गीता बालगुडे

शाळेच्या वेळेत मुलांमध्ये मन रमायचं. पण घरी असलो की घरात थांबूच वाटायचं नाही. निष्पर्ण वृक्षासारखं. घराच्या भिंती आणि आम्ही दोघं. त्यातून चिडचिड होई. कधीकधी भांडण. ते भांडण खूप विकोपाला जायचं.

हे असं का व्हायचं, तर लग्न होऊन पाच वर्षं झालेली. त्यात चार वेळा अ‍ॅबॉर्शन. डॉक्टरांनी शरीरावर विविध प्रयोग केले; पण तरीही मूल नाही. नेमकं उत्तर डॉक्टरांनाही सापडत नव्हतं. एकूण घर हसरंखेळतं नव्हतं.

मूल नाही म्हणून सासूबाई आणि माझे नेहमी खटके उडायचे. मीही चिडचिड करायचे. देवधर्म, उपासतापास, नवससायास करून कंटाळून गेले होते. मध्येच आशेचा किरण दिसला; मी गरोदर राहिले. दोन महिने झाले होते. फलटणला ट्रीटमेंट चालू होती. पण सोनोग्राफीमध्ये कळलं, की बाळ पिशवीत न वाढता ट्यूबमध्येच वाढतं आहे. डॉक्टरांनी धोक्याची सूचना दिली. या अगोदरही एकदा ‘एक्टॉपिक प्रेग्नंसी’ला सामोरं जावं लागलं होतं. यामध्ये डाव्या बाजूची ट्यूब कापली होती. आणि आता हे. त्यामुळे गरोदर राहण्याची 50 टक्के असलेली शक्यता आता शून्यावर येणार होती. टेन्शन भरपूर आलेलं; पण कराडला एका दवाखान्यात ती ट्यूब वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. अन् पुन्हा वाट पाहणं सुरू झालं. त्यात दोन-तीन वर्षं घालवली. पण आशेचा किरण दिसेना. मन पल्लवीत होईना. मुंबई, पुणे, कराड, बारामती अशा ठिकाणचे दिग्गज डॉक्टर आणि आग्या वेताळापासून फिरस्ती देवऋषांची ट्रीटमेंट घेतली. शेवटी सगळेच उपाय संपले. टेस्ट ट्यूब बेबी हाच एक खर्चिक इलाज करायचा बाकी होता;  तोही बिनभरवशाचा. कारण त्यावेळेस त्याचा ‘सक्सेस रेट’ खूपच कमी म्हणजे 30-40 टक्केच होता. शिवाय शरीराचे होणारे हाल वेगळेच! मग ठरवलं, आता औषधोपचार बंद. विज्ञानाला शरण जाण्यापेक्षा सामाजिकतेला शरण जावं असा विचार मनामध्ये बळावू लागला.

शाळा-कॉलेजमध्ये शिकत असताना एक ‘आदर्शवाद’ म्हणून मूल दत्तक घ्यायचं ठरवलं होतं. आता ते पुन्हा डोक्यामध्ये फोफावू लागलं. आपण या गोष्टीचा विचार करावा काय? अशातच माझे जवळचे मित्र परेश, समीक्षा, संतोष यांनी या विचाराला बळकटी दिली. खूप चर्चा केली. विचार केला. सगळ्या साधकबाधक चर्चेनंतर विचार पक्का होऊ लागला. परंतु माझा नवरा मात्र यासाठी अजिबातच सहमत नव्हता. माझ्या माहेरची मंडळी यासाठी तयार होती; परंतु सासरची काहीच खात्री नव्हती. त्यावेळेस हा विचार करणं म्हणजे एक प्रकारची क्रांतीच होती. कारण असं उदाहरण आमचे नातेवाईक, मित्रमंडळी, कुठेच नव्हतं. माझे आई, वडील, बहीण, भाऊ मात्र ठामपणे माझ्या मागे उभे होते. मला माझीही भीती वाटतच होती. मी बाळाला नीट सांभाळू शकेन का? न्याय देऊ शकेन का? अवतीभोवतीच लोक तिच्याशी कसे वागतील? पण निर्णय मात्र ठाम होता. माझी ही आंदोलनं चालू असताना परेशने मात्र नवर्‍याशी बोलून बोलून त्याचं मतपरिवर्तन केलं. तेही याला तयार झाले. या काळातच धाकट्या दिरांना मुलगी झाली. तर सासूबाईंचं मत असं झालं, की ती मुलगी आम्ही दत्तक घ्यावी. परंतु याला माझं मन तयार नव्हतं. आम्ही विचार करत होतो. या काळात परेश मात्र आमच्याशी सतत याच एका विषयावर बोलत होता.

