प्रणाली सिसोदिया
‘‘पोरंहो, आजच्या संवादगटाचा विषय ना ‘शाळेत होणारी शिक्षा’ हा आहे.’’
‘‘काहो ताई, आमच्या जखमांवर काबन मीठ चोळताय?’’ पवन.
‘‘अरे, मी पालकनीती मासिकासाठी काम करते ना, त्यात शिक्षा या विषयावर मला एक लेख लिहायचा आहे. हा लेख आपल्या गप्पांमधून लिहायचा आहे. आपल्या आनंदघरातल्या मुलांचे शिक्षेविषयी काही अनुभव असतील तर ते, त्यांना शिक्षेविषयी काय वाटतं ते मांडायचं आहे.’’ इति मी. एव्हाना आमच्या मोठ्या मुलांना मासिक, लेख हे जरा समजायला लागलंय.
‘‘बसा रे मंग गोलात… ताई लेख लिहिनारे. आपला आवाज गहिर्या लोकांपर्यंत पोचेल अन् आपल्याला होनारी शिक्षा थोडी तरी कमी होईल.’’ वर्गातल्या एका डॅशिंग मुलीनं फर्मान काढताच सर्वजण खूप हसले आणि शेवटी गप्पांना सुरुवात झाली.
‘माझ्या लक्षात राहिलेली शिक्षा’, शिक्षेचे प्रकार, ‘स्वतःला किंवा वर्गात इतर कुणाला शिक्षा झाली की आम्हाला कसं वाटतं’, ‘शिक्षकांना मुलांना शिक्षा का करावीशी वाटत असेल’ आणि शेवटी सगळ्यात भन्नाट म्हणजे ‘मी शिक्षक असतो तर’ अशा अनेक मुद्द्यांवर गप्पा रंगल्या.
एकेकानं शिक्षेबद्दलचे स्वतःचे अनुभव सांगायला सुरुवात केली.
‘‘ताई, ती आपल्या आनंदघरात सुषमा होती ना, तिच्या कानात सरांनी इतक्या जोरात मारली होती, की पुढचे कितीतरी दिवस तिला ऐकूच येत नव्हतं.’’
‘‘ताई, माझ्या लहान बहिणीला एकदा शाळेत मार बसला आणि घरी येऊन ती आजारी पडली. आता तर ती शाळेतच जायला नाही म्हणते.’’
‘‘ताई, आमचे सर तर लै डेंजरेत. तळहातावर छड्या न देता उलट्या हातावर मारतात. रात्री हाताच्या नसा खूप दुखतात. आणि परत घरी आल्यावर काम पण करावं लागतं.’’
‘‘ताई, आमचे सर तर मुलींनापण खूप हानतात. आता आम्ही मोठ्या झालोय ना ताई, तर मार खाताना खूप लाज वाटते. मुलींना काहीही बोलतात. असं वाटतं आताच स्वतःला इथेच गाडून टाकावं.’’
‘‘अरे ताई, हे तर काहीच नाही. आमच्या शाळेत मारण्याची शिक्षा तर करतातच पण पैशांचा दंडपण करतात. लहान मुलांना 5 रु. आणि मोठ्यांना 10 रु. असतात ताई.’’
‘‘आणि सगळ्यात वाईट म्हणजे ना ताई आपण घरी येऊन सांगितलं ना, की मला शाळेत विनाकारण शिक्षा केली, तर घरचेपण विश्वास ठेवत नाहीत आणि वरून ते परत आम्हाला मार मार मारतात. कदी खतम होनार हो ताई ही शिक्षा??’’ इति आनंदघरातली मुलं.
हे सगळं शांतपणे ऐकणारा मनोज मध्येच म्हणाला, ‘‘पण ताई, आमची शाळा चांगली आहे ना म्हणून आम्हाला एवढं नाही मारत. फक्त कधीकधी छड्या देतात. खूप मस्ती केली तर वर्गाबाहेर उभं करतात किंवा रागवतात. आणि शिक्षकांनी खूप मारलं तर घरचे शाळेत येतात कारण आता विद्यार्थ्यांना जास्त शिक्षा करायला परवानगी नाहीये ना.’’
‘‘बरोबर बोलतोय ताई मनोज. मुलांनी कहर केला तर मग आमचे सर-मॅडम स्वतःवर घेतच नाहीत, डायरेक्ट पालकांना शाळेत घेऊन यायला सांगतात. पण मग घरी आल्यावर पप्पा खूप धुतात ताई,’’ यश खाली मान घालून पण हसत म्हणाला.
