डॉ. शिरीषा साठे

शिक्षा आणि स्पर्धा या विषयांची शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी करण्यासाठी ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक डॉ. शिरीषा साठे यांच्याशी पालकनीतीच्या सायली तामणे यांनी बातचीत केली. मुळात शिक्षा ही संकल्पना समाजात कशी उदयाला आली, शिक्षेमुळे काय घडते, शिक्षा करावी की न करावी, करायची झाल्यास तिचे स्वरूप काय असावे, शिक्षेतून निर्माण होणारी भीती आणि ह्या सगळ्यांचे मेंदूवर होणारे परिणाम, स्पर्धा आणि सहकार्य अशा निरनिराळ्या मुद्द्यांवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका व्यक्तीला कर्करोग झालेला होता. पूर्वी कधी तरी तिच्या हातून एक चूक घडली होती. त्याबद्दल तिला सतत अपराधी वाटत होतं.

एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीविषयी अपराधी केव्हा वाटतं, तर तिच्या मनातली नैतिक सीमा किंवा मूल्यांचं तिच्याकडून उल्लंघन होतं. समाज काय म्हणेल किंवा समाजाला काय योग्य वाटतं याचा अपराधी वाटण्यात काहीही हात नसतो. व्यक्तीला स्वतःला मनातून अयोग्य वाटणारी कृती केल्यास अपराधी वाटतं. हे योग्य-अयोग्य असण्याचे निकष तयार कसे होतात हा भाग

वेगळा; पण आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल अपराधी वाटत असेल, तर त्याचा अर्थ आपल्या मनातली एखादी ‘लाईन ऑफ कंट्रोल’ आपण क्रॉस केलेली आहे. तर या व्यक्तीला अपराधी तर वाटत होतंच; पण तिला झालेला कर्करोग हा त्या चुकीची मिळालेली शिक्षा आहे अशी तिची ठाम समजूत झालेली होती. ही शिक्षेची संकल्पना तिच्या मनात अशी का रुजली असेल?

शिक्षेचा उगम

शिक्षा या संकल्पनेचा उदय कसा झाला ह्याकडे उत्क्रांतीच्या चौकटीत बघता येऊ शकतं. माणूस शिकार करायचा त्यावेळी त्याला टोळ्यांमध्ये राहणं अनिवार्य होतं. म्हणजे माणूस हा नाईलाजास्तव सामाजिक प्राणी आहे असं म्हणायला हरकत नाही. या टोळ्या फार तर 100-150 लोकांच्या असायच्या, कारण त्याहून मोठ्या झाल्यास प्रत्येकाला वैयक्तिकरित्या ओळखणं आणि एकमेकांवर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसतं, असं दिसून आलेलं आहे. एकत्र राहायचं असल्यास एकमेकांवर विश्वास ठेवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आपण झोपलेले असू आणि आपल्यावर संकट आलं, तर बरोबरची व्यक्ती आपल्याला उठवेल, मदत करेल हा विश्वास असणं महत्त्वाचं होतं. सहकार्य आणि विश्वास हे नेहमीच हातात हात घालून पुढे जातात. पण शेती करायला लागल्यापासून मानवी समूहांतील लोकांची संख्या थेट 1000-1500 इतकी झाली, कारण सामूहिक काम, एका ठिकाणी राहणं हे सगळं त्यात आलं. आता एवढ्या लोकांनी मिळून एकत्र तर राहायचं आहे, विश्वास तर हवा; पण खात्री काय, असा प्रश्न निर्माण झाला. तिथे मग धर्मसत्ता किंवा राजसत्ता उदयास आली. कोणी कोणाला फसवलं, तर शिक्षा करण्याचा अधिकार आला. नाहीतर फसवणुकीवर नियंत्रण कसं ठेवणार? आता राजसत्ता, धर्मसत्ता म्हटली, तर तिची अंमलबजावणी करणारी व्यक्ती किंवा प्रतिनिधी आलाच. ही किंवा अशा अनेक व्यक्ती मिळूनही सतत लक्ष ठेवणं शक्य नव्हतं. मग यावर उपाय काय, तर अशी समजूत रुजवायची, की कोणी पाहो अथवा ना पाहो, तुम्ही चुकीचं वागलात तर एक अज्ञात शक्ती तुम्हाला त्याबद्दल शिक्षा करेलच… मग सगळं सुरळीत चालेल. त्याला तुम्ही ‘कर्माचा सिद्धांत’ म्हणा, ‘पुढच्या जन्मी ते भोगावं लागतं’ असं म्हणा किंवा ‘तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जाणार की नरकात’; ही सगळी त्याचीच रूपं आहेत. हे तुमच्या मनात खोलवर बिंबवल्याशिवाय, ‘फसवू नये’ हे तुम्ही का पाळणार?

