जे. कृष्णमूर्ती म्हणतात…
बनारस येथील राजघाट शाळेत(1954) विद्यार्थ्यांशी भीती ह्या विषयावर बोलताना जे. कृष्णमूर्ती म्हणतात…
भीती म्हणजे दुसर्या कुठल्यातरी गोष्टीशी निगडीत असलेली गोष्ट.
आई-बाबा बाईंना काय सांगतील?
विंचू-काटा, साप निघाला तर?
कधीतरी आजूबाजूला अवचित दर्शन देणारा मृत्यू,
अशी कशाशी तरी ती निगडित असते.
भीतीला स्वतंत्र अस्तित्व नसतं.
तुम्हाला जी भीती वाटते ती कशामुळे, हे तुम्हाला माहीत असतं का?
तुम्हाला आई-बाबांची, शिक्षकांची भीती तर नाही वाटत ना ?
तसं असू नये; पण शययता असं असण्याचीही आहे.
तुम्हाला परीक्षेत नापास होण्याची भीती तर नाही वाटत ना?
लोकांनी तुमच्याबद्दल चांगला विचार केला पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे, ह्यासाठी तर अस्वस्थ नसता ना तुम्ही?
आपल्याला कशाची भीती वाटतेय हे आपल्याला माहीत असायला हवं.
भीती मनात निर्माण होते. त्यामुळे आपल्याला भीती का वाटते, हे आपल्या मनाला माहीत असायला हवं.
आपल्या मनाला काय वाटतंय, ते समजावून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घ्या.
दररोज एक तास तरी तुम्ही गणित किंवा भूगोलावर घालवता; पण आयुष्यातल्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर दोन मिनिटंही घालवत नाही.
नुसतं गणितं सोडवणं किंवा पाठ्यपुस्तक वाचण्यापेक्षा ‘भीतीपासून मुक्ती कशी मिळवायची’ हे समजून घ्यायला पुरेसा वेळ द्यायला नको का?
अनुवाद: रुबी रमा प्रवीण