डॉ. गोपाल शर्मा
खेळणे हे मुलांच्या जगण्याचे एक नैसर्गिक अंग आहे. त्यासाठी त्यांना काहीही चालते; दगड, माती, काड्या, लाकडे, अगदी घरातली भांडीसुद्धा. धावणे-पळणे, उड्या मारणे, गडबडा लोळणे, हे सगळे याच खेळाचे प्रकार असतात. त्यातून त्यांना स्वतःच्या क्षमतांची जाणीव होत जाते. हळूहळू मग त्यात स्पर्धा शिरायला लागते. हे नैसर्गिकही आहे; पण गेल्या काही दशकांत परिस्थितीमध्ये जरा जास्तच बदल होतो आहे असा अनेक शिक्षक, पालकांचा अनुभव आहे. खेळातली सहजता, त्यातून मिळणारा निखळ आनंद हरवत चाललेला आहे; त्याजागी स्पर्धात्मकता आलेली दिसते आहे.
मुलांच्या खेळात एकमेकांच्यात तुलना होण्याचे महत्त्व आहेच. एकजण पळत असतो आणि दुसरा त्याला शिवायला जात असतो, त्यात वेगाने जाणारा जिंकतो. अशा ठिकाणी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांनी कुठलीही एक बाजू उचलून धरता नये. आपण बाजू उचलून धरली तर त्याचा परिणाम स्पर्धात्मकता वाढण्यात होऊ शकेल हे ध्यानात घेऊन त्यांना विचारांचा समतोल राखता आला पाहिजे.
सध्याचे क्रीडाप्रकार पाहिले, तर स्पर्धा हा त्यांचा अविभाज्य भाग आहे. अगदी कोण जोरात पळते हे बघण्यासाठी लावलेली ‘रेस’ असो, भरवलेली क्रीडास्पर्धा असो; त्यात स्पर्धा आलीच. खेळ म्हटला, की त्यात प्रतिस्पर्ध्यावर मात करणे आले. मग खेळ वैयक्तिक असो की सांघिक. समजा दोन संघ बास्केटबॉल खेळताहेत, तर दोन्ही संघांचे एकच ध्येय असते – समोरच्या संघाच्या बास्केटमध्ये जास्तीतजास्त वेळा बॉल घालणे आणि आपल्या बास्केटपासून त्या संघाला दूर ठेवणे. अॅथलेटिक्स, पोहणे, ह्यातही अधिकाधिक जोरात धावणे, पोहणे, उड्या मारणे अपेक्षित असते.
ध्येय साध्य करण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या शिकवल्या जातात, रणनीती आखली जाते. खेळाडू आपली संपूर्ण क्षमता पणाला लावून स्पर्धेत उतरतात. परिणामी खेळातली चुरस वाढते, गांभीर्य वाढते. मुलांसाठी खेळाचे नियोजन करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की खेळात भाग घेणार्या मुलांच्या मनात स्पर्धेची भावना काहीशी उपजतच असते; पण तो खेळाचा अंतिम उद्देश नाही. आपल्याला या भावनेला उत्तेजन देताना काळजीच घ्यावी लागणार आहे. खेळातून इतरही अनेक गोष्टी मुलांच्या नकळत साध्य होतात.
आत्मविश्वास
स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून कामगिरी करण्याचे अनेक प्रसंग खेळताना येतात. त्यामुळे अनेक वर्षे खेळत असलेल्या मुलांचा आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भागच बनून जातो.
प्रेरणा
मुलांना उपजतच खेळायला आवडते. ह्याच इच्छेला हळूहळू प्रयत्नांची जोड देऊन क्षमतांचा विकास करता येऊ शकतो. त्यासाठी त्यांच्या आतल्या प्रेरणा बळकट करणे गरजेचे आहे. त्याच वेळी त्यांच्या बाह्य प्रेरणांचा आवश्यक तेवढाच उपयोग केला जावा. ह्यामुळे पुढील काळातही ती खेळ, फिटनेस ह्या गोष्टींकडे सकारात्मकपणे पाहू शकतील. हे त्यांच्यासाठी आणि समाजाच्या आरोग्यासाठीही फायद्याचे आहे.
ध्येय ठरवणे
खेळताना मुलांना विविध प्रकारची ध्येये ठरवावी लागतात. ‘मला वेगाने धावायचे आहे’, ‘मला उंच उडी मारण्याचे तंत्र शिकायचे आहे’, असा निर्धार ती मनाशी करत असतात. लहान मुले समजून उमजून ध्येय ठरवतात, असे काही नाही; बहुत करून ते आपोआपच घडते.
