स्वाती भट
‘प्ले फॉर पीस’… माणसांना एकमेकांशी जोडायला… कुठल्याही अडसराविना… मनांच्या किंवा सीमांच्या. ह्या प्रवासात इथे पाकिस्तानात आम्ही कसे येऊन पोचलो ते आधी सांगायला पाहिजे.
ऑक्टोबर 2014, नवी दिल्ली : ‘सर्वसमावेशक शिक्षण’ ह्या विषयावर एका बैठकीदरम्यान आमचा नेपाळच्या सलोनीशी परिचय झाला. तिने फेसबुकवर आमचा फोटो टाकला. तो पाहून पाकिस्तानातून रुमना ह्यांनी कमेन्ट टाकली, ‘‘तुम्ही पाकिस्तानात ‘प्ले फॉर पीस’ ची सत्रे घेऊ शकता का?’’ त्यावर मी लिहिले, ‘‘का नाही! तुम्ही म्हणाल तेव्हा.’’ त्यांनी ITA (इदरा-ए-तालीम-ओ-आगाही) ह्या संस्थेला आमच्याबद्दल कळवले आणि पुढच्या महिन्याभरात आम्ही लाहोरला होणार्या बालसाहित्य महोत्सवासाठीच्या (चिल्ड्रन्स लिटरेचर फेस्टिवल CLF) निमंत्रितांपैकी एक झालो. या निमित्ताने गावोगावचे शिक्षक, मुलांना भेटायची आम्हाला संधी मिळाली. त्या 3 दिवसांत आम्ही खेळाची 6-7 सत्रे घेतली. जवळपास 500 मुले आणि 40 शिक्षक त्यात सहभागी झाले.
तिथे आमचा आनसेर जावेद ह्यांच्याशी परिचय झाला. ‘स्टारफिश’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ते पाकिस्तानातील 33 ख्रिश्चन अल्पसंख्याक शाळांना साहाय्य करतात. ते आम्हाला जोहानाबादमधील एका शाळेत घेऊन गेले. तिथे आम्ही शिक्षक आणि किशोरवयीन मुलांसाठी ‘प्ले फॉर पीस’चे सत्र घेतले. त्यातून मुले आणि शिक्षक एकमेकांच्या जवळ आले. ‘मुलांशी मोकळेपणी वागलो, तर ती आपला मान ठेवणार नाहीत’ असेच आम्ही आजवर मानत आलो होतो, असे शिक्षकांनी सांगितले. मुख्याध्यापकांना असे हसताना, नाचताना पाहून सहभागी मुलींनीही आनंद व्यक्त केला. त्यांनी आजवर कधी सरांच्या चेहर्यावर हास्य पाहिलेच नव्हते.
प्रवासाची सुरुवात
नोव्हेंबर महिन्याची एक सकाळ. मी अमृतसरहून अटारीला जाणार्या रेल्वेमध्ये बसले तेव्हा मनात हुरहूर, अस्वस्थता होती. मी एवढी खुल्या विचारांची असूनही लहानपणी सिनेमांमधून पाहिलेली छिन्नविच्छिन्न मृतदेहांनी पाकिस्तानातून भरून येणार्या रेल्वेगाडीची भीतीदायक दृश्ये माझा पिच्छा सोडत नव्हती. सकाळचा साडेआठचा सुमार होता. डब्यात तुरळकच माणसे होती. मी प्रत्येकाकडे काहीशा साशंक नजरेने बघत होते. मी अजून भारतातच आहे आणि गाडी देशाची सीमा ओलांडून पाकिस्तानात जाणार नाहीये हे मला स्वतःला सारखे बजावावे लागत होते. आम्हाला भारताच्या सीमेवर असणार्या अटारी नावाच्या गावात उतरायचे होते. मी प्रयत्नपूर्वक खिडकीच्या बाहेरचे सृष्टिसौंदर्य बघू लागले.

आम्ही वाघा सीमेवर पोचलो. तिथे एका प्रतीक्षागृहात थांबलो होतो. लोकांकडे असलेले सामानसुमान, बॅगा, पोती पाहून मी थक्क झाले. एक मोठ्ठे कुटुंब पाकिस्तानात परत जायला निघाले होते. मी मनात म्हटले : चला! कमीतकमी यांना लग्नाला तरी जाता आले. म्हणजे सीमांच्या दोन्ही बाजूला असलेली कुटुंबे एकमेकांना भेटतात तर! मला तर हे अशक्यच वाटत होते.
