(चित्रपट परिचय)
अद्वैत दंडवते
मुले आनंदाव्यतिरिक्त इतर भावनादेखील व्यक्त करणार आहेत, त्याही त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तितक्याच गरजेच्या आहेत हे पालकांनी समजून घ्यायला हवे.
संघर्ष आणि शांती / सलोखा यांचा संबंध बाह्यजगाइतकाच आपल्या मनाशीदेखील असतो. ह्या संघर्षमय जगात आपल्या आजूबाजूला काही शांतचित्त माणसे सुखाने नांदत असलेली आपण बघतो, त्याप्रमाणेच वरून अत्यंत शांत भासणार्या लोकांच्या मनात गोंधळ, अनेक भाव-भावनांचा संघर्षही सुरू असतोच की!
आपल्या प्रत्येक वाक्यातून, देहबोलीमधून अनेक भावना व्यक्त होत असतात. हा भावनांचा संघर्ष केवळ मोठ्यांच्याच नाही, तर लहान मुलांच्या आयुष्यातदेखील चाललेला असतो. पहिल्यांदाच शाळेत जाण्याचा दिवस, बाहेरच्या जगात पाऊल टाकताना वाटणारी असुरक्षितता, इतरांशी जुळवून घेताना करावी लागणारी तडजोड, वयात येताना शरीरात होणारे बदल समजून घेऊन ते स्वीकारताना होणारा मनाचा संघर्ष…
तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की आपल्या मनात या भाव-भावनांचे एक कार्यालय आहे आणि तिथे आनंद, दुःख, भीती, किळस, राग अशा भावना आपण कसे वागावे ह्यासाठी दिशादर्शक म्हणून काम करतात, आपल्याला येणार्या चांगल्या-वाईट अनुभवांची साठवणूक करून एक व्यक्ती म्हणून आपल्याला घडवतात.
नुसती कल्पनाही किती सुंदर आहे, नाही? 2015 साली या कल्पनेवर आधारित डिस्नेचा एक अॅनिमेटेड चित्रपट आला ‘इनसाईड आउट’ (खपीळवश र्जीीं). पिट डॉक्टर आणि रोनी डेल कार्मन यांची कथा असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः पिट डॉक्टर यांनीच केले होते. गमतीचा भाग म्हणजे या सिनेमाची कथा पिट यांच्या वयात येणार्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे.
चित्रपटाची नायिका आहे रायली नावाची 11 वर्षांची मुलगी. सगळी कथा तिच्याच अवतीभोवती फिरते. रायलीच्या मनात हवाई वाहतूक नियंत्रित करणार्या केंद्रासारखे दिसणारे एक भावनांचे केंद्र आहे. त्या केंद्रात आहेत आनंद, दुःख, भीती, किळस, राग ह्या पाच भावना; रायलीच्या नजरेतून त्या तिचे विश्व बघतात.
या केंद्रात रायलीच्या प्रत्येक अनुभवाची एक आठवण तयार होते. या सगळ्या आठवणींमध्ये काही आठवणी अगदी खास आहेत. रायलीला आयुष्यात आलेल्या काही महत्त्वाच्या अनुभवांतून त्या निर्माण झालेल्या आहेत. हे अनुभव तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू घडवतात. या प्रत्येक पैलूचे एक-एक बेट आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून रायली घडते आहे.
रायली 11 वर्षांची होते तेव्हा तिचे आईवडील गावातले त्यांचे टुमदार घर सोडून व्यवसायासाठी एका मोठ्या शहरातल्या छोट्याशा घरात राहायला जायचे ठरवतात. जुने मित्र दुरावलेले, नवीन घर, नवीन शाळा; रायली स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यात अचानक घडणार्या या घटनांमुळे तिच्या मनात भावनांचा गोंधळ उडाला आहे.
आजवर या केंद्राची प्रमुख होती ‘आनंद’. मात्र आता रायली वयात येते आहे, तेव्हा ‘दुःख’ अचानक पुढे सरसावते. त्याला एक वेगळी शक्ती मिळते. त्यामुळे दुःख रायलीच्या ज्या ज्या आठवणींना हात लावते, त्या आठवणी कटू व्हायला लागतात. यात मुख्यतः ‘मुख्य आठवणींचा’ समावेश आहे. एखादी आठवण कडू झाली किंवा तिला दुःखाची किनार आली, की ती पुन्हा कधीच पूर्वीसारखी होणार नाही.
