अज्ञातमित्र

कुठलीही व्यक्ती किंवा समुदायाची शांतीच्या दिशेने वाटचाल व्हावयाची असेल, तर त्यांच्या भोवतीची परिस्थिती नैसर्गिक असणे गरजेचे आहे. भीतीमय वातावरणातले शांती साधण्यासाठीचे प्रयत्न काही टिकाऊ नसतील.

‘प्ले फॉर पीस’ म्हणजे ‘संघर्षाचा इतिहास असलेल्या समुदायांमधील मुले, तरुणाई, संस्थांसोबत सहयोगी-खेळ वापरून हास्य, करुणा आणि शांती निर्माण करणे.’ आमचा अनुभव सांगतो, की बहुतेक वेळा परिवर्तन घडते ते माणसांमधील – खास करून तरुणाईच्या मनात जिवंत असलेल्या कोवळ्या पालवीमुळे.

‘एखाद्याला हसणे’ आणि ‘एखाद्यासोबत हसणे’ ह्यातला फरक ‘प्ले फॉर पीस’चे काम करत असताना लवकरच समजला. समजा एखादे अपंग मूल खेळायला आले, तर त्यालाही समान संधी मिळावी, ह्या दृष्टीने तिथल्या तिथे विचार करावा लागतो. ‘शांती-शिक्षण’ (पीस एज्युकेशन) म्हणजे दोन माणसांमध्ये आपलेपणा निर्माण करणारे शिक्षण. एखादा समुदाय, लहान मुले किंवा तरुणांचा गट मैदानात खेळत असताना आपण जे करतो, जे बोलतो ती शांती. ह्या अनुभवांतून पुढे ‘प्ले फॉर पीस’ची मूलभूत मूल्ये विकसित झाली.

ती कुठली ते आपण पाहू.

समावेशकता – ती नसली तर तो नुसता नेहमीचाच खेळ होतो; छळणे, पाडणे, चेष्टा करण्याचासुद्धा खेळ.

सहयोग – खेळ सहयोगावर आधारित असेल, कारण स्पर्धा म्हणजे वगळणे.

शारीरिक आणि मानसिक सुरक्षितता – खेळाडूंना सगळ्या प्रकारे सुरक्षित वाटायला हवे. नाहीतर खेळ सर्वसमावेशक राहत नाही.

मजा – खेळताना मजा यायला हवी. तरच शरीर, मन आणि हृदय खेळात गुंतते. ही झाली सुसंगत समावेशकता. ही फक्त मनात नसते,  संपूर्ण अस्तित्वातून ती अनुभवाला येते. 

‘प्ले फॉर पीस’च्या सत्रांदरम्यान आम्हाला निरनिराळे अनुभव येतात. त्यातून परिवर्तनाची झलक बघायला मिळते. उदाहरणादाखल एक प्रसंग सांगतो.

एका सतरा वर्षांच्या युवतीने ‘प्ले फॉर पीस’च्या कामात चांगला रस घेतला. पुढाकार घेऊन तिने जुन्या हैदराबाद शहरातील तीस शाळांना आठवड्यातून एकदा शांती-सत्र घेऊ देण्यासाठी राजी केले. काम उत्तम सुरू आहे असे आम्हाला वाटत होते. पण एका संध्याकाळी तिचा फोन आला. तिच्या आवाजावरून ती घाबरलेली आहे हे लक्षात येत होते. एका शाळेतील पहिल्या सत्रासाठी आम्ही तिच्यासोबत जावे, असे तिचे म्हणणे होते. ही तिची शाळा होती. शालेय आयुष्यात तिथे तिचे शोषण झाले होते आणि त्यामुळे तिने ती शाळा सोडली होती. तिने पुन्हा म्हटले, ‘‘तुम्ही आला नाहीत तर मी हे सत्र घेऊच शकणार नाही.’’ आम्ही गेलो; तिने आम्हाला आलेले पाहिले. बस एवढेच; पण तिला ते पुरेसे झाले. तिने नेहमीसारखेच सत्र घेतले. आमची मदत न घेता. शारीरिक, शाब्दिक शोषणाचा आघात मुलांना किती निर्बल करू शकतो हे आम्हाला तिथे उमगले. त्याक्षणी ती तिच्यावर झालेल्या आघाताचे उपचारात परिवर्तन करत होती. त्यासाठी तिला आम्ही हवे होतो. तिला असुरक्षित वाटले होते खरे; पण आपण मदत मागू शकतो आणि ती मिळू शकते एवढ्यानेच तिला बळ आले.