मनोज आणि यश ही दोन्ही मुलं शहरातील उच्च मध्यमवर्गीय पालकांची मुलं शिकत असलेल्या शाळेत जातात. मनोज स्वतःला भाग्यवान विद्यार्थी मानतो. त्याला त्याची शाळा या मुलांच्या शाळांच्या तुलनेत चांगली वाटते.
मुलांशी बोलताना जाणवलं, की त्यांना वर्गातल्या इतर मुला-मुलींना शिक्षा केली तरी वाईट वाटतं. काही मुलं गरीब असतात. त्यांच्याकडे वह्या घ्यायला पैसे नसतात आणि मग अशा वेळी त्या मुलांना वर्गाबाहेर काढलं की आम्हाला खूप वाईट वाटतं, असं त्यांच्या बोलण्यातून पुढे आलं.
‘‘ताई, सर-मॅडमपण चुकतात ना कधीकधी. मग त्यांना कोणी आणि काय शिक्षा करायची, सांगा बरं. कधीकधी गहिरा राग आला ना, तर आसं वाटतं, की सरले धोई काढू नाही तर काहीतरी टोकदार खोपशी देऊ.’’ आठवीत शिकणार्या, शरीरयष्टीनं दांडग्या असणार्या महेशनं मध्येच तावातावानं त्याचा संताप व्यक्त केला; पण मग थोड्या वेळानं शांत झाल्यावर हेही म्हणाला, की एक सर खूप प्रेमळ आहेत. शाळेला उशीर झाला की कारण विचारतात, समजून घेतात आणि तो चुकला तर त्याला समजावून सांगतात. हे सर मात्र महेशला देवमाणूस वाटतात.
‘‘शिक्षक शिक्षा का बरं करत असतील रे?’’ हळूच मी त्यांना पुढच्या प्रश्नाकडे वळवलं. या प्रश्नावर मात्र मुलं विचारात पडली. मनात – डोक्यात खूप काहीतरी सुरू आहे हे काहींच्या चेहर्यावरून स्पष्टच जाणवत होतं.
थोड्या वेळानं सलोनी विचार करत करतच म्हणाली, ‘‘ताई, मला वाटतं त्यांना घरचे त्रास देत असतील आणि म्हणून वैतागून ते आमच्यावर संताप काढत असतील.’’ तितक्यात चंदू म्हणाला, ‘‘ताई, मला काय वाटतं ना, काही सर-मॅडमला असं वाटत असेल, की आम्हाला मारलं नाही तर आम्ही त्यांचं ऐकणारच नाही; पण तसं नाहीये ताई.’’
‘‘ताई, आम्ही मस्त्या केल्या, अभ्यास नाही केला की सर धुतात ताई.’’ खोडकर विशाल हळूच गालातल्या गालात हसत म्हणाला.
‘‘ताई, मला तर वाटतं की शिक्षकांनापण विचारलं पाहिजे, की मुलांना शिक्षा केली की त्यांना कसं वाटतं. मला नाही वाटत ताई त्यांना आनंद होत असेल,’’ भावनानं आपलं मत मांडलं.
आधीच्या प्रश्नावर हसत हसत स्वतःचे अनुभव सांगणारी मुलं या प्रश्नावर मात्र फार बोलू शकली नाहीत; मात्र जे 3-4 मुद्दे मांडले होते ते खूप विचार करून मांडले होते. विशेष म्हणजे प्रचंड मार खाणारी ही मुलं शिक्षकांच्या बाजूनंही विचार करण्याचा प्रयत्न करत होती.
आणि शेवटी मुलांच्या आवडीचा प्रश्न आला; ज्याची ती खूप वेळेपासून वाट बघत होती. ‘मी शिक्षक असतो तर?’ किंवा ‘मी शिक्षिका असते तर’ या प्रश्नावर बोलताना मात्र मुलांमध्ये एकमत होतं. स्वतः शिक्षेला सामोरी जात असूनही त्यांच्यापैकी कुणालाही त्यांनी अनुभवलेल्या शिक्षेपैकी एकही शिक्षा करायला आवडणार नव्हतं आणि ह्यावर गटाचं एकमत होतं.
‘‘बरं, मग काय कराल तुम्ही? शिक्षा कराल की नाही?’’ इति मी.
‘‘मग ताई, शिक्षा तर करूच पण ज्यानं मनाला वाईट वाटेल, अभ्यासावर परिणाम होईल, पोरांना आमचं तोंड नाही बघावं वाटणार, शाळेत नाही यावं वाटणार अशी शिक्षा नाही करणार.’’
बाप रे! हे सगळं त्यांचं आतलं मनच बोलत होतं.
‘‘थांबा ताई, 2 मिनिटं वेळ द्या विचार करायला,’’ असं म्हणून मुलं पुन्हा विचारात गढली.
