस्तूंच्या मांडणीपासून जाहिरातींपर्यंत अनेक मार्गांनी आपल्या काही सवयींना आणि विचारपद्धतीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असते. ‘पॉवर ऑफ हॅबिट्स’ नावाचं चार्ल्स डुहिग नावाच्या लेखकाचं एक पुस्तक आहे. सकाळी नाश्त्याला स्थानिक व पौष्टिक खाण्याऐवजी मका आणि साखरेनं भरलेले कॉर्नफ्लेक्स खाण्यापासून, जेवणाच्या सवयींपर्यंत आणि वेगवेगळ्या आधुनिक गॅजेट्सपासून ते झोपताना बारीक दिव्यात झोपण्यापर्यंत कितीतरी गोष्टींची सवय या बाजारव्यवस्थेनं किती योजनाबद्ध रीतीनं सबंध समाजाला लावली आहे, याची जंत्री या पुस्तकात वाचता येईल. या लेखापुरता विचार करता तूर्तास इतकं लक्षात घेणं पुरेसं आहे, की आपल्या विक्रीत वाढ व्हावी म्हणून या कंपन्या अनेक पातळ्यांवर आपल्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात – माणसाचं सतत काहीतरी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकात रूपांतर करत असतात.
ही व्यवस्था मुलांचंही ग्राहकात रूपांतर करत असते. आसपासच्या एखाद्या काठीचा घोडा आणि छत्री किंवा खाटेखाली खोट्याखोट्या घराची कल्पना करण्याच्या वयात ही बाजारव्यवस्था घराघरांत आयती खेळणी पोचवते आणि मुलांच्या सर्जनशीलतेवर नकळत परिणाम करत असते. उदाहरण द्यायचं तर, बहुतेक खेळणी खेळायची कशी याची रीतसर नियमावलीही ही व्यवस्था पुरवते. मुलं त्या प्रकारेच ती खेळणी खेळतात आणि त्यातील रस संपल्यावर नव्या खेळण्यांची मागणी करतात. किंबहुना काही खेळणी ठरावीक प्रकारेच खेळता येतील, अशी त्यांची रचना असते. अर्थातच, ह्यातून नवनवीन खेळण्यांची मागणी वाढते, विक्री वाढते आणि पर्यायानं कंपन्यांचा नफाही. मात्र, मुलाच्या सर्जनशीलतेवर त्याचा दुष्परिणाम होत असतो.
अर्थात, हे केवळ खेळण्यांपुरतं मर्यादित नाही. आपल्याला एखादी गोष्ट खरंच किती आवश्यक आहे, या कसोटीपेक्षा या कंपन्या भावनिक प्रलोभनं, स्पर्धा, माणसाचा कष्ट टाळण्याकडे असणारा सहजभाव अशा सुप्त भावनांचा हरेक बाबतीत फायदा घेऊ पाहत असतात. वस्तूंची आवश्यकता कळण्याएवढी मेंदूची पुरेशी वाढ लहान वयात झालेली नसल्यानं, केवळ भावनांवर स्वार होऊन वस्तू विकत घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं कंपन्यांना सोपंही जात असतं. नवनवी खुळं निर्माण करण्यापासून, मुलांना हरतऱ्हेच्या सवयी लावण्यापर्यंत अनेक उद्योग या कंपन्या करत असतात. सर्जनशीलतेबरोबरच, या बदललेल्या सवयींमुळे खाण्यापासून झोपण्यापर्यंतच्या अनेक बाबींवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे शारीरिक विकासावरही परिणाम होत असतो.
आणखी एक घातक गोष्ट ही बाजारव्यवस्था मुलांच्या आयुष्यात आणते, ती म्हणजे अतिरिक्त स्पर्धा. मोठमोठ्या कंपन्यांना आपल्या वस्तू वा सेवा अधिकाधिक लोकांनी विकत घ्यायला हव्या असतात. त्यामुळे मुलांमध्ये किंवा मुलांद्वारे स्पर्धा निर्माण करणं त्यांच्यासाठी आवश्यक ठरतं. स्पर्धा म्हटलं, की तुलना आलीच. एखादी गोष्ट विकत घेताना गिऱ्हाईक त्याच प्रकारच्या इतर गोष्टींशी त्याची तुलना करून त्यातून सर्वोत्तम वस्तू निवडतं. अशा मुशीतून घडलेला ‘ग्राहक’ पालकाच्या भूमिकेत असताना आपल्या अपत्याची इतर मुलांसोबत तुलना करू लागतो. मुलंही नकळत त्याचं अनुकरण करतात. या सततच्या तुलनेमुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्पर्धेमुळे मुलं आणि पालक अतिरिक्त ताण सहन करत असतात आणि कित्येकदा त्याबद्दल त्यांना माहीतही नसतं.