कठोर परिश्रम
कुठलेही काम करताना त्यात न थकता ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्याची सवय खेळातूनच होते. स्पर्धेतच नाही, तर प्रशिक्षणातही कितीही थकले तरी सगळी ताकद एकवटून आणि लक्ष केंद्रित करून प्रयत्नांत सातत्य ठेवावे लागते. हे समजावे यासाठी सराव करणे, अनेकदा तसा प्रयत्न करणे हवे. त्यामध्ये स्पर्धेचा उपयोग होतो.
स्वयंशिस्त
खेळातही शिस्त पाळावी लागते. पाटीच्या बाहेर पाय पडला तर बाद असा नियम असेल, तर ते पाळावे लागते. सांघिक खेळ असेल तर सर्वांची क्षमता एकत्रितपणे कशी काम करेल हेही बघावे लागते. संघभावनेने खेळणे जमावे लागते. नियोजनबद्ध खेळांच्या स्पर्धांमध्ये ह्या गोष्टी मुलांची निर्णयक्षमता ठरवतात. प्रत्येक मुलाची आपली मनोधारणा असते, आवडनिवड असते, निर्णयक्षमता असते. मुलांना हे समजते. ती खेळाचे नियम पाळायला तयार असतात. मुलांना खेळातून सर्वात जास्त काय मिळायला हवे तर आनंद एवढे प्रशिक्षकानेही ध्यानात धरावे.
आशावाद
खेळताना प्रत्येक टप्प्यावर प्रयत्नांत कसूर होऊ न देणे सोपे नसते. विशेषतः प्रतिस्पर्ध्यापेक्षा पिछाडीवर असताना, आपला संघ हरत असताना तर हे खूपच अवघड असते. मुलांच्या पळण्याच्या शर्यतीत हे दृश्य नेहमी बघायला मिळते. अशा वेळी महत्त्वाचा असतो तो आशावाद. हळूहळू मुलांना कळत जाते, की खेळात सतत प्रयत्नरत राहावे लागते. प्रयत्न करण्याची शिदोरी त्यांना पुढे आयुष्यभरासाठी पुरते.
लवचीकता
आणि समजा एखाद्या वेळी हरलो तर? तर पुन्हा मेहनत करण्याची तयारी ठेवायला हवी. त्याक्षणी दुःख होणे, निराशा वाटणे स्वाभाविकच आहे. पण त्यावर मात करून पुन्हा आनंदाने खेळात सामील होता आले पाहिजे. हळूहळू ही त्यांची सहज प्रवृत्ती होत जाते आणि ती आयुष्यात इतर ठिकाणीही उपयोगी पडते.
नम्रता
आपल्या क्षमतांवर खेळाडूचा विश्वास हवा हे खरेच; पण त्याचबरोबर इतर खेळाडूंबद्दल आदराची भावना हवी. खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी काळजी घेतली नाही, तर सक्षम खेळाडूंमध्ये अहंकार वाढायला वेळ लागत नाही.
अनिश्चितता
खेळात हारजीत चालणारच. एक कुणी तरी जिंकतो, तेव्हा इतर अनेक जण हरतात. त्यामुळे खेळातील आनंदाचे नाते जिंकण्याशी नसावे. नवे शिकणे, बरोबरीच्या खेळाडूंशी खेळायला मिळणे, कष्टाची पराकाष्ठा करून पाहता येणे, यांच्याशी असावे.
क्षमतांचा विकास
खेळात आपले सर्वोत्तम देणे अपेक्षित असते. प्रत्येक वेळी आपल्या पूर्ण क्षमतेनी खेळा, असेच कुणीही पालक किंवा प्रशिक्षक मुलांना सांगत असतात. मुलांना चांगल्या प्रकारे शिकवले, त्यांना प्रोत्साहन दिले आणि प्रयत्न करताना आपले सर्वोत्तमच द्यायचे हे त्यांना प्रेमाने समजावून सांगितले, तर त्यांनाही उत्तमतेचा ध्यास लागतो. खेळाच्या माध्यमातून गुणवत्ता आणि बांधिलकी ह्या गोष्टी मुलांच्या आयुष्याच्या भाग बनल्या, तर ते खेळाचे शिक्षणातले महत्त्वाचे योगदान म्हणता येईल.
स्पर्धात्मक खेळांमध्ये भाग घेतल्याने मुलांमध्ये अनेक गुणांचा विकास होतो हे खरे; मात्र स्पर्धेला अत्यधिक महत्त्व देण्याचे दुष्परिणामही होतात. खेळाच्या मैदानावर आक्रमकपणे वागणे, पंचांवर एकतर्फी निर्णयाचे आरोप करणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे… बरेचदा मुलांमधला ताण मानसिक आजाराचे रूप धारण करतो. मैदानावरील कामगिरी सुधारण्यासाठी खेळाडू उत्तेजक औषधे घेण्यापर्यंत मजल गाठतात.
