चिकूpiku

… १ ते ८ वयोगटातील मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मासिक

रोज उठून मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी कुठले खेळ खेळायचे, कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीज करायच्या, हा बऱ्याच आईबाबांपुढचा यक्षप्रश्न असतो. म्हणजे काही तरी करण्याची इच्छा तर खूप असते; पण नक्की काय करायचं हे सुचत नाही. लहान मुलांच्या मेंदूचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. अशा वेळी मुलांना नवनवीन अनुभव मिळणं खूप गरजेचं असतं.    मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रं, गाणी, हातानी करून बघायच्या सोप्या सोप्या कृती, ऑडिओ गोष्टी, असा खजिना ‘चिकूपिकू’ मासिकातून दर महिन्याला मुलांपर्यंत पोहोचतो. जेवताना, झोपताना ह्यातल्या गोष्टी मुलांनी आई-बाबा, आजी-आबांकडून ऐकाव्या, चित्रं रंगवावी, हातानी खेळणी करून बघावी, अशी ह्या मागची कल्पना आहे. त्या निमित्तानं आई-बाबा आणि मुलांना अर्थपूर्ण एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळते. आजच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘क्वालिटी टाईम.’

‘चिकूपिकू’ हे मुलं आणि आई-बाबा या जोडीचं मासिक आहे. वाचन-कौशल्य अजून पुरेसं विकसित न झालेल्या मुलांना मोठ्यांच्या मदतीनं वाचनानंद मिळवून देणं, त्यातून त्यांना वाचनाची गोडी लावणं, हा ‘चिकूपिकू’चा उद्देश आहे.

हल्ली बरीच मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. मात्र घरात बोलली जाणारी भाषा जन्मापासून मुलाच्या भावविश्वाचा भाग असल्यानं ती भाषा त्याला जवळची वाटते. हे लक्षात घेऊन ‘चिकूपिकू’मधला ८०% मजकूर मराठी भाषेत असतो. या सगळ्या गोष्टी ऑडिओ स्वरूपात मोफत उपलब्ध आहेत. परदेशात राहणाऱ्या मुलांपर्यंतही त्यामुळे त्या सहज पोचतात.

‘चिकूपिकू’ मासिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.chikupiku.com ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.