अशा अनुभवांमधून ‘यू लीड’ निर्माण झाले – तरुणाईसाठी नेतृत्व-विकास कार्यक्रम. यू लीडचे पाच भाग आहेत. 2007 पासून भारतभरातील अनेक युवा गटांपर्यंत आम्ही ते पोचवले आहेत.

2002 साली गुजरातमध्ये आम्ही मुस्लीम समाजासाठी कार्यक्रम घेतला. त्यानंतर अहमदाबादमध्ये आमचे  वीसहून अधिक विकास-कार्यक्रम झाले. जमालपूरचे शिबिर त्यापैकीच एक. झाले असे, की 2002 साली गुजरातमध्ये दंगल झाली. अनेक लोक विस्थापित झाले. ही माणसे शरणार्थी-शिबिरांमध्ये राहत होती. एका शिष्टमंडळाचा भाग म्हणून मे 2002 मध्ये आम्ही अशा अनेक कॅम्प्सना भेटी दिल्या. एकाच वेळी दुःख, आघात पचवू पाहणारी आणि धीर गोळा करून जगण्याचा नवा संकल्प करू पाहणारी माणसे आजूबाजूला दिसत होती.  सर्वस्व गमावलेली माणसे ती; खेळ कशी खेळणार! पण तिसर्‍या दिवशी आम्ही जमालपूरच्या शिबिरातली दहा मुले गोळा केली आणि खेळायला लागलो. दहा मिनिटात प्रत्येक मूल आमच्यासोबत छोट्याशा गोलात एकत्र आले! बाहेरच्या मोठ्या गोलात त्यांचे पालक आणि शिबिरातली इतर मोठी माणसे एकत्र आली. ‘तीन महिन्यांनी आम्ही आमच्या मुलांना हसताना बघतोय’ अशी भावना सगळ्या मोठ्यांनी व्यक्त केली.

तेवीस वर्षांच्या ‘प्ले फॉर पीस’च्या कारकिर्दीतला हा सर्वात रोमांचकारक क्षण होता. न घाबरता हसता येणे ही सर्वात नैसर्गिक, कदाचित सर्वोत्तम नैसर्गिक गोष्ट. कुठलीही व्यक्ती किंवा समुदायाची शांतीच्या दिशेने वाटचाल व्हावयाची असेल, तर त्यांच्याभोवतीची परिस्थिती नैसर्गिक असणे गरजेचे आहे. भीतीमय वातावरणातले शांती साधण्यासाठीचे प्रयत्न काही टिकाऊ नसतील.

2012 साली आम्ही ‘माझी’ ह्या दलित समुदायासोबत काम सुरू केले. आधी तेरा वर्षे ह्या क्षेत्रात काम करत असल्याने, दलित समुदाय रोजच उपेक्षा-भेदभाव आणि अत्याचाराला सामोरा जातो हे आम्हाला माहीत होते; पण माहीत असणे म्हणजे अनुभवणे नव्हे! माझी समुदायासोबत काम सुरू केल्यानंतर आम्ही भेदभाव, अत्याचार, हिंसेचा चेहरा प्रत्यक्ष पाहिला, अनुभवला. गावात गेलो, की दरवेळी ‘आम्ही तिथे का आलो आहोत’ हे ‘वरच्या’ जातीच्या पहारेकर्‍यांना जाणून घ्यायचे असायचे. आमचा उद्देश कळला, की माझी तरुणांकडे उद्दामपणे निर्देश करून आम्हाला म्हणायचे, ‘हे काही कामाचे नाहीत!’ त्यामुळे सहा गावांत मिळून दहावी पास झालेले दहासुद्धा तरुण आम्हाला सापडले नाहीत. शेवटी आम्हाला आमच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. तरुणांऐवजी आम्ही पौगंडावस्थेतल्या मुलांसाठी नेतृत्व-विकासाचा कार्यक्रम घेतला. कुठल्याही पुस्तकातून शिकता आले नसते असे बरेच काही आम्हाला ह्या अनुभवाने शिकवले. प्रत्यक्ष अनुभवातून सहानुभूती, करुणा, सामाजिक न्याय सगळ्याच बाबतीतला आपला दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे उपेक्षित समुदायांसोबत काम करणे हा शांती-शिक्षणामधला आवश्यक घटक असला पाहिजे.