इमिग्रेशनच्या रांगेत आम्ही दोघे सर्वात पुढे होतो. ‘‘बसा. तोंड उघडा…’’ तिथली बाई म्हणाली. ‘‘तुम्हाला हे पोलिओचे ड्रॉप्स घ्यायचे आहेत.’’ मी मोठी असल्याने मला त्याची गरज नाही, हे मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला; पण पाकिस्तानात पोलिओची साथ आलेली असल्याने ड्रॉप्स घेतल्याशिवाय मला सीमेपलीकडे जाता येणार नव्हते. पुन्हा तेच. मी ‘उदारमतवादी’, ‘शहाणीव असलेली’, ‘शांती प्रस्थापित व्हावी म्हणून झटणारी’ अशी सगळी असूनही प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घेत होते. आपल्या नकळत आत झिरपलेल्या विचारांची ताकद आपण ओळखलेलीच नसते. थोडा वेळ ते ड्रॉप्स न गिळता मी तसेच तोंडात धरून ठेवले. जरा पलीकडे जाऊन ते थुंकून टाकावेत, असेही मनात आले. काही भलतेच असले तर… माझ्या मनात पुन्हा पाल चुकचुकली. ‘काय व्हायचेय? सगळे घेताहेत. गिळ चुपचाप…’ मी स्वतःला दटावले आणि गिळून टाकले एकदाचे.
व्हिसा फॉर्ममध्ये धर्म विचारलेला होता. हा रकाना आम्ही मोकळा ठेवू का म्हणून विचारले; पण धर्म लिहिणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मन घट्ट करून आम्ही तो रकाना भरला. ‘जन्माच्या वेळी आमचा कुठला धर्म होता, ते त्यांना हवे आहे’ असे आपले आम्ही मग मनाचे समाधान करून घेतले.
पाकिस्तानी दूतावासाच्या खिडकीशी पोचल्यावर त्यांनी आत बोलावले, ‘अंदर आईये.’
‘हे आपल्याला आत का बोलवत असतील? इथून मी कायमची गायब तर होणार नाही?’
मी आत जाऊन इकडेतिकडे पाहू लागले. हे पाकिस्तानचे प्रतिरूप आहे का?
आत एक कोच होता. तिकडे हात करून त्यांनी बसायला सांगितले, ‘तशरीफ रखिये.’
हे खरे आहे का? आणि जणू काही ती माणसेच होती. (व्हिसा अधिकारी सहसा रोबोट असतात; फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’) तिथून निघण्यापूर्वी आम्ही त्यांना विचारले, ‘‘दोन दिवसांनी आम्ही दिल्लीला परतू. पासपोर्ट घेण्यासाठी कोणाला पाठवले, तर चालेल का?’’
‘‘उद्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो’’, त्यांनी उत्तर दिले. ‘‘तयार झाले की कळवतो.’’
आश्चर्याच्या वाटेवरचा आमचा प्रवास सुरू झाला होता. आम्ही त्याबद्दल ऐकून होतोही; पण स्वतःला अनुभव आल्याशिवाय विश्वास बसत नाही, हेच खरे.
मी पटापट कुटुंबीयांना फोन केले, व्हॉट्सप ग्रुपवर मेसेज पाठवले ‘आम्ही आता पाकिस्तानात प्रवेश करतो आहोत. कदाचित मोबाईलला रेंज नसेल. आत्तापर्यंत तरी सगळे ठीक आहे.’ सगळ्यांच्या उत्तराचा गोषवारा सांगायचा, तर ‘तुम्ही धाडसी आहातच; पण काळजी घ्या. सुरक्षित राहा.’