एरवी बोलतानादेखील माणसं ‘मी कोणाचं काय वाईट केलं होतं, की माझ्या बाबतीत असं झालं?’ असं सहज बोलून जातात. किंवा ‘आपण चांगलं वागलं तर आपलं चांगलंच होतं’, ‘मागच्या जन्मीचे भोग असतील’, ‘मीच का?’, ‘मी या लायकीचा नाही’.., वगैरे हे सगळं कुठून येतं? खरं तर निसर्गात न्याय असण्याची शक्यता कुठेही नाही. न्यायाशी जोडलेला असा कोणताही नियम निसर्गात नाही, तरी आपण ही वाक्यं बोलतो; त्याची मुळं शिक्षेच्या संकल्पनेत दडलेली आहेत. 

कायद्याचा उपयोग का होत नाही

शिक्षेबद्दल ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ह्याप्रमाणे दुसर्‍यांच्या अनुभवातून इतरांनी शिकावं अशी अपेक्षा असते. कायद्याच्या बाबतीतही ही अपेक्षा असते, की कायदा असल्यानं तशा गोष्टीपासून माणूस लांब राहील (डिटरंट).  मुळात चूक होऊच नये आणि झालीच तर वारंवार तीच चूक होऊ नये. अशा प्रकारे दुसर्‍यांच्या अनुभवातून शिकण्यासाठी आवश्यक असणार्‍या जोडण्या मेंदूमध्ये निर्माण व्हाव्या लागतील. त्यासाठी ती अमूक कृती आणि त्याचा तमूक परिणाम हे लगेच दिसून आले पाहिजेत. त्यातील कार्यकारणभाव स्पष्टपणे, ठळकपणे दिसून आला पाहिजे. पण आपल्या देशात, समाजात एखाद्या गुन्ह्याला शिक्षा होण्यासाठी मध्ये इतका कालावधी जातो, की त्यांच्यातील संबंध म्हणावा तसा आपल्या मेंदूपर्यंत पोहचत नाही आणि त्यातून आपण शहाणे होत नाही. त्यामुळे कायदा हा फारसा ‘डिटरंट’ ठरत नाही. म्हणजे गुन्हे रोखण्याच्या दृष्टीनं त्याचा फारसा उपयोग होत नाही. कायद्याबद्दल बोलताना आपण फक्त शिक्षेच्या तीव्रतेबद्दल चर्चा  करतो. ती शिक्षा किती ताबडतोबीनं होते आहे याकडे आपण पूर्णपणे  डोळेझाक करतो.

पूर्वीच्या काळची समाजव्यवस्था अत्यंत कर्मठ होती. त्यात प्रश्न विचारण्याची सोय नव्हती. एखादी चूक केली, तर तुम्हाला तुमच्या समाजातून बहिष्कृत केलं जायची शक्यता असे. आणि दुसरा, वेगळा समाज निवडण्याचं स्वातंत्र्य नसे. इथे परत उत्क्रांतीशी संबंध जोडून बघता येतो. एखाद्या टोळीच्या बाहेर फेकलं जाणं याचा मेंदूनं घेतलेला अर्थ म्हणजे जिवाला धोका असणं. हे मेंदूत पक्कं  बसलेलं होतं.