आमच्यासोबत काम करणार्‍या एका संस्थेत एक दलित तरुण चहा करणे, इतर वरकाम वगैरे करायचा. तिथले कार्यकारी संचालक नेहमी म्हणायचे, ‘आपल्याला याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे’. एकदा तो सामान द्यायला म्हणून ‘प्ले फॉर पीस’च्या प्रशिक्षणस्थळी आला. आम्ही त्याला खेळात सहभागी करून घेतले. छोटी सुट्टी झाल्यावर आम्ही सगळे प्रशिक्षक त्याच्याबद्दल आपसात बोललो. सगळ्यांचे त्याच्याबद्दल चांगले मत होते. मग आम्ही त्याच्या संस्थेकडून रीतसर परवानगी काढली आणि त्याला प्रशिक्षण दिले. त्याने प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यावर कार्यक्रम आखणार्‍या गटामध्ये त्याला घ्यावे अशी सर्वांनी शिफारस केली. आता तो कार्यक्रम-समन्वयक झाला आहे.

परिवर्तन घडते. बदल होतो. आपण शिकतो. जुळवून घेतो. हे सगळे खरे आहे, आणि तरी एक गाभा असतोच; जो ह्या सार्‍या घुसळणीत पुन्हा पुन्हा स्वतःला बळकट करत राहतो. ‘आयुष्यभर संभाषण करूनही कळणार नाही एवढे तासाभराच्या खेळात तुम्हाला एखाद्याविषयी कळू शकते’ असे प्लेटोच म्हणाला होता ना?

2015 साली दक्षिण सुदानमध्ये आम्ही एक शिबिर घेतले होते. शिबिराला आम्ही काही तास उशिरा पोचलो. निर्वासितांचा एक गट आमची वाट बघत होता. नागरी युद्धामुळे (सिव्हिल वॉर) विस्थापित झालेले दहा ते चाळीस वयोगटातले वीस-पंचवीस लोक होते. दक्षिण सुदान म्हणजे अन्न-सुरक्षेची मोठीच समस्या असलेला देश. आम्ही खेळायला लागलो. त्यांच्या प्रतिक्रिया – निरिच्छा, उदासीनता, आश्चर्य, मजा येणे – अशा क्रमाक्रमाने बदलत गेल्या.

सगळ्यांना सहभागी करून घेणार्‍या ‘प्ले फॉर पीस’च्या खेळांची, अनुभवात्मक शिक्षणाची गंमत म्हणजे खेळाची सूत्रे खेळणार्‍याच्या हातात असतात. त्यामुळे कुणी निष्क्रिय राहूच शकत नाही. प्रत्येक जण उत्स्फूर्तपणे व्यक्त होऊ लागतो. तीन दिवसांचे ते शिबिर उत्तम रीतीने पार पडले. खेळ समजून घ्यायला लहान मुले मोठ्यांना मदत करत होती. ते सगळे फार भारावून टाकणारे होते. एक पाय गमावलेली दहा-अकरा वर्षांची एक मुलगी सर्वात उत्साही होती. तिलाही खेळता यावे म्हणून तिच्या गटाने एका पायाने पळण्याच्या शर्यतीची शक्कल लढवली. सुरक्षित वातावरणात अशी मानसिकता बाळसे धरू शकते. याच लोकांनी पहिल्या दिवशी शिबिराबद्दल दोनच अपेक्षा मांडल्या होत्या – 1) उपस्थित राहिल्याबद्दल पैसे मिळावेत, 2) खायला-प्यायला मिळावे.

हिंसाचार सोसलेल्या आणि जगण्यासाठी लागणार्‍या अगदी मूलभूत गोष्टीही गमावून बसलेल्या लोकांसोबत शांती-शिक्षणाचे काम करताना, प्रथम त्यांच्या हातात सूत्रे देणे गरजेचे आहे, हे ह्यातून कळते.