आम्ही सीमा ओलांडायला सुरुवात केली. दोन्ही बाजूंच्या अधिकार्यांकडे पाहून स्मित करण्याचा प्रयत्न केला. आमच्या काळ्या पारपत्रांवरून (पासपोर्ट) आम्ही कुठल्या देशातून आलोय ते कळतच होते. होय! आम्ही आता पाकिस्तानात होतो. बॉलिवूडच्या चित्रपटांतली दृश्ये माझ्या डोळ्यांसमोर तरळत होती. मी आता कायमची जेलमध्ये अडकून पडेन. माझ्याबाबतीत ‘वीर-झरा’सारखेच घडेल ‘फोटो काढू का’, म्हणून एका गणवेशधारी माणसाला विचारले. ‘मला त्यात घेऊ नका म्हणजे झाले’, त्याने कोरड्या आवाजात परवानगी दिली.
तिथे काबुलीवाल्यासारखा दिसणारा एक हिरवा पासपोर्ट असलेला माणूस होता. तो पुटपुटला, ‘‘ह्या इंग्रजांनी सगळं वाटोळं करून टाकलं आहे.’’
अपेक्षेपेक्षा सगळे सहजपणे चालले होते. आमची घड्याळे आम्ही 30 मिनिटांनी मागे केली. इमिग्रेशनच्या एक्झिट गेटवर यजमान संस्थेने पाठवलेली गाडी असणार होती. आमच्याकडे फोन नव्हता. आता काय करावे? इकडेतिकडे पाहिले आणि 200 मीटरवर असलेल्या पार्किंगच्या दिशेने जायला सुरुवात केली. नुकताच पाकिस्तानच्या बाजूला वाघा सीमेवर स्फोट झालेला असल्याने प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्यात आली होती. पाठीवर अवजड बॅगा घेऊन आम्ही चालत होतो. तेवढ्यात मागून आवाज आला, ‘‘तुम्ही सवाती आहात का?’’ काश्मिरातही माझ्या नावाचा उच्चार असाच होई. त्यामुळे मला आश्चर्य वाटले नाही. ते होते रियाजभाई. आमचीच वाट पाहत होते. त्यांनी आम्हाला आमच्या कारचा नंबर सांगितला. हुश्श! आता सगळे सोपे होते. आम्ही त्यांचे आभार मानले.
गाडी लाहोर शहरातून जाऊ लागली. दरम्यान रियाजभाईंशी आमच्या गप्पा सुरू झाल्या. गाडीतल्या रेडियोवर बॉलीवूडच्या लेटेस्ट गाण्यांचा ढणढणाट चाललेला होता. गाडीच्या बाहेर नजर टाकली. जणू पंजाबातल्या रस्त्यांवरून जातोय असे वाटत होते. फक्त रस्त्यावरच्या उर्दू पाट्या हा भारत नसल्याची जाणीव करून देत होत्या. सुरुवातीपासूनच उत्तम आदरातिथ्य अनुभवायला मिळत होते. न्याहारीत चना-नान किंवा शिरा-पुरी. आम्ही ‘वायू’ प्रदेशातच प्रवेश केला होता म्हणा न!
इथे एक गोष्ट आमच्या लक्षात आली. भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देश, काही विशिष्ट शहरांसाठीच व्हिसा देतात. हळूहळू आमचा इथल्या लोकांशी आणि त्यांच्या चांगुलपणाशी परिचय होऊ लागला. हॉटेलच्या स्वागतकक्षावर आमच्या काळ्या पासपोर्टनी आमचे भारतीयत्व जाहीर केले. लगेच आमच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. ‘मी सीमेपलीकडे जाऊ शकतो का? ते सहजशक्य आहे का?’ ‘भारत कसा दिसतो?’ ‘सिनेकलाकारांना भेटता येतं का?’ एक ना अनेक!
दुपारी जेवणाच्या वेळी आम्ही आमच्या मित्राच्या मित्राला भेटलो. तो नास्तिक आहे. त्याची आई दुसर्या खोलीत गेल्यावर मी त्याला विचारले, ‘‘तुझे विचार, एका क्रांतिकारी मासिकासाठी काम वगैरे, हे तुझ्या कुटुंबीयांना चालतं का?’’ कुठल्याही भारतीय तरुणाप्रमाणे तो कुजबुजला, ‘‘ती एक वेगळीच कहाणी आहे. बाहेर गेल्यावर सांगतो.’’