आणि एके दिवशी आम्ही दोघं या विषयावर ठाम झालो, की आता आपल्याला मूल दत्तक  घ्यायचं आहे. या काळात परेशने आम्हाला मूल दत्तक घेतलेल्या त्याच्या अनेक मित्रांना

 भेटवलं. त्यांच्याशी आम्ही बोलत राहिलो. माझ्या मनात मुलाविषयीची ओढ वाढली. माझे मिस्टरही आता मानसिकदृष्ट्या यासाठी खूपच तयार झाले. स्वतःच्या आईलासुद्धा त्यांनी हे व्यवस्थित पटवून दिलं. घरातल्या सगळ्यांचीच मानसिक

तयारी झाली. दत्तक घेण्यासाठी परेशनी औरंगाबाद आणि पुण्याच्या संस्थांची नावं सुचवली, त्यापैकी ‘सोफोश’मधून मूल घ्यायचं ठरवलं. ठरवल्यापासून मुलगी मिळायला दीड वर्ष लागलं. सुरुवातीला आम्हाला बाळ बघायला बोलवलं. एक अनामिक ओढ, हुरहुर आमच्या मनामध्ये होती. तिथल्या ताईंनी गोड नाजूक एक महिन्याची सई आमच्या कुशीत दिली. तिचे ते लुकलुकणारे डोळे बघून आमच्या दोघांचेही डोळे पाणावले. न खाता-पिता दिवसभर आम्ही सईबरोबर थांबलो होतो. खेळत होतो. संध्याकाळी घरी जाताना असं वाटलं, की बाळाला आत्ताच घरी घेऊन जावं. परंतु कायदेशीर बाबी पूर्ण व्हायच्या होत्या.

मध्ये काही काळ गेला. ‘सोफोश’मधून आम्हाला बोलावणं येईना. फोनवर काही सांगायला त्यांनी नकार दिला. प्रत्यक्ष भेटायला या असं सांगितल्यावर लगेच दुसर्‍या दिवशी माझे मिस्टर व समीक्षा ‘सोफोश’मध्ये गेले. तिथे गेल्यावर कळलं, की सईला केईएममध्ये अ‍ॅडमिट करावं लागतं. त्यांनी आम्हाला थोडे दिवस थांबायला सांगितलं. दुसर्‍याच दिवशी मी आणि माझी बहीण बाळाला बघायला केईएम ला गेलो. येताना बाळासाठी बरीचशी खरेदीही करून आणली. त्यावेळेस परिस्थितीचं गांभीर्य माझ्या लक्षातच आलेलं नव्हतं. आम्ही फोनवरून चौकशी करतच होतो. काही दिवसांनी त्यांनी सांगितलं, की तुम्हाला दुसरं बाळ घ्यावं लागेल; परंतु माझं मन सईमध्येच गुंतलेलं होतं. आम्ही तिच्यासाठी वाट बघणार

 असल्याचं कळवलं. पण ती हे जग सोडून गेल्याचा आम्हाला काही दिवसांनी निरोप मिळाला. एक फूल फुलण्याअगोदरच गळून गेलं होतं.

