अॅड. छाया गोलटगावकर 

कौटुंबिक पातळीवर पती-पत्नीमधले मतभेद, कलह वाढत गेला, की कित्येकदा घटस्फोटाचं पाऊल उचललं जातं. एकत्र राहून भांडण मिटत नसेल, संपत नसेल, तर वेगळं होऊन शांतपणे जगण्याचा मार्ग अपरिहार्य वाटायला लागतो. कित्येकदा तर घटस्फोट घ्यायचा की नाही याबद्दलही मनात साशंकता असते. काही वेळा समस्या वेगळी असते आणि उपाय मात्र घटस्फोटाचा निवडला जातो. घटस्फोट घेताना काही महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा हवा असतो म्हणजे आर्थिक समीकरण कसं असेल, वेगळं झाल्यानंतर मुलं कुणाकडे असतील, त्यांचा खर्च कोण करेल, राहण्याची काय व्यवस्था असेल इत्यादी. 

कोर्टात जाऊन कायदेशीररित्या घटस्फोट घेणं हा एक पर्याय आहे; परंतु त्यामध्ये खूप वेळ, पैसा, श्रम खर्च होतात. दुसरा मार्ग असा की परस्पर सामंजस्यानंही कमी वेळ, कमी पैसे खर्च करून घटस्फोटाची प्रक्रिया पार पाडता येते. यासोबतच आणखी एक पर्याय आहे – मध्यस्थीचा – एखाद्या मध्यस्थ व्यक्तीची मदत घेण्याचा. कोर्टात जाण्याआधी किंवा कोर्टात केस चालू असताना कुठल्याही टप्प्यावर मध्यस्थाची मदत घेता येते. अशी व्यक्ती कुटुंबातली, मित्रपरिवारातली किंवा समाजातली असू शकते. समुपदेशक, वकील, मानसोपचारतज्ज्ञसुद्धा उत्तम मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात. कुटुंब आणि नातेसंबंधाचं महत्त्व लक्षात घेऊन कोर्टाकडूनही मध्यस्थी केली जाते. कोर्टात केस चालू असतानाही परस्परसंमतीनं पुन्हा सोबत राहायचं, की घटस्फोट घ्यायचा या निर्णयापर्यंत मध्यस्थाच्या मदतीनं यायला मदत होते. त्यामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेत होणारी ओढाताण टाळता येते. परस्परांच्या सहमतीनं, सामंजस्यानं समस्या सोडवली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रियेत मुलांची होणारी हेळसांड टाळता येते. 

वकील म्हणून मी वेगवेगळ्या केसेस जवळून बघत असते, हाताळत असते. मानवी मनाचे खेळही अनुभवत असते. समस्या, कलह, भांडणं, संघर्ष हा सगळा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. तसं होऊच नये असं वाटलं, तरी ते शक्य होत नाही. या संघर्षाला भिडायचं कसं, ते सोडवायचं कसं, हेही अनेकदा माहीत नसतं. थोडं फार माहीत असलं तरी त्यावेळी जमत नाही. परिणामी, अरेला कारे करत ताणतणाव इतका वाढतो, की नातीच तुटायला येतात. अशी ताणलेली नाती कुटुंबातल्या इतर सदस्यांनादेखील त्रासदायक ठरतात. विशेषतः लहानग्या मुलांची ह्यात फार घुसमट होते. मुलं हा संघर्ष जवळून बघत असतात. अशा वेळी केवळ अशिलासाठी केस चालवणं अशी भूमिका न ठेवता मुलांना व आईवडिलांना योग्य सल्ला, मदत, दिलासा मिळू शकेल अशा पद्धतीनं काम करण्याचा वकिलांचा कल असतो. मुळात प्रश्न काय आहे ते समजून घेणं; सोबत राहायचं की वेगळ व्हायचं हे ठरवता येणं; आणि निर्णय कुठलाही झाला, तरी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता, तो निर्णय स्वीकारता येणं; त्यात सगळ्यांना कमीतकमी त्रास कसा होईल अशा पद्धतीनं निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. सर्वात महत्त्वाचं असतं ते मुलांचं हित जपणं, त्यांची काळजी घेणं, त्यांची जबाबदारी निगुतीनं पार पाडणं. शेवटी सर्वांना आनंदानं, शांतपणे जीवन जगता येणंच अतिशय महत्त्वाचं आहे.

प्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या शब्दात सांगायचं तर-

‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन,

 उसे एक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा…’

शांतपणे, सामंजस्यानं निर्णय घेण्यात मुलांची ओढाताण, होरपळ कमी होते. पालकांचे वाद, भांडणं, घटस्फोटाची प्रक्रिया यामुळे येणारे ताणतणाव कमी होतात. मुलांचं हित जपलं जातं. 

