जून महिन्याच्या अंकासाठी प्रश्न
निसर्ग! या शब्दाच्या उच्चारासरशी आपल्या प्रत्येकाच्या मनात उमटणारे तरंग निरनिराळे असतील. कुणासाठी वातावरण, पाणी, हवा आणि सगळी सजीवसृष्टी म्हणजे निसर्ग असेल, कुणी त्याला देवाच्या रूपात भजत असेल, कुणासाठी केवळ पाठ्यपुस्तकी संकल्पना तर कुणाची ती रोजीरोटीही असेल. कुणाच्या दृष्टीनं निसर्ग हा एक शाश्वत शिक्षक असेल, तर कुणी निसर्गसौंदर्यानं मंत्रमुग्ध होईल; कुणाचा उपयुक्ततावादी दृष्टिकोन असेल तर कुणी आपल्या अस्तित्वाबद्दल त्याच्यापुढे नतमस्तक! एक मात्र खरं, निसर्गाला ओरबाडून घेण्याच्या मानवी वृत्तीमुळे आज संपूर्ण मानवजात वातावरणीय बदलांच्या रूपानं आत्मनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आज त्याबद्दल सर्व स्तरांतूनच चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
एक पालक म्हणून निसर्गाचा विचार करत असताना आपल्याला काय वाटतं, मनात कोणते प्रश्न उद्भवतात हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. ‘जून’ महिन्याचा अंक आपण याच विषयावर करत आहोत. आपल्या विचारांना चालना देण्यासाठी खाली काही प्रश्न दिलेले आहेत…अर्थात निसर्ग जसा अनंत आहे, तशीच त्यावरची चर्चाही काही ठरावीक प्रश्नांमध्ये बांधली जाऊ शकत नाही.. ह्या विषयासंबंधित तुमच्या विचारांचं स्वागत आहे.
- निसर्गाचं तुमच्या मनातलं स्थान काय आहे?
- आपल्या मुलांना निसर्गाच्या विविध रूपांची ओळख कशी करून देता?
- निसर्ग आपलं पालकत्व जाणीवपूर्वक घेत नसला तरी आपण त्याची लेकरं तर असतोच. निसर्गाकडून पालकपणाचे काही धडे आपल्याला मिळतात का?
गेल्या काही वर्षांमध्ये अवतीभोवतीच्या निसर्गात काही अनपेक्षित बदल घडतायत असं तुम्हाला जाणवतंय का? आपल्या मुलाबाळांच्या समोर त्यातून कोणती आव्हानं उभी राहत आहेत? आपण त्यावर काय उपाययोजना करायला हवी?