आपण एक उदाहरण बघूया. हात स्वच्छ धुण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण आमचा साबण इतर साबणांपेक्षा कसा वरचढ आहे हे दाखवून द्यायची चढाओढ मुलांपुढे ‘तुझा साबण स्लो आहे का?’ अशा स्वच्छतेशी संबंध नसणाऱ्या कोणत्यातरी तुलनात्मक गोष्टीला धरून मांडली जाते. ह्यातून मुलांमध्ये अनेक पातळ्यांवर स्पर्धा भिनत असते. एकतर सतत एकमेकांपेक्षा वरचढ असण्याची गरज आहे असा समज मुलांमध्ये रुजतो. त्याचबरोबर त्यासाठी स्वतःला सतत सिद्ध करत राहण्याची, कसल्यातरी कसोटीला सामोरं जात हे वरचढ असणं ‘दाखवून’ देण्याची वृत्तीही मुलांमध्ये रुजत जाते. याहून घातक परिणाम म्हणजे, तुम्ही सर्वोत्तम नसाल, तर तुमचा ‘उपयोग’ नाही हेही नकळतपणे भिनवलं जात असतं. सतत इतरांपेक्षा वरचढ असण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून काहीतरी करणं किंवा इतरांकडून शिकणं, इतरांना मदत करणं, इतरांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ असणं अशा अनेक गोष्टींकडे या स्पर्धात्मक वातावरणात पूर्ण दुर्लक्ष होतं.
आधुनिक बाजारव्यवस्थेला ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ हा एकच स्पर्धात्मक मंत्र कळतो आणि त्याचा अगदी चुकीचा अर्थ मुलांपर्यंत पोचतो. स्पर्धा हाच टिकून राहण्याचा एकमेव मार्ग नसून, खरं तर निसर्गात सहकाराच्या मार्गानं कित्येक चांगल्या गोष्टी घडत असतात; पण विक्री आणि नफा यावर उभ्या असणाऱ्या बाजाराला त्याकडे बघायचं नसतं आणि पालकांना ह्याचे काय परिणाम होताहेत त्याची जाणीव नसते.
बाजारव्यवस्थेमुळे सर्जनशीलतेवर परिणाम
बाजार म्हटलं, की ‘फायदा-तोटा’ आला. ‘नफा’ हे आधुनिक बाजारव्यवस्थेचं इंधन असतं. अर्थातच, व्यवस्थेनं आपल्यात भिनवलेलं हे ‘फायदा बघून कृती करण्याचं सूत्र’ आपल्याकडून मुलांपर्यंत इतकं झिरपतं, की ‘केवळ करून पाहावंसं वाटतं म्हणून काहीतरी केलं’ अशा प्रकारच्या कृतींमध्ये वयानुसार घट होत जाते आणि ज्यापासून काहीतरी मोजता येणारा फायदा दिसतोय त्याच कृती करण्याकडे मुलांचा कल वाढू लागतो. याचा थेट परिणाम मुलांच्या सर्जनशीलतेवर, अर्थात क्रिएटिव्हिटीवर, होत असतो.
बाजार तुमच्या नकळत अनेक गोष्टी मुलांवर लादत असतो. त्यातच एक म्हणजे पर्यायांची उपलब्धता. एस ते एक्स-एक्स-एल या मापांच्या तथाकथित ‘रेंज’पासून, सोफा-बिछाने वगैरेच नव्हे, तर अख्ख्याच्या अख्ख्या खोल्यांची ‘आदर्श’ रूपं बाजारव्यवस्था आपल्या डोक्यात घडवत असते. ही साचेबद्धता बाजारव्यवस्थेला घाऊक उत्पादन शक्य व्हावं यासाठी आवश्यक असतेच, शिवाय उत्पादनाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं फायद्याचीसुद्धा. मात्र असे साचेबद्ध पर्याय उपलब्ध असणं मुलांच्या सर्जनशीलतेला मारक असतं. घाऊक उत्पादन करण्यासाठी योग्य नसल्यानं, पठडीबाहेर विचार करणं बाजाराला परवडत नाही; पण मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ते अत्यंत आवश्यक असतं. म्हणूनच यासाठी पालकांनी सजग राहून प्रयत्न करत राहणं आवश्यक ठरतं.