त्याच्या आईने मला विचारले, ‘‘भारतातले सगळे लोक तुमच्यासारखे चांगले असतात का? आम्हाला तर सगळ्या भारतातल्याच वस्तू आवडतात – सौंदर्यप्रसाधनं, मसाले; अगदी विक्सही.’’
सगळीकडून आमच्यावर हास्याचा आणि नमस्कारांचा (सलाम) वर्षाव सुरू होता. रात्रीचे जेवण शांतपणे हॉटेलच्या खोलीतच घ्यावे, असा आम्ही विचार करत होतो, तोच फोन वाजला. ‘‘माझ्यासोबत जेवायला येता का?’’ त्यांना आम्हाला एकटे सोडायचेच नव्हते. आनसेर हा पाकिस्तानातील अल्पसंख्याक ख्रिश्चन होता. तो आम्हाला तिथल्या गोष्टी सांगत होता. त्या सगळ्या भारतातल्याच वाटत होत्या. भेदभाव, शालाबाह्य मुले वगैरे…
स्वागत
दुसर्या दिवशी सकाळी आम्हाला ‘प्ले फॉर पीस’चे सत्र घ्यायचे होते. एवढ्या भव्य स्वागताची आम्ही अपेक्षाच केली नव्हती. गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव, बॉलीवूडच्या गाण्यावर नृत्य… क्षणार्धात आम्ही भारतातून आलेले सेलिब्रिटी बनून गेलो. पुढचा आठवडाभर हे असेच चाललेले होते. भारतासारखे इथलेही शिक्षक, मुले सत्र सुरू असताना खेळात सहभागी होत होते.
तिथली एक गोष्ट मला खूपच आवडली. चहासाठी तिथे दुधाऐवजी दूधपावडर ठेवलेली असे. तिचे तोबरे भरायला मला किती आवडते म्हणून सांगू! पण मी स्वतःला रोखले. त्यांचे डोळे माझ्यावर खिळलेले आहेत हे माझ्या लक्षात आले.
कार्यशाळा संपल्यावर जरा मोठी मुले आम्हाला जाऊ देत नसत. ‘‘एक ऑटोग्राफ द्या न! हिंदीत लिहा बरं का.’’ हिंदीत का? मला जरा आश्चर्य वाटले. त्यांचे एकमुखाने उत्तर आले, ‘‘कारण आम्हाला भारत आणि भारतीय चित्रपट, दोन्ही आवडतात.’’ वा! मला जणू बॉलीवूडच्या चित्रपटात असल्यासारखे वाटायला लागले. त्यांची, त्यांच्या भावा-बहिणींची नावे मी हिंदीत लिहीत होते खरी; पण त्यांना काही बोध होत असेल ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मग मी आधी इंग्रजीत आणि पुढे हिंदीत नावे लिहिली; जेणेकरून आपण काय वाचतोय ते त्यांना कळावे. निघताना त्यांनी आम्हाला टाटा केला, मिठ्या मारल्या.
ह्या नव्याने झालेल्या मित्रांपैकी काहींनी आम्हाला लाहोर फिरवण्यासाठी सुट्ट्या घेतल्या. बादशाही किल्ला, मशीद फिरवून आणली. आम्हाला परदेशी लोकांसाठी असलेले जास्त रकमेचे तिकीट काढावे लागले नाही. आमच्या मित्रांचे म्हणणे पडले, की आम्ही पाकिस्तानीच वाटतो. खरेच?
जरासे पुढे गेलो, तो तिथल्या सुरक्षा रक्षकाने हटकले. अरेच्चा! आम्ही नियम मोडला होता. आता काही खरे नाही. मी मनोमन हादरले. ‘सुरक्षित राहा’… लोकांच्या शुभेच्छा मला आठवायला लागल्या. रजा हळूच म्हणाला, ‘‘तू जा पुढे, मी बघतो.’’
आम्ही पुढे गेलो. थोड्याच वेळात रजाही आलाच. मृदू आवाजात त्याने मला विचारले, ‘‘तुला ते वर्तमानपत्र हवंच आहे का?’’ माझ्या लॅपटॉपच्या बाजूच्या कप्प्यात ‘द हिंदू’ हा भारतीय पेपर होता. आता हे प्रकरण रजाने कसे हाताळले? तो त्यांना म्हणाला, ‘‘ते आमचे मित्र आहेत. कराचीहून आलेत. आणि त्यांच्याकडे ‘डॉन’ हा पाकिस्तानी पेपर आहे.’’ मला वाटते, त्या सुरक्षा रक्षकांनाही भारताबद्दल ममत्व असावे. त्यांनी आम्हाला जाऊ दिले. मी तिथल्या तिथे तो पेपर टाकून दिला.