आताच्या काळात थोडा गोंधळ कसा उडाला आहे ते पाहा : प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे, आपले मित्रमैत्रिणी, म्हणजे आपला समाज निवडण्याचं थोडंफार स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. त्यामुळे आपल्या वर्तुळाबाहेरच्या समाजाला घाबरून आपण चुकीची कृती करणार नाही इतका त्याचा प्रभाव उरलेला नाही; कृती आणि त्याबद्दल होणारी शिक्षा ह्यांच्या मध्ये खूप वेळ निघून जात असल्यानं कायद्याचाही धाक वाटत नाही; आणि स्वत:च्या कृतीची जबाबदारी स्वतःच घेण्याची प्रगल्भता मुलांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण करायला हवी तशी ती प्रत्यक्षात केली जात नाही. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

वेगवेगळ्या शिक्षांचे परिणाम

शारीरिक इजा – मारणं, कान  पकडणं – ही तात्पुरती असते, पुढे ती जखम भरून निघते. त्यामुळे अयोग्य वर्तन टाळण्यात शारीरिक शिक्षेचा फारसा उपयोग होत नाही असं दिसून आलेलं आहे. मात्र नाकारणं, वाळीत टाकणं; थोडक्यात म्हणजे व्यक्तीच्या स्वाभिमानाला, स्वप्रतिमेला धक्का देणार्‍या शिक्षेचे परिणाम दीर्घकाळ टिकतात, कारण आदिमानवाच्या काळापासून व्यक्तीचा मेंदू या सर्वांचा अर्थ जिवाला धोका असाच लावत आलेला आहे. गटातून बाहेर टाकलं जाणं, नाकारलं जाणं याचा जिवंत राहण्यावर परिणाम होणार आहे असं वाटून, या कृती मेंदू जास्त गांभीर्यानं घेतो. अपमानाचाही परिणाम असाच दीर्घकाळ टिकतो.

शिक्षा ही संकल्पना निर्माण करणारे आणि रुजवणारे मुख्यत्वे पुरुष होते असं मानण्याला वाव आहे. कारण त्याकाळी सत्ता पुरुषांच्या हाती होती. मग स्त्रियांच्या संदर्भात शिक्षेचा विचार करताना आपल्याला काय दिसून येतं? शेती करायला लागल्यावर माणूस उद्यासाठी साठवणूक करायला लागला. आपण केलेली साठवणूक आपल्याच वंशाकडे पुढे गेली पाहिजे असं वाटल्यामुळे, स्त्रीवर जास्त जास्त बंधनं घातली गेली. त्यामुळे एकाच चुकीसाठी पुरुषाच्या तुलनेत स्त्रीला जास्त शिक्षा दिली गेली. दुसरं एक महत्त्वाचं असं, की नाकारलं जाण्याची (रिजेक्शन) भीती आणि म्हणून त्याची शिक्षा ही पुरुषांना आणि बाईला वेगवेगळी जाणवते. पुरुषांना नाकारलं जाण्याची भीती ही ‘आपला वंश पुढे जाणार नाही’ अशा अर्थानं जाणवते. म्हणूनच आपलं ‘पौरुषत्व’ सतत सिद्ध करत राहणं पुरुषांना गरजेचं वाटतं. बाईला तिचं मूल वाढवण्यासाठी इतरांच्या सहकार्याची गरज असते. त्यामुळे नाकारलं जाण्याची भीती तिला तुलनेनं जास्त वाटते. कुटुंबाकडून, समाजाकडून नाकारलं जाण्याची शिक्षा तिला अधिक त्रासदायक ठरते. एखाद्या कटुंबामध्ये नवरा-बायकोमध्ये अबोला असला, तर त्यातल्या बायकोची घालमेल जास्त होते. ह्याचा अर्थ स्त्रिया भावनिकरित्या कमकुवत असतात असा नाही, प्रत्येकाला भावनांवर ताबा मिळवता आला पाहिजे  हेही खरंच; पण मुळात स्त्रियांवर याचा परिणाम जास्त होतो असं दिसून येतं. त्याचा संबंध उत्क्रांतीशी आहे.

