स्वाती केळकर

ते एक अजब शहर आहे…

त्या दगडी शहरात

आकळत नाही काय खुबी आहे,

की पावलागणिक झुकते आपले मस्तक,

की याच गल्ल्यांमधून चालला होता

एक परमेश्वराचा प्रेषित, शतकांपूर्वी.

कोण्या चिर्‍याला स्पर्शून बघतो एखादा हात

की, कदाचित इथेच कुठे, भिंतीचा आधार घेत

क्षणभर थांबला असेल कुणी त्राता.

एखादी शिळा पवित्र

जीवर ठेवलं होतं शेवटचं पाऊल कुणा देवदूतानं.

आणि तिथे त्याच वाटेने पुन्हा

येणार आहे कोणी प्रकाशपुत्र,

कारण मृत्यूनंतरही त्याची वाट बघताहेत

अगणित जीव.

पिवळट पडत जाणारी प्रत्येक भिंत

प्रत्येक झिजवट पायरी

सांगते आहे एखादी कहाणी

कुणा परमेश्वराच्या पाईकाची

कुणा पैगंबर, कुणा ईसामसीहाची

ज्यानी मानवाला माणूस बनवू पाहिलं.

तरीही या शहराच्या हवेला व्यापून आहे कटुता

आणि प्रत्येकाचे विदीर्ण ऊर.

सभोवताली इतक्या भिंती तरी आत भयभीत 

आणि दहशतीखाली पिवळ्या पडलेल्या सर्व देवड्या,

रस्ते सर्व अस्वस्थ आणि आशंकित,

कधी कुणी उचलेल पुढे येऊन

इथलाच एखादा दगड…

असे निरागस तळहात

ज्यांवरील रेषासुद्धा अजून अस्पष्ट

ते पेलताहेत स्फोटके. 

निरागस चेहरे पण

डोळ्यात निखारे.

रोखलेल्या बंदुका आणि भडभडते टायर

हवेत तलखी, धुरगुदमरते आकाश

कसं हे शहर,

त्यातून हे कशाचे धुमारे?

शतकांपूर्वी जो क्रूस

ठेवला होता येशूच्या खांद्यावर;

तोच वाहतोय येथील प्रत्येक देह

आणि पिचतोय त्याच्या खाली

कधी भय, कधी द्वेष

तर कधी भूतकाळाच्या ओझ्याखाली.

मूळ हिंदी कविता : स्वाती केळकर

स्वाती केळकर हिंदी मुलखातल्या असल्या तरी आता पुण्यातच राहतात. त्यांचं लेखन तर सुरस असतंच, पण खास गोष्ट अशी सांगता येईल, की त्यांना सर्वच कला-विषयांबद्दल नितळ आणि शहाणी आत्मीयता आहे.

अनुवाद : विनय कुलकर्णी