मशिदीच्या शेजारीच एक गुरुद्वारा होता. मध्ये छोट्या दुकानांची रांग होती; अगदी भारतातल्यासारखेच दृश्य. जवळच रेड लाईट एरियाही होता – भारत आणि पाकिस्तानातले आणखी एक साम्य! चालताना आजूबाजूला मुले खेळत होती. चुकीच्या बाजूने दामटलेली वाहने, रस्त्यावरची चिन्हे, ऑटोरिक्षा, मोठेमोठे फलक, गर्दी, बिर्याणी-विक्रेता, पाणीपुरीची गाडी, चिनी खेळण्यांची टपरी, मुले, मुली, बायका, माणसे, रस्ते, भिंती, रंग.. सगळेच किती सारखे आणि तरी किती वेगळे!
रात्री जेवताना एकीशी ओळख झाली. गप्पा सुरू झाल्या.
‘‘तुम्ही कुठून आलात?’’
‘‘अऽऽऽ भारत..’’
मी पुढे काही बोलणार, एवढ्यात ती म्हणाली, ‘‘आधी मला तुला मिठी मारू दे.’’
ही केवळ सुरुवात होती. त्यानंतर शिक्षकसाहित्य आणि बालसाहित्य महोत्सवासाठी (ढङऋ । उङऋ) येणार्या व्यक्तींशी गप्पांचा सिलसिलाच सुरू झाला. ती सगळी मंडळी माझ्यापेक्षा वयाने, मानाने मोठी होती. कुणी लेखक-साहित्यिक होते, कुणी संहिता-लेखक, तर कुणी कथाकथनकार. त्यांच्यापैकी बहुतांश मंडळी त्यांच्या लहानपणी भारतात होती. त्यांच्याकडे तिथल्या सुंदर आठवणी होत्या.
‘‘बाटलीत लावलेला मनी-प्लांट म्हणजे काय ते तुला ठाऊक आहे का? तो मी आहे. माझी मुळे कापून टाकलेली आहेत. आता एका बाटलीत सजवून मला नव्या जागी ठेवण्यात आलेय.’’
‘‘अशी इकडे माझ्या मिठीत ये. तुला पाहून मला भारतातल्या माझ्या लहानपणच्या घराची आठवण आली. आठवीपर्यंत मी तिकडे होते. त्यानंतर आम्हाला तिथून निघावे लागले. कुटुंबातल्या काही लोकांनी तिकडेच राहायचे ठरवले. आता आमच्या क्वचितच गाठीभेटी होतात. सगळा संबंध संपलाय.’’
त्या रात्री भावनांचा वेगळाच आविष्कार बघायला मिळाला. मला अपराध्यासारखे वाटायला लागले. कशासाठी? माहीत नाही. हे मी केले नाही. मी देशाचे तुकडे केले नाहीत. ह्या मेंदूत, आत्म्यात वर्षानुवर्षे खोलवर रुजलेल्या गोष्टी धडाधड कोसळत होत्या. माझा उदारमतवादी ‘स्व’ खोलवर माझ्या हृदयाला धडका मारू लागला.
हसीनाआपांशी झालेली भेट खूपच रोमांचक होती. त्यांनी ‘तनहाईयां’, ‘धूप किनारे’ वगैरे मालिका लिहिल्या आहेत. भाड्याने आणलेल्या व्हिडिओ कॅसेटवर ह्या मालिका पाहिलेल्या मला आठवतात.
त्या म्हणाल्या, ‘‘स्वाती, मला तुम्हा दोघांशी खूप बोलायचंय.’’
उत्तरोत्तर आमच्या गप्पा रंगतच गेल्या. मी त्यांच्याशी बोलतेय ह्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.
