चम्मत ग – कणीक
चोपडा-जळगाव बस एवढी गच भरली होती, की आठ लोकांत एक घाम येत होता. पाय ठेवायला जागा नव्हती. तरीही नीट उभे राहता येत होते.
बसहून दुप्पट आकारमान होते स्टॅंडवरच्या माणसांचे. आणि तरी, बस आल्यावर क्षणार्धात त्या सगळ्यांची आणि बसच्या दाराची मिळून एक गच्च कणीक मळली गेली आणि मग ती कणीक डावी-उजवीकडून दाबून दाबून दाराच्या पलीकडे चढत सरकत बसमध्ये मावली!
आपल्या तोंडातला वेलदोडा आपण चघळतोय की दुसरा, आपला फोन आपल्या की दुसऱ्याच्या खिशात आपण की दुसऱ्याने ठेवला, आपले काही अवयव हरवलेत की जास्तीचे आलेत, आपले विचार आपल्याला येताहेत की दुसऱ्याला, असे प्रश्न निर्माण होत होते.
पुढच्या स्टॅापला एकोणतीस लोक उतरले तरी बसमध्ये तेवढेच लोक होते.
सगळ्यांची उंची काही इंचांनी वाढली असणार. सगळीकडून एवढे दाबलेले वरून निघाले असणार.
जळगाव स्टॅंडला एक मित्र ॲक्टिवावर घ्यायला आलेला दिसला. ही एवढाली गच्च कणीक आता ॲक्टिव्हावर कशी मावणार असा प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यात बसचे दार उघडले आणि क्षणार्धात कणकेची माणसे झाली! मला स्वत्वाची जाणीव झाली. प्रश्न सुटला.
रुबी रमा प्रवीण