परेश जयश्री मनोहर
पाऊसही ‘ओके’ असतो, पावसात भिजणंही ‘ओके’ असतं आणि आपल्याजवळ आपला हक्काचा रेनकोट असणं तर ‘ओके’ असतंच असतं.
ऑफिसमधून येऊन सवयीनं हातपाय धुऊन चहा मारत दिवसभराच्या गप्पा हाणायच्याऐवजी आज तो वेगळ्याच मूडमध्ये होता. ऐन उन्हाळ्यातही पावसाळ्याचा ‘फील’ देणारा दिवस, त्यात असलेलं लोड शेडिंग आणि इन्व्हर्टरच्या जिवावर कसाबसा फिरणारा पंखा यानं तिचा जीव गेलेला आणि यानं आल्या आल्या कपाट उपसायला सुरुवात केलेली.
‘‘अरे यार, एक गोष्ट धड सापडत नाही, कमाल आहे. आत्ताच तर बघितल्याचं आठवतंय. कुठे असेल बरं? नेमका हवा तेव्हा गोष्टी सापडत नसतील तर काय फायदा?’’
‘‘अरे काय हवंय तुला? काय भुणभुण करत बसलाय?’’
‘‘थांब ग तू जरा. शोधून काढल्यावर कळेलच की. साला नको तेव्हा हातात पडतात आणि हव्या तेव्हा कुठे जातात कळत नाही माझ्या गोष्टी.’’
‘‘काही फाईल शोधतो आहेस का? हार्ड डिस्क कालच नेली आहेस ऑफिसला. आता वर्क फ्रॉम होम संपलं आहे म्हणताना तुझ्या गोष्टी तू शिफ्ट केल्या आहेस; विसरलास का काय?’’
‘‘ओ अक्का, जरा थांबा. मला करू दे काय करायचं ते.’’
‘‘ते फॉर्मल्स तरी चेंज करतोस का, जरा फ्रेश हो, मग मलाही सांग, मिळून शोधूयात.’’
‘‘सोने, अग जरा गपतेस का? लग्न केलंयस का माझ्याशी? नाही ना, मग? जरा मला स्पेस दे न. नाहीच सापडलं तर सांगेन तुला. जा तोवर तुझे कॉल्स अटेंड करत बस. जा.’’
‘‘हे कूल. फक ऑफ विथ युअर स्पेस यार.’’
ती उठली आणि कॉफीचा मग घेऊन तिच्या डेस्कशी जाऊन बसली.
नुकताच फुगलेला शहराचा पसारा पोटात घेत वाढलेल्या या गाववजा उपनगरात असलेली ही सोसायटी. दोघंच राहणार असली आणि येणारे जाणारे नसले, तरीही स्वत:ची स्पेस वाटलंच तर असावी म्हणून आग्रहानं आणि जरासा ताण घेऊनच त्यांनी हा ‘टूबीएचके’ भाड्यानं घेतलेला. आम्ही लग्न न करताच सोबत राहणार असं म्हटल्यावर दोघांच्या घरातले त्यांच्याकडे ढुंकून बघण्याची शक्यताच नव्हती. पेपरात वाचायला आणि ओटीटीवर सिरीजमधून पाहायला ‘लिव्ह इन’ भारी वाटत असलं, तरी आपल्या घरात कोणी का म्हणून असले धंदे करेल असं वाटत जगणार्या घरातली होती ती दोघंही.