बाजारव्यवस्था आणि लिंगभाव (व लैंगिकता)
वस्तूंची घाऊक निर्मिती करताना वस्तूंचं विविध कसोट्यांवर वर्गीकरण करणं बाजारव्यवस्थेला आवश्यक असतं. मग ते कपड्यांचं मापानुसार केलेलं वर्गीकरण असो किंवा मग लिंगानुसार. तुम्ही खेळण्यांच्या दुकानात गेलात की पहिला प्रश्न काय येतो? ‘कुणासाठी हवीयेत खेळणी – मुलगा की मुलगी? काय वय आहे?’ कोणत्या वयोगटाच्या मुलग्यांनी काय खेळावं आणि मुलींनी काय खेळावं याचं वर्गीकरण बाजारानं केव्हाच केलं आहे. केवळ खेळणीच नव्हे तर निळा रंग ‘मुलग्यांचा’ आणि गुलाबी ‘मुलींचा’ असंही वर्गीकरण बाजार करतो.
असं लिंगाधारित वर्गीकरण बाजारव्यवस्था फक्त रंगांबद्दलच करते असं नव्हे. एकूणच निर्मितीपासून जाहिरातींपर्यंत अनेक प्रकारे हा बाजार मुला-मोठ्यांपर्यंत लिंगाधारित साचेबद्धपणा रुजवत असतो. जाहिरातींतून तर मुलांच्या शर्टाचे डाग काढण्यापासून त्यांना रुचकर डबे देण्यापर्यंत आणि घरातील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यापासून ते केसांची निगा राखण्यापर्यंतची अनेक कामं अपवाद म्हणून देखील पुरुष करताना दिसत नाहीत. त्याचबरोबर बॅगा उचलणं, आपल्या कुटुंबासाठी इन्श्युरन्स काढणं, कार चालवणं, संध्याकाळी दमून ऑफिसातून घरी येणं अशी कामं या जाहिरातींनी पुरुषांना देऊन टाकलेली आहे. हे फक्त जाहिरातींपुरतं मर्यादित नाही बरं. वस्तूची निर्मितीही त्याचा वापर कोण करणार हे गृहीत धरून होत असते. बायका कार चालवायला लागून इतकी वर्षं झाली; पण किती कार बायकांच्या उंचीला साजेशा तयार होतात? कित्येक घरांत पुरुष रांधतात; पण किती ठिकाणी हे विचारात घेऊन ओट्याची उंची साधली जाते? या अशा अनेक गोष्टी आहेत. वरवर पाहता अगदीच क्षुल्लक वाटतात; मात्र मुलांवर याचा खूप खोलवर परिणाम होत असतो. साध्या वॉटरबॅग किंवा पेन्सिलींवर कोणाचं चित्र असावं इथपासून हे लादलेलं लिंगभावात्मक वर्गीकरण सुरू होऊन पुढे आई आणि बाबाचीच नव्हे, तर स्त्री आणि पुरुषाची बाजारव्यवस्थेनं ठरवलेली भूमिका मुलांमध्ये रुजते. अशी लिंगसापेक्ष भूमिका बाजारासाठी सोयीची असते, कारण त्यांची उत्पादनं त्यांना तशी बेतता येतात. मुलांच्या लिंगभावावर मात्र याचा मोठा परिणाम होत असतो. या सगळ्याचा आदर्श जोडीदाराच्या कल्पनेवर आणि पुढे जाऊन लैंगिकतेवर परिणाम झाल्याचा काही अभ्यासक दावा करतात. अर्थात, हे विधान अजून सिद्ध झालेलं नाही; पण तशी शक्यता असल्याचे शोधनिबंध उपलब्ध आहेत.