याउलट – टोकाचे वाद-भांडणं चालू असतात, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू असतात, कोर्टात एकमेकांवर अनेक केसेस केल्या जातात – अशा वेळी कळत-नकळत मुलांवर त्याचे वाईट परिणाम होतात. मुलांच्या मनात पालकांबद्दल पूर्वग्रह, गैरसमज, भीती तयार होते. कोणत्याही एका पालकाजवळ मुलं असतील, तर दुसर्‍या पालकाबद्दल आणि त्याच्या नातेवाईकांबद्दल पूर्वग्रह तयार केले जातात. मुलांना दोन्हीकडचीही नाती हवी असतात. ती न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिंता, धास्ती, नैराश्य, चिडचिड, हिंसक वृत्ती, अशा अनेक समस्या दिसू लागतात. काही वेळा या सगळ्यांचे दूरगामी परिणाम त्यांच्या आयुष्यावर बघायला मिळतात.

एकदा नेहा आणि तिची १२-१३ वर्षांची मुलगी उर्वी रस्त्यात भेटल्या. नेहाचा घटस्फोट झाल्यानंतर आमची ही पहिलीच भेट. खूप दिवसांनंतर भेट झाली म्हणून साहजिकच आम्ही गप्पांमध्ये रंगलो. घर जवळच होतं म्हणून ती आग्रहानं तिच्या घरी घेऊन गेली. उर्वी मात्र नेहमीसारखी बोलली नाही. मी तिच्याशी बोलू लागले; पण तिला मात्र बोलावंसं वाटत नव्हतं. कोमेजून गेलेली दिसत होती. तिचे प्रतिसाद नेहमीपेक्षा फारच वेगळे होते. उत्साहानं काहीतरी केलेलं दाखवणारी उर्वी आज बोलायला, बघायला तयार नव्हती. तिच्याशी बोलता बोलता मी तिच्या खोलीत गेले, खोली अस्ताव्यस्त. तिची चित्रं, फोटो, जगभर फिरण्याचं स्वप्न… सगळंच अस्ताव्यस्त दिसलं. ती अगदी थोडं बोलली, त्यातही तिचा एक प्रश्न खटकला, “मी मेले तरी कुणाला पर्वा आहे?” यावर मी गप्प राहिले. नेहाला विचारलं, “उर्वीला काय झालं? ती असं का बोलते?” त्यावर नेहा रडू लागली, “काय सांगू मॅडम, घटस्फोटाचे व्रण आहेत हे… याआधी मी कधी घराबाहेर पडले नाही. शिक्षण असूनही नोकरी करणं, पैसे मिळवणं अत्यंत कठीण जातंय. आई-वडिलांचा पाठिंबा आहे म्हणून बरं! निदान घर तरी आहे. नाहीतर आज आम्ही रस्त्यावर असतो. नोकरीसाठी बाहेर पडते तेव्हा उर्वी घरी एकटी असते. तिच्या वडिलांचा फोन येतो तर त्यांचं ओरडून बोलणं, माझ्याबद्दल तिचे कान भरणं हे असं सुरू आहे. कंटाळून तिनं त्यांना ब्लॉक केलं. एव्हाना तिच्या मित्र-मैत्रिणींमध्ये आमच्या घटस्फोटाबद्दल कळलं आहे. आता या वयातली मुलं काहीबाही बोलतात, चर्चा होते; त्यामुळे ती कोणाशीच बोलेनाशी झालीय. घरातच असते आणि असं काहीतरी बोलते. मला तर घरात बसणं शक्य नाही… खाणार काय?” मी तिला एकदा समुपदेशकासोबत बोलून बघावं आणि गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावीस असा सल्ला दिला. माझ्या एका सायकॉलॉजिस्ट मैत्रिणीशी बोलले. तिला पूर्ण हकिकत सांगितली. नेहाला तिचा नंबर देऊन वेळ घ्यायला सांगितलं. तिला सतत फोन करून, फॉलोअप घेऊन, ती समुपदेशकाकडे जाते आहे ना याची मी खात्री करून घेत होते. सायकोलॉजिस्ट-सायकियाट्रिस्ट यांच्या मदतीनं, औषधोपचारांनी उर्वी त्या अँग्झायटी-डिप्रेशनमधून बाहेर येऊन पुढचं शिक्षण घेऊन आता उत्तम करिअर करत आहे. वेळीच लक्षात आल्यामुळे आणि योग्य ती पावलं उचलल्यामुळे उर्वी पुन्हा नव्यानं जीवनाला सामोरी जाऊ शकली. 