ती मोठ्या शहरात जन्मलेली. व्यापारी समाजात झालेला जन्म आणि सतत हिशोब करत जगणार्या घरात वाढलेली ती तिच्या घराला कधीच सूट न होणारी. पुस्तकं, सिनेमे, गप्पा आणि दोस्तमंडळी यांच्या गराड्यात रमलेली. गावात राहून जमेल तसं जगण्याचा प्रयत्न करणार्या छोट्या घरात वाढलेला तो. दोघंही तसे एकमेकांसोबत जगण्याचे रोमँटिक हिशोब घालायची शक्यता नसलेले; पण नोकरीच्या निमित्तानं भेटले, हळूहळू सोबत फिरणं, गप्पा, सिनेमे, ट्रेक करत निवांत दिवस घालवणं सुरू झालं. आधी मोठा मिक्स ग्रुप, मग सिलेक्टेड दोस्तांचा ग्रुप आणि नंतर नंतर दोघांनाच एकमेकांसोबत आवडायला लागलेलं अशी सगळी तर्हा. बराच काळ एकमेकांबद्दल सीरियस आहोत की नाही ते समजून घेण्याचा प्रयत्न करत, भांडत, शिवीगाळ करत शेवटी आपण सोबत जगू शकतो असं नक्की वाटतंय असं झाल्यानं, आता काय करूयात या वळणावर पोचायला दोन वर्षं लागली.
घरातल्या सततच्या वादांना कंटाळून लग्न नकोच असं तिचं ठरलेलं; तर ‘आपलं काही नाही, तू म्हणशील तसं’ म्हणणारा, फक्त ‘काहीही कर; पण मला आयुष्यातून घालवू नकोस’ एवढंच पालुपद घेऊन सोबत जगण्याचा प्रयत्न करणारा तो.
एका पावसाळी रविवारी त्यांच्या ग्रुपचा ट्रेक ठरला. दूरवर नजर जाईल तोवर भाताची खाचरं, मधल्या बांधांवरून समोर दिसणार्या डोंगररांगा. आभाळ भरून आलेलं पण पाऊस कोसळत नव्हता; पण कधीही उधाणून येईल अशी परिस्थिती. कोणत्याही ट्रेकला होतं तसंच आधीचा उत्साह, गाणी, भेंड्या करत निवांत सगळा गट सैलावला. मग ही दोघं मागे मागे पडत शेवटी मागेच राहिली आणि बाकीच्यांनी त्यांना तसं राहू दिलं असावंही.
ती हरखून गेलेली, एक तर नुकताच फुलू लागलेला निसर्ग, त्यात आवडू लागलेल्या माणसाची साथ. कोणत्या तरी पुस्तकात वाचलेल्या पाचूच्या बेटावर आपण दोघंच आहोत असं वाटत त्या बेहोशीत भोवतालाकडे बघत असलेली.
‘‘या एवढ्या पावसात त्या झोपडीत राहणार्या बाईची काय आबदा होत असेल न? ती गुरं काय करत असतील ग भिजताना? मायला पाऊस आहे का काय?’’ तिला आधी हा काही बोलला हे कळायला जरासा वेळ गेला. तो तसाही तिच्याशी बोलत नव्हताच. त्याच्या डोळ्यात आणि डोक्यात त्याच्या गावातला त्याच्या लहानपणीचा पाऊस होता. पत्र्याचं घर गळताना एका ठिकाणी एक पातेलं तर दुसरीकडे मग्गा, जरा धार मोठी असली तर घरातली बादली, दारातून आत येणार्या शिंतोड्यांसाठी पोतं असा सगळा सरंजाम करावा लागायचा. आणि तरीही तो गावातल्या सगळ्यात गरीब वस्तीमध्ये राहत नव्हता. तिकडं तर काय काय होत असेल याचा अंदाज त्याला दुसर्या दिवशी मित्रांशी बोलताना यायचा.
तर ती म्हणाली, ‘‘काय रे? काय विचार करतोय? गाव आठवलं का?’’ त्यानं मान हलवली तर तिनं त्याचं डोकं घुसळलं आणि म्हणाली, ‘‘देख यार, याही घरातून कोणीतरी निघेलच की तुझ्यासारखा. मनात सगळं गावातलंही राखून ठेव; पण इथली ही भन्नाट सुंदरताही मनाच्या गाभार्यात पोचू दे.’’ त्यानं मान झटकली आणि हसला. तो त्यांच्या आयुष्यातल्या नंतर येणार्या अनेक बेमिसाल ट्रेक्सपैकी पहिला ट्रेक ठरला.