म्हणजे खेळामध्ये समतोल साधला जाणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करता येईल?
खेळातून आनंद मिळतो हे मुलांना खरे तर समजतेच; दरम्यानच्या काळात स्पर्धेचा ताण वाढला तरच मुले ते विसरतात. त्यांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेऊन त्यांनाही त्यांच्या मनातले प्रश्न विचारता येतील एवढा मोकळेपणा दिला पाहिजे. खेळताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे; भले प्रयत्न असफल ठरला असेल तरी. विजय कुणाचाही होवो, त्याचे मोठेपण मान्य केले जावे. मात्र त्याच वेळी हरणार्याला कमी लेखू नये.
स्पर्धात्मक खेळांचे आपण वर पाहिलेले दुष्परिणाम हे बर्याच अंशी संघभावनेशी जोडलेले असतात. सांघिक खेळ खेळण्यासाठी गट तर केलेच पाहिजेत. लहान मुलांच्या स्पर्धा घेताना जितके जास्त संघ किंवा गट करता येतील तेवढे चांगले. हे संघ खेळ सुरू होण्याच्या आधी तयार करून खेळ संपला की विसर्जित व्हावेत. पुढच्या वेळी नवीन संघ तयार करावेत. शक्यतो मुलांचे स्थायी गट केले जाऊ नयेत.
खेळाचा मूळ उद्देश आनंद असावा. त्यानंतर मनाशरीराची जोपासना असा असू शकेल. त्यानंतर काही शिकावे, क्षमता वाढवाव्यात इत्यादी गोष्टी येतात. स्पर्धात्मकतेमुळे खेळाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असेल, तर ते थांबवलेच पाहिजे.
खेळ संपल्यावर मुले हिरिरीने त्यावर चर्चा करतात हे सगळ्या शिक्षक-पालकांनी अनुभवले असेल. आपला खेळ, समोरच्या टीमचा खेळ, पंचांचे निर्णय, सगळ्यावरच आपापली मते मांडली जातात. हे नैसर्गिकही आहे आणि आवश्यकही! ह्यातून ती बरेच काही शिकतात. पुढच्या वेळी खेळताना काय करायचे, काय टाळायचे हे शिकतात. त्या अर्थाने हे पुनरावलोकन फार उपयुक्त म्हणता येईल.
खेळाच्या स्पर्धांबरोबरच मुलांसाठी एकमेकांच्या मदतीने खेळण्याचे खेळही आयोजित करावेत. उदाहरणादाखल एक खेळ सांगतो – अमिबा शर्यत. ह्यासाठी 5 ते 10 मुलांचा एकेक गट करायचा. त्या मुलांनी एकमेकांचे हात धरून गोल करायचा. 2-3 मुले गोलाच्या आतही थांबू शकतात. प्रत्येक गटाने आपली रचना तशीच राखून दिलेले अंतर पार करायचे. लक्षात घ्या, इथे संपूर्ण गटाला एकमेकांच्या मदतीशिवाय धावणे शक्यच होणार नाही.
अशा एकात्मिक उपक्रमांमधून मुलांना मजा तर येतेच, पण फायदाही होतो. रुचिपालट होतो. इतर विषयांचेही आपोआपच शिक्षण होते.
नकाशाचे चित्र हा असाच एक खेळ आहे. हा मैदानावर खेळायचा असतो. एखादा देश, त्यातली राज्ये किंवा भाग ह्यांचे त्या देशाच्या सापेक्ष स्थान ह्यातून लक्षात येते हे तर आहेच; पण मुलांची शारीरिक क्षमताही वाढते. एखादा देश ठरवून घ्यायचा आणि मैदानावर त्याचा नकाशा काढायचा. त्यात विविध प्रदेश / राज्ये दाखवायची. प्रत्येक प्रदेशासाठी एकेक चिठ्ठी तयार करून त्याच्या एका बाजूला त्या प्रदेशाचे नाव आणि एखादी शारीरिक कृती लिहायची, तर दुसर्या बाजूला तिथून कुठल्या प्रदेशात जायचे त्या प्रदेशाचे नाव. समजा एका चिठ्ठीवर लिहिलेले आहे ‘महाराष्ट्र’ आणि ‘एक मिनिट नृत्य कर’. मागच्या बाजूला लिहिलेले आहे ‘ओडिशा’. म्हणजे खेळणारा मुलगा त्याप्रमाणे कृती करेल. प्रत्येक चिठ्ठी त्या त्या राज्याच्या ठिकाणी ठेवलेली असेल. मुलांची संख्या राज्यांच्या संख्येएवढी किंवा त्यापेक्षा कमी असावी. मुले जास्त असतील, तर 2 गटात खेळता येईल. खेळ सुरू करताना सर्वांनी एका ठिकाणी थांबायचे. समन्वयकाची सूचना मिळताच त्यांनी नकाशाकडे धाव घेऊन कुठल्याही एका राज्यापासून कृतीला सुरुवात करायची. तिथली कृती करून झाली, की चिठ्ठीच्या मागच्या बाजूला लिहिलेल्या राज्याकडे धाव घ्याची. असे पुढे पुढे जात प्रत्येक ठिकाणची शारीरिक क्रिया पूर्ण करायची. सर्व मुलांचे सर्व प्रदेश फिरून झाले, की खेळ संपला.
