ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत.
एक आई – ‘तू नको! तू जा! बाबा पाहिजे!’ असं करतो माझा मुलगा. शाळेत जाण्यावरून काहीतरी बिनसलं काल. मग झालं! ‘मला बाबाच पाहिजे, तरच जाईन’ सुरू झालं. मागच्या आठवड्यात आम्ही माझ्या आईकडे गेलो होतो. प्रवासामुळे तो खूप थकला होता. मी झोपवत होते तर इतक्या वेळा ‘बाबा पाहिजे’ केलं, की आई म्हणाली, “अग जाऊ दे ना त्याला बाबाकडे!” माझ्या मुलाला मी नको, बाबा हवा; तेही थकलेलं, वैतागलेलं, दु:खी असताना, ह्याचं वाईट वाटतं. अशा प्रसंगी मला काय वाटतं ह्यापेक्षा त्याची गरज भागवणं महत्त्वाचं, हे नेहमी लक्षात ठेवायचा प्रयत्नही करते. पण…
बेकी – ‘तू नको, बाबा हवा’ ची कट्यार काळजात घुसल्यावर काहीही लक्षात ठेवणं अवघडच आहे. मला तू खूप आवडलीस. प्रामाणिकपणे स्वतःची जखम उघडी करून दाखवायला धाडस लागतं. तू विचारी आहेस आणि पालकत्वाकडे गंभीरपणे बघतेस हेही ह्यावरून कळतंय. तुझा मुलगा जे म्हणतोय, त्याबद्दल तुला जे वाटतंय ते अगदी नैसर्गिक आहे. असं वाटणारी तू एकटी नाहीस. अनेकांच्या बाबत हे घडतं; पण त्यांना बोलून दाखवायला आवडत नाही. मला सांग, तुझा मुलगा ‘बाबा हवा’ म्हणतो तेव्हा तुझ्या मते तो काय म्हणत असतो?
आई – ‘बाबा माझी जास्त चांगली काळजी घेतो… तुझ्यापेक्षा!’
बेकी – हे महत्त्वाचं आहे खूप. हे बरेचदा घडतं. मूल काय म्हणतं आणि आपल्या आत ते कसं पोचतं. ते म्हणतं ‘बाबा हवा’, आपल्याला ऐकू येतं – ‘बाबा तुझ्यापेक्षा चांगला पालक आहे!’ मुलं बोलतात, आपण त्याचं थेट काही तरी भलंमोठं भाषांतर करून ऐकतो, आपल्या पालकत्वावर आरोप करून घेतो आणि मग त्यानुसार प्रतिक्रिया निर्माण करतो. मला सांग, तुझं आणि मुलाचं गुळपीठ जमलंय, असं कधी होतं?
आई – खेळताना, पुस्तक वाचताना.
कालच आम्ही एक पुस्तक घेऊन लोळत होतो. सगळं पुस्तक गाऊन वाचायचं होतं आम्हाला! एकदम मस्त जोडी जमली होती आमची!
बेकी – ‘बाबा हवा’ प्रसंगी ही जोडी जमल्याची भावना कमी होते. त्यामुळे ‘आमची कधी तरी जोडी जमते का?’ सारख्या शंकांच्या खोल भुयारात विचारांची गाडी अडकत जाते. त्याऐवजी, भावनांचं अस्तित्व मान्य कर, त्यांना नावं दे. ह्याक्षणी मुलानं मला नाकारलंय, खूप वाईट वाटतंय, त्याची-माझी गट्टी असल्यासारखंच वाटत नाहीये आत्ता, धडधड वाढलीये, दुःख होतंय, त्याला मी नाही, बाबा हवाय ह्याचा राग येतोय… वगैरे वर्णन कर मोठ्यानं. भावनांना नावं दिली की त्या तुझं सगळं अस्तित्व व्यापून टाकणार नाहीत, तुझ्यातला एक भाग बनून राहतील. ‘असं वाटू शकतं, मी स्वतःला असं वाटण्याची परवानगी देते’ असंही म्हण पुढे. ही पहिली पायरी. ह्या पायरीवर पोचायचा आणि टिकून राहायचा सराव कसा करायचा ते शिकू आपण आधी. ते जमलं की मग, आई-मुलाचं नातं आणखीन घट्ट करायला हवंय का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची मेंदूची क्षमता विकसित होईल.
रुबी रमा प्रवीण

ruby.rp@gmail.com
पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.