उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती!
उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती! आठ वर्षांपूर्वी खेळघरात यायला त्यांनी सुरुवात केली आणि कधी खेळघराच्याच होऊन गेल्या हे कळलंही नाही. ज्या गटाला गरज असेल तिथे मी जाईन असं त्या आपणहून म्हणतात. मुलांशी त्यांची पटकन मैत्री होते. प्रेमानं मुलांना जवळ घेणं, त्याची चौकशी करणं, वस्तीतील कोणत्याही अगदी खेळघरात न येणाऱ्या लहान मुलाकडे प्रेमानं हसून बघणं ही उषाताईंची खासियत आहे.
महानगरपालिकेच्या शाळेत मागे असणार्या मुलांसोबत सतत दोन वर्षे त्यांनी खेळघराच्या माध्यमातून काम केले आणि त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
अतिशय उत्साही आणि जे ठरवलं ते प्रामाणिकपणे करणं हा त्यांचा स्वभाव आहे. वर्गासाठी जाताना निरनिराळी कोडी त्या घेऊन जातात. तसंच त्यांच्या वाचनात काही चांगलं, मुलांसाठी योग्य असं काही आलं तर त्याचं कात्रण त्या आवर्जून घेऊन जातात.
मुलांप्रती असलेली कळकळ, वात्सल्य उषाताईंच्या शब्दांतून, देहबोलीतून सतत जाणवते. खेळघराच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा मनापासून सहभाग असतो.
नवीन कार्यकर्त्यांना खेळघराशी जोडून घेण्याच्या कामातही त्या सहभागी आहेत.
त्यांना माहीत असलेल्या नव्यानं शिकलेल्या गोष्टी करून पाहणे, त्या मुलांपर्यंत कशा नेता येतील यासाठी प्रयत्न करणे हे त्या सातत्यानं करत असतात.
अशी ही मुलांशी छान नाळ जुळलेली आमची मैत्रीण…आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो!