चोपडा गावातील भिल वस्तीवरच्या लहान मुलांच्या वर्गात आम्ही मुलांच्या दातांच्या आरोग्यावर काम करायचं ठरवलं. त्यासाठी आपल्या वस्तीतल्या लोकांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी दात घासण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटलं. मग मुलांबरोबर वस्तीत जाऊन आम्ही पालकांशी संवाद साधायला सुरुवात केली. घरोघरी जाऊन ‘तुम्ही दात कशाने घासता?’ ‘तुमचे आजी-आजोबा दात घासायला काय वापरायचे?’ वगैरे विचारलं. गप्पांमधून हळूहळू अनेक प्रकार समोर येऊ लागले. काही पालक टूथपेस्ट, ब्रश वापरतात, काही विको पावडर, काही वस्तीत मिळणारं दंतमंजन, काही जण राख आणि मिठाच्या मिश्रणानं दात घासतात, तर कुणी कोळश्याची भुकटी वापरतं. कडुलिंब, करंज झाडाच्या काड्यांनीही काही जण दात घासतात असंही कळलं. एवढ्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल ऐकल्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असं आम्ही ठरवलं. (काहींच्या मंजनात तंबाखू असते, ते मात्र आम्ही सोडून दिलं!)
आमच्या आनंदघरात आम्ही हे प्रयोग सुरू केले. एकदा कोलगेट वापरून दात घासले. एकदा विको पावडर आणि दंतमंजन. मग कोळशाच्या पावडरनं दात घासून पाहायचं ठरवलं. त्यासाठी मुलांनी कोळसा गोळा केला. तो खलबत्त्यात कुटला. काही मोठे कण राहिले होते म्हणून ती पावडर चाळून घेतली. नंतर त्या मऊसूत पावडरीनं आम्ही दात घासले. एकदा राख वस्त्रगाळ करून त्यात मीठ घालून त्या मिश्रणानं दात घासून पाहिले. एकदा कडुलिंबाची, तर एकदा करंजाची काडी वापरून पाहिली. हे अनुभव आम्हा सर्वांसाठीच नवे आणि मजेदार होते.
रोजच्या रोज दात नीट स्वच्छ करणं ही एक गोष्ट झाली; पण ते खराबच होऊ नयेत, यासाठी काय खावं आणि काय टाळावं हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं होतं. त्यासाठी आम्ही चांगल्या दातांचा इतिहास पाहायचं ठरवलं. ज्यांचे दात अजूनही मजबूत आणि स्वच्छ आहेत अशा आजीआजोबांचा शोध घ्यायचं ठरवलं. वस्तीतल्या सीता आजी आणि कमला आजींची वयं ६० च्या पुढे, पण दात मात्र एकदम पांढरे शुभ्र आणि मजबूत! आम्ही त्यांना आनंदघरात येण्याचं आमंत्रण दिलं. सगळे खूप उत्साहात होते. मुलांनी त्यांची छोटीशी मुलाखत घेतली. त्यांना प्रश्न विचारले. ‘तुम्ही दात कशाने घासता?’, ‘तुमचे दात इतके स्वच्छ कसे?’, ‘तुम्ही काय खाता?’… आजींनी सगळ्यांशी प्रेमानं गप्पा मारल्या. मुलांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. ‘आम्ही कोळशाने दात घासतो. गुटखा, सुपारीमुळे दात खराब होतात. तुम्ही मुलं चॉकलेट, कुरकुरे जास्त खाता, म्हणून तुमचे दात लवकर किडतात.’ आज्या सांगत होत्या आणि मुलं ऐकत होती.
दात घासण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ स्वतःसाठी आणि निसर्गासाठी कितपत सुरक्षित आहेत हेही अभ्यासण्याचा पुढे आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी त्या त्या पदार्थाचा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, आपल्या हातात पोचलेल्या कोलगेटच्या ट्यूबचा प्रवास कसा कसा झाला ते शोधलं. टूथपेस्ट बनवताना त्यात एवढे चित्र-विचित्र पदार्थ टाकतात ज्यांची नावं आम्हाला अजूनही नीट म्हणता येत नाहीत! पेस्ट वापरून संपल्यावर ट्यूबच्या भविष्याचाही थोडा अभ्यास केला. ट्यूब, मीठ, कडुलिंबाची काडी, राख, कोळसा, इ. गोष्टी जमिनीत खड्डा करून पुरून टाकल्या आणि काही दिवसांनी खड्डा उकरून कोणाचं काय झालं ते पाहिलं.
प्रसारमाध्यमं सांगतात तसेच दात साफ करावेत असं काही नाही, दात घासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यातल्या स्वतःसाठी आणि परिसरासाठी सुरक्षित पद्धती कुठल्या, मुळात काय कमी खाल्लं पाहिजे जेणेकरून शक्यतो दात खराबच होणार नाहीत, असा सगळा शोध आम्ही इथल्या माणसांच्या स्थानिक इतिहासातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार स्वतःच्या वागण्यात बदल करायचा प्रयत्न करत आहोत.
शुभम शिरसाळे

shirsaleshubham@gmail.com
वर्धिष्णू संस्थेच्या आनंदघर उपक्रमातर्फे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील रामपूरा वस्तीत मुलांसोबत काम करतात.