या दरम्यान भावनांच्या कार्यालयात एक छोटा अपघात होतो. आनंद आणि दुःख, दोघीही कार्यालयातून बाहेर बेटांच्या दुनियेत फेकल्या जातात. रायलीच्या आयुष्यातून आता आनंदच नाहीसा झाल्याने तिच्या भावविश्वातील एक-एक बेट कोसळायला लागते. रायलीच्या मुख्य आठवणींना दुःखाचा स्पर्श होऊ नये याची काळजी घेत आनंद आणि दुःख यांना आता काहीही करून कार्यालयात पोचायचे आहे. सगळी बेटे कोसळण्याच्या आधी आनंद आणि दुःख कार्यालयात पोचतात का, रायलीच्या आठवणींचे काय होते, ह्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी ‘इनसाईड आउट’ बघायला हवा.
या सिनेमाची कल्पना कशी सुचली याबद्दल पिट यांनी सांगितले, की त्यांची 11 वर्षांची, नेहमी आनंदात राहणारी मुलगी वयात येण्याच्या टप्प्यावर पदोपदी चिडचिड करायला लागली. सगळ्या गोष्टींना नाक मुरडायला लागली. बाल-कल्पनांमध्ये रमणारी आपली मुलगी अचानक मोठी झाली ही कल्पना पिट यांच्या पचनीच पडेना. मग सुरू झाला एक प्रवास मुलांचे भावविश्व समजून घेण्याचा.
रायलीला आपले आधीचे शहर, जुनी शाळा, मित्र यांची आठवण येतेय, ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत याचा राग येतोय, आपल्या मनात चाललेल्या भावनिक आंदोलनांमुळे ती गोंधळून गेली आहे. आईवडील त्यांच्या वाढलेल्या व्यापामुळे तिला फारसा वेळ देऊ शकत नाहीत. या वयात मुलांना आईवडिलांची, त्यांच्याशी मोकळेपणी बोलण्याची किती गरज असते, हे ‘इनसाईड आउट’ अगदी सोप्या पद्धतीने उलगडून सांगतो.
पिट यांच्याप्रमाणेच रायलीच्या पालकांनादेखील तिच्यात होणारा बदल लक्षात येतो; मात्र अडचणीच्या मुद्द्यांना बगल देत ते तिला इतर मार्गांनी खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात. वयात येणारी मुले अचानक चिडचिडी होतात, पूर्वी ज्या गोष्टीत त्यांना रस वाटायचा त्याच गोष्टी त्यांना नकोशा होतात, हवे ते मिळवण्यासाठी ती हट्टाला पेटतात आणि आईवडिलांच्या विरुद्ध भूमिका घ्यायला लागतात. सिनेमातली रायलीसुद्धा घर सोडण्याचा निर्णय घेते. रायलीच्या भावनांच्या मुख्य केंद्रात आता आनंद आणि दुःख नसल्याने भीती, राग आणि किळस त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रायलीची आई तिला तिच्या आवडत्या हॉकी टीमबद्दल सांगते तेव्हा रायलीला आनंद न होता ती कुत्सितपणे हसून ‘खूपच छान’ एवढेच उत्तर देते.
मुलांनी नेहमी आनंदात राहावे यासाठी पालक प्रयत्न करत असतात; पण आपण स्वतः सदैव आनंदातच असतो का याचा विचार मात्र सहसा होताना दिसत नाही. रायलीच्या आईच्या मनातील भावनांच्या केंद्राची प्रमुख आहे ‘दुःख’, तर वडिलांच्या केंद्राचा प्रमुख आहे ‘राग’. त्यामुळे रायलीच्या स्वभावात होणारे बदल समजून न घेता वडील तिच्यावर आणखी जास्त चिडतात, तर आईला दुःख होते. मुले आनंदाव्यतिरिक्त इतर भावनादेखील व्यक्त करणार आहेत, त्याही त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी तितक्याच गरजेच्या आहेत हे पालकांनी समजून घ्यायला हवे.
मुलांच्या रमणीय बालपणाच्या संकल्पनेत अनिष्ट भावनांची घुसखोरी पालकांना नको असते. मुलांना अशा भावनांना सामोरे जावे लागू नये म्हणून पालकांचा आटापिटा चाललेला असतो. ‘इनसाईड आउट’ ह्या विचाराला छेद देतो. कटू आठवणी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांच्याशिवाय आनंदाला अर्थ नाही हा संदेश हा चित्रपट देतो.
आनंद आणि दुःख एकत्र अनुभवल्यानंतरच रायलीला शांतीचा अर्थ कळतो. आणि आईवडिलांच्या कुशीत रडणार्या रायलीच्या आणि सोबतच प्रेक्षकांच्या चेहर्यावरसुद्धा एक हलके हसू उमटते.
‘इनसाईड आउट’ डिस्ने हॉटस्टार तसेच यु-ट्यूबवर उपलब्ध आहे.
अद्वैत दंडवते
adwaitdandwate@gmail.com

‘वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी’ या जळगावस्थित संस्थेचे सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक. आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी वर्धिष्णू प्रयत्न करते.
छायाचित्रे इंटरनेटवरून साभार