‘‘ताई, मी कमीतकमी शिक्षा करेल, छोटीशी काहीतरी. आणि जी चूक असेल त्याविषयीच शिक्षा करेल किंवा बोलेल. उगाच काहीही दुसरंच नाही बोलनार,’’ सिंधू म्हणाली.
‘‘ज्यांचं भांडण झालंय त्या दोघांना मी समोरासमोर बसवेल. काय झालं आहे ते आधी समजून घेईल आणि मग गरज पडली तर दोघांना शिक्षा करेल, नाही तर समजावून सोडून देईल,’’ निलेशनं आपलं मत मांडलं.
‘‘ताई, मी ना रागवेल पण घरच्यांच्या व्यवसायावरून सर्व वर्गासमोर टोमणे नाही मारनार ताई,’’ हे स्वतः अनुभव घेतलेली मालू बोलली.
सुरुवातीच्या प्रश्नांना हसून उत्तरं देणारे चेहरे आता मात्र गंभीर झालेले दिसत होते. मला वाटतं ‘मी शिक्षक असतो तर…’ या प्रश्नाकडे मुलं खूप जबाबदारीनं बघत होती, त्याविषयी खोलवर विचार करत होती.
‘‘ताई, मी आपल्या आनंदघरातल्या ताया करतात ना तसं करेल. मी त्यांच्याशी एकट्यात बोलेल आणि त्यांना समजावून सांगेल.’’ हे उत्तर ऐकून मला छान वाटलं. आनंदघरात मुलांना शाब्दिक, शारीरिक किंवा कुठल्याही प्रकारची शिक्षा केली जात नाही. ताई / दादा आणि मुलं संवादातून एकत्र उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. या चर्चेत पाचवीतल्या शिवानं मात्र एक मजेशीर शिक्षा सुचवली. तो म्हणाला ‘‘मी रोज भांडण करणार्या मुलांना एकत्र एका बेंचवर बसायची शिक्षा देईल. मग त्या भांडणार्या पोरांमध्ये दोस्ती होऊन जाईल.’’
साधारण तास-दीड तास आम्ही बोलत होतो. स्वतःचे शिक्षेचे अनुभव सांगताना मुलांना किती सांगू नि किती नको असं झालं होतं. एरवी काही विषयांवरच्या चर्चांमध्ये मुलांकडे सांगायला काही नसतं; पण इथे बोलण्यासाठी म्हणून वर झालेली मुलांची बोटं खालीच होत नव्हती. शिक्षेमुळे मुलांवर होणारे परिणाम मी लेखातून मांडण्याऐवजी मुलांनीच ते मांडले आणि त्यावरची उत्तरंही त्यांनीच दिली. या तासा-दीड तासाच्या संवादात मी 10 ते 15 मिनिटंच बोलले असेन, बाकी पूर्ण वेळ तीच बोलत होती. मला त्यांच्या विचारांचं खूप कौतुक वाटत होतं.
या सर्व चर्चेअंती मला एका गोष्टीचं नवल वाटलं. आजूबाजूला एवढं हिंसेचं वातावरण असताना आणि स्वतःदेखील एवढी हिंसा अनुभवलेली असताना ‘मी शिक्षक असलो असतो तर…’ या प्रश्नावर ‘मी मुलांना खूप मारेल, खूप शिक्षा करेल’ असं उत्तर एकाकडूनही आलं नाही; उलट त्यांनी कुठल्यातरी अर्थपूर्ण शिक्षेचा अवलंब करण्याचं ठरवलं होतं. या संवेदनशील विचारांमागच्या कारणांचा शोध पुढच्या तासाला घ्यायचा असं ठरवून मी आणि माझी मुलं तासाभरापासून प्रचंड ‘शिक्षा’मय झालेल्या वर्गातून शांतपणे हसत-हसत बाहेर पडलो.
टीप : हा संवाद जळगाव शहरातील आर्थिक दुर्बल घटकांतील (प्रामुख्याने कचरावेचक तसेच बालमजुरी करणार्या) मुलांसोबत झाला आहे. या मुलांचा वयोगट 11 ते 14 असा आहे. ही मुले शहरी वस्तीतल्या निम्न आर्थिक गटाच्या खाजगी शाळांमध्ये शिकतात. लेखातील सर्व मुला-मुलींची नावे बदललेली आहेत.
प्रणाली सिसोदिया
pranali.s87@gmail.com
लेखक ‘वर्धिष्णू’ संस्थेच्या सहसंस्थापक आणि पालकनीतीच्या संपादकगटाच्या सदस्य आहेत. त्यांना मुलांबरोबर काम करायला आवडते.
