दीपस्तंभ – जानेवारी २०२४
संपूर्ण जगात ते अगदी आपल्या आसपास सर्वत्र अराजकाची परिस्थिती असताना मनात आशेचा दीप तेवत ठेवणाऱ्या लघुकथांचे सदर…
कोलकत्याच्या अत्यंत गजबजलेल्या ब्रेबॉर्न रस्त्यावर मॅगेन डेव्हिड सिनेगॉगच्या उंचच उंच खिडक्यांच्या तावदानांमधून दुपारची उन्हं जमिनीवर सर्वत्र पसरली आहेत. पांढरा शुभ्र गणवेश घातलेला 44 वर्षांचा अन्वर खान आपल्या कामात मग्न आहे. चकाचक पॉलिश केलेल्या सागवानी खुर्च्या तो ओळीत मांडून ठेवतो आहे. तसं सिनेगॉगला भेट द्यायला हल्ली फारसं कुणी येत नाही म्हणा. मुळात आणि ह्या विस्तीर्ण पसरलेल्या शहरात ज्यू लोक आता उरले तरी किती आहेत! पण म्हणून अन्वरची आपल्या कामावरची श्रद्धा जराही कमी होत नाही. तो तिथला प्रमुख ‘केअरटेकर’ आहे. मंदिर स्वच्छ राहावं म्हणून झाड-पूस, झटकपटक असा त्याचा मन लावून उद्योग चाललेला असतो.
तिकडे दूर गाझापट्टीवर इस्रायलींचा अथक बॉम्बवर्षाव सुरू आहे. आजवर हजारो पॅलेस्टिनी त्यात मारले गेले आहेत. ह्या सगळ्याची सुरुवात झाली ऑक्टोबरच्या 7 तारखेला. हमासनं इस्रायली भागावर हल्ले करून 1400 लोकांचे प्राण घेतले आणि दोनेकशे लोकांना ओलीस ठेवलं. मात्र मॅगेन डेव्हिड सिनेगॉगच्या त्या शांत सभागृहात ह्या घटनेचे कुठलेही पडसाद उमटलेले दिसत नाहीत.
अन्वर म्हणतो, ‘‘ते उभं राहून नमाज (प्रार्थना) पढतात; आम्ही बसून, एवढाच काय तो फरक!’’ तो 20 वर्षांचा असल्यापासून ह्या 140 वर्षं जुन्या रेनेसाँ-शैलीतल्या सिनेगॉगमध्ये ‘केअरटेकर’ आहे.
अगदी आत्ता 75 वर्षांपूर्वीपर्यंत कोलकत्यातल्या सगळ्या सिनेगॉगमध्ये चैतन्य असे. अठराव्या शतकाच्या शेवटी ह्या शहरात पहिल्यांदा ज्यू लोक आले. त्यावेळी इथे पाच सिनेगॉग होती. आता ही संख्या तिनावर आलेली आहे. पाच हजारापेक्षा जास्त असलेले ज्यू आता अवघे वीसच्या आसपास उरलेले आहेत.
मात्र, ह्या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट आजही टिकून आहे. सिनेगॉगच्या केअरटेकरच्या अनेक पिढ्या झाल्या. ही सगळी माणसं शेजारच्या ओडिशामधल्या काकतपूर गावातलीच असतात. आणि विशेष म्हणजे ती सगळी मुस्लीम आहेत. तीन सिनेगॉग मिळून सहा मुस्लीम केअरटेकर आहेत. हे सगळे तिथेच आवारातल्या क्वार्टरमध्ये राहतात. कधीमधी सणावाराला जातात घरच्यांना भेटायला. झाडझूड, साफसफाई ह्या सगळ्यात भल्या पहाटेच त्यांचा दिवस सुरू होतो. फर्निचरचं पॉलिश व्यवस्थित आहे ना, विजेची सगळी बटणं नीट चालताहेत ना… एक ना दोन. आलेल्या पाहुण्यांना फिरवणं, त्यांना माहिती सांगणं, हेही तेच करतात. अर्थात, हल्ली हे कमीच घडतं.
कोलकत्यामधले ज्यू किंवा सिनेगॉगचे हे मुस्लीम केअरटेकर इस्राइल-हमास युद्धाबाबत अनभिज्ञ आहेत अशातला काही भाग नाही. जगात काय चालू आहे, हे त्यांना माहीत आहे. कोलकत्यातही डाव्यांच्या आणि मुस्लिमांच्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चे, निषेध-सभा झाल्या; पण आम्ही कुणाच्याही दबावाला जुमानलं नाही, असं हे केअरटेकर सांगतात.
‘‘माझ्यासाठी हे सिनेगॉग आमच्या मशिदीपेक्षा अजिबात वेगळं नाही. मरेपर्यंत आम्ही त्याची काळजी घेत राहू. नमाज पढताना मी युद्धात पोळणाऱ्या सर्व धर्मांच्या लोकांसाठी प्रार्थना करतो. मुस्लीम आणि ज्यू, सगळ्यांनाच ह्यामुळे त्रास सोसावा लागतो आहे. सर्वांचे भोग लवकरात लवकर संपोत अशी आशा करूया.’’ अन्वर खान म्हणतो.
स्रोत : अल् जझीरा वृत्तवाहिनी