एका दुपारी अजान ऐकून एक मित्र म्हणाला, ‘‘माईकवरून काय सांगताहेत ते ऐकते आहेस न? तुला चमत्कारिक वाटत असेल न?’’
‘‘पण हे तर आम्ही भारतातही ऐकतो.’’ मी म्हटले.
अजानसाठी माईक वापरण्याच्या विरोधात त्याने एकदा चळवळ केली होती म्हणाला. माझा विश्वास बसेना. पाकिस्तानबद्दलचे माझे मत खूपच चुकीचे ठरले होते.
उङऋ मध्ये शुक्रवारी दुपारी प्रार्थनेच्या वेळी आयोजकांनी एक छोटेसे चर्चासत्र ठेवले होते. पण त्याची घोषणा करायला वेळच मिळाला नाही. दहा हजारांच्या आसपास मुले आणि त्यांच्या शिक्षकांचे वेळेकडे लक्षच नव्हते. सगळे गोष्टी ऐकण्यात, पुस्तके चाळण्यात गुंग होऊन गेले होते. हा आहे पाकिस्तान!
3,500 शालेय विद्यार्थ्यांनी ह्या महोत्सवाला हजेरी लावली. ऑक्सफर्ड प्रेसच्या मदतीने पाकिस्तानात ही चळवळ चालवली जाते. तिथे सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या शाळा आहेत. उत्तर भारतात जशा हिन्दी माध्यमाच्या सरकारी शाळा असतात, तशाच इथे उर्दू माध्यमाच्या शाळा सहसा सरकारी असतात. ह्या महोत्सवाला येण्याच्या आधी एका इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापकांनी आमच्या एका शिक्षक असलेल्या मित्राला विचारले, ‘‘इंग्रजी माध्यमाच्या इतर शाळा येणार आहेत का? तिथे सगळी उर्दू बोलणारी मुलं असतील, आमच्या मुलांना तिथे आवडेल का?’’ भारतातही अशीच वाक्ये कानावर पडतात, नाही का?
मैत्री
एका दुपारी आम्ही एका ज्येष्ठ टीव्ही कलाकाराच्या संगीत-सत्राला जायचे ठरवले. प्रत्येक लहान मुलाने हिंदी चित्रपट-गीत गायले. इथेही आम्ही सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र झालो. खालिद अनामने त्याचे गाणे आपल्या ‘भारतीय मित्रांना’ समर्पित केले. आमच्या कार्यशाळेला आलेल्या एका शिक्षकांनी आम्हाला स्टेजवर खेचले. सगळेजण ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे…’ हे गाणे मनापासून गात होते; कधीही न तुटू शकणार्या मैत्रीचे गाणे.
मला 2004 साली भरलेल्या ‘जागतिक सामाजिक मंचा’ची (थेीश्रव डेलळरश्र र्ऋेीीा) आठवण झाली. कार्यक्रमाची ती शेवटची संध्याकाळ होती. ‘इंडियन ओशन’ नावाचा बँड मंचावर होता. पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ प्रेक्षकांत होते. ते हेच गाणे म्हणत होते. तेव्हाही मी आश्चर्यचकित झाले होते. त्यांना खरेच मैत्री हवी आहे.

इस्लामाबादहून आलेल्या एका तज्ज्ञ व्यक्तीने मी भारतातून कुठून आलेय म्हणून विचारले. आम्ही इतके फिरत असतो, की ह्या प्रश्नाचे उत्तर देणेच कठीण होते. मी म्हटले, ‘‘आत्ता माझं घर बिहारमधल्या पाटण्याला आहे.’’ तिच्या चेहर्यावरचे हावभाव बदलले. ‘‘खरंच? माझ्या नवर्याचे काही कुटुंबीय तिथेच कुठेतरी राहतात; पण मला नेमकं नाही सांगता येणार. तुम्ही बोला त्याच्याशी, तो तिकडे आहे बघा…’’ प्रत्येक पाकिस्तानी माणसाचे कुणी ना कुणी भारतात होतेच!
आम्हाला ज्या संस्थेने निमंत्रण दिले होते, त्याची प्रमुख होती बाएला. त्या रात्री तिनेच जेवण ठेवले होते. मी शाकाहारी असल्याने तिने स्वतः खपून माझ्यासाठी पनीरचे पदार्थ केले होते. प्रेम आणि खाणे, लाहोर दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे – आणि आम्हाला दोन्ही भरभरून मिळाले.