शिक्षेमुळे काय घडतं

शिक्षा करावी की नाही, तिचं स्वरूप काय असावं, या प्रश्नांकडे वळण्याआधी शिक्षेचे परिणाम काय होतात ते पाहिलं पाहिजे. आपल्या जिवाला धोका निर्माण करणारी कोणतीही कृती आपल्याला शिक्षेसारखी वाटते हे आपण यापूर्वी पाहिलं.

शिक्षेचे दोन भाग करता येतील – प्रत्यक्ष शिक्षा आणि वंचित ठेवणं (निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट). एखादी कृती केल्यानंतर दुसर्‍या कोणीतरी आपल्याला देतो ती प्रत्यक्ष शिक्षा, तर एखादी कृती केल्याच्या परिणामी काहीतरी गमवावं लागतं ते म्हणजे वंचित ठेवणं. म्हणजे गृहपाठ न केल्यामुळे अंगठे धरून उभं राहावं लागणं ही झाली शिक्षा. तर खेळाच्या तासाला खेळायला न जाता गृहपाठ पूर्ण करावा लागणं हे झालं वंचित ठेवणं. करायची असलेली एक गोष्ट आपण नाही केली आणि म्हणून आपल्याला आवडणारी एक गोष्ट आपण गमावून बसलो. मुलांच्या बाबतीत असं दिसून येतं, की शिक्षा करण्यापेक्षा वंचित ठेवण्याचा परिणाम मुलं स्वतःच्या कृतीची जबाबदारी घ्यायला शिकण्याकडे जाण्याचा होईल.         

मात्र निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट ठरवताना एक काळजी घ्यावी लागते. मुलाची कृती आणि त्याला कशापासून वंचित ठेवलं जाणार आहे ह्या दोन गोष्टींमध्ये कार्यकारणभावाचं नातं असायला पाहिजे. ‘तू अभ्यास केला नाहीस, तर आपण हॉटेलमध्ये जायचं नाही’, यामध्ये कृती आणि परिणाम यांचा काहीच संबंध नाही. त्यापेक्षा ‘तू आठवडाभर घरी नीट वेळच्यावेळी स्वतःच्या हातानं जेवलास, तर आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ’ हे एकमेकांशी संबंधित आहे. किंवा ‘रोज मैदानावर शारीरिक खेळ खेळलास, तरच तुला कम्प्युटरवर खेळ खेळायला मिळेल’ हे एकमेकांशी संबंधित आहे.

मुलांच्या बाबतीत शारीरिक शिक्षेचे, रागवण्याचे, ओरडण्याचे फायदे न होता तोटेच होतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. एक उदाहरण पाहू. एखाद्या मुलानं गृहपाठ केला नाही, तर साहजिकच त्या दिवशी शिकवलेलं त्याच्या मेंदूत पक्कं बसणार नाही. त्याचं हे झालेलं नुकसान भरून कसं काढायचं याचा विचार न करता शिक्षकांनी शिक्षा म्हणून दुसर्‍या दिवशी त्याला वर्गाच्या बाहेर पाठवलं, तर त्याही दिवशी शिकवलेलं त्याला कळणार नाही. म्हणजे शिक्षेमुळे मुलाचं दुहेरी नुकसान झालं. त्यामुळे वंचित ठेवण्याचा विचार करताना एखाद्या चुकीच्या कृतीमुळे होणारे नैसर्गिक परिणाम भरून कसे काढता येतील असा पर्याय काढला पाहिजे.     

तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्गात सर्वांसमोर अपमान करणं, दुर्लक्ष करणं ही ‘रिजेक्शन’ची रूपं आहेत. याचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतात, त्यांना खूप असुरक्षित वाटतं. आईनं बोलणं बंद करणं हे लहान मुलांसाठी सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतं. कारण आईनं न बोलणं म्हणजे आईनं मला टाकणं. आणि आईनं मला टाकणं म्हणजे माझ्या जिवाला धोका आहे हे मेंदूमध्ये खूप खोलवर रुजलेलं आहे.