दुसऱ्या एका केसमध्ये घटस्फोटासोबत इतर केसेसही होत्या. आईला तिच्या चार वर्षांच्या मुलीला भेटू दिलं जात नसे. इतकंच काय, मुलीभोवती कायम बाउन्सर… ती शाळेत, बागेत कुठेही गेली तरी; ही तरतूद केवळ आईला भेटू न देण्यासाठी…

आणखी एका केसमध्ये १०-१५ वर्षं झाली, वडील मुलाला भेटण्यासाठी तळमळताहेत. 

एका केसमध्ये मुलं आईला भेटण्यासाठी तयार नाहीत. मुलं वडिलांकडे आहेत. घटस्फोट झालेला आहे. आई मुलांना भेटायचं म्हणते तर मुलं अटी ठेवतात; अमुक एक वस्तू दिलीस तर भेटेन, बोलेन. 

अशा कितीतरी केसेस. प्रत्येकाची निराळी तऱ्हा. कितीतरी पालक आपल्या पाल्यापासून या ना त्या कारणानं दुरावले आहेत. अशा केसेस बघताना विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांच्या मर्यादा व अपयश ठळकपणे जाणवतं. नातेसंबंध का व कशासाठी, याविषयीचा अंधार ठळकपणे दिसायला लागतो. एकत्र कुटुंब ते  विभक्त कुटुंब आपण आलोच आहोत. याही पुढे जाऊन कुटुंब या ‘युनिट’ला तडा जात आहे. माणूस अधिकाधिक एकाकी पडत चाललेला आहे, असं एकाकी आयुष्य आरोग्यदायी नसतं. ‘मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे’ असं समाजशास्त्रज्ञ म्हणतात. या सगळ्याचा अर्थ पुन्हा व्यवस्थित समजावून घेण्याची वेळ आलेली आहे.

खरं तर मतभेद, भांडणं, घटस्फोट हे सगळं पती-पत्नीमध्ये घडतं. या दोन व्यक्तींचं पटत नाही असं होतं, होऊ शकतं; पण आई-वडिलांमध्ये काही भांडण आहे का? आईचं मुलांवर प्रेम, माया आहे. वडिलांचीही आहे. मुलं दोघांचाही जीव की प्राण आहेत; अर्थात, काही अपवाद वगळले तर. मग असं असताना मूल एका पालकाजवळ असताना दुसर्‍या पालकाबद्दल आणि त्याच्या नातेवाईकांबद्दल वाईट मत करून देणं योग्य नाही. ते मुलांच्या हिताचं नाही. मूल लहान असतं. त्यांच्या वतीनं आई / वडील निर्णय घेतात, की दुसरा पालक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध ठेवायचे की नाही. मूल लहान आहे, बरोबर आहे; पण त्यांच्या वतीनं नाती तोडण्याचा अधिकार पालक म्हणून तुम्हाला आहे का? 

मूल लहान आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, त्याच्या वतीनं निर्णय घेतले तरी चालतील, किंवा आपले निर्णय त्याच्यावर लादले तरी चालतील; असा विचार व कृती मुलांची निकोप वाढ व विकासासाठी घातक आहे. म्हणूनच मूल आकारानं छोटं असलं, तरी माणसाचे पूर्ण गुणधर्म असलेलं व्यक्तिमत्त्व आहे – हे समजून घेणं मुलाच्या व्यापक हितासाठी आवश्यक आहे. मुळातच मूल स्वतंत्र आहे. त्याचं स्वतंत्र अस्तित्व आपण मान्य करायला हवं, स्वीकारायला हवं. मुलाचं व्यक्तिमत्त्व बहरण्याची जबाबदारी पालकांची आहे. समजा नवऱ्याशी किंवा बायकोशी पटलं नाही तर भांडणं-घटस्फोट पती-पत्नीत होईल; आई-वडिलांचा कसा होईल? आणि आपापसात पटत नाही म्हणून मुलांचंही आई किंवा वडिलांसोबत पटणार नाही, पटू नये, अशी पावलं का उचलावीत? तो निर्णय त्या मुलांचा असणार आहे याची जाण आणि भान असणं गरजेचं आहे. म्हणजेच मुलांचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारता येणं. अर्थात, जिथे मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिक इजा होण्याची शक्यता असेल अशी नाती वगळून.

