ठरवले आणि निभावले….
रेश्मा लिंगायत, खेळघर ताई.
खेळघरातील २री ,३री ,४थी चा वर्ग! मुलांना ताईने प्रश्न विचारला, “ १० रुपयांमध्ये खायला काय काय विकत मिळू शकेल?मात्र ते पौष्टिक असले पाहिजे.” एकेका मुलानी सांगितले. २० एक पदार्थ निघाले. त्याची यादी तयार झाली. उदा. १ रू ला छोटा गुलाबजाम ,५ रू ला शेंगदाणा लाडू मिळतो.इत्यादी त्यात यादीत शिजवलेल्या आणि कच्च्या पदार्थांचे वर्गीकरण केले. आम्ही त्यातून एक पदार्थ निवडला, उकडलेले अंडे ! त्यातून आपल्याला काय काय मिळते यावर बोलणे झाले. जे अंडे खात नाहीत त्यांनी तळलेली मूगडाळ आणायची असे ठरले.
आता प्रत्यक्ष उपक्रमाला सुरुवात झाली. प्रत्येकाला १० रू मिळाले. उकडलेले अंड कुठे मिळते ते तुम्ही शोधायचे किंवा घरून उकडून आणायचे ते तुम्ही ठरवा. कोणाची मदत नाही घ्यायची.घरून सुरी,ताटली घेऊन येणे.अंडे घेऊन आल्यावर काय करायचे ? अंडे सोलणे ,सुरीने चार भाग करणे,त्यावर लिंबू पिळणे,त्यावर चवी पुरते मीठ आणि तिखट पेरणे आणि चावून चावून खाणे. या सर्व गोष्टीत ताई मदत नाही करणार व विचारलेल्या प्रश्नाचे उतर पण नाही देणार. एवढे सांगितल्यावर मुले निघाली.
मुलग्यांना माहिती होते कुठे उकडलेले अंडे मिळते. त्यांनी अंडे आणले खेळघरात ठेवले. आता घरी सुरी आणि ताटली आणायला गेले.मुलीना उकडलेले अंड शोधायला जरा वेळ गेला.कारण त्यांना माहिती नव्हते पण ते अंड घेऊन घरी गेल्या बाकीचे समान घेतले मग खेळघरात आल्या. काही मुले घरी गेले नाहीत. बाकी चे सर्व आले होते, त्यामुळे त्याना वाटले उशीर झाला. त्यातल्या काहींनी मुलांनी कागद घेऊन हाताने तुकडे केले. काही मुलीनी हात धुऊन अंड सोलले साल कच-यात टाकली. सुरीने चार तुकडे केले. त्यावर लिंबू पीळले मग मीठ ,तिखट चवी पुरते पेरले.अथीर मुलांनी अंड कसं तरी सोलले त्याची साल पण निघाली नाही पूर्ण असं त्याचे त्याचे कसं ही तुकडे केले.हात अंगाला पुसले. त्यांना खाण्यात रस होता. काही मुलांना लिंबू पिळायला अवघड गेले.दोन मुले अंड न खाणारी होती.त्यांनी मूगडाळ आणून पाकिटातून काढून वाटीत घेतली त्यात लिंबू पिळले. हे सर्व निरीक्षण आम्ही ताया टिपत होतो. सर्वांचे होईपर्यंत थांबायचे होते. मग मुलांनी खाण्याचा आनंद घेतला. यश नावाचा मुलाने दोन कच्ची अंडी विकत घेतली आणि घरून उकडून आणली. त्यात त्याचा एक तास गेला. तरी, मी ठरवले ते करु शकलो हा आनंद त्याच्या मनात होता.या सर्व गोष्ट होत असताना लक्षात आले की काही मुलांनी पूर्ण सूचना नीट ऐकून घेतल्या नाहीत. काही मुलांनी करायचे म्हणून केले, काही मुले सुरवातीला वस्तीला फेरी मारून आले पण नंतर मात्र इतरांचे बघून आपल्या कृतीत सुधारणा केली. याच्यातून मूल कसा विचार करते, त्याला येणारे प्रश्न कसे सोडवतात ते कळले. सर्व झाल्यावर झालेल्या गोष्टीवर बोलणे केले. काय काय झाले? काय अडचणी आल्या?काय गमंत झाली?कुठे वेळ गेला? हे प्रत्येकाचे अनुभव ऐकताना इतर मुले भर घालत होती.तोच अनुभव मुलांनी लिहिला किंवा चित्र काढले. सर्व मुलांनी या उपक्रमाला आनंदाने प्रतिसाद दिला.