या संपूर्ण कालावधीत परेश आणि समीक्षा ह्यांनी आम्हाला खूपच सावरलं. लग्नानंतरचा सगळा सारीपाट डोळ्यापुढे येत होता. मुलासाठी केलेले प्रयत्न आठवले. सासूबाईंनी जे जे सांगितलं ते ते मी केलं होतं. सगळ्यात भयंकर म्हणजे एका देवऋषानं रुमालामध्ये पंधरा दिवसांची लिंबं बांधून दिली होती. रोज ते लिंबू न चिरता न धुता अख्खं खायचं असं पंधरा दिवस केलं. अजूनही पदरी यश येईना. काय करावं? डोळ्यापुढे काळोख पसरला होता.

आणि अशातच पुन्हा फोन आला. सईच्या आठवणी घेऊनच आम्ही ‘श्रीवत्स’मध्ये प्रवेश केला. पूर्वीला हातात घेताना मला त्यात तिचे तेच लुकलुकणारे डोळे दिसले. पूर्वीला आत्ता आम्ही घेऊनच जाणार असा आम्ही यावेळेस शर्मिलाताईंना आग्रहच केला. दोन आठवड्यातच हे बाळ आम्हाला देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आणि खरंच 21 सप्टेंबर 2012 ला पूर्वीला आमच्या कुशीत दिलं.

परेश, दीपक, समीक्षा, संतोष, राणी, प्राजक्ता, बाबूलाल, राजू, राजश्री, माझा भाऊ विजू असे सगळेच तिच्या स्वागतासाठी जमले होते. आमच्या दोघांच्याही चेहर्‍यावर परमोच्च आनंद होता. आज मी आई आणि हे बाबा झाले होते. पूर्वीचं नाव बदलून आम्ही ‘तुळजा’ ठेवलं. हे नाव ठेवताना गंमतच झाली. राजन खान आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला तुळसा नाव सुचवलं; परंतु आम्ही तुळजाच ठेवलं. आम्ही सगळेच खूप खुशीत होतो. परेशनी आमच्या मानसिक तयारीसाठी प्रयत्न केले नसते, तर कदाचित आजही आम्ही उदासपणे घराच्या चार भिंतींत जीवन अनुभवत राहिलो असतो.

सगळ्याच नातेवाईकांनी तुळजाचं स्वागत केलं. ती सगळ्यांची लाडुकली झाली. आई-बाबा होणं सुखाचं आणि तितकंच जबाबदारीचंही होतं. पावणेतीन महिन्यांचं तुळजाचं रुटीन बदलून इथल्या वातावरणाशी मिळतंजुळतं व्हायला महिना लागला. कधी घरी जातो आणि बाळाला घेतो असं आता आम्हाला दोघांनाही व्हायचं. आमच्या घराच्या भिंती आता किलबिलायला लागल्या होत्या. पहिली दिवाळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी झाली. सगळ्यांनीच तिला छानपैकी स्वीकारलं होतं. त्यामुळे माझ्या मिस्टरांना असलेली सामाजिक स्वीकृतीविषयीची भीती पूर्णच नाहीशी झाली. तुळजाचा पहिला वाढदिवस घरातच सगळ्या नातेवाईकांबरोबर साजरा केला. माझी आणि तिची चेहरेपट्टी एकच होती. पण आता ही माझी मोठी झालेली लेक म्हणते, ‘‘आई माझं नाक बाबासारखं आहे. तुझ्यासारखं नाही.’’ आमच्या भावकीतल्या काही बायका म्हणायच्या, की तू बहुतेक सरोगसी केलेली आहे. हिचं दिसणं, सवयी, आवडीनिवडी तुझ्यासारख्याच कशा? आता सगळ्यांनीच हे बाळ आपलंच आहे यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सुरुवातीला तिच्याशी बोलताना तुला दोन दोन आई-बाबा आहेत, तू खूप भाग्यवान आहेस, असं मी सांगत असे. आणि यावरती ती खूप छान ‘रिअ‍ॅक्ट’ही होते. तिला असं वाटतं, की ती  कृष्णच आहे.