जिम्नॅस्टिक्ससारखे उपक्रमही मुलांसाठी आयोजित करता येतील. त्यातून मुलांची ताकद, लवचीकता वाढते, ती लयबद्ध हालचाली करायला शिकतात, त्यांचे शारीरिक संतुलनही चांगले साधले जाते. धावण्याची किंवा चालण्याची शर्यत न ठेवता त्या चालण्याला वेगळा उद्देश जोडता येईल. म्हणजे दोन ठिकाणांमध्ये किती पावलांचे अंतर आहे वगैरे.
पारंपरिक खेळ किंवा स्पर्धांचे नियम बदलून त्यांना नवीन स्वरूप देता येईल; जेणेकरून मुले काही वेगळा विचार करू शकतील. एक उदाहरण बघू – तिरप्या रिले रेसचे. ही इतर रिले रेसप्रमाणेच खेळायची असते; फक्त फरक इतकाच, की दर वेळी बॅटन वेगळ्या टीमला द्यायचा. त्यामुळे माझी टीम, दुसरी टीम ह्यातले अंतर पुसट होत जाते. सुरुवातीला मुले गोंधळतील; पण काही वेळा धावल्यानंतर पास कुणाला द्यायचा ते त्यांना बरोबर कळू लागते.
एक गोष्ट लक्षात येईल, की योग्य नियोजन आणि त्याची विचारपूर्वक अंमलबजावणी केल्यास मुलांसाठी खेळाचा चांगला कार्यक्रम आखला जाऊ शकतो. त्यातून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
मुक्त चिंतन
लेख वाचताना मध्ये अडथळा येऊन वाचण्याचा आनंद कमी होऊ नये, म्हणून त्या वेळी उपस्थित होऊ शकणारे काही प्रातिनिधिक प्रश्न इथे देत आहोत. वाचकांच्या मनातही निश्चितपणे असे काही प्रश्न निर्माण झाले असतील. अर्थात, विचारमंथनाच्या दृष्टीने इथे दिलेले प्रश्न ही केवळ एक सुरुवात आहे…
1. स्पर्धा ह्या शब्दाचे शाब्दिक आणि व्यावहारिक अर्थ काय आहेत?
2. खेळाडूची खेळातली कामगिरी मोजण्याचे निकष काय असावेत?
3. पारितोषिक देण्याचे ज्याला ते मिळाले आहे त्याच्यावर आणि ज्याला मिळू शकलेले नाही त्याच्यावर काय परिणाम होतात? शिक्षणाच्या दीर्घकालीन उद्देशांचा विचार करता, विशेषतः आंतरिक आणि बाह्य प्रेरणांच्या संदर्भात, बक्षीस देणे कितपत योग्य म्हणावे? अगदी मोठ्या स्पर्धांचे, म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे, उदाहरण घेतले तरी त्यात समजा त्या त्या टप्प्यावर जिंकणारा आणि हरणारा यांना सारखेच बक्षिस मिळेल असे केले तर?
संदर्भ :
Melissa Mohr, The History of “Competition’ Won’t Cooperate, The Christian Science Monitor.
Shailesh Shirali (2002, July). Competition and its Educational Consequences: Is There an Alternative? https://www.journal.kfionline.org/ issue-6/competition-and-its-educational-consequences-is-there-an-alternative.
डॉ. गोपाल शर्मा

tukey30@gmail.com
लेखक पुण्यातील ‘स्वधा वॉलडोर्फ लर्निंग सेंटर’ येथे क्रीडाशिक्षक आहेत. ह्या आधी त्यांनी ऋषीव्हॅली स्कूल, व्हॅली स्कूल आणि सह्याद्री स्कूल ह्या शाळांमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून काम केले आहे.