पुढे अथेन्समधल्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये हे पुन्हा सिद्ध झाले. गरीब, उपेक्षित, जगण्याच्या मूलभूत गरजाही न भागलेल्या दुबळ्या लोकांकडे दयेने बघण्याची आपल्याला सांस्कृतिक सवय आहे. सीरिया आणि इराकमधून आलेल्या तरुणांना आम्ही कॅम्पमध्ये भेटलो, त्यांच्या कहाण्या ऐकल्या, तेव्हा त्यांच्याकडे कशा दृष्टीने बघावे ह्याबद्दल जागरूक झालो. कॅम्पमधील अन्न आणि ते देण्याची पद्धत त्यांना आवडली नव्हती. ‘देणार्‍या’ला ह्याचा राग येणे सहज शक्य आहे! कुणी तरुण एखाद्या कार्यक्रमातून बाजूला जाऊन सिगारेट ओढतो किंवा एखादी आई मुलीला सिगारेट देते तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्या डोक्यात अनेक ग्रह तयार होतात. ह्या ग्रहांकडे डोळसपणे बघायला आमचे प्रशिक्षण भाग पाडते. हे तरुण आर्थिकदृष्टया वरच्या स्तरातून आलेले. एक जीवघेणा प्रवास करून ह्या समुद्रकिनारी पोचले. काहींना पोचायला तर अनेक महिने लागले होते. पुढे पंधरा दिवसांत त्यांनी तिथे ‘प्ले फॉर पीस’ गट सुरू केला. नंतर त्यांच्यातला एक जण नेदरलँडला स्थलांतरित झाला. तेव्हा त्याने तिथेही ‘प्ले फॉर पीस’ गट सुरू करून तरुणांना मदत केली. 

लोकांमधले परिवर्तन त्यांचे अनुभव, निवड, सुरक्षितता, अभिव्यक्ती, आशा ह्यांतून होते हे स्पष्ट आहे. त्यात मानवी संवाद हवा हेही नक्की. आम्ही ह्याच्या मध्यभागी आहोत. ह्या मानवी प्रक्रियेचे आम्ही माध्यम आहोत. स्वतःला महत्त्व न देणे हे आमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे; हे प्रत्येक नवीन अनुभवातून आम्हाला उमगते आहे.

2000 साली आम्ही ‘प्ले फॉर पीस’ सुरू केले तेव्हा ‘प्ले’ ह्या शब्दामुळे लोकांना ते नाटक असावेसे वाटले. अनुभवात्मक शिक्षणाच्या अध्यापनशास्त्रात सापडतील एवढेच खेळ / उपक्रम तेव्हा गुगलवर सापडत. अमेरिकेत, अनुभवात्मक शिक्षणाच्या एका परिषदेत ‘प्ले फॉर पीस’चा जन्म झाला. आता ‘खेळातून विकास’ हा बर्‍याच संस्थांमध्ये मुख्य कार्यक्रम असतो. भारतातसुद्धा अशी एक परिषद होते. पुस्तके, संकेतस्थळे आणि कीकोरी अ‍ॅपवर आता ‘प्ले फॉर पीस’चे खेळ उपलब्ध आहेत. बदल घडतोय. जग आता खेळाला महत्त्व देऊ लागले आहे. म्हणजे आम्ही काळाच्या पुढे आहोत का? नाही! होमो लुडेन्स माहीत असेल तर तुम्ही असे नक्कीच म्हणणार नाही! कारण हा 1938 मधला संदर्भ आहे!

(डच इतिहासकार योहान हाइझिंगा ह्यांनी लिहिलेले ‘होमो लुडेन्स’ हे 1938 मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे. ह्यात समाज आणि संस्कृतीमधील खेळाचे महत्त्व विषद करून सांगितलेले आहे. संस्कृती घडवण्यासाठी खेळ गरजेचा आहे. लुडेन्स हा लॅटिन शब्द क्रीडा, खेळ, शाळा आणि सराव अशा संमिश्र अर्थाचा आहे.)