मेंदू आणि भीती  

शिक्षेचा आणि भीतीचा संबंध आहे हे आपण आधी पाहिलं. पूर्वापार चालत आलेली शिक्षा भीतीवर आधारलेली आहे. आता भीती आणि मेंदूचा काय संबंध आहे ते पाहूया. भीती वाटायला लागली, की मेंदूची सर्व शक्ती आणि साधनं जीव वाचवण्याकडे वळवली जातात. आधी पाहिल्याप्रमाणे ही भीती शारीरिक असू शकते किंवा नाकारलं जाण्याची असू शकते. अशी भीती वाटायला लागल्यावर पळा, लढा किंवा निपचित पडा अशा तीन पर्यायांसाठी मेंदू आणि शरीर स्वतःला तयार करत असतं. त्यामुळे मग अशा वेळी सर्जनशील विचार करणं, लक्षात ठेवणं, विश्लेषण करणं, कल्पना करणं, प्रश्न सोडवणं, अशा गोष्टी मागे पडतात, कारण त्यासाठी मेंदूकडे तशी साधनं शिल्लक नसतात. मूल शाळेत किंवा घरात सतत शिक्षेसंदर्भातील भीती आणि ताण घेऊन वावरत असेल, तर आधी सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या त्या वेळी तर मागे पडतातच; पण त्या सतत मागे पडल्यामुळे, त्या क्षमता निर्माण होण्यासाठी लागणारा मेंदूचा विकास, मेंदूमध्ये योग्य जोडण्या तयार होणं हेदेखील मागे पडतं. व्यक्ती मोठी झाल्यावर, भीतीमधून बाहेर आल्यावरही या क्षमतांचा त्याच्यात अभाव जाणवतो. झोपेच्या वेळी आपला मेंदू दिवसभरातल्या अनुभवांची, माहितीची योग्य रचना आणि जोडणी करत असतो. पण एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूचं वातावरण खूपच ताणाचं आणि भीतीचं असलं, तर झोपेतही मेंदू अतिदक्ष असतो आणि त्याच्यामध्ये वरील क्षमता विकसित होत नाहीत.

बदललेल्या परिस्थितीत शिक्षा  

‘आम्ही नाही का मार खाऊन शिकलो? आमचं काय वाईट झालं? आजकालची पिढी बेपर्वा झाली आहे’ वगैरे म्हणताना आपण अनेकदा ऐकतो. हे थोडं समजून घेऊ. पूर्वी घरात खूप माणसं असायची. त्यामुळे एक रागावला तर दुसर्‍याकडे जाता यायचं. म्हणजे एखाद्यानं रागवलं, तर लगेच नाकारलं जाणं आणि जिवाला धोका वाटणं अशी त्याकाळी  परिस्थिती नव्हती. मुलांसाठी एका वेळेला अनेक नाती उपलब्ध असायची. आता ते कमी झाल्यामुळे घरातून किंवा शाळेतून आलेलं रिजेक्शन जास्त गंभीर परिणाम करतं.

आभासी (व्हर्च्युअल) जगातही आपण पोस्ट केलेल्या एखाद्या गोष्टीला ‘लाईक्स’ मिळाले नाहीत, तर आपल्याला दुर्लक्षित, रिजेक्टेड वाटतं. आपली सर्व देवाणघेवाण आता ‘ऑनलाईन’ होत असल्यामुळे आजूबाजूला माणसांचा वावर कमी झाला आहे. हे होणं साहजिक आहे, त्याला चांगलं वाईट म्हणण्याचा हेतू नाही,  काय घडतं आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.     