‘‘दाढी वाढवलेली माणसं मला सहनच होत नाहीत’’ माझी पावलं ह्या संभाषणाच्या दिशेने वळली. ‘‘… विशेषतः बिनामिशीची.’’ हं.. आणखी एक मिथक कोसळून पडले.
सहावीला इतिहास शिकवणारा एक मित्र मागे आंतरराष्ट्रीय शांती-महोत्सवासाठी भारतात आला होता. तो मला आनंदाने सांगत होता, ‘‘मी भारतातून देवाची एक मूर्ती आणलीय. ती बघायला आणि हिंदूंबद्दल जाणून घ्यायला माझी मुले खूप उत्सुक आहेत.’’ झोपायला जाताना माझ्या मनात आले, की भारतातल्या माझ्या मित्रांना हे कळवावे. झाले. त्यातून चर्चाच सुरू झाली.
‘‘आम्ही रोज बातम्या ऐकतो. त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही. कुणा एकट्या व्यक्तीच्या अनुभवावरून आम्ही मत नाही बनवू शकत.’’
‘‘पाकिस्तानी सैन्याशी लढणारे माझे कित्येक मित्र मी गमावले आहेत… ते नजरेआड केले जाऊ शकत नाही.’’
दोन देशांमधल्या सीमेबद्दल बोलताना लाहोरमधला एक मित्र म्हणाला, ‘‘हे सगळं राजकारण्यांचं कारस्थान आहे. जनतेला काही प्रॉब्लेम नाहीय. सगळे पुन्हा एक होऊ इच्छितात.’’
लाहोरची क्षणचित्रे
एक मैत्रीण म्हणाली, ‘‘तुम्ही भारतात स्कर्ट घालू शकता. इथे तर पुरुष टक लावून बघत राहतात.’’ मी तिला जाणीव करून दिली, की तिने फक्त चंदीगढ पाहिले होते. रस्त्यावरची वर्दळ, नो एन्ट्रीचे बोर्ड हयातून अगदी सफाईने गाडी चालवत ती आम्हाला घेऊन चालली होती. एका क्षणी तर डोळे मिटून घेत ती जोरात किंचाळली, ‘या खुदा’. लाहोरच्या रस्त्यांवरून चालताना पाटण्यापेक्षा मला काही वेगळे नाही वाटले. तिथे अनारकली नावाचा स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध रस्ता आहे. तिथल्या एका चहाच्या टपरीवर चहाचे घोट घेत लाहोर शहर न्याहाळणे हा अक्षरशः आनंदानुभव होता. असे वाटले… हा क्षण असाच गोठवून ठेवावा.
तिथल्या शदमान मार्केटमध्ये एका मित्राने स्वेटर, चिलगोजा ह्यांच्या किमतीवरून घासाघीस चालवली होती. आपल्याकडे तरी आपण वेगळे काय करतो! समजा तुम्हाला कधी जगाच्या ह्या बाजूला येण्याचा योग आला, तर मी वर उल्लेख केलेल्या ठिकाणांना भेट द्याच. आणखी एक ठिकाण आहे, चमन आईस्क्रीम नावाचे. इथे आईस्क्रीमचे भन्नाट प्रकार मिळतात. आणखी एक ठिकाण आहे. त्या चौकाचे नाव ‘भगतसिंग चौक’ व्हावे यासाठी तिथल्या एका गटाचे प्रयत्न चालू आहेत. ह्याच ठिकाणी भगतसिंगला फासावर लटकवण्यात आले होते. त्यावेळी हा भाग लाहोर सेंट्रल जेलच्या आत होता. विकासकामांमुळे त्याचा संकोच होत गेला.
बालवाडीतली मुले आम्हाला ‘क्रिश’ कसा उडतो आणि तो कित्ती भारी आहे, वगैरे गोष्टी सांगत होती. जरा मोठी मुले मी त्यांना शाहरुख खानची भेट घ्यायला मदत करू शकते का, म्हणून विचारत होती. बॉलीवूड आणि चित्रपटांबद्दल मी एवढे बोलू शकेन, असा मी कधी विचारही नव्हता केला.