निशाचा घटस्फोट झालेला. पती बेरोजगार, तो कुठलीही जबाबदारी घेतच नव्हता. निशाचं आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाचं, पार्थचं, सासू-सासरे-नणंद आणि इतर नातेवाईकांशी उत्तम नातं होतं. निशानं मला प्रश्न विचारला, “पार्थचं वडिलांसोबत छान नातं आहे. पण वडील बेजबाबदार आहेत. सासू, सासरे, नणंद या सर्वांसोबत माझं आणि पार्थचं उत्तम नातं आहे. आम्ही एकमेकांची काळजी घेतो. ते नातं व्यवस्थित राहू शकेल का?” मी म्हटलं, “तुझं भांडण जर केवळ नवऱ्याशी आहे, त्याचा बेजबाबदारपणा व त्यातून होणाऱ्या त्रासाशी आहे, तर घटस्फोटानंतरही पार्थ व वडिलांचं नातं, आजी-आजोबा, आत्याचं नातं व्यवस्थित राहायला हरकत नाही. नात्याचं हे नवीनपण तुला शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि इतरांनाही ते सांगावं लागेल. ते जमतं. काही लोकांनी ते जमवलं आहे. तुलाही जमू शकतं. त्यासाठी गरज पडली तर समुपदेशकाची मदत घेशील.”

माझं अमुक एका व्यक्तीशी पटत नाही म्हणून माझ्या मुलांना त्या सर्व नात्यांपासून दूर ठेवणं ही नातेसंबंधांतील सर्वात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम गंभीर होतात. ते मुलांना त्यांचं संपूर्ण आयुष्य भोगावे लागतात. परस्पर सामंजस्यानं, एकमेकांचा आदर ठेवून घटस्फोट घेता येतो, त्यासाठी इतर नाती वेठीस ठेवण्याची गरज नसते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांपर्यंत नातं, नातेसंबंध, नात्याचा स्वीकार इत्यादी गोष्टी छान पद्धतीनं पोचवता येतात.

घटस्फोट होणं, यात एक अत्यंत जवळिकीचं नातं संपणं असतं. ते सर्वांसाठीच अत्यंत त्रासदायक, वेदनादायी आहे. अशा वेळी संवाद, विशेषतः मुलांसोबतचा, महत्त्वाचा. मुलांचं वय किती आहे, त्यानुसार त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं. तुमच्या मतभेदाचा विषय बोला; परंतु बोलताना आरोप-प्रत्यारोप नको. घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल माणूस म्हणून एकमेकांचा आदर राखून सांगा. एका नात्यात पटलं नाही तर काही बिघडत नाही. तुमचं ज्यांच्याशी पटलं नाही त्यांचं इतर अनेकांशी छान पटतं; म्हणजे काय तर केवळ तुम्ही दोघं एकमेकांना अनुरूप नाही आहात. त्याशिवाय स्वतंत्रपणे तुम्ही दोघंही उत्तम माणसं असू शकता. जर तुमच्या नात्याचा असा स्वीकार करू शकलात, तर ते मुलांसाठी जास्त निकोप आणि आरोग्यदायी असेल.

एका केसमध्ये पस्तीस वर्षांच्या मुलीला नातेसंबंधांच्या संघर्षांत बघत होते. बॉयफ्रेंड टिकत नाही, लग्न जुळत नाही, जुळलं तरी टिकेल का अशी सतत भीती वाटत असते. याचं बीज अर्थातच लहानपणात आईवडिलांचा घटस्फोट, वडील न भेटणं, यात असू शकतं. त्यांना ती खूप ‘मिस’ करते असं तिच्या बोलण्यातून जाणवतं. कदाचित वडिलांची छबी ती बॉयफ्रेंड किंवा नवरा निवडताना शोधत असावी.

न्यायालयात येणारी कुठलीही केस ही केवळ केस नसते; ते माणसाचं माणसांशी असलेलं नातं असतं. त्यामुळे वकिलानं केवळ केस लढणं, हरणं, जिंकणं इथपर्यंत काम करणं अपेक्षित नाही, तर अशिलाला खऱ्या अर्थानं दिलासा मिळणं गरजेचं आहे. मग तो दिलासा कायदेशीर लढाईसोबत त्यांना आयुष्यात पुन्हा नव्यानं उभं करणारा असावा. कोर्टात जाण्याआधी व कोर्टात केस चालू असताना, अशा कोणत्याही टप्प्यावर परस्पर सामंजस्यानं तडजोड करता येते आणि आयुष्याची नवी सुरुवात पुन्हा नव्या उमेदीनं करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जाऊ शकतात.

“शांती म्हणजे केवळ कलह मिटवणं नाही, तर आक्रमक, हिंसक अशा समस्येला शांतवणारे, सर्जनशील पर्याय निर्माण करणं आहे.”
-डोरोथी थॉम्सन 

अॅड. छाया गोलटगावकर 

chhaya.golatgaonkar@gmail.com

वकील आणि सामाजिक विषयांच्या अभ्यासक. बालसंगोपन व शिक्षण, मानसिक आरोग्य ह्या क्षेत्रांमध्ये कार्य करतात.