स्पर्धा

रॉबर्ट सपोल्स्की (डरिेश्रीज्ञू) नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो, की आपल्याला हव्याहव्याश्या वाटणार्‍या हिंसेला आणि आक्रमकतेला आपण स्पर्धा हे नाव दिलं आहे. स्पर्धेत एखाद्याला हरवणं, त्याच्या पुढे जाणं अपेक्षित असतं. स्पर्धेबद्दल आपण मोठी माणसं मुलांचा खूप गोंधळ उडवून देतो. बोलताना आपण ‘स्पर्धा स्वतःशीच केली पाहिजे’ वगैरे मोठी मोठी उदात्त वाक्यं बोलतो; पण प्रत्यक्षात खेळ, उपक्रम, अभ्यास, परीक्षा सगळ्यातच आपण इतरांशी स्पर्धा करत असतो. त्यात पहिला, दुसरा, तिसरा असे नंबर काढले जातात. प्रवेश परीक्षांमध्येही तेच. मग स्वतःशी स्पर्धा करणं म्हणजे काय आणि ती कशी करायची हे मुलं शिकणार कधी आणि कशी? तुम्ही स्पर्धेला ‘हेल्दी कॉम्पिटीशन’ म्हणा किंवा दुसरं काही हे फक्त शब्दांचे खेळ आहेत. स्पर्धा हळूहळू आक्रमकता आणि रागाकडे जायला लागते. रागाला नेहमी एक ‘टार्गेट’ लागतं. मुलं स्पर्धेच्या ताणानं आत्महत्या करतात तेव्हा हे

टार्गेट ती स्वतःच असतात. तो स्वतःवर व्यक्त केलेला राग असतो. राग आपल्याबाहेर टार्गेट झाला, की मग मारामारी, कट-कारस्थानं, दुसर्‍याचे पाय खेचणं हे सुरू होतं. मुलांनी सहकार्य शिकावं, स्वतःशी स्पर्धा करावी हे आपल्याला हवं असलं, तर त्यासाठी त्यांच्या मेंदूत तशा जोडण्या व्हायला हव्यात आणि त्यासाठी तशी परिसंस्था आपण निर्माण करायला हवी.      

लहानपणापासून आपण ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ हा वाक्प्रचार ऐकत आलेलो आहोत. त्यात स्पर्धा अध्याहृतच आहे आणि म्हणून ती नैसर्गिक आहे, असा प्रतिवाद अनेकदा लोक करतात. यात हे समजून घेतलं पाहिजे, की हे प्रजातींच्या पातळीवर बोललं गेलेलं आहे, व्यक्तीच्या नाही. प्रजाती म्हणून तुम्ही वरचढ ठरलात तर तुम्ही टिकून राहाल. मग त्या अर्थानं आपण केवळ स्पर्धेनं ‘फिटेस्ट’ ठरत नाही,  सहकार्यानंदेखील ठरतो. मात्र सहकार्य करणार्‍या अनेक प्रजाती हजारो लाखो वर्षं टिकाव धरून पुढे पुढे गेलेल्या आहेत. एकमेकांशी स्पर्धा करत आपण आज माणसं मारतच आहोत आणि आपल्या प्रजातीचं नुकसान करत आहोत. युद्ध म्हणजे स्पर्धाच तर आहे.

काही लोक याच्या बरोबर विरुद्ध बोलतात. त्यांचं म्हणणं मुलांमध्ये नैसर्गिकपणे स्पर्धा नसतेच; ती आपण त्यांना शिकवतो. हेही तितकंसं खरं नाही. हव्याहव्याशा आक्रमकतेला आपण स्पर्धा  म्हणत असू, तर आक्रमकता माणसामध्ये निसर्गतः असतेच. मात्र आपण त्याला किती खतपाणी घालतो आणि ती कुणाच्या विरुद्ध वापरतो हे महत्त्वाचं आहे. सुसंस्कृत होण्याच्या प्रवासात माणसानं अनेक गोष्टी सोडून दिल्या मग आपल्याला आक्रमकतेकडून सहकार्याकडे जायला काय हरकत आहे? शारीरिक संबंध निसर्गत: प्रजोत्पादनासाठी गरजेचे होते; पण आपण ते प्रजोत्पादनापासून  विलग केले ना? तसेच सर्व लोकांच्या गरजा पूर्ण होतील, सर्वांना समान हक्क मिळतील अशी व्यवस्था आपण निर्माण केली, की स्पर्धेचा प्रश्न आपोआप सुटतो.

डॉ. शिरीषा साठे

shirisha1964@gmail.com

डॉ. शिरीषा साठे यांनी 11 वी 12 वी च्या मानसशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तक समितीच्या अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या सल्लागार  मंडळांत मोलाची भूमिका बजावली आहे.