‘प्ले फॉर पीस’ आता आमच्यासाठी एक मार्ग झाला आहे – संवाद घडवणारा, समावेशकता / विविधता / न्यायीपणा ह्यांचे भान आणणारा, सुरक्षित वातावरणात चिकित्सकपणे विचार करायला उद्युक्त करणारा, जीवनकौशल्ये विकसित करणारा, सामाजिक-भावनिक समज आणि मनःस्वास्थ्य वृद्धिंगत करणारा मार्ग. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाविषयी लहान मुलांची मते जाणून घेण्यासाठी ‘क्राय’ (उठध) ह्या संस्थेने करोनाकाळात आम्हाला काम करायला सांगितले. उद्देश हा, की त्या माध्यमातून मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्त होता येईल. दक्षिण सुदानमधील एका संस्थेचे कर्मचारी आम्हाला म्हणाले, की मुलांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ही एक आदर्श पद्धत आहे. काश्मीरमध्ये असे काम करणार्‍या शंभर माणसांना आम्ही प्रशिक्षण दिले आहे.

खिलाडू वृत्ती म्हणजे इतरांशी नाते जोडण्याची, सहयोगाची उत्कट इच्छा. खेळाचे मूळ स्वरूप स्पर्धात्मक नसून सहयोगाचे आहे. खेळ कुठे सुरू करायचा, कुठे संपवायचा, त्याचे नियम आणि भूमिका काय आहेत हे खेळणारी मुले ठरवून मान्य करतात आणि मग त्यानुसार खेळतात.  

‘प्ले फॉर पीस’ काय आहे?

‘प्ले फॉर पीस’चे सत्र सुरू असताना काय बघायला मिळते? हास्याचे फवारे उडत असतात, धावपळ सुरू असते, नाचरे पाय आणि हात झुलत असतात. अरेच्चा, वॉव… चित्कार ऐकू येत असतात. गटांमध्ये गाणी सुरू असतात.  थोडक्यात काय; नुसता धुमाकूळ चाललेला असतो.

ह्या सगळ्याबद्दल काय वाटते म्हणून लोकांना विचारले असता कुणी म्हणते, ‘मला माझे बालपण आठवले’, कुणी म्हणते, ‘सुरुवातीला मी जरा बिचकले; पण मग माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली’, ‘सगळा ताण निवळला’, ‘खेळताना खूप लक्ष द्यावे लागते’, ‘मेंदू आणि शरीर, दोघांनाही तरतरी आली’, ‘थोडक्या वेळात आम्ही मित्र झालो’; अशा अनेक प्रतिक्रिया.

‘प्ले फॉर पीस’च्या सत्राला आम्ही ‘शांती-सराव सत्र’ म्हणतो. म्हणजे काय, तर ह्या सत्रांत घेण्यात येणारे उपक्रम एकमेकांसह शांतीने, सौहार्दाने राहता येण्यासाठी आवश्यक असलेली मनाची, वागणुकीची, स्वभावाची घडणूक करणारे असतात. त्यामुळे खेळातून कुणालाही बाद केले जात नाही (स्पर्धा नाही),  खेळताना चुकणे मान्यच असते (सगळेच चुकतात, आणि चुका करण्यात काही गैर नाही), प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने सत्तेचे समान वाटप होते (कुणी कुणाच्या वरचढ नाही).

‘प्ले फॉर पीस’ हा काही एकदा साजरा करण्याचा सोहळा नाही. गटाबरोबर सातत्याने काम केले जावे अशी एकंदर कल्पना आहे. वेगवेगळ्या लोकांचा एक गट जेव्हा एकाच प्रकारच्या उपक्रमात भाग घेतो,  कुठल्याही प्रकारे न जोखणारे सुरक्षित वातावरण अनुभवतो, तेव्हा त्यातून त्यांना आनंद मिळतो. स्वतःची सकारात्मक प्रतिमा उजळून निघते. आणि अखेरीस ह्या सगळ्याचा परिणाम जगाकडे किंवा इतरांकडे बघण्याच्या दृष्टीवर होतो खास!

अज्ञातमित्र

swatiagyat@gmail.com

‘प्ले फॉर पीस’ संस्थेचे प्रशिक्षक. 2000 सालापासून त्या माध्यमातून देशातल्या आणि परदेशातल्या लोकांशी जोडलेले आहेत. कविता लिहिणे हा त्यांचा छंद आहे.

त्यांच्या कामाविषयी www.hereweplay.blogspot.com ह्या ब्लॉगवर अधिक जाणून घेता येईल.

अनुवाद : रुबी रमा प्रवीण

छायाचित्रे अज्ञातमित्र ह्यांच्या ब्लॉगवरून