आता तुळजा बारा वर्षांची झाली आहे. बारा वर्षं कशी भुर्रकन गेली कळलंच नाही. माझी ही लेक आता खूप हुशार, मनमौजी, स्वतःला पटतं तेच करणारी आणि शहाणीही झाली आहे बरं का!

ग्रामीण भागात मुलं दत्तक घेणं हे दुर्मीळ आहे. आम्ही दत्तक-पालक आहोत हे एव्हाना पंचक्रोशीत ठाऊक झालेलं आहे. त्यामुळे ज्यांना मूल नाही ते आमच्याकडे येतात, विचारतात. आम्हीही त्यांना मूल दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देतो. आजवर चार पालक येऊन भेटले. त्यांनी तुळजाशी खूप गप्पा मारल्या. तीही त्यांच्याशी खूप छान बोलते.

मागच्या वर्षी सैनिकी स्कूल परीक्षेच्या तयारीसाठी मी तिला सातारला ठेवलं होतं. सहा महिने ती तिकडे होती. या काळात एकही रात्र आम्ही व्यवस्थित झोपलो नाही. तिच्यासाठी जिवाची नुसती घालमेल व्हायची. रात्र रात्र जागरण. तिच्यासाठी आम्ही खरंच खूप वेडे आहोत. इतका आम्हाला तिचा लळा लागलाय. आज तुळजाबरोबर एकेक क्षण अनुभवत असताना त्यावेळी धाडस करून घेतलेल्या निर्णयाबद्दल भारीच वाटतं. या सगळ्यामध्ये माझ्या आसपास असणार्‍या लोकांनी दिलेली साथही कौतुकास्पद आहे. आम्ही राहत असलेल्या ग्रामीण भागात लोक आम्हाला याविषयी माहिती विचारतात .

तुळजा दोन वर्षांची असताना आम्ही जेजुरीला कडेपठारच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलो होतो. मस्त करवंदं खाल्ली. खूप खेळलो. या सगळ्या काळात ती माझ्या मिस्टरांच्या कडेवर होती. संध्याकाळ होत आलेली. अचानक त्यांच्या पायाखालचा दगड निसटला आणि तुळजाला घेऊन ते पडणार हे त्यांना जाणवलं. त्यांनी स्वतःचा पाय फिरवला आणि तिला पोटाशी घट्ट पकडलं. त्यांचा पायाचा बॉल निसटला. मात्र तुळजाला किरकोळच खरचटलं. या घटनेवरून मला त्यांच्या तिच्यावरच्या प्रेमाची साक्ष पटली. आता मी एकदमच निर्धास्त झाले आहे.

हे सगळं लिहिण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच, की ग्रामीण भागात, विशेषतः परंपरागत वातावरणात, दत्तक-मूल ही संकल्पनाच अनोळखी, अवघड; अशा वेळी मूल दत्तक घेऊन आपलं आई-बाबा होण्याचं सुख आपणच उपभोगायचं असतं. समाज, नातेवाईक काय म्हणतील यापेक्षा माझं सुख कशात आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. मूल होण्यासाठी एका मर्यादेच्या बाहेर जाऊन वैद्यकीय उपचार करून घेऊन आणि स्वतःच्या शरीराचं वाटोळ करून आपलंच आयुष्य कमी करणं योग्य नाही; आणि आता ते मनाला पटतही नाही. स्वतःच स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे.

‘सोफोश’सारख्या अनेक संस्थांपैकी कुठे तरी आपलं बाळ आपल्या कुशीत शिरण्याची वाट पाहतं आहे. गरज आहे ती फक्त त्या दिशेनं पाऊल उचलण्याची!!

गीता बालगुडे

geetajagtap76@gmail.com

बारामती तालुक्यातील वायाळ पट्टा गावात प्राथमिक शिक्षक.  भारत ज्ञान-विज्ञान समितीच्या राज्य-सदस्य.