सामाजिक/ राजकीय परिणाम
याचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे विविधतेकडे दुर्लक्ष करत तिचा केलेला अस्वीकार. बहुसंख्य लोकांच्या गरजेला प्राधान्य देऊन बाजार चालतो. उदा. बाजारातील बहुतेक वस्तू उजवखुरी जनता डोळ्यासमोर ठेवून बनलेली असते. परंतु डावखुर्याच नव्हे, तर पाचपेक्षा अधिक किंवा कमी बोटं असणार्या, ठरावीकच आकाराची व लांबीची बोटं नसणाऱ्या इथपासून ते हात किंवा बोटंच नसणाऱ्या व्यक्तींना बाजार अनुल्लेखानं संपवतो. अर्थात, गिऱ्हाईकंही याचा विचार न करता, आहे त्या परिस्थितीत ‘चालवून’ घेतात किंवा आपल्यापुरता पर्याय शोधतात. थोडक्यात व्यवस्था आपल्याला जे देतेय त्यापुढे झुकतात. हे निव्वळ उदाहरण असलं तरी व्यवस्थेचे पाईक होण्याची हीच मनोधारणा जेव्हा एखाद्या लोकशाही देशातल्या नागरिकांची होते, तेव्हा एकारलेले समाज किंवा एखाद्याच व्यक्तीभोवती केंद्रित असलेल्या समाजाची उभारणी होताना दिसते. सतत इतर देशांच्या पुढे असणं, इतर समाजांच्या पुढे असणं, अशा ‘स्पर्धेत’ मग्न असलेला समाज सहकार, विविधतेची जोपासना, स्वनिर्मितीचा आनंद, ठेहराव इत्यादी गोष्टी विसरत जातो. आपली मुलं अशीच एकारलेली व्हावीत असं कोणालाही वाटत नसतं. मग काय करावं?
पालक काय करू शकतात?
इतर कोणत्याही व्यवस्थेप्रमाणे बाजारव्यवस्था म्हणजे काही आपल्यापासून वेगळी काढता येणारी व्यवस्था नव्हे. आपण पालक आणि मुलंही त्याच व्यवस्थेचा एक भाग आहोत. त्यामुळे ही व्यवस्था टाळणं सर्वार्थानं अशक्य आहे. इतर अनेक व्यवस्थांप्रमाणे या व्यवस्थेचेही काही फायदे आहेत. ते नाकारण्यात अर्थही नाही; मात्र वर विशद केलेले परिणामही त्या फायद्यांबरोबर येतात. मग अशा वेळी पालक काय करू शकतात ते पाहूया.
सर्वप्रथम आपण हे लक्षात ठेवायला हवं, की वस्तू विकत घेताना दाखवल्या जाणाऱ्या प्रलोभनांना बळी पडणं/ न पडणं आपल्या हातात असतं. बाजारातून गोष्टी घेताना नक्की काय विकत घेतो आहोत, का घेतो आहोत आणि नेमकी हीच वस्तू का घेत आहोत याबद्दल पालकांनी मुलांशी सतत चर्चा करणं ही पहिली पायरी झाली. त्याचबरोबर किमान काही गोष्टी, बाजारात मिळतात तशा, तयार विकत न आणता, फक्त कच्चा माल बाजारातून आणणं आणि ती वस्तू स्वतःच्या आवडीनुसार करणंही पालकांनी सुरू करावं. यातून घरातील सगळ्यांनाच नवनिर्मितीचा आनंद मिळेल आणि उपलब्ध पर्यायांना अव्हेरून आपलं आपण, आपल्याला हवं तसं काहीतरी घडवू शकतो – नव्हे तसं घडवणं आनंददायी असू शकतं – याचीही मुलं नोंद घेतील.
दुसरं असं, की घाऊक उत्पादन करणारे मोठमोठे उद्योग अर्थात ‘ब्रँड्स’ हे पर्यावरणाच्या ऱ्हासाला सर्वाधिक कारणीभूत असतात हेसुद्धा मुलांना पटवून देता येईल. ज्या वस्तू आयत्या आणतो आहोत, त्या एखाद्या मोठ्या ‘ब्रँड’चा शिक्का असलेल्या घेण्यापेक्षा व्यक्ती किंवा स्थानिक समूहानं घडवलेल्या असतील, तर त्यांना प्राधान्य देऊ शकतो. अर्थात, त्यासाठी पालकांनाही ब्रँड किंवा मोठमोठी नावं यांच्या प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या खरेदीवर ताबा ठेवावा लागेल. त्याचबरोबर या वस्तू घडवणाऱ्या व्यक्तींना, कुटुंबांना किंवा समूहाला भेटणं, मुलांना त्यांच्याशी बोलू देणं याही गोष्टी करता येतील, जेणेकरून या वस्तूंच्या निर्मितीबद्दल आणि त्यामागील कष्टांबद्दल मुलांपर्यंत माहिती पोचेल. उदाहरणार्थ, प्रत्येक वेळी एखाद्या ठरावीक ब्रँडची चप्पल खरेदी न करता मुलांसोबत चांभारदादांच्या खोपटीत जाऊन एखादा जोड घेता येईल. रोज एखाद्या विशिष्ट उद्योगसमूहाचीच दुधाची ‘पिशवी’ न लावता, जवळच्या गोठ्यात जाऊन किंवा एखाद्या स्थानिक दुकानदाराकडून बरणीत दूध आणणं, या गोष्टी करता येतील.
याचबरोबर बाजारव्यवस्थेनं लादलेले काही साचे मोडणंही आवश्यक आहे. बाजार ठसवू पाहत असलेल्या ठरावीक कप्प्यांपलीकडेही काही शक्यता आहेत याची पालकांनी मुलांना जाणीव करून देणं आवश्यक आहे. मग वडिलांनी मुद्दाम गुलाबी रंगाच्या वस्तू किंवा कपडे वापरणं असो किंवा आईनं गुंतवणुकीबद्दल निर्णय घेणं असो, मुलांसमोर हे करत राहिलं पाहिजे. व्यवस्थेनं लादलेले काही साचे आम्ही स्वीकारत असलो, तरी काही साचे नाकारणं शक्य आहे, इतकी नोंद मुलांच्या मनात होत राहणं महत्त्वाचं आहे. मुलांशी वागताना, त्यांच्या वस्तू विकत घेतानाही त्याच कसोट्या लावणं आवश्यक ठरतं. उदा. खेळणी घेताना दुकानदारानं वय आणि लिंग विचारल्यावर, थेट त्या प्रश्नाचं उत्तर न देता, नक्की कोणत्या प्रकारचा खेळ हवा आहे हे दुकानदाराला सांगणं आवश्यक आहे. बाजारव्यवस्था ही एक आवश्यक व्यवस्था असली, तरी तिला आपल्यावर किती अधिराज्य गाजवू द्यायचं ते आपण ठरवायचं असतं इतकं मुलांना समजावण्याचं काम तरी पालक नक्की करू शकतात.
एक गंमत सांगतो. कधी खेळण्यांच्या दुकानात गेलात तर, ‘आम्हाला मुलांना काहीही शिकवायचं नाहीये, त्यांचं कोणतंही ‘स्किल’ विकसित करायचं नाहीये. फक्त निरुद्देश धमाल करत वेगवेगळ्या वयोगटातल्या ५ जणांच्या कुटुंबासोबत घरात किंवा बाहेर खेळता येईल असा खेळ दाखवा,’ असं सांगा. अनेक विक्रेते असा खेळ सुचवू शकत नाहीत. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या मनात अनेक शक्यता येत असतील तर हे स्वागतार्ह आहे.
थोडक्यात सांगायचं तर, आधुनिक बाजारव्यवस्थेचे दोष टाळून मुलांवर होणारे दुष्परिणाम रोखायचे असतील, तर पालकांनी त्या दुष्परिणामांबद्दल आधी स्वतः सजग होणं खूप आवश्यक आहे. अन्यथा ही बाजारव्यवस्था आपल्यात हाव उत्पन्न करायला सज्ज असते. माणूस मुळातच असंतुष्ट म्हणा किंवा स्वतःला असुरक्षित समजणारा प्राणी आहे. अशावेळी बाजारव्यवस्था हरेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे पर्याय मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देत असते. ही अशी अक्षय्य उपलब्धता मनात एक प्रकारच्या सुरक्षिततेची भावना उत्पन्न करते. त्याचबरोबर सुरक्षा, समाधान किंवा शांतता शोधायला व्यक्ती बाह्यघटकांवर अवलंबून राहायला लागते. पालकांनी आपला आनंद, आपलं समाधान बाजारव्यवस्थेवर अवलंबून न ठेवता स्वत:तच शोधलं, तरच ते मुलांपर्यंत पोचेल. नाही का?
ऋषिकेश दाभोळकर | rushimaster@gmail.com
लेखक आयटी क्षेत्रात कार्यरत असून अटकमटक.कॉम ही बालसाहित्याला वाहिलेली वेबसाईट चालवतात.
(लेखातील चित्रे इंटरनेटवरून साभार)