तिची भूतकाळ मागे टाकण्याची क्षमता अफलातून होती, तर त्याची भूतकाळाशी बांधलेली नाळ फार घट्ट होती. ती तुटलेली नव्हती; पण अडकलेलीही नव्हती. तोही अडकला नव्हता; पण घुटमळत राहायचा आसपास. तिला लहानपणी अनेक गोष्टी कराव्या लागायच्या, ज्याचा काहीही अर्थ तिला लागत नसायचा; तर याला अनेक गोष्टी करता येत नव्हत्या, ज्या त्याला करायच्या असायच्या असा सगळा असल्यानसल्या जगण्याचा मेळ घालत ते सोबत चालायचा प्रयत्न करत होते.
शहरात नोकरीला लागल्यावर त्यानं घर नीट करायला सुरुवात केलेली. सगळ्या बेसिक गोष्टी बांधत आईवडिलांची सोय लावून तो मोकळा होत असतानाच या प्रेमाच्या जाणिवेनं त्याला वेगळं जग दाखवलं. गावाच्या मानानं समजूतदार, विचारी असला तरीही त्याच्या विचारांना कोणत्याही धाडसी कृतीची जोड नव्हती. जिथे प्रेम करणं हेच एक धाडस, तिथे प्रेम करून लग्न न करता राहायचा विचार म्हणजे पापच.
‘‘ही आवलादच बारा बोड्याची आसन. मायला, झवायची सोय पायजे म्हून असली नागडी धंदी करायची व्हय. आई घालायची आसंन त आपली जात पाह्य, पातीला बस्त्यात का ते पाह्य, हे काय आणलं म्हनी तुह्या मायचा भोसडा मायला. झाटभर नोकरी आन् हातभर पैसा आला त काय आमच्यावर उडणार व्हय रे?’’
बापाची झड काही थांबायचं नाव घेईना म्हणताना त्यानं आशेनं आईकडे बघितलं. तर आईनं जरा समजूतदारपणाचा भाव घेऊन नवर्याला गळ घातली. ‘‘व्हय वो, जाऊ द्या न. न्हाई जातीची त न्हाई, पर मनतोय त भेटून तं घेऊ. व्हय रं, जातीची मरू दे, पर लगन त कर. गावजेवण त घालाय नकू व्हय.’’
‘‘नाही आई, जेवण नाही घालणार आम्ही कोणाला.’’
‘‘अय येड्या भोकाच्या! जेवण न्हाई द्यायचं त लगीनतरी कशाला व्हय करताय रे.’’
‘‘नाहीच करायचं आम्हाला लग्न.’’
‘‘मायला तुह्या…’’ म्हणत बाप उठलाच. आईनंही भिंतीकडे तोंड केल्यावर, अनेक दिवस पाठ केलेली वाक्यं तो एका दमात बोलला आणि निघाला.

निघाला खरं; पण पिढ्यानपिढ्या लग्न घर संसार करत जगलेल्या घराला, भावकीला आणि गावाला ‘नेमकं लग्न का करणार नाही?’ याचं काय उत्तर द्यावं हे त्याला अजूनही कळलं नव्हतंच. लग्न करायचं नाही म्हणजे काय हे जसं त्याला कळत नव्हतं, तसंच लग्न करायचं म्हणजे नेमकं काय हेही कळत नव्हतंच. आपण लग्न करावं की नाही हे कळायच्या आतच शिक्षण संपून नोकरी करताना तो दोस्तीच्या रस्त्यानं प्रेमाच्या वाटेवर आला.
