जॉन लेनन
‘इमॅजिन’ ही जॉन लेनन यांची कविता जगभर अनेकांची आवडती आहे. आज ऐकली तरी पहिल्यांदा ऐकली होती तसंच मन वेडावतं. ती आपापल्या वाणी-वैखरीत आणण्याचा प्रयत्न जगभरात अनेकांनी अनेकदा केलेला आहे. असा प्रयत्न सदासुंदरच असतो, कारण त्याचा अर्थ आहे, आणखी एक कवी ‘इमॅजिन’च्या स्वप्नात गुंफला गेलाय. स्वप्नाचं सत्याच्या वाटेवर आणखी एक पाऊल पडलंय. तशीच ही आपली मैत्रीण डॉ. कीर्ती मुळीक म्हणते आहे...
नाही इथे स्वर्ग, वा नरकही कोठे
नितळ आभाळ जळ पांघरून येते
वेडा म्हणाल मला, मी एकटा नसे
ऐसे हे जीवन आज सर्वांचे ॥
नाही कुठलाही देश, ना सीमा ना वेश
ना हत्या ना त्वेष, ना धर्म ना द्वेष
ऐसे हे जीवन अपार शांतीचे ॥
आज मी एकला, स्वप्न पाहतेला
तुम्ही जणू आला, हाती हात घेतला
हे विश्व असे घर आपुल्या सर्वांचे
ऐसे हे जीवन अपार प्रेमाचे ॥
नाही कुणा हाव, ना मालकीही असे
प्रेम बांधवांचे, सर्व लोकांमध्ये दिसे
वेडा म्हणालही मला, मी एकटा नसे
ऐसे हे जीवन अपार तृप्तीचे ॥
जॉन लेनन ह्यांच्या आवाजातील ‘इमॅजिन’ हे गीत यूट्यूबवर उपलब्ध आहे.
भावानुवाद : डॉ. कीर्ती मुळीक
mulickkeerti@gmail.com
स. प. महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक. कथा, कविता, ललित, समीक्षा, बाल आणि कुमार वाङ्मय अशा विविध
साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केले आहे.