निरोप घेताना…
कामानिमित्त मी खूप फिरते. जिथे जाईन तिथल्या लोकांना निघताना ‘तुम्हीपण या, आमच्यासोबत राहा’, असे निमंत्रण देते. इथल्या लोकांनाही मला तसे म्हणावेसे खूप वाटत होते. पण मी तसे करणार नाही. कदाचित त्यामुळे त्यांना वाईट वाटेल. जर ते म्हणाले – आम्ही कसे येऊ, तर? त्यांना व्हिसा कसा मिळवून द्यायचा हे मला खरेच माहीत नाही.
महोत्सवात एका शिक्षिकेने मला ऑटोग्राफ मागितला. मला मिठी मारायची आहे म्हणाली. त्या दिवशी ती फक्त तेवढ्यासाठीच आली होती. तिची मिठी म्हणजे भारताला दिलेले आलिंगन होते, उत्कट पण कधी पूर्ण न होऊ शकणारी इच्छा! खरे तर मिठ्या मारणे वगैरे माझा प्रांत नाही; पण तिला मात्र मी नाही म्हणू शकले नाही.
पांढरी सीमारेषा ओलांडतानाचा माझा फोटो बघून लाहोरच्या एका मित्राने फेसबुकवर लिहिले :
‘‘ये लाईन का चक्कर है सारा, जिसने 20 करोड लोगोंको घनचक्कर बना दिया.’’
***
‘‘ते हिंदी गाणी का म्हणतात? त्यांची गाणी नाहीत का? पाकिस्तानी कलाकारांची रोजीरोटी भारतावर अवलंबून आहे.’’
‘‘तुम्ही दोघं पाकिस्तानला गेला आहात, हे ऐकून माझ्या मित्रांना धक्का बसला. मलाही कल्पना करणं जडच जातंय. मला तिकडच्या गोष्टी सांगा म्हणजे मी आणखी जाणून घेऊ शकेन.’’
टीव्हीवर कोकलून जे सांगितले जाते त्याव्यतिरिक्त काहीही माहीत नसणार्यांसाठी माझे अनुभव म्हणजे एक चिमुकला झरोका असू शकतो.
… आणि हे शब्द मला पुन्हा पाकिस्तानात जायला उभारी देतात :
‘‘थँक यू स्वाती आणि अग्यात. ह्या वेळी तुमच्यामुळे बालसाहित्य महोत्सवाची रंगत वाढली. अनेक जणांमध्ये बदल झाले. लाहोरमध्ये तुम्ही नक्की काहीतरी तार छेडलीत. बरेचजण तुमचे चाहते झाले आहेत. उङऋ च्या माध्यमातून ही सीमेपारची मैत्री झाली!’’
आम्ही विचार केला होता त्यापेक्षा आमच्या प्रवासाचा पट मोठा होता, हे आम्हाला भेटणार्या प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यातून आम्हाला उमगते आहे. तिथली माणसे, त्यांचे आसू आणि हसू, त्यांच्या अडचणी, भीती, तिथल्या जगण्याचे विविध रंग ह्याबद्दलची माध्यमे आपल्यापर्यंत पोचवत नसलेली माहिती आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचते आहे. जगातल्या इतर कुठल्याही ठिकाणांप्रमाणेच पाकिस्तान आहे. तिथे अनेक लोक राहतात, त्यांची एक संस्कृती आहे – रंगीबेरंगी; अक्षरशः लाखो छटा असलेली; बघू शकलात तर, किंवा बघायची इच्छा असली, तर!
स्वाती भट
swatiagyat@gmail.com
‘प्ले फॉर पीस’ संस्थेच्या प्रशिक्षक. संस्थेच्या कामानिमित्त भारतात तसेच विविध देशांमध्ये भटकंती. त्या निमित्ताने निरनिराळ्या लोकांशी, त्यांच्या रीतिरिवाजांशी जोडल्या गेल्या आहेत. चित्रपटनिर्मितीची आवड. त्यांच्या कामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्या Laughter Compassion Peace ह्या युट्यूब चॅनेलला भेट देता येईल.
अनुवाद : अनघा जलतारे
छायाचित्रे : स्वाती भट