तिच्या घरी जेव्हा कळलं, की जातीबाहेर जाणार तेव्हाच त्यांनी तिला घराबाहेर काढलेलं. जास्त वाद, वैचारिक चर्चा, खडाजंगी याला तशीही फार जागा नव्हतीच त्यांच्यात. ती बाहेर पडली तेव्हा तिच्या मनात लग्न न करण्याच्या कारणांची उजळणी आणखीनच घट्ट होत होती. लग्न म्हणजे चुकते करायचे हिशोब, आईचं सतत दबलेपण, बापाची मुजोर दादागिरी, भावांचा पुरुषी मस्तवालपणा आणि नातेवाईक जमातीचा अगोचर हस्तक्षेप. अगदी कळत्या वयापासून तिनं हेच तर बघितलेलं. लग्न, नातेसंबंध, त्यातून येणार्या अपेक्षा, बंधनं, जाच या सगळ्यांच्या पलीकडे जगायचा निर्णय ती घेत होती. म्हणूनच शक्य तेवढे दिवस तिनं लग्न हा विषय टाळलेला. घरचेही ‘करते आहे नोकरी तर करू दे उलट बरा जावई मिळेल’ म्हणून गपगुमान होते. तर नोकरीत हा भेटला आणि लग्न न करण्याच्या वाटेवर प्रेमाचं हे वळण लागलं. मग तिनं पुढाकार घेऊन आपण लग्न न करताच राहूया असं त्याच्याशी बोलायला आणि घरच्यांनाही सांगायला सुरुवात केली. त्यालाही आधी नवीनच होतं हे सारं.
‘‘आता प्रेमात आहोत तर लग्न करायला काय होतंय? सारी दुनिया लग्न करते आणि सारी दुनिया नीट जगते. आता तुझ्या घरात आहेत लफडी म्हणून सगळ्या घरात तेच असेल का? आपण ट्राय तर करूयात यार.’’
‘‘लग्नाचा मूळ आधार काय हे तर सांग.’’
‘‘आधार कशाचा असायला लागतोय. करतात म्हणून करतात. तसंच आपणही करायचं.’’
‘‘मग न करता सोबत राहिलो तर काय बिघडलं? आज सोबत आहोत, प्रेम आहे असं वाटतंय तर सोबत राहूयात, उद्या नाहीच वाटलं प्रेम तर निघायचं. मला कोणतीही कमिटमेंट नकोय, द्यायचीही नाहीये आणि तुझ्याकडूनही नकोय सात जन्माच्या शपथा.’’
‘‘अरे! थांब न जरा. गावच्या पावसात जसं गारठायला व्हायचं आणि कोपरा धरायला पळापळ व्हायची तसंच होतंय राव. हा काय प्रकार आहे यार? लग्न नको ठीक. पण कमिटमेंटही नको हे कसं काय? याला काय अर्थ आहे? आपण प्रेम करतो न एकमेकांवर? मग कमिटेड आहोतच न?’’
‘‘हे आता आपल्याला वाटतंय न? मग आता या क्षणी आपण कमिटेड आहोतच की. पण त्यासाठी उद्याच्या शपथा का? आज ज्याला आपण प्रेम म्हणतो उद्या त्याचंच ओझं वाटायला लागलं तर ते का वाहायचं? बोल नं?’’
‘‘ए माझे आई, तू म्हणशील तसं करूयात. मला या गोष्टी विचार करायला, पचायला नव्या आहेत. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू म्हणतीस तसं ओझं नकोय ना व्हायला आपल्या प्रेमाचं काय आणि नात्याचं काय. फक्त मला या सगळ्या गोष्टी नवीन आहेत तर मला सोबत राहू दे यार. तुझ्यामाझ्या आधारानं आपण पुढं जाऊयात तरी.’’
मग अनेक ट्रेक्स, अनेक संध्याकाळी अनेक तासांच्या वादावादीत घालवल्यावर ते इथवर पोचले.
या सगळ्यात त्याचा पाऊस त्याच्या सोबत असायचाच. पावसातलं गळकं घर आणि भिजक्या आठवणींनी त्याच्या मनातला मोठा कोपरा व्यापलेला. तो तिला ‘रेनकोट’ म्हणायचा तर तिला आधी कळायचंच नाही. ‘मी काय प्लास्टिकची आहे का?’ ती नकट्या रागानं फुरंगटून त्याला म्हणायची. तर तो म्हणायचा, ‘नाही ग, बाहेरच्या पावसापासून मला वाचवणारी जादू आहेस तू. पत्र्यावरून केसांवर आणि तिथून कॉलरवर, मग तिथून एक रेष धरून पाठीच्या पन्हाळातून घुसणारा पाऊस तुला माहिती नाहीये, म्हणून तुला तू रेनकोट आहेस हे कळत नाहीये; पण तू आहेस. माझा प्रेमाचा रेनकोट!’

ती म्हणायची, ‘सगळ्या भित्या घालवणारा माझा पाऊस आहेस तू. ज्याच्या नुसत्या येण्यानं सर्जनाच्या हजार कल्पना जन्मतात तो पाऊस आहेस तू. प्रत्येकच पाऊस नकोसा नसतो हे सांगणारा माझा पाऊस आहेस तू.’
तर एकदम निवांत जगत असताना अचानक आजची संध्याकाळ आली. एरवी फार निवांत असणारी संध्याकाळ आज एकदम हायपर होती. त्याला नेमकं काय हवंय हे कळत नसल्यानं ती अस्वस्थ होती आणि ह्यानं पूर्ण कपाट उपसून ठेवलेलं. खोलीची अवस्था बिकट करून ठेवलेली. सगळीकडे कपाटभरच्या वस्तू सांडून ठेवलेल्या.
शेवटी तासाभराच्या शोधाशोधीनंतर तो हातात एक पुडकं घेऊन आनंदानं सॉरी म्हणत तिच्या खोलीत आला.
‘‘उगाच हायपर झालो मगाशी. तुलाच शोधत होतो आणि तुलाच बोललो उगाच.’’
‘‘सापडली का जादूची कांडी? काय शोधत होतास? आणि आता ती खोली तूच आवरणार आहेस हेही लक्षात ठेव.’’
‘‘करतो ग जानेमन. बघ तरी काय सापडलं आहे मला.’’
‘‘ढिश्क्याव!’’ त्यानं ती जुनाट प्लास्टिकची थैली मोकळी केली, तर आतून रेनकोट निघाला. फुलाफुलांचा. जुनाच पण लाडाचा असावा तसा. त्यानं हातावर प्रेमानी घेतलेला तिच्यासमोर धरला.
तिनं कपाळावर हात मारून घेतला.
‘‘अरे तुला नाही माहिती. मी पाचवीत असताना माझ्या मावशीनं मला हा रेनकोट दिलेला. अख्ख्या गावात फक्त माझ्याकडे होता असला रेनकोट. सगळी पोरं एक तर भिजत नाही तर डोक्यावर पोतं घेऊन शाळेला यायची. मीही तसाच जायचो.’’
‘‘तर जेव्हा मला रेनकोट मिळाला, मी फार खूश. फुलाफुलांचा लांबच्या लांब, माझ्या गुडघ्याच्याही खाली पोचायचा. मस्त मोठाली प्लास्टिकची चार बटणं असलेला, त्याची कॉलर अशी टाइट होती, ती पुढे माझ्या ओठांपर्यत यायची आणि गंमत म्हणजे सोबत एक टोपीही होती, भगतसिंगच्या प्रसिद्ध टोपीसारखी. खरं तर, मी अख्खा मिळून चार-साडेचार फुटांचा आणि त्यात कसा दिसत असेन कल्पना कर. मला याचा अंदाज नाही कारण एवढा मोठा आरसाच नव्हता न घरात. तर असा हा आयुष्यात हवा असणारा रेनकोट आला.’’
‘‘मी पावसाची वाटच बघत बसलेलो. पाऊस आला की आपण रेनकोट घालणार, अख्ख्या रस्त्यावरून जाताना आपण भिजणार नाही, आपलं दप्तर भिजणार नाही. काय काय विचार. आणि मग खरंच पाऊस आला. मी रेनकोट घातला. घरातून बाहेर पडलो. बाजारआळीतून जाताना सगळे माझ्याकडे बघत होते. पाऊस आणि भिजणं सवयीचं होतं; पण रेनकोट? तो सवयीचा नव्हता न. लोक मला हसताहेत असं वाटायला लागलं. माझा धीर खचायला लागला. तरीही शाळेत गेलो. वर्गात पाय टाकला तर सगळी मुलं एकदम जोरात हसायला लागली. मला एकदम लाजच वाटली.’’
‘‘मला लक्षात आलं, की पाऊस असणं ‘ओके’ आहे, पावसात भिजणंही ‘ओके’च आहे. ‘ओके’ नाहीये ते पाऊस असताना बाकीचे भिजत असताना आपल्याकडे रेनकोट असणं. मग मी काय केलं माहितेय? रेनकोट पावसाळ्यात दडवून ठेवला आणि उन्हाळा आल्यावर डोक्यावर टोपी आणि अंगात रेनकोट घालून चोर-पोलीस खेळायला लागलो. बरेच दिवस गेले आणि पाऊसही तसा राहिला नाही; पण रेनकोट मी सोबत ठेवलाच. आता इतक्या वर्षांनी तुझ्यासोबत पाऊस झेलताना मला आठवलं, म्हणजे कळलंच, की पाऊसही ‘ओके’ असतो, पावसात भिजणंही ‘ओके’ असतं आणि आपल्याजवळ आपला हक्काचा रेनकोट असणं तर ‘ओके’ असतंच असतं.’’
‘‘आता तू म्हणशील की आज हा सगळा उद्योग करून का मी हे रेनकोटपुराण घेऊन बसलोय? तर डार्लिंग आज तारीख किती?’’
‘‘अकरा मे?’’
‘‘मग?’’
‘‘अरे कमाल आहे तुझी! तुला न काहीच आठवत नसतं. मागच्या वर्षी आपण त्या आपल्या आवडत्या जागी पडलेलो गप्पा मारत, सूर्य जरासा झुकलेला आणि पाखरांनी घर गाठायला सुरुवात केलेली. लग्न करणं, न करणं, यातून येणार्या नकोशा परंपरा आणि बंधनं यावर अनेक वेळा बोलूनही पुन्हा आपण बोलत बसलेलो.’’
‘‘तुला लग्न करायचं नव्हतं; पण माझ्या मनात तर लग्नाची आस. मग तू म्हणालीस, एक काम करू. मनातल्या मनात आपण लग्न करू. आज अकरा मे, आज आपली हळद आणि उद्या बारा मे, उद्या आपली लग्नाची तारीख.’’
‘‘मग आपण घरी आलो. मी तुला मिसळणाच्या डब्यातली चिमूटभर हळद लावली. आणि ’’
‘‘बास रे बास… त्यात तिखट मिसळलं होतं, मी दोन तास डोळे चोळत बसले होते, आठवतंय ते सगळं मला.’’
‘‘ऐक ना. तर आज आपल्या मानलेल्या हळदीची पहिली वर्षगाठ आहे. न कोणत्या परंपरा न कोणती बंधनं. आपण आणि आपलं प्रेम. आज मी माझा घट्ट धरून ठेवलेला हा भूतकाळ तुला साक्षी ठेवून बाजूला करणार आहे. तेव्हा मला पाऊस नकोसा होता. हा रेनकोट माझ्याकडे होता; पण पावसापासून वाचवत नव्हता.’’
‘‘आज मला पाऊसही हवाय, त्यात मनसोक्त भिजायचंही आहे आणि भीती वाटलीच तर माझ्याकडे माझा हक्काचा रेनकोट आहे. तू माझा रेनकोट आहेस.’’
परेश जयश्री मनोहर
paresh.jm@gmail.com
भारत ज्ञान-विज्ञान समुदाय संघटनेचे कार्यकर्ता. गेली 22 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करतात. गेली 8 वर्षे टाटा ट्रस्टमध्ये अॅनॅलिटिक्स इनसाइट्स अँड इम्पॅक्ट टीममध्ये काम करतात.
चित्रे : भार्गवकुमार कुलकर्णी
